आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मूर्तिपुजकांकडून मूर्तिभंजन ( अग्रलेख )

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

त्रिपुरातील ऐतिहासिक विजयामुळे भाजप, संघ परिवारात चैतन्य व उन्माद दोन्हीही उफाळून आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा ही जोडगोळी पक्षात चैतन्य आल्याची भाषा करतात, तर दुसरीकडे संघ परिवाराचे आधुनिक चाणक्य समजले जाणारे राम माधव व त्रिपुराचे राज्यपाल तथागत रॉय हे उन्मादाचे समर्थन करतात. त्रिपुराचा विजय हा संघ परिवारातील प्रामाणिक कार्यकर्त्यांचा अनेक दशकांचा संघर्ष आहे, असे मोदी-शहा सांगतात. तर सत्ता बदलल्यानंतर प्रत्येक सत्ताधारी स्वत:चे राजकारण करतो, विरोधक सत्तेवर आल्यावर वेगळे काय करतात, असे तथागत रॉय म्हणतात. राम माधव तर दोन पावले पुढे जाऊन लेनिनचा पुतळा रशियात थोडाच पाडला आहे, तो आमच्या त्रिपुरात पाडला आहे, असे निर्लज्जपणे सांगतात. या पुतळे पाडापाडीच्या प्रकरणावरून देशभर प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली. कोलकात्यात काही समाजकंटकांनी संघाचे प्रणेते श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुतळ्याला काळे फासले, तामिळनाडूत द्रविड चळवळीचे उद्गाते ई. व्ही. रामस्वामी पेरियार व उत्तर प्रदेशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची मोडतोड केली, तेव्हा या मंडळींनी सारवासारव सुरू केली. हे पुतळे पाडापाडीचे राजकारण आपल्याच अंगाशी येते आहे, याची भीती त्यांना वाटली.   


त्रिपुरातील डाव्यांची २५ वर्षे असलेली सत्ता हिसकावून घेणे ही घटना भाजपसाठी ऐतिहासिक असली तरी भाजप-संघ परिवाराकडे जशी कार्यकर्त्यांची ताकद, एकजूट आहे तसे डाव्यांचेही आहे. डाव्यांची राजकीयदृष्ट्या सत्ता केवळ एका राज्यात असली तरी डावे असे तत्त्वज्ञान अजून मेलेले नाही, ते जिवंत आहे, हे भाजपच्या पचनी पडलेले दिसत नाही. ‘काँग्रेसमुक्त, डावेमुक्त भारत’ हा संघ परिवाराच्या राजकारणाचा भाग असला तरी काँग्रेस व डाव्या विचारधारांचे आपल्या देश उभारणीत अमूल्य असे योगदान आहे. ज्या लेनिनचा पुतळा ‘भारतमाता की जय’च्या घोषणांत बुलडोझर लावून पाडला त्या लेनिनच्या क्रांतिकारी विचारधारांनी एकेकाळी आपले हजारो स्वातंत्र्यवीर झपाटलेले होते. लेनिनच्या नेतृत्वाखाली १९१७ मध्ये रशियात राजेशाही संपुष्टात येऊन कामगारांची राजवट आली तेव्हा लोकमान्य टिळक व कृ. प्र. खाडिलकरांनी मिळून ‘केसरी’मध्ये या कामगारशाहीच्या समर्थनार्थ अग्रलेख लिहिले होते. लेनिन जर ब्रिटिशांवर तुटून पडत असेल तर त्याने अंगीकारलेली विचारधारा योग्यच असली पाहिजे, असे टिळकांचे मत होते. श्रीपाद अमृत डांगे यांनी ‘गांधी व्हर्सेस लेनिन’ या नावाचे पुस्तक लिहिले. हे पुस्तक लेनिनपर्यंत पोहोचले आणि लेनिनने ‘कोण आहेत हे डांगे? कोण आहेत टिळक?’ असे विचारत त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. तो काळच असा धामधुमीचा होता की, लेनिनच्या क्रांतिकारी विचारांचा जगातील सर्वच वासाहतिक राजवटींवर परिणाम होत होता. हजारो क्रांतिकारक साम्राज्यवाद व भांडवलशाहीकडून होणाऱ्या पिळवणुकीविरोधात एकवटत होते. लेनिनच्या ‘कामगारांनो, एक व्हा’ या ऐतिहासिक घोषणेने तर भांडवलशाहीची मुळे हादरली होती. म. गांधींनी तर रशियन राज्यक्रांती ही शतकातील एक महान व अद्भुत घटना असल्याचे म्हटले होते. रशियन क्रांतीमुळे दमनशाहीविरोधात उभे राहण्याचे बळ जगाला मिळाले, असे ते म्हणत. खुद्द लेनिन भारतातील घडामोडींवर लक्ष ठेवून होता. त्याला भारतातील गरीब जनता एक ना एक दिवस ब्रिटिशांच्या दमनशाहीविरोधात उभी राहील, असा विश्वास होता व तसे काही लेख त्याने लिहिले होते. एप्रिल १९१७ मध्ये गांधींजींनी चंपारण्य सत्याग्रह हाती घेतला. लेनिन व त्याच्या कम्युनिस्ट साथीदारांनी या सत्याग्रहापासून प्रेरणा घेतली होती. रशियन राज्यक्रांतीने जसा राजेशाहीच्या विरोधात मार्ग अनुसरला तसा आपणही अंगीकारावा यावर काँग्रेसमधील मवाळ व जहाल मतवादी मंडळींचे एकमत झाले हाेते. क्रांतिकारक भगतसिंग हे लेनिनचे चाहते होते. लेनिनचा पुतळा पाडणाऱ्यांना इतिहासाचे असे अनेक संदर्भ माहीत असते तर बुलडोझर लावून पुतळे पाडण्यापर्यंत त्यांची मजल गेली नसती. परंतु राम माधव वगैरे आधुनिक चाणक्यांना प्राचीन इतिहासाबरोबर अर्वाचीन इतिहासही माहीत असतो; पण त्यांना विद्वेषाचे राजकारण पुढे रेटायचे असते, त्यामुळे अशा घटनांना समर्थन देण्याइतपत त्यांची मजल जाते. विरोधाभास असा की, आजच्या राजकारणात मोदींची प्रतिमा ‘ग्लोबल’ झाल्याने त्यांना जगापुढे सातत्याने जावे लागते. भारताची अर्थव्यवस्था वेगाने विस्तारत आहे, जगाने या देशात बिनदिक्कत गुंतवणूक करावी, असे आवाहन ते करतात तेव्हा त्यांच्यापुढे असे पुतळे पाडापाडीचे राजकारण अडसर ठरू शकते. विजय आनंदात साजरा करावा, पण त्यात उन्माद नको, तारतम्य असावे.

बातम्या आणखी आहेत...