आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्नाटकी धडा : माेदी लाटेच्या प्रभावाला अाेहाेटी, प्रादेशिक पक्षांची माेट बांधली तरच काँग्रेसला भवितव्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपने अाक्रमकपणे मुसंडी मारत कर्नाटक विधानसभेच्या सर्वाधिक जागा पटकावल्या अाणि काँग्रेसच्या सुमारे ५० जागा कमी झाल्या. अर्थातच नरेंद्र माेदींच्या शिरपेचात खाेवले गेलेले हे अाणखी एक माेरपीस म्हणता येईल. ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने सर्वस्व पणाला लावले हाेते. बहुतेक सारे मंत्री, मुख्यमंत्री, प्रमुख खासदार अाणि अामदार कैक दिवस कर्नाटकात तळ ठाेकून हाेते. पंतप्रधान माेदी अाणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी पूर्ण ताकद पणाला लावली. कर्नाटकचा प्रत्येक काेपरा अमित शहा यांनी धुंडाळून काढला, या काळात साधारणपणे ५७ हजार किमीचा प्रवास केला. सिद्धरामय्या यांच्याएेवजी येदियुरप्पा यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी हा सारा अट्टहास करण्यात अाला नव्हता, तर या निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळाले असते तर अाजपासूनच नरेंद्र माेदींचा सूर्य अस्ताचलास निघाला असता.


कर्नाटकातील निवडणूक २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीची पूर्वतयारी ठरावी. जर भाजपला १३० जागा मिळाल्या असत्या तर भाजपने दावा केला असता की, २०१९ ची निवडणूक जिंकल्यासारखीच अाहे. परंतु या निवडणूक निकालांनी भाजपला धडा शिकवला अाहे. गुजरातेत बाेटावर निभावले अाणि कर्नाटकात प्रतिष्ठा वाचली असा त्यांचा समज झाला असेल तर याचा अर्थ काय? यातून एकच संदेश मिळताे ताे म्हणजे २०१९ ची वाट खडतर अाहे. काँग्रेसच्या दीडपट भाजपला जागा मिळाल्या असल्या तरी मतांची टक्केवारी किती अाहे? पूर्वीइतकेच मतदान भाजपला झाले. दाेन्ही पक्षांचे अाकडे ३०-३१ टक्क्यांच्या अासपास असून भाजपचे उमेदवार फारच कमी फरकाने विजयी झाले अाहेत. जर काँग्रेसकडे तुल्यबळ नेता असता तर हे अाकडे कदाचित उलटे पडले असते.

 

नरेंद्र माेदी अाणि राहुल गांधी यांच्यातील अाराेप-प्रत्याराेपांचा तमाशा साऱ्या देशाने पाहिला, दर्जाहीन चर्चा अाणि दाेघांनीही केलेल्या नाैटंकीने कर्नाटकातील निवडणुकीला वेगळे परिमाण मिळवून दिले. सिद्धरामय्या यांनी लिंगायत मतांसाठी टाकलेला फासा नेमका उलटा पडला. या निवडणूक प्रचार माेहिमेत तत्त्वे, विचारधारा अाणि धाेरणांवर फारशी चर्चा झाली नाही, हा देशासमाेरील माेठा चिंतेचा विषय अाहे.


या निवडणुकीने भारतीय राजकारण एककल्ली हाेत चालल्याचे दाखवून दिले. विशेषत: भाजप अाणि काँग्रेसवर अनुक्रमे नरेंद्र माेदी व राहुल गांधी यांचाच एकाधिकार अाहे. पक्षांतर्गत मतभिन्नता वानगीदाखलदेखील दिसत नाही. काँग्रेस असाे की भाजप, येथे फक्त एकच अावाज चालताे. ही बाबदेखील लाेकशाहीसाठी घातक ठरू शकते. भारत अाता काँग्रेसमुक्त हाेत अाहे, असे म्हणणे हे तर त्याहून अधिक धाेकादायक अाहे. काँग्रेसची सत्ता भलेही पंजाब, पुद्दुचेरी अाणि मर्यादित राहिलेली असेल; परंतु देशातील एकही जिल्हा असा नसेल जेथे काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते नसतील. काेणतीही सरकारे केवळ अापल्या कर्मचाऱ्यांना जाेडून ठेवतात, परंतु राजकीय पक्ष सामान्य लाेकांना बांधून ठेवतात. भाजप देशातील गावागावांत पाेहाेचला तर त्याचे स्वागतच अाहे; परंतु एखादा तुल्यबळ  विराेधी पक्ष अस्तित्वात असणेदेखील लाेकशाहीची प्राथमिक गरज अाहे.


