आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

व्यवस्थेत धरणीकंप घडवणारा ‘तृतीय रत्न’ प्रायाेगिक नाट्यसृष्टीतील शिल्प!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकीकडे सांगलीचे संस्थानिक चिंतामणराव पटवर्धन यांच्या राजाश्रयावर होणाऱ्या ‘सीता स्वयंवर’, ‘इंद्रजीत वध’, ‘राजा गोपीचंद’सारखी विष्णुदास भावेंची नाटके, तर याच काळात सामाजिक बदलाचं माध्यम म्हणून प्रस्थापित व्यवस्थेला उघडे करून त्यावर फटकारे ओढणारे म. जोतीरावांचे ‘तृतीय रत्न’ या दोन्ही नाट्यपरंपरा भिन्न तर होत्याच; पण त्यांच्या ध्येय व उद्देशातही कमालीचे अंतर होते.  म. फुले यांच्या नाटकातील सृष्टी त्यांनी स्वतः निर्माण केली होती. ही सृष्टी रंजक नव्हती, तर वास्तववादी होती, इतकेच नाही तर ती प्रायोगिक व सांकेतिकही होती

 

महापुरुषांच्या बाबतीत नेहमीच एक होते, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या एकाच पैलूवर प्रकाश टाकला जातो, मात्र त्याशिवाय त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची अशी अनेक वैशिष्ट्ये असतात जी समाज जीवनाच्या सांस्कृतिक पर्यावरणाला अत्यावश्यक असतात. म. जोतीराव फुलेंच्या विषयी देखील तेच होऊ पाहतेय. समाज परिवर्तनाचे अग्रदूत तथा चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या विरोधात दंड ठोकून उभे राहणारे महात्मा फुले सर्वज्ञात आहेतच, पण या परिवर्तनाच्या लढाईत फुलेंनी साहित्य प्रांतातले ‘नाटक’ हे शस्त्र अगदी आरंभीच हाती घेतले होते. इतकेच नव्हे, तर जोतिबांच्या प्राप्त साहित्याचा अभ्यास केला असता त्यांनी १८५५ मध्ये लिहिलेले ‘तृतीय रत्न’ हे नाटक त्यांची पहिली साहित्यिक रचना तर ठरतेच ठरते, सोबत हे नाटक मराठी रंगभूमीवरील आद्यनाटकही ठरावे. 


१८४२ ते १८७४ हा कालखंड मराठी नाटकाच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरतो. याच काळात दशावतार व तमाशाच्या मिश्रणातून वेगळा प्रकार अस्तित्वात येत होता. विष्णुदास भावे त्याला ‘आख्यान’ संबोधतात, तर त्यासाठी महात्मा फुले ‘नाटक’ हा शब्द वापरतात. विष्णुदास भावे यांनी ५ नोव्हें. १८४२ पहिले ‘अहिल्याेद्धार आणि सीता स्वयंवर’  या नाटकाचे पद्यआख्यान सांगलीत केले.

 

