Home | Editorial | Agralekh | Editorial about final match of football World Cup

जिगर हरली, दर्जा जिंकला! (अग्रलेख)

दिव्य मराठी | Update - Aug 02, 2018, 05:03 PM IST

फुटबॉल विश्वचषकाचा अंतिम सामना रंगणार असल्याचे निश्चित झाल्यानंतर क्रोएशियाच्या पाठीराख्यांमध्ये वाढ झाली.

 • Editorial about final match of football World Cup

  'अंडरडॉग्ज' जिंकावेत ही बहुतेकांची भावना असते. म्हणूनच क्रोएशिया आणि फ्रान्स यांच्यातील फुटबॉल विश्वचषकाचा अंतिम सामना रंगणार असल्याचे निश्चित झाल्यानंतर क्रोएशियाच्या पाठीराख्यांमध्ये वाढ झाली. आकाराने मराठवाड्याएवढा नसलेला आणि लोकसंख्येने पुण्यापेक्षाही कमी. क्रोएशियाने फुटबॉल विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात धडक मारावी याचे क्रीडाप्रेमींना कौतुक वाटले. क्रोएशियाने खेळही तसाच जिगरबाज केला. पिछाडीवर पडल्यानंतरही मोक्याच्या वेळी गोल करून अशक्य वाटणारे विजय मिळवले. अंतिम सामन्यात त्यांच्याकडून याच चमत्काराची पुनरावृत्ती जगभरच्या फुटबॉलप्रेमींना होती. ब्राझील, जर्मनी, स्पेन, अर्जेंटिना, इंग्लंड हे माजी विश्वविजेते स्पर्धेतून बाद झाले होते.


  बेल्जियम, मेक्सिको, उरुग्वे, पोर्तुगाल या धोकादायक संघांना गाशा गुंडाळावा लागला. या धक्कादायक निकालांची परंपरा कायम राखत क्रोएशिया यंदाच्या विश्वचषकाची सांगता करेल, असे वाटत होते; प्रत्यक्षात फ्रान्सच्या नियोजनबद्ध, ताकदवान, वेगवान खेळापुढे क्रोएशियाची जिगर कमी पडली. एका चिमुकल्या देशाचे जगज्जेता होण्याचे स्वप्न भंगले. सामन्यात सर्वाधिक वेळ फुटबॉलवर ताबा राखल्यानंतरही क्रोएशिया फ्रान्सवर मात करू शकला नाही. फ्रान्सच्या फुटबॉलपटूंनी मात्र कमी वेळेत मिळालेल्या संधींचे सोने केले. सन १९९८ च्या विश्वविजेत्या फ्रान्स संघात खेळलेले दिदिएर देशाम्प्स यंदाच्या फ्रान्स संघाचे प्रशिक्षक होते. अंतिम सामन्याचे ताण-दडपण कसे झुगारून टाकायचे हे दिदिएरना माहिती होते. शिवाय, नव्वद मिनिटांच्या खेळात संघाचा दम आणि शक्ती कमी न होऊ देता कोणते खेळाडू कधी बदलायचे याचेही त्यांचे नियोजन पक्के होते. तुलनेने क्रोएशियाची रणनीती कमी पडली. ज्या अंतिम टप्प्यात क्रोएशियाला कामगिरी उंचावण्याची गरज होती, नेमकी तेव्हाच फ्रान्सच्या तरुण, तगड्या, शिस्तबद्ध खेळाडूंपुढे त्यांची दमछाक झाली.


