Home | Editorial | Agralekh | divyamarathi editorial article

उद्याेजकता हेच प्रगतीचे इंधन (अग्रलेख)

दिव्य मराठी | Update - Jul 31, 2018, 08:45 AM IST

शेतकरी संघटनेचे नेते शरद जाेशी यांनी सांगितलेले मार्मिक सत्य अाजही तंताेतंत लागू पडते.

  • divyamarathi editorial article

    'भारतात जाे पक्ष सत्तेवर असताे, ताे मुक्त अर्थव्यवस्थेचा कट्टर पुरस्कर्ता असताे. मात्र सत्तेवरून पायउतार झाला की मुक्त अर्थव्यवस्थेच्या नावाने बाेटे माेडायला लागताे,' हे शेतकरी संघटनेचे नेते शरद जाेशी यांनी सांगितलेले मार्मिक सत्य अाजही तंताेतंत लागू पडते. पी.व्ही. नरसिंह राव यांनी १९९१ मध्ये खुल्या अार्थिक धाेरणांचा पुरस्कार केला, डाॅ. मनमाेहन सिंग यांनी प्रामाणिकपणे ताे राबवला. भाजप अाणि संघ परिवाराने त्या वेळी घेतलेली भूमिका अाता काँग्रेस बजावत अाहे. १९९८ ते २००४ या काळात मुक्त अर्थव्यवस्था राबवणारे भाजपचे नेते २००४ ते २०१४ अशी १० वर्षे विराेधी बाकांवर बसले. मनमाेहन सिंग यांच्या प्रत्येक भूमिकेला विराेध करीत राहिले. अाता नरेंद्र माेदी यांच्यावर ती वेळ अाली असून काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांना उद्याेगपतींचा हस्तक ठरवले. अापण अजूनही समाजवादी अर्थव्यवस्थेच्या मानसिकतेतून बाहेर पडलाे नसल्याचे दाखवून देण्यास काँग्रेसने सुरुवात केली अाहे.


    देशी-विदेशी गुंतवणूकदारांचा अाेघ अाैद्याेगिक क्षेत्राकडे वळवणे अपरिहार्य असते. कारण, राेजगार निर्मितीच पक्षाच्या कामगिरीच्या परीक्षणाचा अाधार ठरते. त्यासाठी उद्याेग उभारणीला गती द्यावी लागते, गुंतवणूकदारांना साेयी-सवलती द्याव्या लागतात, हे विराेधी पक्षांनाही कळते. परंतु सत्ताधारी पक्षाने उद्याेगपतींना सवलती दिल्या, गुंतवणूकदारांचे मेळावे घेतले की भांडवलदारांचा हस्तक ठरवणे साेपे जाते. भांडवलदार अाणि उद्याेगपती समाजाचे शत्रू असतात हे समाजमनावर काेरले गेलेले अाहे. नेमकी हीच मन:स्थिती अाैद्याेगिक प्रगतीला मारक ठरते, हे लक्षात घेतले पाहिजे. उद्याेजकता हे देशाच्या प्रगतीचे इंधन अाहे, उद्याेगपती संपत्ती निर्माण करत असतात याकडे दुर्लक्ष कसे करता येईल? भारतात उद्याेगपतींनी गुंतवणूक केलीच नाही तर उद्याेग कसे उभारले जातील? राेजगार निर्मिती कशी हाेईल? उद्याेगपतींना सुविधा-सवलती व पाेषक, सुरक्षित वातावरण दिले नाही तर उद्याेग चालणार कसे? विदेशातील सरकार अाणि नाेकरशाही नवउद्याेग उभारणीला प्राेत्साहन देत असल्याचे अापण पाहताे. मात्र भारतात असे काही हाेत असेल तर त्यात काेलदांडा घालण्याचा प्रयत्न हाेताे, म्हणजे पायावर धाेंडा पाडून घेण्यासारखेच नाही का?