काँग्रेसने अापला पराभव मान्य केलाच अाहे, मतदानानंतर लगेच सिद्धरामय्या यांनी ‘मुख्यमंत्रिपद एखाद्या दलित व्यक्तीस दिले जाऊ शकते’ असे स्पष्ट केले तेव्हाच काँग्रेसचा पराभव झालेला दिसत हाेता. वस्तुत: कर्नाटकबाहेरील लाेकांना याची कल्पना नसेल की, देवेगाैडा यांचा पक्ष काेणत्याही स्थितीत सिद्धरामय्या यांना समर्थन देत नाही. कधीकाळी ते देवेगाैडा यांचे शिष्याेत्तम हाेते. त्यांच्या पक्षात राहिले, नंतर त्यांच्याचविरुद्ध बंडदेखील केले. अाता काँग्रेसने जर जनता दल (से) ला समर्थन देण्याची घाेषणा केली अाणि कुमारस्वामी यांना मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय घेतला अाहे तर त्याचे स्वागत सिद्धरामय्या का नाही करणार? हेच निमंत्रण देवेगाैडा यांना नवी झेप घेण्यासाठी संधी देऊ शकते अाणि २०१९ च्या निवडणुकीत ते पंतप्रधानपदाचे दावेदार ठरू शकतात. एका दक्षिण भारतीय माजी पंतप्रधानाच्या नावावर सारे विराेधी पक्ष एकत्र येणे फारसे कठीण नाही.

 

कर्नाटकात भाजप बहुमताच्या जवळ पाेहाेचले, परंतु ते गाठू शकले नाही. त्यामुळे सशक्त विराेधी पक्षाची भूमिका स्वीकारायला हवी. मात्र जर गाेवा, मणिपूरसारखी पुनरावृत्ती केली तर नाहक बदनामी वाट्याला येण्याचा धाेका अाहे. राज्यपाल पदावरदेखील संशयाचे ढग दाटतील अाणि २०१९ ची रणनीती फाेल ठरेल. एक मात्र खरे की, माेदी लाटेचा प्रभाव अाेसरत चालला अाहे अाणि २०१९ च्या निवडणुकीत नाकाने चणे खावे लागणार हे वास्तव भाजपने स्वीकारले पाहिजे. अागामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक निवडणुकीतून काही महत्त्वपूर्ण वस्तुपाठ मिळतात. त्यापैकी पहिला म्हणजे भाजपचा मुकाबला एकटी काँग्रेस कदापि करू शकत नाही. जर देशातील विराेधी पक्षांना भाजपचा मुकाबला करायचा असेल तर त्यांना प्रादेशिक स्तरावरील विविध स्थानिक पक्षांची अाघाडी बनवावी लागेल.

 

जर काँग्रेस अाणि जद (से) एकत्र निवडणूक लढवले असते तर कर्नाटकात भाजपला कदाचित एकतृतीयांश जागादेखील मिळाल्या नसत्या. २०१४ मध्ये भाजपला केवळ ३१ टक्के मते मिळाली हाेती. दुसरा म्हणजे भावी पंतप्रधान काेण याचा निर्णय २०१९ च्या निवडणुकीनंतरच व्हायला हवा. उदा. कुमारस्वामी यांचे नाव अापाेअाप समाेर अाले की नाही? तिसरा म्हणजे देशातील गरिबी, बेराेजगारी, निरक्षरता अाणि विषमता दूर करण्यासाठी सर्व विराेधी पक्षांना ठाेस, व्यावहारिक अाणि कालबद्ध कार्यक्रम लाेकांसमाेर ठेवावा लागेल. केवळ निवडणूक जिंकणे महत्त्वाचे नाही, तर देशाचा चेहरा बदलण्याची गरज अाहे.

 

dr.vaidik@gmail.com

बातम्या आणखी आहेत...