Home | Editorial | Agralekh | Editorial about vijay mallya

कासावीस मल्ल्या (अग्रलेख)

दिव्य मराठी | Update - Jun 28, 2018, 08:13 AM IST

मद्यसम्राट विजय मल्ल्या एकेकाळी सेलिब्रिटी म्हणून पंचतारांकित पार्ट्या, आयपीएल, फॅशन शोजमध्ये झळकत असायचा.

 • Editorial about vijay mallya

  मद्यसम्राट विजय मल्ल्या एकेकाळी सेलिब्रिटी म्हणून पंचतारांकित पार्ट्या, आयपीएल, फॅशन शोजमध्ये झळकत असायचा. किंगफिशर बिअर ब्रँडला मिळालेले यश अर्थात त्याचे होते, पण किंगफिशर एअरलाइन्स त्याला आर्थिक दृष्ट्या गोत्यात आणणारी ठरली. एका धंद्याच्या यशातून दुसऱ्या नवख्या धंद्यात उतरणे त्यात गुंतवणूक करणे हे तसे जोखमीचे काम असते. मल्ल्याने ती जोखीम स्वीकारली. जगभरातील प्रवासी विमान सेवा ही तेलाच्या राजकारणावर व व्यवसाय स्पर्धेवर अवलंबून असते. मल्ल्याच्या किंगफिशर एअरलाइन्सला तेलाची समीकरणे हाताळता आली नाहीत. तिला देशातल्या विमान कंपन्यांनी जोरदार टक्कर दिली. त्यात किंगफिशर ढासळत गेली. मल्ल्याला बँकांनी बेकायदा मदत केली. त्याच्या जोरावर काही काळ विमाने उडाली, पण एका धंद्यातल्या नफ्याने दुसरा धंदा त्याला रेटता आला नाही. अखेर मल्ल्याने दिवाळखोरी जाहीर केली. आपल्याला देशातल्या न्यायव्यवस्थेकडून न्याय मिळणार नाही, असे म्हणत मल्ल्याने परदेशात पळून जाण्याचे ठरवले. आणि आता तेथून तो कायदेशीर लढाई लढण्याचे प्रयत्न करतोय.


  मंगळवारी मल्ल्याने ट्विटरवरून आपली कर्ज फेडण्याची तयारी आहे, पण आपल्याविरोधात राजकीय षडयंत्र उभे केल्याने आपली प्रतिमा कर्जबुडव्यांचा पोस्टरबॉय, अशी विनाकारण झाली, अशी प्रतिक्रिया दिली. आपली आर्थिक बाजू पंतप्रधान व अर्थमंत्र्यांना पत्राद्वारे सांगितली, पण त्याचे उत्तर त्यांच्याकडून आले नाही, असा त्याचा आणखी दावा होता. मल्ल्या आताच का बोलला हे काही गूढ नाही. तो आता भारतीय तपास यंत्रणांकडून चहुबाजूंनी वेढला जातोय म्हणून त्याची सुटण्याची धडपड आहे. त्याला स्वत:च्या प्रतिमेची काळजी आताच का पडली, हेही आश्चर्यकारक आहे. मल्ल्याची प्रतिमा अझीझ प्रेमजी, रतन टाटा, नारायण मूर्तींप्रमाणे कधीच नव्हती. त्याने शरणागती पत्करली तरी त्याच्या प्रतिमेत बदल होणार नाही.


  मुद्दा त्याच्याभोवती तपास यंत्रणांनी फास आवळत चालल्याचा आहे. सार्वजनिक बँकांना गंडा घालून वा अन्य कोणतेही आर्थिक गैरव्यवहार करून परदेशात पळून जाणाऱ्या गुन्हेगारांविरोधात ईडी व सीबीआयने 'फरार आर्थिक गुन्हेगार' वटहुकुमाची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यात विजय मल्ल्याचे पहिले नाव आहे. या कायद्यानुसार ईडी-सीबीआयने मल्ल्याची देशभरातली जवळपास ९० टक्के मालमत्ता जप्त केली असून त्याने बुडवलेली सुमारे ९००० कोटी रु.ची बँक कर्जे गुन्हेगार कायद्यात समाविष्ट करण्याच्या हालचाली सुरू आहेत. ही प्रक्रिया पूर्ण होताच मल्ल्याचे सर्व कारनामे गुन्हेगार सदरात समाविष्ट होतील व तो एक आर्थिक घोटाळे केलेला फरार गुन्हेगार म्हणून आंतरराष्ट्रीय कायद्याच्या चौकटीत येईल. ब्रिटनमध्ये त्याने आश्रय घेतल्याने त्याच्या प्रत्यार्पणासाठी अनेक कायदेशीर अडचणी आहेत. त्याची सोडवणूक सुरू आहे. मल्ल्याचा दावा, आपला धंदा आर्थिक कारणाने डबघाईला आला, त्यात आर्थिक गैरव्यवहार किंवा जाणूनबुजून बँकांना गंडा घालण्याचा प्रयत्न नव्हता असा आहे, तर मल्ल्याने जाणूनबुजून बँकांना गंडा घातला व तो परदेशात पळून गेला, असे भारतीय तपास यंत्रणांना सिद्ध करायचे आहे.


  भारतीय तपास यंत्रणांची ही खेळी उलटवण्यासाठी मल्ल्याने आपली संपत्ती विकण्याची तयारी दर्शवली आहे. त्याने कर्नाटक उच्च न्यायालयात सुमारे १४ हजार कोटी रु.ची मालमत्ता विकून नऊ हजार कोटी रु.चे कर्ज आपण फेडू शकतो, त्यासाठी न्यायालयाने परवानगी द्यावी, असाही अर्ज दाखल केला आहे. या अर्जाला ईडी व सीबीआयने आक्षेप घेऊ शकते. कारण 'फरार आर्थिक गुन्हेगार' वटहुकुमांतर्गत कोणाचीही जप्त केलेली मालमत्ता वा संपत्तीचा लिलाव प्रकरणाची सुनावणी सुरू असतानाही करण्याची मुभा सरकारला दिली आहे. या तरतुदीचा फायदा ईडीने घेऊ नये यासाठी मल्ल्याचे हे अखेरचे प्रयत्न आहेत.


  मल्ल्या जेव्हा ब्रिटनमध्ये पळून गेला तेव्हाच त्याच्या पलायनाबाबत देशात राजकीय गदारोळ सुरू झाला होता. त्याचे पलायन मोदी सरकारच्या कृपाशीर्वादाने झाले, असा विरोधकांचा थेट आरोप होता. संसदेत त्यावरून हंगामा झाला होता. त्या वेळी विरोधकांच्या आरोपाला उत्तर देताना सरकारची पंचाईत झाली होती. देशाच्या तिजोरी सांभाळणाऱ्या चौकीदाराला गुंगारा देऊन मल्ल्याने पोबारा केला, ही टीका थेट पंतप्रधानांवर झाल्याने तर हा विषय अधिक संवेदनशील झाला होता. आता येत्या ३१ जुलै रोजी मल्ल्याच्या प्रत्यार्पणाबाबत ब्रिटनचे न्यायालय निकाल देणार आहे. हा निकाल विरोधात गेला तर त्याचे चांगलेच राजकारण मोदी सरकार २०१९च्या लोकसभा निवडणुकांत करेल, ही भीती मल्ल्याला असल्याने त्याने हे सगळे प्रकरण राजकीय षडयंत्र असल्याचा दावा केला आहे. त्याचे म्हणणे हे खरे आहे. तो केव्हाच राजकीय पक्षांचा निवडणूक विषय झाला आहे.

Trending