पुढे यालाच नाट्य अभ्यासकांनी ‘सीता स्वयंवर’ नाटक असे संबोधले. मात्र, विष्णुदास भावे यांच्या नाटकात नाटकासाठी जी रंगावृत्ती आवश्यक असते तिचा अभाव होता. या नाटकात प्रवेश, नटी-सूत्रधार, अंक अशी रचना नाही. पद्यात्मक स्वरूपात त्याची मांडणी आहे. गद्याचा त्यात अभाव आहे. स्वत: भावे त्यांच्या रचनेला नाटक न म्हणता ‘आख्यान’ म्हणतात. अण्णासाहेब किर्लोस्करांनी १८६६ मध्ये भारत शास्त्रोत्तेजक मंडळ स्थापन करून ‘श्री शंकर दिग्विजय’ हे त्यांचे पहिले नाटक सादर केले. पुढे अण्णासाहेबांनी  किर्लोस्कर संगीत नाटक मंडळ या नव्या संस्थेद्वारे १८७४ मध्ये त्यांचे ‘शाकुंतल’ लिहून बेळगावला सादर केले. ‘सीता स्वयंवर’ मध्ये पद्यप्राचुरता व शाकुंतलमधील संगीतप्राचुरता यामुळेही हे दोन्ही खेळ इंग्रजी ऑपेरा नाट्यरचनेच्या जवळ जात होते. मुळात हे दोन्ही नाटककार कन्नड भागवत मंडळाच्या नाटकाने प्रभावित होते. नाट्य वाङ्मयाच्या इतिहासकारांनी जोतीराव फुले यांच्यावर मोठा अन्याय केल्याचे निदर्शनास येते. वास्तविक पाहता १८४२ मध्ये ‘सीता स्वयंवर’ हे आख्यान विष्णुपंत भावे शुद्ध मनोरंजन या प्रधान हेतूने करतात; तर  १८५५ मध्ये जोतीराव फुले समाज परिवर्तनाच्या ध्यासाने ‘तृतीय रत्न’ हे नाटक करतात. आज ज्या अर्थाने प्रायोगिक किंवा समांतर रंगभूमी हे शब्द वापरले जातात त्याची मुहूर्तमेढ महात्मा फुलेंच्या ‘तृतीय रत्न’ या नाटकाने रोवली.  विष्णुदास भावे व नंतरच्या कालखंडात अण्णासाहेब किर्लोस्कर हे एकीकडे धार्मिक व पौराणिक कथांना आपल्या नाटकांचा मुख्य विषय बनवत असताना, पद्य व संगीत या घटकांना सादरीकरणाचे मुख्य अंग केलेले असताना महात्मा जोतीराव फुले मात्र वर्णव्यवस्था शूद्रांचे, कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे कसे शोषण करत आहे व  ब्राह्मणी व्यवस्था इथल्या बहुजन निरक्षर जनतेला कशी लुबाडत आहे व यातून बाहेर पडायचे असेल तर शिक्षण कसे महत्त्वाचे आहे यासारख्या मूलभूत विषयावरील आशयघन  ‘तृतीय रत्न’मधून लोकजागर करत होते. नाटक म्हणून संपूर्ण संकल्पनेचा विचार केला व नाटकाचा विषय व आशय, गद्यात्मकता, संवाद, दिग्दर्शनीय टिप्पणी, रंगावृत्ती, प्रवेश, नेपथ्य सूचना, घटनाक्रम, आरंभ-मध्य व अंत यातील लेखन सुसूत्रता या दृष्टीने ‘तृतीय रत्न’ हेच आद्यनाटक ठरते व ‘तृतीय रत्न’ चे नाटककार म. जोतीराव फुले हेच खऱ्या अर्थाने मराठी भाषेतील आद्य नाटककार ठरतात. ज्या कारणाने विजय तेंडुलकर, गिरीश कर्नाड, बादल सरकार व  भीष्म साहनी हे त्या त्या भाषेतील ‘पहिले’ ठरतात त्याच कारणाने महात्मा फुले हेदेखील ‘पहिले’ ठरावेत.

 

‘घाशीराम कोतवाल’मधून शोषक आणि शोषित या विषयी जे तेंडुलकर सांगू इच्छितात, हिंदीमध्ये डॉ. शंकर शेष यांना ‘पोस्टर’मधून जे सांगायचंय किंवा बादल सरकार यांना ‘भोमा’मधून जे ध्वनित करायचंय तेच जोतिराव फुलेंनी १८५५ मध्ये ‘तृतीय रत्न’मधून मांडले आहे. या नाटकात शोषितांची हृदयद्रावक कथा फुले सांगतात. वर्णाच्या उच्चस्थानी असल्याचा फायदा घेत   गरीब श्रमिकांना लुबाडण्यासाठी ज्ञान व बुद्धीचा वापर करताना त्याला धर्माचा भक्कम आधार कसा दिला जातो हे नमूद करून म. फुले या शोषणाविरुद्ध बंड करण्याची प्रेरणा या नाटकातून देतात. त्यासाठी त्यांनी पात्रांची केलेली उपाययोजना, वातावरण निर्मिती, संवादातील बांधणी आदी नाटकाचे गुण त्यांच्या  पूर्वीच्या नाटककारांच्या  नाटकात अभावानेच होते.

