आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपोषणांची नाटके (अग्रलेख)

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रतिस्पर्ध्यावर त्याचेच अस्त्र उचलायचे, ही रणनीती राजकारणात नरेंद्र मोदी-अमित शहा दुकली यांनी केव्हाच आत्मसात केली आहे. म. गांधींच्या सत्याग्रहरूपी नि:शस्त्र प्रतिकारापासून आताची काँग्रेस चार हात लांब आहे. नव्हे, ती अनभिज्ञ आहे. पण गांधीजींनी ब्रिटिश राजवटीच्या विरोधात केलेल्या राजकीय चाली-क्लृप्त्या मोदी व शहांना आठवतात.  वाचकांना आठवत असेल की गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांनी काही तास अन्न वर्ज्य करून उपोषण केले होते व मीडियाला त्याचे मोठे अप्रूप वाटले होते. कारण तोपर्यंत मोदी उपवास करतात, हे या देशाला माहिती नव्हते. एकीकडे विकासरूपी राजकारण व वागण्यात गांधी विचारसरणी मोदींकडे आहे, हेच धक्का देणारे होते. ज्या संघ परिवाराने गांधीजींना प्रात:स्मरणीय मानले होते, पण गांधींच्या अहिंसक तत्त्वज्ञानापासून स्वत:ला दूर ठेवले होते, त्या संघ परिवाराचा एक कट्टर स्वयंसेवक गांधीजींनी आखून दिलेल्या आत्मक्लेशाचा मार्ग अनुसरत आहे, ही मोदींच्या राजकीय प्रवासाला निश्चितच कलाटणी (टीआरपी) देणारी घटना होती. मोदींच्या अशा हेतूवर काँग्रेसही आक्षेप घेऊ शकत नव्हती. कारण गांधीजी आपले आहेत, असे म्हणण्याची नैतिकता त्यांनी केव्हाच गमावली होती. त्यांच्याकडे नैतिकवान असे सांगणारा नेताही नव्हता. काँग्रेसची ही गोची पाहून व त्या काळातले देशातील राजकीय वातावरण आजमावत मोदी उपोषणास बसले.


२०१०-११ चा काळ तसा देशात अनेक ‘तोतया’ गांधींनी व्यापला होता. अहिंसा, सत्याग्रह, उपवास, आत्मक्लेश अशा गांधीतत्त्वांना भलतेच उधाण आले होते. ती काँग्रेसविरोधातील राजकीय अशी मोठी लाट होती. या लाटेत काँग्रेस भुईसपाट झाली, पण या लाटेत ‘तोतया’ गांधींऐवजी साबरमतीचे मोदी सत्तेवर आले. मग मोदींनी जगभर फिरताना गांधी तत्त्वज्ञानाचा जयघोष केला, शिवाय येणाऱ्या-जाणाऱ्या परदेशी पाहुण्याला साबरमतीची चक्कर मारण्यास, तेथे सूतकताई करणे सक्तीचे केले. आता सोमवारचे काँग्रेसचे फसलेले उपवासरूपी उपोषण लक्षात घेऊन मोदी-शहा दुकली आमच्या सरकारला विरोधक संसदेत काम करू देत नसल्याच्या निषेधार्थ दिवसभर अन्नत्याग करत उपोषणाला बसणार आहेत. मोदी पंतप्रधान असल्याने त्यांच्याकडे अनेक सरकारी अधिकारी, देशी-विदेशी पाहुण्यांचा सततचा राबता असतोच. त्यात अनेक फायलींवर सह्या मारायच्या असल्याने व उपोषणात काही तास खर्च करणे म्हणजे देशाचे काही तास वाया घालवणे हे राष्ट्रपाप असल्याने मोदी उपोषणादरम्यान आपले कार्यालयीन काम करणार असल्याचे समजते. तिकडे भाजपचे अध्यक्ष अमित शहा हुबळी-कर्नाटकात निवडणूक प्रचार दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यातच ते उपोषणाला बसणार आहेत. एकुणात देशाचा पंतप्रधान व सत्तेत असलेल्या पक्षाचा अध्यक्ष एकाच वेळी देशाच्या भल्यासाठी, संसदेची विरोधी पक्षांना घालवलेली प्रतिष्ठा पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी उपोषणाला बसणार आहेत. हा भारतीय लोकशाहीतला आगळावेगळा, विरळा ऐतिहासिक क्षण यापूर्वी कोणी पाहिला नसेल. ९०च्या पिढीने ज्यांनी मोदींना भरभरून मते दिली त्यांना मोदींच्या बहुरूपी व्यक्तिमत्त्वातील एक नवे रूप या निमित्ताने दिसून येईल. देशातल्या शेकडो इंग्रजी-हिंदी-प्रादेशिक न्यूज चॅनेलच्या पत्रकारांनीही असा इव्हेंट त्यांच्या कारकीर्दीत कव्हर केलेला नसेल, अशा सर्वांसाठी ही सुवर्णसंधीच म्हटली पाहिजे. शिवाय मोदी भक्तांना इतिहासाचे आपण साक्षीदार आहोत, असा एक दिलासाही त्यानिमित्ताने मिळेल.  

 

काँग्रेसने संसदेत भाजपला विरोध करताना किती गांधीजी वापरले हे सर्वांना माहिती आहे. भाजपनेही संसदेत विरोधकांना संधी देताना कोणत्या संसदीय लोकशाही मूल्यांचे पालन केले हेही जनतेला माहिती आहे. गांधीजी उपवासाच्या माध्यमातून देशातील गोरगरीब जनतेला ब्रिटिशांच्या जुलमी राजकीय-आर्थिक- सामाजिक धोरणांचा कसा फटका बसतो याकडे जगाचे लक्ष वेधावे म्हणून प्रयत्न करत होते. त्यामागे समाजहिताचे व्यापक उद्दिष्ट होते. मोदी-शहा असो वा राहुल गांधी असो, यांना गांधीजींचे राजकारण करायचे असेल तर त्यांनी आपल्या संघटना अशा विचारांनी परिपक्व करण्याची गरज आहे. गांधीजी दलित प्रश्नांविषयी संवेदनशील होते म्हणून ते आत्मक्लेश करून घेत होते. आताचे सत्ताधारी दलितांवर, शोषितांवर अत्याचार करणाऱ्यांना क्लेश न देता निवडणुकांचा विचार करतात. त्यांचे आत्मक्लेश कोणते उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून केले जाणार आहेत हे उलगडून दाखवण्याची गरज नाही. गंमत अशी की, मोदी-शहा यांनी काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध गांधीवादी समाजसेवक अण्णा हजारे यांच्या सत्याग्रहाला ‘मॅनेज’ करून त्यांना नारळपाणी दिले होते. आता नियतीने मोदींवर संसदेची प्रतिष्ठा अबाधित राखण्यासाठी उपोषणाची वेळ आणली आहे. दोन परस्परशत्रूंच्या विचारसरणींच्या राजकारणात गांधी मात्र अमर आहेत.

बातम्या आणखी आहेत...