आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपरती माफीनाम्याची (अग्रलेख)

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून २०११मध्ये दिल्लीतील जंतरमंतरवर अण्णा हजारेंचे उपोषण अरविंद केजरीवाल यांच्या ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ या संस्थेने आयोजित केले होते. तो काळ असा होता की, अण्णा हजारे, रामदेवबाबा, किरण बेदी, भूषण पिता-पुत्र आणि केजरीवाल अशी पंचकडी लोकपाल विधेयक व भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून यूपीए-२ सरकारवर तुटून पडत होती. त्यांच्याकडून जागोजागी संसद सदस्यांची खुलेआम गलिच्छ पातळीवर टिंगलटवाळी केली जात होती. सर्व नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले जात होते. हे आरोप करण्यात केजरीवाल हे अग्रभागी होते.


सीमाशुल्क खात्यात वरिष्ठ पदावर काम करत असल्याने नोकरशाहीचा चांगला अनुभव असणारे आणि माहिती अधिकारासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठेचा रॅमन मॅगेसेसे पुरस्कार मिळाल्याने केजरीवाल यांच्या सर्व आरोपांत तथ्य असल्याचा ग्रह देशभरातील मध्यमवर्ग विशेषत: उच्चशिक्षित इंग्रजाळलेल्या तरुणांनी, उदारमतवादी-लोकशाहीवादी विचारवंतांनी व मीडियाने करून घेतला होता. त्यामुळे केजरीवाल यांची प्रतिमा अमिताभ बच्चन यांच्या ‘अँग्री यंग मॅन’शी तुलना करणारी झाली होती. सामान्यांचे (अधिकांश मध्यमवर्ग) पाणी-वीज-घर-भ्रष्टाचार असे प्रश्न मांडणारा, नैतिकेची भूमिका मांडणारा व आदर्श राजकारणाविषयी सामान्यांच्या मनातील भावनांना मांडणारा नेता या देशाला अनेक तपांनी गवसला, असे वातावरण देशभर झाले होते. केजरीवाल थेट नेत्यांची नावे घेत सनसनाटी निर्माण करत असत. त्याने त्यांची लोकप्रियता वाढत गेली, पण त्या बळावर त्यांनी आम आदमी पक्ष स्थापन करून दिल्ली विधानसभा निवडणुकांत भाजप व काँग्रेससारख्या मातब्बर पक्षांना धूळ चारली. निवडणुकीच्या अशा यशामुळे केजरीवाल अधिक बेताल झाले. आपणच नैतिकवादी राजकारणी, बाकीचे भामटे अशा थाटात ते वागू लागले. पण या देशात प्रत्येकाला मतस्वातंत्र्य, न्याय मागण्याचे स्वातंत्र्य आहे, प्रत्येक जण स्वत: स्वच्छ आहोत हे सिद्ध करू शकतो. केजरीवाल यांना हे कायदेशीर हक्क माहिती नसल्याने ते निर्धास्त होते, पण केजरीवाल यांच्याविरोधात भाजपचे अरुण जेटली, नितीन गडकरी, काँग्रेसच्या शीला दीक्षित व पंजाबमधील माजी मंत्री मजिठिया यांनी मानहानीचे दावे दाखल केले तेव्हा कायद्याच्या पातळीवर आरोप सिद्ध करण्याची केजरीवाल यांच्यावर वेळ आली आणि ते पद्धतशीर अडकले गेले. आता चार वर्षांनंतर न्यायालयात आरोपांचे पुरावे देता येत नसल्याचे लक्षात आल्यानंतर केजरीवाल एकेकाला माफीनामे देत सुटले आहेत. गेल्या आठवड्यात त्यांनी मजिठिया यांची माफी मागितली आणि आपल्याभोवती संशयाचे ढग निर्माण केले.  

 

केजरीवाल यांचे माफीनामे म्हणजेे त्यांच्या चांगुलपणाचे किंवा त्यांच्यामध्ये परिपक्वता आली, असे मानले तरी ज्या आरोपांवर त्यांनी लोकांच्या मनातील संताप बाहेर काढून सत्ता मिळवली त्या मतदारांपुढे आपण केलेले आरोप खोटे होते असे ते सांगतील का? केजरीवाल व त्यांच्या काही सहकाऱ्यांच्या मते न्यायालयीन लढ्यात ऊर्जा खर्च करण्यापेक्षा ही ऊर्जा लोकहितासाठी राबवण्यासाठी हे माफीनामे आहेत. हा युक्तिवाद मानला तरी भविष्यात केजरीवाल अन्य पक्षांच्या नेत्यांवर आरोप करणार की नाहीत? राजकारणात विरोधकांची माफी मागणे ही दुर्मिळ बाब असली तरी या खेळामुळे नेत्याची राजकीय प्रतिमा ढासळते. मतदारांचा विश्वासही कमी होतो. केजरीवाल यांनी स्वत:ची प्रतिमा विश्वासार्ह व प्रामाणिक नेता अशी केली होती व ते आता स्वत: आपण चूक केली, असे सांगतात तर खरे केजरीवाल कोणते, हा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो. रावणासारखी अनेक तोंडे घेऊन राजकारण करता येत नाही, ते संघटना करू शकतात, नेता नाही. भविष्यात केजरीवाल मतदारांपुढे व न्यायालयांपुढे पुरावे ठेवून राजकीय टीका करत असतील तर ती एक आगळीवेगळी घटना म्हणावी लागेल. पण केजरीवाल यांचा गेल्या सात-आठ वर्षांतला राजकीय प्रवास हा बेबंद स्वरूपाचा आहे. त्यांच्या पक्षाचा प्रभाव कमी होत आहेच, पण तेथे बेदिलीही माजली आहे. नैतिकतेचा अहंगंड बाळगून राजकारण करणे ही कसरत असते. केजरीवाल यांनी अजून जेटली व शीला दीक्षित यांची माफी मागितलेली नाही. हे दोन नेते आगामी निवडणुका पाहता त्यांना माफी देतील का, हाही उत्सुकता निर्माण करणारा प्रश्न आहे. शिवाय प्रशांत भूषण, योगेंद्र यादव, आनंद कुमार हे त्यांचे एकेकाळचे जवळचे साथीदार यांची ते माफी मागतील का, हेही महत्त्वाचे आहे. माफी मागून नैतिक उंची येते, असे मानले तरी खरी नैतिकता सत्य बोलण्यात असते. केजरीवाल यांचा माफीनामा या परिप्रेक्ष्यात पाहायला हवा.

बातम्या आणखी आहेत...