आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन शिलेदारांचे डाव (अग्रलेख)

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोकसभा निवडणुकांना काही महिने शिल्लक असताना अर्थव्यवस्थेपुढच्या समस्या व बेरोजगारीच्या प्रश्नावर आपली पाच वर्षांतील कामगिरी जनतेपुढे ठेवण्यापेक्षा मुस्लिम समाजातील तिहेरी तलाक प्रश्न आणि राम मंदिर हे मुद्दे राजकारणात पेटत ठेवल्यास होणारे ध्रुवीकरण आपल्या फायद्याचे असल्याची खात्री भाजपला पटली आहे. त्या दृष्टीने भाजपची शिस्तबद्ध पावले पडायला सुरुवात झाली आहे. तसा नारळच भाजपच्या मोदी, शहा, निर्मला सीतारमण या तीन शीर्ष नेत्यांनी - शिलेदारांनी फोडला. गेल्या आठवड्यात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मुस्लिम समाजातील काही बुद्धिवादी, विचारवंतांसोबत एक बैठक घेतली. काँग्रेस नेते सलमान खुर्शिद यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या या बैठकीचे वृत्त उर्दू वर्तमानपत्र 'इन्किलाब'मध्ये 'होय, काँग्रेस हा मुस्लिमांचा पक्ष आहे,' या मथळ्याने प्रसिद्ध झाले. या वृत्ताची दखल एकाही राष्ट्रीय माध्यमाने घेतली नाही वा न्यूज चॅनलवर घमासान चर्चा घडल्या नाहीत. पण भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी त्याची त्वरित दखल घेतली. 


संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०१९ची लोकसभा निवडणूक काँग्रेस धर्मावर आधारित लढण्याचा विचार करत असेल आणि त्याने समाजात धार्मिक तणाव वाढून दंगली घडल्यास त्याची जबाबदारी काँग्रेसची राहील असे ठोकून वक्तव्य केले. सीतारमण यांच्या वक्तव्यानंतर पुढच्या दिवशी आझमगडमध्ये 'पूर्वांचल एक्स्प्रेस वे'ची कोनशिला बसवताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'काँग्रेस हा मुस्लिम पुरुषांचा पक्ष आहे, त्यात महिलांना स्थान कुठे,' असा सवाल केला. संसदेच्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या पावसाळी अधिवेशनात तिहेरी तलाक विधेयकावर वादळी चर्चेचे संकेत आहेत. सरकारच्या विधेयकावर काँग्रेससह अन्य विरोधी पक्ष फारसे समाधानी नसल्याने होणारा संभाव्य गोंधळ ओळखून काँग्रेसवरच त्याचे खापर फुटावे म्हणून मोदींनी भाजप पक्ष मुस्लिम महिलांचे हित सांभाळणारा आहे अशी भूमिका घेतली. मोदींच्या भाषणानंतर हैदराबादेत भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकांआधी अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात होईल असे वक्तव्य करून तिसरा बार उडवला. नंतर हे वक्तव्य अमित शहा यांनी केलेच नाही, भाजपचा राम मंदिराचा विषय अजेंड्यावर नाही अशी भाजपने सारवासारव केली. पण राम मंदिराचे पिल्लू सोडून राजकारणात चर्चा घडवून आणण्याची क्लृप्ती भाजप अनेक वर्षे खेळत आला आहे. आताच्या क्लृप्तीतून त्यांना काँग्रेसवर निशाणा साधायचा आहे. 


२०१४च्या लोकसभा निवडणुकात बहुसंख्य हिंदू समाजाची मते मिळवण्यासाठी भाजपने सर्व धार्मिक मुद्दे, पाकिस्तान, दहशतवाद, भ्रष्टाचार असे विषय वापरले होते. त्यांच्या प्रचारात आक्रमकपणा होता, सोशल मीडियाची त्याला साथ होती. त्यातून काँग्रेस हा केवळ मुस्लिम हित पाहणारा पक्ष आहे, अशी प्रतिमा त्यांनी काँग्रेसची करून ठेवली. याचे परिणाम दिसून आले. उ. प्रदेशातल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांनी भाजपच्या पदरात भरभरून मते टाकली. सेक्युलर व मुस्लिम िहतांची भाषा करणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांना त्यांनी धूळ चारली. आम्हालाच सर्वाधिक मुस्लिम मते मिळाली असा दावाही हा पक्ष करण्यास मोकळा झाला. गेल्या चार वर्षांत देशभरातील काँग्रेस 'मुस्लिमधार्जिणा पक्ष' असा शिक्का बसलेल्या भाजपच्या राजकीय आरोपातून अजूनही मुक्त झालेली नाही. मध्यंतरी माजी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी हा आरोप पुसून काढण्यासाठी प्रयत्न केले होते. 


काँग्रेस हा केवळ मुस्लिमांचा मित्रपक्ष आहे असा खोटा प्रचार भाजपने केला व त्यामुळे आम्हाला पराभव पत्करावा लागला असे विधान त्यांनी केले होते. त्यानंतर काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर राहुल गांधी यांनी गुजरात विधानसभा निवडणूक प्रचारात काँग्रेस हा अल्पसंख्याकांच्या हितसंबंधांची राखण करणारा पक्ष आहे, पण तो हिंदू हित सांभाळणाराही पक्ष असल्याचे मतदारांवर ठसवण्यासाठी विविध मंदिरांचे दर्शन घेतले होते. काँग्रेसने या निवडणुकांत गुजरात दंगलीचा मुद्दाही उचलला नाही. त्याचा राजकीय फायदा काँग्रेसला झाला. आता निवडणुका जवळ येत असल्याने काँग्रेस मुस्लिम बुद्धिवंतांच्या जवळ जात असेल तर त्यावरचे राजकारण करण्याची संधी भाजप सोडूच शकत नाही. कारण आर्थिक आघाडीवर त्यांच्याकडे सांगण्यासारखे फारसे काही नाही. अनेक आर्थिक धोरणे शेतकऱ्यांविरोधात असल्याने विरोधी पक्ष भाजपच्या विरोधात एकजूट होत आहेत. अशा परिस्थितीत काँग्रेसने विरोधकांची एकजूट करून दाखवल्यास अनेक राज्यांत प्रादेशिक पक्षांचे आव्हान भाजपपुढे तयार होऊ शकते. हे आव्हान जन्मास येण्याअगोदर तिहेरी तलाक, राम मंदिर असे मुद्दे उचलत काँग्रेसला कोंडीत पकडण्याचे भाजपचे डाव ध्रुवीकरण अधिक गडद करणारे आहेत.

बातम्या आणखी आहेत...