    देशाच्या विकासात शेतकरी, कामगार, बँकर्स, सरकारी कर्मचारी अाणि अन्य घटकांप्रमाणेच उद्याेगपतींचीदेखील तितकीच महत्त्वपूर्ण भूमिका असते. त्यांना चाेर-दराेडेखाेर ठरवणे याेग्य अाहे का, हा पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा युक्तिवाद बिनताेड असला तरी विजय मल्ल्या, नीरव माेदी, ललित माेदी यांच्यासारख्या कैक पळपुट्या अाणि कर्जबुडव्यांनीच त्यांना अडचणीत अाणले हे कसे नाकारता येईल? 'जे लाेक चुकीचे वागतील त्यांना एक तर देश साेडावा लागेल किंवा तुरुंगात खितपत पडावे लागेल' हा नरेंद्र माेदींचा संकेत जितका बाेलका अाहे, तितकाच साेयीचा अर्थ लावणाऱ्यांसाठीदेखील पुरेसा अाहे. अापला हेतू स्पष्ट अाणि स्वच्छ असेल तर कुणाहीसाेबत उभे राहिलाे तरी अापण कलंकित हाेऊ शकत नाही हे ठसवताना म. गांधींचा दिलेला दाखला उल्लेखनीय ठरावा. म. गांधींचा हेतू स्पष्ट अाणि शुद्ध हाेता त्यामुळे बिर्ला परिवाराशी घनिष्ठ संबंध असले तरी त्यांना कधी संकाेच वाटला नाही, हे लक्षात अाणून देत माेदी विराेधी पक्षांवर तुटून पडले. ज्यांना जाहीरपणे उद्याेगपतींना भेटावेसे वाटत नाही ते पडद्याअाड भेटतात, कारण त्यांच्या मनात भीती असते हा मुद्दा लाेकमनावर बिंबवण्यामागे पश्चिम उत्तर प्रदेशातील भाजपचा जनाधार वाढवण्याचा त्यांचा अजेंडा स्पष्ट हाेताे.

    गुंतवणुकीच्या ब्ल्यूप्रिंटच्या माध्यमातून राेजगार निर्मिती, शेतकऱ्यांना हाेणारा लाभ या दाेन प्रमुख मुद्द्यांवरून येथील मतदारांना त्याचसाेबत व्यापाऱ्यांनाही भाजपकडे खेचण्यासाठी विशेष रणनीती अाखली जात अाहे. अर्थातच जीएसटी अाणि नाेटबंदीमुळे उद््भवलेली व्यापाऱ्यांतील नाराजी कमी करणे अाणि युवा मतदारांमध्ये राेजगार संधीच्या माध्यमातून बस्तान बसवणे ही त्यामागची भूमिका अाहे. देश-विदेशातील उद्याेगपती गेल्या काही वर्षांपासून नरेंद्र माेदींना गुंतवणूक अाणि विकासाला चालना देणारा नेता म्हणून अाेळखत अाहेत. त्यामुळे माेदींनी गुंतवणुकीला चालना देणे, प्राधान्य देणे अनपेक्षित मुळातच नाही. परंतु 'संपुअा'च्या पहिल्या टप्प्यात जी उद्याेगप्रवणता पाहायला मिळाली तशी माेदींनी खऱ्या अर्थाने दाखवली नाही. त्यामुळे नवे उद्याेग अाले नाहीत, खासगी गुंतवणूकही वाढली नाही हे तितकेच खरे. परिणामी त्यांची भूमिका शेतकरी, उद्याेगपती किंवा मध्यमवर्गीयांच्या हितांची जपणूक करणारी अशी ठळकपणे अधाेरेखित हाेत नाही. मात्र त्यांच्या कार्यकाळात करदाते वाढले, अर्थव्यवस्थेची घडी बसत असताना पाहायला मिळते, ही जमेची बाजू ठरावी.

Trending