 

महत्त्वाचे म्हणजे भावेंच्या नाटकातील वातावरण, कथा, पात्रे ही रामायण, महाभारत किंवा पुराणातील असल्याने ती सर्वज्ञात होती व त्यावर खेळ बेतणे ही नाटककाराला सोपे होते. मात्र, म. फुले यांच्या नाटकातील सृष्टी त्यांनी स्वतः निर्माण केली होती. ही सृष्टी रंजक नव्हती, तर वास्तववादी होती. इतकेच नाही, तर ती प्रायोगिक व सांकेतिकही होती. या नाटकातील गरीब कुणब्यांची गरोदर बायको म्हणजे बहुजनांची उद्या जन्मणारी पिढी तर गरीब कुणबी म्हणजे इथला शोषित बहुजन समाज तर जोशी, भटजी म्हणजे चतुराईनं बहुजनांना लुबाडणारी व्यवस्था. पाद्री म्हणजे शिक्षणाच्या नवीन शस्त्राने दिलेले ‘नेत्र’ होय. या नाटकात म. फुले यांनी ‘विदूषक’ या पात्राच्या माध्यमातून मराठी रंगभूमीवर प्रथमच प्रयोगशील सूत्रधार आणला.

 

महात्मा फुलेंचा हा विदूषक लोकांना हसवण्याऐवजी भेदक वस्तुस्थितीची मांडणी करत व्यवस्थेवर प्रहार करतो. काहीसा असाच विदूषक ब्रेक्थच्या नाटकात दिसतो. शोषणाची वाट कधी वर्गव्यवस्थेच्या, तर कधी वर्णव्यवस्थेच्या गल्लीतून जाते. तृतीय रत्नमध्ये जोतिराव फुले वर्ग आणि वर्ण या दोन्ही व्यवस्थेवर आसूड ओढत नुकतेच नव्याने हाती आलेल्या शिक्षण नावाच्या शास्त्राला हात घालतात. मुळात म. फुलेंनी या नाटकाचे नावच क्रांतिकारी ठेवले आहे. ‘तृतीय रत्न’ यात म. फुलेंनी ‘रत्न’ हा शब्द ‘नेत्र’ ‘ज्ञानचक्षू’ या अर्थाने वापरला आहे. हा ‘तिसरा डोळा’ शिक्षणाची ऊर्जा घेऊन उघडला तर व्यवस्थेत धरणीकंप होईल या परिवर्तनवादी विचारानेच जोतीरावांनी नाटकास ‘तृतीय रत्न’ नाव दिले असावे. एकीकडे सांगलीचे संस्थानिक चिंतामणराव पटवर्धन यांच्या राजाश्रयावर होणाऱ्या ‘सीता स्वयंवर’, ‘इंद्रजीत वध’, ‘राजा गोपीचंद’सारखी विष्णुदास भावेंची नाटके, तर याच काळात सामाजिक बदलाचं माध्यम म्हणून प्रस्थापित व्यवस्थेला उघडे करून त्यावर फटकारे ओढणारे म. जोतीरावांचे  ‘तृतीय रत्न’ या दोन्ही नाट्यपरंपरा भिन्न व उद्देशातही कमालीचे अंतर होते. एकीकडे विष्णुदास भावेंच्या नाटकांना जबरदस्त राजाश्रय मिळालेला असताना दुसऱ्या बाजूला मात्र याच काळात दक्षिणाप्राइज कमिटीने ‘तृतीय रत्न’ नाकारले. त्यावर  स्वतः म. फुले म्हणतात, “त्यामुळे मला हे नाटक एकीकडे टाकून द्यावे लागले.” कदाचित यामुळे नाटकाचा इतिहास लिहिणाऱ्यांनीही आद्य नाटककार म. जोतिराव फुले यांना ‘एकीकडे टाकून दिले’ असावे. 

 

डॉ. सतीश साळुंके, नाट्यलेखक/दिग्दर्शक 

dr.satishsalunke@yahoo.in

बातम्या आणखी आहेत...