आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जतनधर्म वाढवावा! (अग्रलेख)

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ, लेखक, विज्ञान प्रसारक डॉ. जयंत नारळीकर यांनी त्यांच्या वैयक्तिक जीवनातील दृकश्राव्य क्षण नुकतेच राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे जतनासाठी सुपूर्द केले ही बाब कुठल्याही संवेदनशील व्यक्तीला सुखावणारी आहे. डाॅ. नारळीकर यांच्यासारख्या ख्यातनाम संशोधकाच्या आयुष्यातील हे दृकश्राव्य क्षणांचे 'फुटेज' सध्याच्या आणि भविष्यातील पिढ्यांसाठी मोलाचा ठेवा ठरतील यात शंका नाही. यानिमित्ताने 'जतन-संवर्धन-दस्तऐवजीकरण' या कळीच्या मुद्द्याचे पुनर्जागरण झाले हे सर्वात महत्त्वाचे आहे. आपल्याकडे 'इदं न मम' अशा मानसिकतेतून खूप काही करायचे, पण नामानिराळे राहायचे असेच संस्कार पूर्वापार चालत आले आहेत. परिणामी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आभाळाएवढे कर्तृत्व गाजवूनही कुणाचीही कुठल्याही स्वरूपाची अधिकृत माहिती मिळू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. 


आपल्याकडे महाकवी कालिदासाचे समग्र साहित्य पिढ्यान््पिढ्या लोकप्रिय आहे, पण कालिदास कोण, त्याचा काळ कोणता, त्याचे गुरू कोण, त्याचे समकालीन कोण, त्याचे अध्ययन, प्रतिभा, साहित्यनिर्मितीची पार्श्वभूमी.. या सगळ्यांविषयी कुठलीही माहिती नाही. संतकाव्यात किमान नामा म्हणे, तुका म्हणे... इतपत उल्लेख आढळतात. पण बहुसंख्य क्षेत्रात 'कृती सर्वांसमोर, पण कर्ता अज्ञात' असेच चित्र आढळते. अगदी पन्नास-साठ वर्षांपूर्वीही याच उदासीनतेचा प्रत्यय येतो. या पार्श्वभूमीवर डॉ. नारळीकरांनी स्वत:हून आपल्या आयुष्यातील वैयक्तिक अनुभवांचे, गुरूंचे, मातापित्यांचे, घराचे, कुटुंबीयांचे जे दृकश्राव्य फुटेज 'एनएफएआय'कडे सोपवले ते अतिशय स्वागतार्ह पाऊल म्हणावे लागेल. आज सहस्रचंद्रदर्शनी वयातले दीर्घानुभवी नारळीकर सर त्यांच्या तरुण वयात कसे दिसत होते, त्यांचे गुरू फ्रेड हॉयेल कसे होते, साठ वर्षांपूर्वी नारळीकरांच्या आई इसराजसारखे दुर्मिळ वाद्य किती सफाईने वाजवत होत्या, त्यांच्या घरात हत्ती कसे येत होते, कौटुंबिक नाती कशी जोपासली जात होती... मध्यमवर्गीय कुटुंबाचे अत्यंत हृद्य असे चित्र या फुटेजमधून उभे राहते. अशा जागतिक कीर्तीच्या व्यक्तीचे घरगुती क्षण जतन करणे हे राष्ट्रीय कर्तव्य मानून 'एनएफएमआय'सारख्या संस्थांनी हे फुटेज जतन केले पाहिजे. 


सद्य:स्थितीत राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात प्रामुख्याने चित्रपटांचे जतन केले जाते. पण आपल्या देशाचे भूषण असणाऱ्या कलावंत, शास्त्रज्ञ, वैज्ञानिक, साहित्यिक, तंत्रज्ञ... अशा जीवनाच्या विविध क्षेत्रांतील व्यक्तींचे दृकश्राव्य स्वरूपातील जतन हा देशाच्या दृष्टीनेही मोलाचा ठेवा आहे. जतनाच्या मुद्द्याला जोडून येणाऱ्या तांत्रिक मुद्द्यांचा विचारही करणे अगत्याचे आहे. नारळीकर सरांनी दिलेले फुटेज आठ एमएम आणि सुपर एट एमएम या स्वरूपाचे आहे. आता त्या फुटेजसाठी लागणारे प्रोजेक्टर्सही दुर्मिळ आहेत. पन्नास वर्षांपूर्वीच्या फुटेजचे महत्त्व इतके वाटत असेल तर आगामी पन्नास वर्षांत हे फुटेज किती मौल्यवान ठरेल याचा अंदाज करणे अवघड नाही. देशाचे विज्ञान क्षेत्रातील आजवरचे एकमेव नोबेल प्राप्त करणारे सर सी. व्ही. रामन यांची तुरळक छायाचित्रे वगळता त्यांच्याविषयी कुठलीही माहिती मिळत नाही. त्यांचे लेखन आणि ही छायाचित्रे इतकाच ठेवा आपल्याजवळ आहे. 


तीच बाब डॉ. जगदीशचंद्र बोस, मेघनाद साहा, शांतीस्वरूप भटनागर, होमी भाभा अशांच्या बाबतही आहे. मग त्याहीपूर्वीच्या भास्कराचार्य, आर्यभट्ट, वराहमिहिर यांच्याविषयी न बोलणेच बरे. सरल्या पिढीच्या खांद्यावरच नेहमी उगवती पिढी उभी राहत असते आणि भविष्याचा वेध घेत असते. ज्या खांद्यांचा भक्कम आधार आपण घेतो ते खांदे कसे घडले, ते कुणाच्या खांद्यावर उभे होते हे जाणून घेणे आणि त्याविषयी कृतज्ञ असणे हे राष्ट्रकर्तव्यच आहे. विदेशांत अनेक ठिकाणी त्या-त्या देशांनी आपले असे कर्तृत्ववान कलावंत, साहित्यिक, संशोधक विविध स्वरूपात जतन केलेले दिसतात. ज्या गावात ती व्यक्ती जन्मली, शाळेत गेली, तिचे कर्तृत्व घडले, ती प्रत्येक जागा, ती वस्तू.. यांचे अत्याधुनिक साधनसामग्रीचा वापर करून केलेले जतन विदेशांत कित्येक ठिकाणी दिसते. त्या तुलनेत आपल्याकडील चित्र फारसे आशादायक नाही. 


जतनामध्येही आपण प्राधान्यक्रम लावताना दिसतो. राजकीय नेते, पुढारी, कलावंत - लेखक अशी उतरती भाजणी दिसते. त्यात शास्त्रज्ञ-वैज्ञानिक-संशोधकांचे स्थान नेमके कुठे आहे, हा प्रश्न आजतरी अनुत्तरित आहे. मिसाइलमॅन म्हणून ख्यातनाम असणाऱ्या डॉ. कलाम यांचेही वैज्ञानिक म्हणून (राष्ट्रपतिपद स्वीकारण्याआधीचे) फुटेज आहे का, असा प्रश्न विचारावा लागेल. जतनाविषयीची जाणीवजागृती जशी विदेशातल्या समाजात रुजलेली आढळते ती दृष्टी, ती जागृती आपल्याकडे मात्र अत्यल्प दिसते. त्यामुळेच नारळीकर सरांनी स्वत: पुढाकार घेत या जतनाच्या दिशेने उचललेले पाऊल महत्त्वपूर्ण आहे.

बातम्या आणखी आहेत...