आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोणता पक्ष, कुठली निष्ठा? (अग्रलेख)

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विधान परिषद निवडणुकीचे निकाल राजकीय पक्षांचे जनमानसातील स्थान दाखवतात, यावर आता कोणीच विश्वास ठेवत नाही. कारण या निवडणुका नेमक्या कोणत्या शक्तीच्या बळावर होतात, हे उघड गुपित आहे. असल्या निवडणुकीतील यश-अपयश कशाचे प्रतीक असेलच तर संबंधित राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या पारखी नजरेचे असू शकेल.

 

उमेदवारीसाठी कोणता तुल्यबळ उमेदवार   नेत्याला गाठता आला, हेच त्या नेत्याचे कौशल्य. त्यावरच त्या पक्षाचे या निवडणुकीतील यशापयश अवलंबून असते. हेच मापक लावायचे तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण या बाबतीत सपशेल अपयशी ठरले आहेत. कारण त्यांना आपल्या पक्षाची जागा या निवडणुकीत राखता आला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच्या त्यांच्या चाली फसल्या आहेत. त्याची कारणे काहीही असली तरी अपयश ते अपयशच. त्याला पर्याय दुसरे काहीही असू शकत नाही. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मात्र दोन जागांनी आपली विधान परिषदेतली ताकद वाढवण्यात यशस्वी झाले आहेत.

 

खरे तर सत्ताधारी पक्षाला अशा निवडणुकीत बाजी मारणे सोपे असते, असा आजपर्यंतचा इतिहास आहे. पण भाजपला सध्या तरी आपल्या दोन जागा राखण्यातच समाधान मानावे लागते आहे. याचा अर्थ या पक्षाने सत्तेचा वापर केला नाही, असा मात्र घेता येणार नाही. 
नाशिक मतदारसंघात भाजपच्या नेत्यांनी ऐनवेळी शिवसेना उमेदवाराऐवजी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. पनवेलमध्ये शिवसेनेने केलेल्या भाजपच्या गोचीला हे उत्तर ठरेल, असे त्या पक्षाच्या नेत्यांना वाटत होते.

 

पण तरीही शिवसेनेचे नरेंद्र दराडे निवडून आले. हा भाजपच्या राजकीय कौशल्यापेक्षाही सत्ताकारणाचा अधिक मोठा पराभव मानायला हवा. कारण नाशिक मतदारसंघात काय सुरू आहे, याचा पत्ताही भाजपच्या नेत्यांना लागला नव्हता, हे आता उघड झाले आहे. मुख्यमंत्र्यांना रोज राज्यभरातील हालहवाल गुप्तपणे सांगितला जात असतो. राजकीय हालचाली टिपणाऱ्या सर्वच सरकारी यंत्रणा मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत असतात. तरीही छगन भुजबळ यांची शिवसेना उमेदवाराला मदत होणार आहे, याचा थांगपत्ताही त्यांना लागला नाही.

 

तसे असते तर ऐनवेळी राष्ट्रवादीच्या पारड्यात आपली कमळे सोडण्याचा निर्णय त्या पक्षाने घेतला नसता. जे नाशिकमध्ये झाले तेच पनवेलमध्येही घडले आहे. आपल्या पक्षासाठी ज्यांनी हयात घालवली त्यांचाच मुलगा शिवसेनेकडे जातो आहे आणि त्याला शिवसेना उमेदवारी देण्याच्या तयारीत आहे याचीही माहिती मुख्यमंत्र्यांना आधी मिळाली नाही. हा फडणवीस यांच्या सत्ताकारणाचा पराभव नाही तर काय आहे? मुख्यमंत्री त्यांच्याकडे येणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवायला तयार नाहीत की खरी माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवलीच जात नाही, असा प्रश्न पडतो.

 

स्वत:च्या राजकीय कौशल्याबाबत त्यांना नको तितका विश्वास असल्यामुळेही कदाचित असे घडत असावे. अर्थात, नरेंद्र मोदींचाच चेला असल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचाही हा स्थायीभाव होणे यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. पण यंत्रणा खरी माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवतच नसतील तर मात्र परिस्थिती गंभीर आहे, यात शंकाच नाही. निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर या निवडणुकीतील मतदान गुप्त असूच नये, इथपासून तर पक्षाच्या ताकदीनुसार विधान परिषदेत सदस्य नियुक्त केले जावे इथपर्यंतचे सुविचार काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना सुचू लागले आहेत. अर्थात, त्यातही अनपेक्षित असे काही नाही.

 

कायदे मंडळातील हे उच्च सभागृह कशासाठी आहे, याचे भान विसरून राजकीय तडजोडी करण्यासाठीचे साधन म्हणून वापरताना या पक्षांना कधी साधन सुचिता दाखवता आलेली नाही. त्यामुळे करमणूक म्हणूनच जनता टीव्हीवरच्या असल्या चर्चा ऐकत असते. साधन सुचितेचा आणि राजकारणातील पावित्र्य जपण्याचा आव आणत जो भाजप सत्तेत आला आहे, त्यानेही त्याच मळलेल्या वाटेवरून जावे, ही बाब मात्र सर्वसामान्यांचा भ्रमनिरास करणारी आहे. शिवसेनेच्या बाबतीत तर बोलायलाच नको.

 

शिवसैनिकांची निष्ठा हाच ज्या पक्षाचा आतापर्यंतचा मूलाधार होता, त्यानेही आता विजयासाठी ‘सक्षम’ उमेदवार आयात करण्याचे धोरण जाणीवपूर्वक स्वीकारले आहे. त्यामुळेच बहुतांश पक्ष फिरून आलेल्या नरेंद्र दराडेंना नाशिकमध्ये आणि आपल्या आमदाराच्याच मुलाला परभणीमध्ये त्यांनी विदर्भातून आणून उमेदवारी दिली. त्याची फळेही त्यांना मिळाली आहेत. त्यामुळेच सर्वसामान्य निष्ठावान कार्यकर्त्यांवर मात्र सर्वच पक्षांत अन्याय व्हायला लागला आहे. या निवडणुकीनेही तेच सिद्ध केेले आहे.  कोणता पक्ष अन् कुठली निष्ठा, असे कार्यकर्ते विचारू लागले तर त्यांना तरी दोष कसा देणार?

 

बातम्या आणखी आहेत...