Home | Editorial | Agralekh | Editorial about maratha reservation

हिंसक वळणाची धास्ती (अग्रलेख)

दिव्य मराठी | Update - Jul 24, 2018, 08:12 AM IST

लाखोंची उपस्थिती असूनही कमालीची शिस्त आणि संयम हे मराठा आरक्षण मोर्चाचे वैशिष्ट्य असल्याचे गेल्या वर्षात सिद्ध झाले होते

 • Editorial about maratha reservation

  लाखोंची उपस्थिती असूनही कमालीची शिस्त आणि संयम हे मराठा आरक्षण मोर्चाचे वैशिष्ट्य असल्याचे गेल्या वर्षात सिद्ध झाले होते. हरियाणा व गुजरातमधील आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा संयम महाराष्ट्राची उच्च संस्कृती दाखवून देणारा होता. महाराष्ट्रातील सर्व ५८ मोर्चे शांततेत पार पडले. कोणत्याही राजकीय नेत्याचा वा पक्षाचा आधार न घेता हे मोर्चे निघत होते. यातून मराठा तरुणांमधील अस्वस्थता प्रगट होत होती. मुंबईतील मोर्चासमोर सरकारतर्फे काही घोषणा करण्यात आल्या. स्कॉलरशिपसाठी मार्कांची अट कमी करण्याच्या व फीमध्ये सवलती देण्याच्या घोषणेला मोर्चातील तरुण-तरुणींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. आरक्षणापेक्षाही अधिक प्रतिसाद या घोषणेवर होता. मराठा तरुण-तरुणींची अस्वस्थता कशात आहे हे त्या उत्स्फूर्त प्रतिक्रियेवरून लक्षात येत होते. सरकारने जे दिले त्यावर मराठा तरुणांनी तात्पुरते समाधान मानून घेतले व आरक्षणाचे समाधानही लवकरच वाट्याला येईल अशा अपेक्षेत राहिले. तसे झाले नाही व गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षण आंदोलनाने पुन्हा जोर पकडला.


  दुर्दैवाने या वेळी टोकाची भूमिका घेतली गेली. मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात अटकाव करण्याची घोषणा झाली. मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरला न जाण्याचा निर्णय घेतला. पंढरपूरमधील अमाप गर्दी व श्रद्धामय वातावरण याचा विचार करता तेथे राजकीय संघर्ष होऊ नये या अपेक्षेने मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला असेल तर ते योग्य होते. प्रा. सदानंद मोरे यांनी म्हटल्याप्रमाणे, मराठा मोर्चाचे तरुण नेतृत्व संयमी असले तरी अशा गर्दीचा गैरफायदा उठवणारे विघ्नसंतोषी असतात. त्यांनी गडबड केली असती तर महाराष्ट्रात सर्वोच्च स्थानी असलेल्या सांस्कृतिक व अाध्यात्मिक परंपरेला तडा गेला असता. वारकरी परंपरा ही धार्मिक म्हणण्यापेक्षा आध्यात्मिक आहे व हिंदू परंपरेत अध्यात्माचे स्थान धर्माहून वरचे आहे. तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाबद्दल टीका करणे बरोबर ठरणार नाही. मात्र त्याचबरोबर या निर्णयाचे समर्थन करताना त्यांनी मराठा मोर्चाच्या नेतृत्वावर जे आडून शरसंधान केले तेही टाळायला हवे होते. मुख्यमंत्र्यांची अस्वस्थता समजू शकते, पण अशा वेळी शब्द फार जपून वापरायला हवे होते. तसे न झाल्यामुळे आरक्षणाची मागणी करणारे तरुण संतापले. आंदोलनाला धार चढली. जलसमाधी घेण्यासारखी टोकाची पावले उचलली गेली. त्यामध्ये दुर्दैवाने काकासाहेब शिंदे या तरुणाचा मृत्यू झाला.


  या मृत्यूमुळे आरक्षण आंदोलनातील संयमाची मर्यादा ओलांडली जाण्याची धास्ती आहे. मुख्यमंत्र्यांनी याकडे तातडीने लक्ष दिले पाहिजे. सरकारने काही चांगल्या योजना मराठा समाजासाठी जाहीर केल्या; पण त्या तरुणांपर्यंत पोहोचल्या का, याचा काहीही आढावा घेण्यात आला नाही. मुख्यमंत्री घोषणा करतात, पण त्या वास्तवात उतरत नाहीत असे तरुणांचे म्हणणे आहे व मुख्यमंत्र्यांवरील त्यांचा विश्वास उडालेला आहे. याचे मुख्य कारण असे की, सरकारी योजना मराठा तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपचे नेते व कार्यकर्ते काम करताना दिसत नाहीत. केंद्रातील भाजप सरकार जसा एकखांबी तंबू आहे तसेच महाराष्ट्रात होत आहे.


  मराठा तरुणांची अस्वस्थता प्रामाणिक आहे. शेतीवर भागत नाही. औद्योगिकीकरण वेगाने होत नसल्याने नोकऱ्या मिळत नाहीत. आरक्षण नसल्याने व्यावसायिक शिक्षणामध्ये शिरकाव होत नाही. यातून हा पेच निर्माण झाला आहे. वेगाने आर्थिक विकास हेच त्याला उत्तर आहे, पण त्यासाठी काही वर्षे जावी लागतील. तो विकास होईपर्यंत काय करता येईल व मराठा तरुण-तरुणींना व्यावसायिक क्षेत्रात स्थिरावण्यासाठी कशी मदत करता येईल यावर सरकारने विचार केला पाहिजे. मराठ्यांचे नेतृत्व, त्यात जाणते राजेही आले, यांनी आजपर्यंत त्या दिशेने फारशी पावले उचलली नव्हती. त्या काळात आंदोलनेही झाली नव्हती. त्याला कारण आर्थिक पेच अवघड झाला नव्हता. आता तो अवघड झालेला आहे. यामुळेच मराठा व मराठेतर अशी फूट वेगाने रुंदावत चालली आहे.


  आमच्या हक्कांवर आक्रमण होत आहे अशी भावना मराठेतरांमध्ये आहे. याचे राजकीय परिणाम जे व्हायचे ते होतील, पण सामाजिक परिणाम वाईट असतील. हे थांबवण्यासाठी आरक्षण झटपट मिळणे कसे कठीण आहे व आरक्षण मिळेपर्यंत न थांबता मराठा समाजाचा विकास होणे कसे शक्य आहे याबाबत मुख्यमंत्र्यांनी परिणामकारक संवाद साधला पाहिजे. यासाठी पक्षातील, पक्षाबाहेरील तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची मदत घेतली पाहिजे. निवडणुकीसाठी ज्या फौजेची तयारी अमित शहा व मुख्यमंत्री करीत आहेत ती फौज त्यांनी आधी मराठा तरुण-तरुणींशी संवाद वाढवण्यासाठी वापरावी. सामाजिक विसंवादाने मराठी संस्कृतीला नख लागेल. तसे होता कामा नये.

Trending