Home | Editorial | Agralekh | divyamarathi article on polytics of sharad pawar

पवारांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ (अग्रलेख)

दिव्‍य मराठी | Update - May 03, 2018, 01:00 AM IST

पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासूनचा बालेकिल्ला आहे. या पट्ट्यात साखर कारखाने आणि दूध संघांचे मज

  • divyamarathi article on polytics of sharad pawar

    पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासूनचा बालेकिल्ला आहे. या पट्ट्यात साखर कारखाने आणि दूध संघांचे मजबूत जाळे आहे. या माध्यमातून येथील अर्थकारण आणि पर्यायाने राजकारणावर ‘राष्ट्रवादी’ मांड ठोकून आहे. सन २०१४ च्या मोदी लाटेत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत हक्काच्या या जिल्ह्यांमध्ये ‘राष्ट्रवादी’ची वाताहत झाली. बालेकिल्ल्यातच जिथे पायाखालची वाळू सरकली तिथे मराठवाडा आणि खान्देशात बसवलेल्या नव्या बस्तानाची काय कथा? एकूणच नाव ‘राष्ट्रवादी’ असलेल्या या पक्षाची प्रत्यक्षातली स्थिती मतदारांनी ‘प्रादेशिक’ केली. राज्य आणि केंद्र या दोन्ही सत्तास्थानांतून ‘राष्ट्रवादी’ बाहेर फेकली जाण्याची स्थिती पक्ष स्थापनेनंतर पहिल्यांदाच आली. मोदी लाटेचा झंझावात पाहून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेकांनी शरद पवारांची साथ सोडली. ‘राष्ट्रवादी’ला रामराम ठोकण्याचा सिलसिला अलीकडच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपर्यंत सुरू राहिला. परिणामी संसद ते पंचायत अशा सर्व निवडणुकांत ‘राष्ट्रवादी’ची घसरण होत राहिली. गमावलेली विश्वासार्हता मिळवून देणारा आर. आर. पाटील यांच्यासारखा नेता नाही. कोणाला वाचवण्यासाठी छगन भुजबळांचा बळी दिला, या शंकेने ओबीसी पाठीराखे पोखरले. कोरेगाव भीमा प्रकरण झालेल्या परिसरात ‘राष्ट्रवादी’चे वर्चस्व असल्याने दलितांमध्ये संभ्रम आहे. ऊस-दूध उत्पादकांचा भरवसा उडाला. ग्रामीण सत्तास्थाने, सहकारी कारखानदारी, बँकिंग, ऊस-द्राक्ष शेती आदी ठिकाणी स्थिरावलेला प्रामुख्याने मराठा मतदार हा शरद पवारांचा पाठीराखा आहे. २०१४ च्या केंद्र आणि राज्यातल्या सत्तांतरानंतर या पारंपरिक मतपेढीलाही खिंडार पडण्यास सुरुवात झाली. २०१९ च्या निवडणुकीनंतरही हेच चित्र कायम राहिले तर ‘शेकाप’ची जी अवस्था या राज्यात झाली तशीच ‘राष्ट्रवादी’ची झाल्याशिवाय राहणार नाही, ही वस्तुस्थिती आहे.

    या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी जयंत पाटील यांची नियुक्ती पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी नुकतीच केली. अमेरिकेत शिकून परतलेल्या जयंतरावांचा राजकीय वारसा मोठा आहे. साखर कारखान्याचे अध्यक्षपद ते सलग सहा वेळा आमदारकी असा त्यांचा पल्लेदार सार्वजनिक-राजकीय प्रवास आहे. या दीर्घ कारकीर्दीत भ्रष्टाचार किंवा इतर भानगडीत जयंतराव सापडल्याचे कधी आढळले नाही. नऊ वर्षे राज्याचा अर्थसंकल्प मांडणाऱ्या या तरुण नेत्याची प्रतिमा अभ्यासू, सुसंस्कृत, मृदुभाषी, चाणाक्ष आणि शहरी व ग्रामीण तोंडवळ्याची आहे. या गुणवैशिष्ट्यांचा समुच्चय ‘राष्ट्रवादी’मध्ये दुर्मिळ आहे. शिवाय शरद पवारांचा पूर्ण विश्वास ही आणखी एक जमेची बाजू. पश्चिम महाराष्ट्राचा ढासळलेला बालेकिल्ला मजबूत करण्यासाठी याच परिसरातल्या चतुर मराठा नेत्याकडे नेतृत्व सोपवणे ‘राष्ट्रवादी’साठी आवश्यक होते. प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीपुरते सांगायचे तर जयंत पाटलांची निवड म्हणजे शरद पवारांनी केलेला ‘करेक्ट कार्यक्रम’ आहे. ‘विरोधकाची पुरती नामुष्की करणे’ या अर्थाने कोल्हापूर आणि विशेषतः सांगलीच्या राजकारणात ‘करेक्ट कार्यक्रम’ हा शब्द लोकप्रिय आहे. जयंत पाटील हे अजित पवारांच्या धाकात राहणारे नेते नाहीत, हेही पवारांनी आवर्जून पाहिले असणार. जयंत पाटील अजित पवारांचे ‘होयबा’ होऊ शकत नाहीत.


    सुनील तटकरे आणि अजित पवारांवर सिंचन घोटाळ्याची टांगती तलवार आहे. ही तलवार कोसळलीच तरी प्रादेशिक पक्ष नेतृत्वाचा प्रश्न उद्भवू नये याची खबरदारी पवारांनी जयंतरावांच्या नियुक्तीतून घेतली आहे. प्रदेशाध्यक्षपद निवडीचा मुहूर्त साधून पवारांनी काँग्रेसलाही चांगलेच दमात घेतले. प्रदेशाध्यक्ष म्हणून पहिल्याच भाषणात जयंतरावांनीही काँग्रेसला बेंडकुळ्या काढून दाखवल्या. ‘राज्यकर्ते म्हणून काम करण्याची क्षमता असणारे (स्टेट्समन) सर्वाधिक नेते आमच्यात आहेत. आम्ही कमकुवत नाही,’ असे जयंतरावांनी काँग्रेसला ठासून सांगितले. वास्तविक येत्या निवडणुकांमध्ये काँग्रेससोबत आघाडी करण्याची सर्वाधिक गरज ‘राष्ट्रवादी’ला आहे. महाराष्ट्र हा काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला आहे. सत्ता नसली, नेतृत्व नसले तरी काँग्रेसचा टक्का फार घसरत नाही, हे अनेक निवडणुकांमधून सिद्ध झाले आहे. ‘राष्ट्रवादी’ स्वतंत्र लढली तरी यात काँग्रेसचे आता झाले, त्यापेक्षा अधिक वाटोळे होण्याची सुतराम शक्यता नाही; उलट ‘राष्ट्रवादी’चा पाय आणखी खोलात जाऊ शकतो. तरीही पवारांचा राजकीय इतिहास आणि ज्येष्ठत्व याची प्रचंड भीती बाळगण्याची सवय पृथ्वीराज चव्हाण वगळता उर्वरित प्रदेश काँग्रेसला आहे. काँग्रेसचे हे गुपित पवार चांगले ओळखून आहेत. म्हणूनच संभाव्य जागावाटपात वरचष्मा राखण्यासाठी पवारांनी आतापासूनच दबावतंत्र चालवले आहे. रणनीती म्हणून हाही ‘राष्ट्रवादी’चा ‘करेक्ट कार्यक्रम’ आहे. पवारांच्या या डावपेचांपुढे काँग्रेस किती झुकते यावर आगामी राजकारणाची दिशा स्पष्ट होईल.

Trending