आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तो ‘पगडी’ पचास! (अग्रलेख)

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बदललेल्या आधुनिक जीवनशैलीत खरं तर फेटे, पगड्यांची गरज संपली आहे. एखादी परंपरा साजरी करण्यासाठी किंवा महत्त्वाच्या सण-समारंभापुरतीच आता यांची शोभा. राजकारणात मात्र ‘प्रतीकात्मकता’ परिणामकारक ठरते. म्हणूनच फेटे-पगड्या, ढाल-तलवारींना राजकीय व्यासपीठांवर आवर्जून स्थान मिळते. राजकीय प्रतीकात्मकतेचे भान शरद पवारांइतके खचितच कोणाला असावे. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष असलेल्या पवारांनी त्यांच्या या गुणाचा दाखला नुकताच दिला. निमित्त होते त्यांच्या पक्षाच्या विसाव्या वर्धापन दिनाचे. जामिनावर सुटलेल्या छगन भुजबळांच्या डोक्यावर चढवलेली ‘पुणेरी पगडी’ पवारांना खटकली आणि तातडीने ती उतरवण्याची सूचना त्यांनी केली. एवढेच नव्हे तर यापुढच्या ‘राष्ट्रवादी’च्या कार्यक्रमात कोणती पगडी घालायची याचे प्रात्यक्षिकही लगेच करून दाखवले. भुजबळांच्या डोक्यावरून जी ‘पुणेरी पगडी’ जाणीवपूर्वक, सर्वांसमक्ष काढून घेण्याचा देखावा मांडणाऱ्या पवारांनी स्वतः तीच ‘पुणेरी पगडी’ यापूर्वी अनेकदा याच पुण्यात स्वतःच्या डोक्यावर आनंदाभिमानाने बिनदिक्कत मिरवलेली आहेच. सबब पवारांचा राग ‘पुणेरी पगडी’वर नसावा. २०१९ च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पवारांच्या ‘पगडी बदल मोहिमे’कडे पाहायला लागते. राजकीय कुरघोड्या करताना पवारांचे पुरोगामित्व पातळ पडत असल्याचे अनेकदा महाराष्ट्राने पाहिले आहे. देवेंद्र फडणवीस, राजू शेट्टी, छत्रपती संभाजीराजे, प्रकाश आंबेडकर यांच्यासारख्या अनेकांनी हा अनुभव घेतलेला आहे.

 

विसाव्या वर्षात पक्षाचा पाया कधी नव्हे इतका कमकुवत झाल्याने राजकीय मुद्दे, वैचारिक धारा, जनतेचे प्रश्न यापेक्षाही ‘प्रतीकात्मक’ता पवारांना महत्त्वाची वाटते.  राष्ट्रवादीच्या व्यासपीठावरून ‘पुणेरी पगडी’ हद्दपार करण्यामागे राजकीय अपरिहार्यता  देखील आहेच. पन्नास वर्षांच्या दीर्घ संसदीय कारकीर्दीनंतरही ‘प्रतीकात्मकते’वर भर देण्याची पाळी त्यांच्यावर यावी, हा एका अर्थाने त्यांचा राजकीय पराभवच आहे. पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमात महिला, अल्पसंख्य, इतर मागासवर्गीय, मागासवर्गीय असे चेहरे आवर्जून पहिल्या रांगेत बसवण्याची ‘प्रतीकात्मकता’ शरद पवार आवर्जून पाळतात. भुजबळ, पिचड, गुजराथी आदींना त्यांनी प्रदेशाध्यक्ष केले. त्यानंतरही विशिष्ट समाजाचे प्रतिनिधित्व करणारा पक्ष हा शिक्का ‘राष्ट्रवादी’ला पुसता आला नाही. स्वतःच्या पुरोगामी प्रतिमेला ते स्वतःच वारंवार धक्के देत आले आहेत. महाराष्ट्राचा सर्वात तरुण मुख्यमंत्री होताना ‘मनुवादी’ जनसंघाचा पाठिंबा त्यांना गैर वाटला नव्हता.


भाजपला जातीयवादी म्हणतानाच त्यांचे राज्य सरकार टिकवण्यासाठी पवारांनी न मागताच समर्थनाचा टेकू देऊ केला हाेता. शिवसेनेला हिंदुत्ववादी ठरवायचे, पण सुप्रिया सुळेंचे राज्यसभेतले पहिले पाऊल विनासायास पडावे म्हणून त्याच शिवसेनेचा आधार घ्यायचा. या पद्धतीचे म्हटले तर बेरजेचे आणि म्हटले तर संधिसाधूपणाचे राजकारण पवारांनी अनेकदा केले आहे. वीस वर्षे वयाचा पवारांचा पक्ष पंधरा वर्षे राज्यातील आणि दहा वर्षे केंद्रातील सत्तेत होता. दीर्घकाळ सत्ता लाभूनही पक्षाचा पाया विस्तारू शकला नाही. शेतकरी कर्जबाजारीपणा, शेतमाल हमीभाव, मराठा-धनगर आरक्षण हे मुद्दे पवार आज ऐरणीवर आणतात; मनात आणले असते तर हे सर्व प्रश्न निकाली काढणारी सत्तास्थाने बहुजनांनी कैक वर्षे त्यांना देऊ केली होती. त्या वेळी पवारांनी या मुद्द्यांना न्याय न दिल्याची बहुजनांची तक्रार खोडता न येणे ही ‘राष्ट्रवादी’ची खरी अडचण आहे. नेमकी ही दुखरी नस छगन भुजबळांनी पडकली अाणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत नवी उमेद जागवण्यासाठी अाता मराठा-अाेबीसींची नव्याने माेट बांधण्याचे संकेतही दिले.


मंडल कमिशनचा धागा पुढे नेत मराठा अारक्षणाला समर्थन देण्याच्या त्यांच्या भूमिकेतून ही बाब अधाेरेखित हाेते. शेतकरी, मराठा आणि ‘ओबीसीं’मधले काही घटक हा या राष्ट्रवादी कांॅग्रेसचा हुकमी जनाधार  हाेता, मात्र २०१४ नंतरच्या प्रत्येक निवडणुकीत पवारांपासून दुरावत गेला. छगन भुजबळ आणि त्यांच्या डोक्यावरच्या बदललेल्या पगडीच्या माध्यमातून हा दुरावलेला जनाधार शरद पवार पुन्हा एकवटू इच्छितात, हेच त्यातून ध्वनीत हाेते. २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर हाती काही लागले नाही तर ‘राष्ट्रवादी’चे भविष्य गाळात रुतणार आहे. बहुजनांमध्ये गमावलेली विश्वासार्हता कमावण्यासाठी महात्मा फुले यांच्या नावाची पगडी लाभदायी ठरू शकते, असा राजकीय आडाखा पवार बांधत असतील तर त्यात चूक काही नाही. येत्या निवडणुकांमध्ये जनाधार मिळवून पक्ष बळकट केला (सर सलामत) तर पुढे हव्या तितक्या पगड्या (निवडणुकोत्तर युत्या-आघाड्या) बदलण्याची सोय पुन्हा असतेच.

बातम्या आणखी आहेत...