  खेळ म्हणजे फक्त दोन बाजूंमधील शारीरिक कौशल्य, दम, लवचिकता, शक्ती आणि जीवतोड परिश्रम यांच्यातला संघर्ष असतो, असा अनेकांचा फार मोठा गैरसमज आहे. शारीरिक कौशल्याला कणखर मनाची आणि बुद्धिचापल्याची जोड असल्याशिवाय मैदानात जिंकता येत नसते, हे खरे वास्तव आहे. २०० देशांना मागे टाकून अंतिम सामना खेळणाऱ्या दोन संघांच्या गुणवत्तेत एरवी फार मोठा फरक नसतो. डोके शांत ठेवून मोक्याचा क्षण साधण्याचे कसब आणि मैदानाबाहेर आखलेली रणनीती मैदानात उतरवणारे खंबीर मन ज्याच्याकडे असते तोच अखेरीस बाजी मारतो. क्रोएशिया आणि फ्रान्स यांच्यातला खरा फरक इतकाच होता. बाकी दोन्ही संघांनी जगभरच्या कोट्यवधी फुटबॉलप्रेमींपुढे लाजवाब, थरारक खेळाचा नजराणा सादर केला. फ्रान्सच्या विजयाला एक 'कृष्णकिनार'देखील आहे. फ्रान्सच्या विश्वविजयी संघात दहा जण कृष्णवर्णीय आहेत. हे सगळे एक तर अाफ्रिकी देशांमधल्या स्थलांतरित माता-पित्यांच्या पोटचे किंवा आफ्रिकी देशात जन्मून जगण्यासाठी फ्रान्समध्ये दाखल झालेले.


  संघर्ष करून या कृष्णवर्णीयांनी फ्रान्सच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळवले. तरीही काही वर्णभेदी फ्रेंचांना हे 'व्हाइट्स'वरचे अतिक्रमण वाटते. 'कृष्णवर्णीयांनी भरलेला संघ हीच का फ्रान्सची ओळख?' अशी नाके मुरडायला त्यांनी सुरुवात केली ती या गंडातून. कृष्णवर्णीयांच्या बहारदार खेळाने जगज्जेते केल्यानंतर आता हाच फ्रान्स एकदिलाने त्यांना मानवंदना देतो आहे. समता, बंधुता या मानवी मूल्यांची जगाला नव्याने ओळख करून देणारा फ्रान्स आणि एकूणच युरोप अलीकडच्या काळात संकुचितवादाच्या भोवऱ्यात अडकण्याची भीती निर्माण झाली आहे. या वर्णभेदी मानसिकतेवर फुटबॉल विश्वविजयाचा उतारा कामी येणार आहे. दरवेळच्या विश्वचषक नव्या ताऱ्यांना जन्म देतो. रशियातली विश्वचषक स्पर्धा याला अपवाद ठरली नाही. मेस्सी, नेमार, रोनाल्डो या नामवंतांचा विसर पडावा, अशी कामगिरी करत लुका मॉड्रीच (क्रोएशिया), पॉल पोग्बा, एम्बेपे (फ्रान्स), रोमेलु लुकाकू (बेल्जियम), हॅरी केन (इंग्लंड) अशांनी लाखो चाहते मिळवले. पण त्याच वेळी अाफ्रिका, आशिया, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या खंडांतला एकही संघ उपांत्य फेरी गाठू शकला नाही.


  उपांत्य फेरीनंतरचा विश्वचषक 'युरोपीय लीग'सारखाच वाटला. सन २०२२ च्या कतार फुटबॉल विश्वचषकात हे चित्र दिसू नये, अशी अपेक्षा फुटबॉलप्रेमींना असेल. आशियात रंगणाऱ्या आगामी विश्वचषकात भारतीय संघ दिसावा, अशी आशा भारतीय फुटबॉलप्रेमी बाळगतील. ४४ लाख लोकसंख्येच्या क्रोएशियाने १३० कोटींच्या भारताला तेवढी प्रेरणा नक्कीच दिली आहे. रत्नपारखी नजर आणि पैलू पाडणारे प्रशिक्षक मिळाले तर जग गाजवण्याची धमक अगदी आसामातल्या भाताच्या शेतातून आलेल्या हिमा दासकडेही असू शकते, हे देशाने नुकतेच पाहिले आहे. ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेलांनीही ते पाहिलेले असावे इतकेच.

Trending