Home | Editorial | Agralekh | Editorial article about Challenges in frant of Imran Khan

वास्तव आणि आव्हाने (अग्रलेख)

दिव्य मराठी | Update - Jul 30, 2018, 08:00 AM IST

शनिवारी त्यांनी इम्रान खान यांच्या पीटीआयला ११५ जागा मिळाल्याचे जाहीर केले.

  • Editorial article about Challenges in frant of Imran Khan

    गेल्या आठवड्यात पाकिस्तानात नॅशनल असेंब्लीच्या निवडणुकांत इम्रान खान यांच्या 'पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ' (पीटीआय) या पक्षाने बाजी मारली असली तरी हा पक्ष सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक अशा (१३७ जागा) २१ जागांनी दूर असल्याने अन्य पक्षांशी जुळवाजुळवीचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. जवळपास सर्वच विरोधी पक्षांनी काही जागांचे निकाल वादग्रस्त असल्याची तक्रार केल्याने अंतिम जागांची घोषणा पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने केली नव्हती. मात्र शनिवारी त्यांनी इम्रान खान यांच्या पीटीआयला ११५ जागा मिळाल्याचे जाहीर केले. पण हा आकडा १०८ पर्यंत घसरणार आहे. कारण इम्रान खान पाच जागांवरून निवडणुकीत उभे राहिले होते त्या सर्व जागांवर ते निवडून आले आहेत. त्याचबरोबर त्यांच्या पक्षातील तीन नेत्यांनी दोन ठिकाणांहून िनवडणूक जिंकली होती, या जागाही कमी होणार आहेत. तरीही पीटीआयचे सरकार अन्य पक्षांशी हातमिळवणी करून १६४ जागा मिळवेल असे चित्र आहे. इम्रान खान यांचे लक्ष नॅशनल असेंब्लीत साधे बहुमत गाठण्याकडे आहे. तेथे १७२ आकडा गाठल्यास एक मोठी राजकीय आघाडी पाकिस्तानात उभी राहील. म्हणजे एका बाजूला इम्रान खान यांचा पीटीआय व छोटे पक्ष तर दुसऱ्या बाजूला नवाझ शरीफ यांचा पाकिस्तान मुस्लिम लीग, बिलावल भुत्तो यांचा पाकिस्तान पीपल्स पार्टी, मुत्तहिदा मजलिस ए-आलम व अन्य घटकपक्ष. कराचीतला मोहाजिर कौमी मुव्हमेंट व बलुचिस्तान अवामी पार्टी, इम्रान खान यांच्या युतीत सामील होईल अशा घडामोडी सुरू आहेत. हे राजकीय चित्र पाहिल्यास नवख्या इम्रान खान यांची चोहोबाजूंनी कोंडी करण्यासाठी तगडे विरोधक एकत्र होत आहेत हे दिसून येते. पण इम्रान यांच्या जागा दोघाही मातब्बरांपेक्षा खूप अधिक आहेत.


    इम्रान खान यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर आहे. पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच घराणेशाहीचा वारसा नसलेल्या एखाद्या राजकीय पक्षाचा नेता पंतप्रधान म्हणून निवडून आला आहे. त्याचबरोबर गेल्या ३० वर्षांत देशातील चारही प्रांतांत एकाच निवडणुकांत एकाही पक्षाला विजय मिळालेला नव्हता, ती किमया इम्रान खान यांच्या पक्षाने करून दाखवलेली आहे. यावरून जनतेच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येते. इम्रान खान यांनी निवडणूक प्रचारात 'इस्लामी वेलफेअर' या घोषवाक्याखाली अजेंडा जाहीर केला होता. या अजेंड्यात सामान्य पाकिस्तानी जनतेला रोजगार, योग्य शेतीमाल दर, दहशतवादापासून मुक्ती, परकीय गुंतवणूक व उद्योगधंद्यांसाठी सवलती अशी बरीच आश्वासने आहेत. ही आश्वासने पाकिस्तानच्या सध्याच्या अर्थव्यवस्थेकडे पाहिल्यास पुरी करण्यात अत्यंत कठीण आहेत. या देशाला चोहोबाजूंनी आर्थिक समस्यांनी घेरलेले आहे. जगातला क्रमांक दोनचा सर्वात तरुण असलेला हा देश आहे. पण तरुणांच्या हातात काम नसल्याने आर्थिक-सामाजिक प्रश्न वाढले आहेत. पहिल्या पत्रकार परिषदेत इम्रान खान यांनी चीनच्या गरिबी निर्मूलन योजनांचे उदाहरण दिले होते. तसा धडक कार्यक्रम त्यांनी हाती घेऊ असे म्हटले आहे.


    पाकिस्तानची सध्याची चालू खात्यावरची तूट १८ अब्ज डॉलर इतकी प्रचंड आहे. पाकिस्तानच्या इतिहासात आजपर्यंत एवढी तूट आलेली नव्हती. त्यात आगामी आर्थिक वर्षात चालू खात्यावरच्या तुटीत ४५ टक्क्यांनी वाढ होईल असा अंदाज आहे. या तुटीबरोबर सुमारे २.२ ट्रिलियन डॉलर इतकी अर्थसंकल्पीय तूटही अपेक्षित आहे. ही तूट आटोक्यात आणण्यासाठी बरेच शासकीय खर्च, योजनांना कात्री लावावी लागणार आहे. इम्रान खान यांनी सरकारची आर्थिक धोरणे स्पष्ट करताना पाकिस्तानी रुपयाची सातत्याने होत असलेली घसरण थांबवण्यासाठी सरकारला प्रयत्न करावे लागतील असे म्हटले होते. (हा प्रश्न भारताच्या रुपयालाही भेडसावत आहे.) परकीय गुंतवणूक वाढवणे, उद्योजकांना सवलती देणे, चीन-अफगाणिस्तान-रशिया-भारत असा चौकोनी व्यापारी आकृतिबंध राबवणे असे प्रयत्न त्यांना करावे लागतील. किंबहुना याला प्राधान्य द्यावे लागेल. भारतात पेट्रोलजन्य पदार्थांची टंचाई नाही, पण पाकिस्तानात सर्वत्र टंचाईमुळे पेट्रोल-डिझेलच्या पंपांबाहेर मोठ्या रांगा लागलेल्या दिसून येतात. पाकिस्तानात वीजचोरीचे प्रमाण सर्वाधिक आहे. या देशांत दरवर्षी १२ अब्ज डॉलरची वीज तयार होते त्यापैकी ४ अब्ज डॉलर वीज चोरीस जाते. तसेच २२ अब्ज पाकिस्तानी रुपयांचा नैसर्गिक वायू चोरीस जातो. चीनने नव्या सरकारचे स्वागत करत दीड अब्ज डॉलरचे कर्ज मंजूर केले आहे. सौदी अरेबियाही मदत करण्यास उत्सुक आहे. या कर्जाचा राजकीय अर्थ असा की, इम्रान खान यांचे सत्तेत येणे शेजारील देशांनी स्वीकारले आहे.

Trending