आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिंजऱ्यातील वाघ! (अग्रलेख)

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकाग्रता व धाडस ही वाघाची वैशिष्ट्ये. वाघाचे एक वैशिष्ट्य म्हणजे तो आपली शिकार लपूनछपून करतो. जंगलात वाघाला स्वत:चे मित्र नसतात. असतात ते त्याचे शत्रूच. शिवसेना स्वत:ला वाघ समजते व आपल्या कार्यकर्त्यांना मावळे. वाघाला जे वन्यप्राण्यांमध्ये ग्लॅमर आहे तसे राजकारणात आपल्याला आहे, असा शिवसेनेचा समज आहे. पण महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास पाहिल्यास शिवसेना हा राजकारणात नेहमीच दुय्यम पक्ष राहिला आहे. १९९५ वा २०१४ ची निवडणूक असो, भाजपशी त्यांना सत्तेसाठी जुळवून घ्यावे लागले. त्यामुळे जंगलावर एकटे अधिराज्य करण्याची वाघाची नैसर्गिक वृत्ती-प्रवृत्ती असते तशी वृत्ती-प्रवृत्तीही या पक्षाला दाखवता आलेली नाही. हे सांगण्यामागचे कारण असे की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘शिवसेनेचा वाघ हा पिंजऱ्यातला वाघ नाही, त्यामुळेच तो राज्याच्या आणि राष्ट्राच्या प्रश्नांवर गर्जना करतो. आता या वाघाला रोखणे किंवा गोंजारणे अशक्य आहे,’ असा भाजपला उद्देशून टोमणा मारला आहे.


गेल्या चार वर्षांत भाजपकडून पदोपदी अपमान होऊनही अशा अनेक पोकळ डरकाळ्या शिवसेनेने मारल्या आहेत. त्यापैकी ही एक. या काळात शिवसेनेचा वाघ कधी आक्रमक झाला नाही की त्याने रागाने भाजपवर नखे मारली नाहीत. आता जी काही आरडाओरड सुरू आहे ती पुढे बचावात्मक पातळीवर येत असल्याने. २०१९च्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या विरोधात काँग्रेससह अन्य पक्षांची एक व्यापक आघाडी जन्मास येत आहे, त्याच सुमारास एनडीए घटक पक्षातील काही पक्ष थेट भाजपची मान पकडायला सुरुवात करत आहेत. त्यात आपले शौर्य दिसायला हवे म्हणून शिवसेनेचे हे असले फुकाचे उद्योग.  

 

शिवसेनेला एक राजकीय वास्तव चार वर्षांनंतर पचनी पडलेले नाही. ते हे की, भलेही भाजप एनडीए आघाडीच्या माध्यमातून सत्तेवर आला असला तरी भाजपला लोकसभेत बहुमत मिळालेले आहे. त्यानंतर देशातल्या ज्या काही राज्यांतल्या विधानसभा निवडणुका भाजपने जिंकल्या आहेत त्यातही त्यांनी स्वत:चे बळ दाखवले आहे. भाजपने मुंबईतल्या महापालिका निवडणुकांत शिवसेनेचा घाम काढला होता. त्यांनी युती मोडलेली असूनही शिवसेनेला प्रमुख विरोधी पक्ष म्हणून पालिकेत व रस्त्यावर विरोध न करण्याचा निर्णय घेतला होता. असे औदार्यरूपी राजकारण भाजपने शिवसेनेसोबत केले. महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतही राष्ट्रवादी-काँग्रेसमध्ये खिंडारे पाडून भाजपने यश मिळवले. त्यात शिवसेनेची त्यांना आतूनही रसद नव्हती. अशा वेळी भाजपच्या ‘मनमानी’ राजकारणाबद्दल शिवसेनेची तक्रार असेल तर ती सत्तेत राहून सुटू शकेल असा भाबडा समज त्यांनी का बाळगावा हा प्रश्न अनेकांना पडतोय. शिवसेनेला जर स्वत:चे अस्तित्व राखायचे असेल तर त्यांनी सत्तेतून बाहेर पडून लोकांमध्ये जाण्याची गरज आहे. तृणमूल काँग्रेस, द्रमुकसारखे पक्ष यूपीए आघाडीशी पटले नाही म्हणून सत्तेतून बाहेर पडलेे.


ममता बॅनर्जी या यूपीए व एनडीए अशा दोन्ही आघाड्यांमध्ये होत्या, पण जेव्हा त्यांच्या प्रादेशिक राजकारणाचा प्रश्न आला, डाव्यांच्या विरोधात त्यांना प. बंगालमध्ये आक्रमक राजकारण करण्याची वेळ आली तेव्हा त्या केंद्रातील आघाडीतून बाहेर पडल्या व स्वबळावर एकदा नव्हे, तर दोनदा तृणमूल काँग्रेसला सत्तेवर आणून दाखवण्याची किमया केली. जयललिता यांच्या अण्णा द्रमुकचा केंद्रातल्या वाजपेयी सरकारवर एवढा दबाव होता की त्यांनी केंद्रातले वाजपेयी सरकार पाडण्याची मर्दुमकी गाजवली होती. त्याचा त्यांना ना खेद होता ना खंत. सध्याच्या चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पक्षाने गेल्याच महिन्यात आंध्र प्रदेशला विशेष आर्थिक दर्जा मिळत नसल्याची तक्रार करत सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

 

याच संदर्भाने शिवसेनेने या चार वर्षांत राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राच्या कोणत्या प्रश्नाला लावून धरले हे दुर्बीण लावून शोधले पाहिजे. महाराष्ट्रातही त्यांनी विरोधकांच्या हा मध्ये हा मिळवले, पण स्वत: काय केले याचा त्यांच्याकडे कोणताही दाखला नाही. गेल्या काही महिन्यांत अॅट्रॉसिटी व शेतकरी-आदिवासी प्रश्नांवर महाराष्ट्र उभा-आडवा पेटला असताना शिवसेनेने या शोषित जनतेला पाठिंबा देण्यासाठी किती मेळावे, मोर्चे, सभा घेतल्या? आता भाजपचा मैत्रीच्या प्रस्तावाचा ते अशा थाटात अव्हेर करत आहेत, जणू काही आता त्यांच्या नेत्यांना आगामी निवडणुकीत सुवर्णकाळ दिसत आहे. डरकाळी फोडल्यानंतर समोरच्याला घाम फुटला तर त्यात दम असतो, जंगलामध्ये अशी दमबाजी चालते. शिवसेनेने जंगलाचा अभ्यास करणे इष्ट आहे.

 

बातम्या आणखी आहेत...