Home | Editorial | Agralekh | Editorial about plastic ban

एका हट्टासाठी (अग्रलेख)

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 26, 2018, 07:12 AM IST

शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या हट्टामुळे सरकारने प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला. मध्यंतरी आदित्य यांनी मुंबईत न

  • Editorial about plastic ban

    शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या हट्टामुळे सरकारने प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला. मध्यंतरी आदित्य यांनी मुंबईत नाइट लाइफ नसल्याचीही खंत व्यक्त केली होती. आता त्यांना मुंबई व महाराष्ट्र प्लास्टिकमुक्त हवा आहे. लोकांच्या दैनंदिन जीवनातून प्लास्टिक हद्दपार झाल्यास पर्यावरण सुधारेल, नद्यानाले तुंबणार नाहीत. लोकांचे आयुर्मान वाढेल, गायी वगैरे प्राणी प्लास्टिकच्या पिशव्या खाऊन दगावणार नाहीत, असे त्यांना वाटते.


    शिवसेनेला त्यांच्या या हट्टात विज्ञानवादी-प्रागतिक वगैरे दृष्टिकोन दिसून आल्याने ही बंदी काहीही करून यशस्वी करून दाखवायची, असा वेगळा हट्ट पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी धरला आहे. पण अशा हट्टापायी प्लास्टिकवर अवलंबून असणारे राज्याचे अर्थकारण कोलमडणार आहे, हे या मंडळींच्या लक्षात आलेले नाही. प्लास्टिकला पर्याय काय आहेत ते उद्योगजगताला सांगितले गेलेले नाही. किती मायक्रॉनच्या पिशव्या वापरायच्या, किती मायक्रॉनच्या नाहीत, इतक्या मर्यादित चौकटीत सरकार या बंदीकडे पाहत आहे आणि मध्यमवर्गाचे प्रतिनिधित्व करणारी पर्यावरणवादी मंडळी प्लास्टिक बंदीमुळे पर्यावरण स्वच्छ होईल, असा भ्रम पसरवत आहेत. मुळात फक्त प्लास्टिकमुळे शहरातील किती गटारे, नाले, नद्या तुंबतात, किती जलजीवांना धोका पोहोचला आहे, मानवी जीवनाला कोणत्या प्लास्टिक वापरामुळे धोका आहे याबद्दल स्पष्टता नाही. तरीही आपले पर्यावरणमंत्री जिवाला धोका पसरवणाऱ्या साथी आणि रोगराई यांना कारण प्लास्टिकच आहे, असे साफ ठोकून देतात. पर्यावरणमंत्र्यांना हे माहीत नसावे की, प्लास्टिक हे आरोग्याला अपायकारक नाही. प्लास्टिकमध्ये अन्य रासायनिक द्रव्ये टाकून एखादी वस्तू तयार केल्यास ती कदाचित आरोग्याला अपायकारक असू शकते. उलट प्लास्टिकचे छोटे-मोठे डबे, वेष्टनं यात अत्यंत महत्त्वाची औषधे, द्रव्ये ठेवली जातात, शस्त्रक्रियेसाठी लागणारी साधने प्लास्टिकमध्ये ठेवतात. कदम यांनी कोणत्या प्रकारचे प्लास्टिक विषारी आहे हे आधी स्पष्ट करावे. या बंदीचा खरा फटका प्लास्टिक रिसायकलिंग उद्योगाला बसणार आहे. त्याचा विचार उद्योग खाते असलेल्या शिवसेनेने केलेला नाही. महाराष्ट्रातील प्लास्टिक रिसायकलिंग उद्योगाला अगोदरच नोटबंदीचा जबर फटका बसला आहे. त्यातून तो सावरत असताना ही नवी बंदी म्हणजे दुसरा घाव आहे.


    घनकचरा गोळा करणे व त्याची विल्हेवाट लावणे हा महापालिकांना भेडसावणारा खरा प्रश्न आहे. त्याचे एक कारण लोकांमध्ये कचरा टाकण्याबद्दलची शिस्त नाही. २०१६मध्ये केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने देशातील प्रमुख ६० शहरांमधील घनकचऱ्याबाबत एक अहवाल तयार केला होता. या अहवालात महापालिकेकडून गोळा करणाऱ्या एकूण घनकचऱ्यात प्लास्टिकचा वाटा सर्वात कमी म्हणजे केवळ ६.९ टक्के इतका आढळून आला आहे. गोळा केलेल्या बहुतांश प्लास्टिकचे रिसायकलिंग होते आणि रिसायकलिंग न होणाऱ्या प्लास्टिकचे प्रमाण अत्यंत अल्प असे आहे. मुंबई शहर व त्याच्या आसपासच्या भागात प्लास्टिक रिसायकलिंगचा उद्योग गेली ६० वर्षे आहे. या उद्योगाला या बंदीमुळे जवळपास गाशा गुंडाळावा लागणार आहे. या उद्योगाला मिळणारे भंगार-प्लास्टिक वापरलेले असते. काही कारखान्यांतला तो टाकाऊ पदार्थ असतो. हे प्लास्टिक पुन्हा वापरता येते, असे तंत्रज्ञान हे उद्योग वापरत आहेत. त्यामुळे प्लास्टिकच्या कॅरीबॅग, बाटल्या, खेळणी, चपला, पाइप, कंटेनर, ड्रम, बादल्या, पत्रे, दुधाच्या पिशव्या, घरातले टाकाऊ झालेले प्लास्टिक, कारखान्यातील प्लास्टिक कचरा गोळा करून त्यांचे विकेंद्रीकरण करून पुन्हा बाजारात हे प्लास्टिक नव्या स्वरूपात आणले जात आहे. हा कच्चा माल बंदीमुळे या उद्योगांसाठी मिळताना मारामार होणार आहे.


    या उद्योगाच्या मेहनतीवर (यात हजारो कामगार काम करत आहेत. त्यामध्ये स्त्रियांची संख्या उल्लेखनीय अशी आहे) व भरवशावर अवलंबून असणारी औषध, हॉटेल, रिटेल व ऑनलाइन इंडस्ट्री देशभर इतकी विस्तारली आहे की प्लास्टिक बंदीचे परिणाम काही काळानंतर या उद्योगांच्या उलाढालीवर दिसू लागणार आहेत. एकट्या मुंबई व पुण्यातून देशातले २५ ते ३० टक्के ऑनलाइन रिटेलर आपला व्यवसाय करत असतात. त्यांचे पॅकेजिंगचे गणित बंदीमुळे पूर्णत: कोलमडणार आहे. प्लास्टिक पॅकेजिंगला पर्याय म्हणून कागदी पुठ्ठ्यांकडे वळल्यास कागदाची मागणी किती वेगाने वाढेल, याची कल्पना राज्य सरकारने केली असावी, असे वाटत नाही. पाश्चात्त्य देशांतही प्लास्टिक बंदीचे असे कायदे झालेले आहेत, पण त्याला यश आलेले नाही. पण या देशांनी प्लास्टिक कचऱ्याचे व्यवस्थापन, रिसायकलिंग उद्योग अधिक सक्षम केला आहे. आपण मात्र आपलेच उद्योग मारण्याचे ठरवले आहे ते एकाच्या हट्टासाठी.

Trending