Home | Editorial | Agralekh | Editorial article about maratha resurvation

उशिरा टाकलेली पाऊले (अग्रलेख)

दिव्य मराठी | Update - Jul 28, 2018, 07:35 AM IST

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने शुक्रवारी आयोगाच्या अध्यक्षांची भेट घेतली.

 • Editorial article about maratha resurvation

  मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाविषयीचा अहवाल तयार करण्याच्या कामाला अधिक गती द्यावी, अशी विनंती करण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने शुक्रवारी आयोगाच्या अध्यक्षांची भेट घेतली. हे सरकारच्या वतीने उशिरा टाकलेले योग्य पाऊल आहे, असे म्हणायला हरकत नाही. कारण आरक्षणासंदर्भात आवश्यक ती पाऊले उचलण्यात हे सरकार दिरंगाई करते आहे, हाच मुख्य आरोप सध्या केला जातो आहे. वातावरण तापायला आणि मराठा तरुणांचा संताप प्रकट व्हायला तेच कारण ठरले आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्या आरोपाचे खंडन होईल यासाठी जी काही पाऊले उचलली जायला हवी होती त्याकडेच नेमके सरकारचे दुर्लक्ष होत होते. आंदोलनातून राजकीय लाभ उठवू इच्छिणाऱ्यांना दुर्लक्ष करून संपवणे हा त्यामागे सत्ताधाऱ्यांचा हेतू असेलही; पण त्यामुळे सर्वसामान्यांच्या मनात सरकारच्या आरक्षणाबाबतच्या हेतूविषयीच शंका निर्माण होते आहे, याचे भान सरकारमधले धुरीण गमावून बसले होते.


  मराठा आरक्षणासंदर्भात नेमेलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीने आयोगाच्या अध्यक्षांना लवकर अहवाल देण्याची विनंती करून आपण भानावर आलो आहोत, हे दाखवून दिले आहे. पण तेवढे केले म्हणजे आता सारे काही आलबेल होईल, अशा भ्रमातही सरकारने राहू नये. केवळ हेतू चांगले असून चालत नाही, ते चांगले आहेत हे दिसावे लागते. त्यासाठी सरकार म्हणून संबंधितांना आणखीही बऱ्याच गोष्टी कराव्या लागणार आहेत.


  मराठा समाजाला इतर मागासवर्ग म्हणून आरक्षण मिळाले तर त्यांना ज्या गोष्टी मिळतील त्या सर्व आरक्षण नसतानाही सरकारने देऊ केल्या आहेत. पण इथेही तेच आहे. केवळ देऊ करून होत नाही. त्या संबंधितांना मिळायला हव्यात. त्या संबंधितांपर्यंत पोहोचत नसतील तर दोष कोणाला द्यायचा? मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष असलेल्या चंद्रकांत पाटील यांनी त्यासाठी मराठा संघटनांनाच दोषी ठरवले आहे. सरकारने दिलेले हे लाभ आपल्या समाजातल्या गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी या संघटनांनी पुढाकार घ्यायला हवा होता, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. ती चुकीची मुळीच नाही. आंदोलनाच्या निमित्ताने तावातावाने बोलणाऱ्या मराठा नेत्यांपैकी कोणीच याकडे लक्ष का दिले नाही, याचा जाब त्यांनाही नक्कीच विचारता येईल. पण त्याआधी सत्ताधाऱ्यांना त्याचे उत्तर द्यावे लागेल. 'केडर बेस' म्हणवणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते तरी काय करत होते, हे संघ स्वयंसेवक म्हणून काम केलेल्या चंद्रकांत पाटलांना या निमित्ताने आम्ही विचारीत आहोत. राजकारणात अशा प्रश्नांची उत्तरे मिळत नसतात आणि ती मिळण्याची अपेक्षाही करायची नसते. म्हणूनच 'देर आये, दुरुस्त आये' असे म्हणून समाधान मानायचे हेच खरे.


  सरकार जर आरक्षणाच्या बाबतीत खरोखर प्रामाणिक असेल आणि त्यासाठी काही ठोस पावले उचलली गेली असतील तर ती समोर येणे महत्त्वाचे आहे. ते आधीच झाले असते तर आज आंदोलनामुळे जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे ती कदाचित झाली नसती. त्या निमित्ताने गेलेला चार जणांचा जीवही वाचला असता. जे केले ते विरोधकांनी राजकीय स्वार्थ समोर ठेवून घडवून आणले आहे, असा सरकारचा त्यावरचा खुलासा आहे. ते खरे मानले तरी विरोधकांना संधी कोणी दिली, हादेखील प्रश्न येतोच. पंढरपूर यात्रेत साप सोडण्याचे नियोजन झाले होते आणि त्याचे पुरावे सरकारकडे आहेत, असे सांगणाऱ्या चंद्रकांत पाटलांनी त्यात मोठमोठी राजकीय मंडळी आघाडीवर होती, असा गौप्यस्फोटही आज केला. तसे असेल तर त्यांच्या चेहऱ्यावरचे बुरखे सरकारने अजूनही का फाडलेले नाहीत, हादेखील प्रश्न आहेच. असे नियोजन कोणी करीत असेल आणि त्यातून घातपात घडवून आणत असेल तर त्यांच्यावर सरकार म्हणून काय कारवाई केली, हेही जाहीर करायला हवे.


  ही मंडळी बडी राजकीय मंडळी आहेत म्हणून सरकार त्यांच्यावर कारवाई करीत नसेल तर पुन्हा सरकारच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह उभे राहते. विरोधकांचे गुन्हे आणि चुका यांचा वापर त्यांना नियंत्रणात ठेवण्यासाठी किंवा राजकीय लाभासाठी सरकार करणार असेल तर तो लोकशाहीशी आणि पर्यायाने जनतेशी केलेला द्रोहच आहे. असा द्रोह याआधीदेखील जलसिंचन आणि इतर घोटाळ्यांच्या बाबतीत ठोस कारवाई टाळून सरकारने केला आहेच. ते पुन्हा घडू नये म्हणून यात्रेत साप सोडण्याचे नियोजन करणाऱ्यांची नावे सरकारने तातडीने जाहीर करावीत, त्यांच्याविरोधात गंभीर गुन्हे दाखल करावेत. ती सरकार म्हणून सत्ताधाऱ्यांची जबाबदारी आहे. तसे केले नाही तर त्यांना संरक्षण देण्यासाठी विद्यमान सरकारही त्यांच्याइतकेच दोषी ठरेल, हे वेगळे सांगायला नको.

Trending