आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईकरांच्या मरणकळा (अग्रलेख)

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईकराची अवस्था रोज मरण्यासारखी झाली आहे. त्यात पावसाळा म्हणजे संकटांची मालिकाच असते. गेल्या आठवड्यात विमान पडले आणि साेमवारी अंधेरी स्थानकानजीक रेल्वे मार्गावरच एक पादचारी पूल पडला व पश्चिम रेल्वे-हार्बर रेल्वे ठप्प झाली. लोकल मोटरमनच्या प्रसंगावधानाने मोठी जीवित हानी होता होता वाचली. रेल्वे मार्गावरचे पूल सहजपणे कोसळतात, त्याची जबाबदारी सरकारी यंत्रणा एकमेकांवर ढकलतात. पूल नादुरुस्त झाले आहेत, त्यांच्या डागडुजीची जबाबदारी कोणीच घेत नाही, हे संतापजनक आहेच. 


प्रशासन कोडगे झाल्याचे लक्षण आहे. सर्वसामान्यांच्या हालअपेष्टा, दैन्याकडे सहानुभूतीने बघणारा कोण नाही आणि त्यात मरण आले तर त्याच्या मरणाला काडीचीही किंमत दिली जात नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी रेल्वे मंत्रालयाचा कारभार हाती घेतल्यानंतरची एल्फिन्स्टन पुलावरची चेंगराचेंगरीनंतरची ही दुसरी दुर्घटना. नेहमीप्रमाणे त्यांनी दुर्घटनेच्या चाैकशीचे आदेश वगैरे दिले. यंत्रणेनेही तात्पुरते काम करत असल्याचे दाखवले. दोन-एक दिवसांत असे काही घडले नसल्याचे वातावरण तयार होईल आणि प्रशासन व मुंबईकर नव्या दुर्घटनेची वाट पाहत बसेल. त्यानंतर परत तोच देखावा. मुंबई ही सगळीकडून पोखरली गेल्याने तिला असे धक्के बसतच राहणार. ती रक्तबंबाळ होत जाणार. दिवसेंदिवस तिला जगणे अशक्यप्राय होत जाणार. गेल्या २०-२५ वर्षांत तर या शहरावर अनेक बाजूंनी तीव्र हल्ले झाले आहेत. तिचे लचके तोडले गेले आहेत. जातीय द्वेषातल्या दंगलीपासून, धार्मिक तेढ निर्माण करणारे भीषण बॉम्बस्फोट, दहशतवादी हल्ले ते महापुराचे आक्रमण असे सर्व काही भोगले आहे व पचवले आहे. त्यात गेल्याच आठवड्यात घाटकोपरमध्ये अगदी मध्यवस्तीत एक चार्टर्ड विमान थेट कोसळले. हे आणखी एक नवे आक्रमण. दीड कोटी लोकसंख्येच्या मुंबई शहर आणि उपनगरांवरून रोज शेकडो विमाने ये-जा करत असतात, पण विमान कोसळण्याची दुर्घटना आजपर्यंत कधी घडली नव्हती. तीसुद्धा घडली. 


अशा घटनांचा समाजमनावरचा परिणाम खोलवर होत नाही, असे सरकारला वाटत असावे, पण तसे नाही. अंधेरीतील दुर्घटनेनंतर सोशल मीडियात लोकांनी मुंबई महापालिका, राज्य व केंद्र सरकार आणि रेल्वे प्रशासन यांच्यावर तुफान टीका केली. प्रशासन, सर्व पक्षांच्या राजकीय नेत्यांविरोधात लोक तीव्र संताप व्यक्त करत होते. बुलेट ट्रेनऐवजी रोज विलंबाने धावणारी, सुरक्षित लोकल सेवा सरकारने पुरवावी, रेल्वेची पायाभूत यंत्रणा सक्षम करावी, रेल्वे मार्गावरचे पूल सुरक्षित आहेत का हे तपासावे, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत होत्या. लोकांना काय हवे ते द्यावे, कुणा 'राजा'च्या मनात येईल ते त्याला देऊ नये, अशा स्वरूपाच्या टोकाच्याही प्रतिक्रिया होत्या. आता अशा दुर्घटना झाल्यानंतर बुलेट ट्रेनला सर्वसामान्यांकडून होणारा विरोध निश्चितच दखल घेण्याजोगा झाला आहे. मुंबईकरांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून, तिला बेदखल करत बुलेट ट्रेन पुरेशा सुरक्षा यंत्रणेशिवाय पळवत नेल्यास त्याचे गंभीर परिणाम सर्वांनाच भोगावे लागणार आहेत, हे स्पष्ट आहे. जमिनीखालून मेट्रो व त्यात बुलेट ट्रेन प्रकरण याने वातावरण घुसळत चालले आहे. 


या घडीला मुंबईत घडणाऱ्या प्रत्येक रेल्वे अपघाताची तुलना बुलेट ट्रेनशी जोडली जात आहे. कारण मुंबईकरांना बुलेट ट्रेनपेक्षा लोकल सेवा जवळची वाटते. लोकल या शहराच्या जीवनवाहिन्या आहेत. त्या तुटल्या तर शहरात हाहाकार माजतो. गेल्याच आठवड्यात 'मेट्रो मॅन' ई. श्रीधरन यांनी बुलेट ट्रेन ही श्रीमंतांसाठी आहे, ती सर्वसामान्य प्रवाशांच्या आवाक्याबाहेरची अाहे, तिचा सर्वसामान्य प्रवाशांना काहीच उपयोग नाही, असे थेट व स्पष्ट विधान केले. मोदी सरकारने ई. श्रीधरन यांना देशातील मेट्रो रेल्वेचे निकष ठरवण्यासाठी एका समितीचे अध्यक्षपद देऊ केले आहे, ते स्वीकारल्यानंतर काही दिवसांत त्यांनी बुलेट ट्रेनपेक्षा भारतीय रेल्वेने आधुनिक, स्वच्छ, सुरक्षित व वेगवान रेल्वे सेवा प्रवाशांना कशी पुरवावी याकडे लक्ष द्यावे, अशी प्रतिक्रिया दिली. ई. श्रीधरन यांच्या म्हणण्यात तथ्य आहे, कारण रेल्वेची सुरक्षितता आजही रामभरोसे आहे. मुंबईत रेल्वे प्रशासन, राज्य सरकार व मुंबई महापालिका यांच्यात सुरक्षिततेबाबत कोणताच समन्वय नसतो हे अनेक वेळा दिसून आलेले आहे. २००९ मध्ये ठाण्यात एक जलवाहिनी थेट धावत्या लोकलवर कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. त्या वेळी प्रत्येक यंत्रणा एकमेकांवर जबाबदाऱ्या ढकलत होत्या. आता दुसऱ्यांदा अशाच स्वरूपाची घटना घडली आहे. याचा अर्थ गेल्या दुर्घटनेतून या यंत्रणा काहीच शिकलेल्या नाहीत. त्या कोडग्या व असंवेदनशील झाल्या आहेत. मुंबईकर मात्र जीव मुठीत घेऊन रोज मरणकळा सोसतोय. 

बातम्या आणखी आहेत...