Home | Editorial | Agralekh | Editorial article about narayan rane's stand on maratha reservation

रोखठोक राणे (अग्रलेख)

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 01, 2018, 08:17 AM IST

भीतीपोटी आपल्याच समाजाला सत्य न सांगू शकणाऱ्या नेत्यांच्या मांदियाळीत माजी मुख्यमंत्री नारायण राणे वेगळे ठरले आहेत.

  • Editorial article about narayan rane's stand on maratha reservation

    कायदा आणि परिस्थिती कळत असूनही 'समाजाचे' पाठबळ मिळणार नाही किंवा राहणार नाही या भीतीपोटी आपल्याच समाजाला सत्य न सांगू शकणाऱ्या नेत्यांच्या मांदियाळीत माजी मुख्यमंत्री नारायण राणे वेगळे ठरले आहेत. योग्य वेळी योग्य गोष्टींची जाणीव आपल्या समाजातील आंदोलकांना करून देण्याचे काम त्यांनी सोमवारी केले. ते तेवढ्यावरच थांबले नाहीत. या आंदोलनाला पेटते ठेवत आपली नेतेगिरीची हौस भागवू इच्छिणाऱ्यांनाही त्यांनी समाजासमोर उघडे करण्याचा प्रयत्न केला. आज ही महाराष्ट्राची गरज आहे आणि राणे यांनी ती ओळखली हे महत्त्वाचे आहे. यासाठी राणेंना धन्यवाद द्यायला हवेत. एरवी त्यांच्या बेपर्वा वृत्ती आणि आत्मकेंद्री राजकारणाविषयी कितीही टीका केलेली असली तरी त्यांच्या या ताज्या भूमिकेचे कौतुकच करायला हवे. अर्थात, राणेंचे हे सत्ताधाऱ्यांपुढचे लोटांगण आहे किंवा ती त्यांची राजकीय हतबलता आहे, अशीही टीका त्यांचे विरोधक करू शकतील. कदाचित, आंदोलन मागे घेण्यात रस नसलेले आंदोलकांचे काही नेतेही तशी टीका करतील. पण सर्वसामान्य मराठा समाज नारायण राणेंच्या भूमिकेशी सहमत होईल, अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही.


    खासदार असलेले नारायण राणे सरकारची वकिली करीत आहेत, अशी टीका काहींनी केली. पण ते समाजस्वास्थ्य बिघडू नये यासाठी पुढाकार घेत आहेत, हे त्यांचे म्हणणे अधिक संयुक्तिक वाटते. कारण सरकारचे लांगूलचालनच करायचे असते तर राणे यांनी विधान परिषद निवडणुकीत आणि नाणार प्रकल्पासंदर्भात सरकारविरोधी भूमिकाच घेतली नसती. ज्या मुलाखतीत त्यांनी मराठा समाजाला सरकारवर विश्वास ठेवून आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले त्याच मुलाखतीत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आणि त्यांच्या सरकारचे काय चुकले हेही तितक्याच स्पष्टपणे सांगितले. हे सांगताना ते हतबल नसतील तर मराठा आरक्षणासंदर्भात बोलताना हतबल आहेत असे म्हणणे योग्य होणार नाही. या संदर्भात आणखी एक बाब प्रकर्षाने लक्षात घेतली पाहिजे. इतर कोणत्याही नेत्यापेक्षा राणे यांना या विषयावर बोलण्याचा निश्चितच जास्त अधिकार आहे. कारण या विषयावर निर्णय घेण्यासाठी त्यांच्याच अध्यक्षतेखाली तत्कालीन आघाडी सरकारने समिती नेमली होती. त्या माध्यमातून त्यांचा या विषयाचा केवळ अभ्यासच झालेला नाही तर परिस्थितीची सर्वाधिक जाणही त्यांना आली आहे. म्हणूनच हा प्रश्न केवळ कायद्यानेच सुटू शकतो, हे ते वारंवार सांगतात आणि कोणत्याही आंदोलनात जाऊन बसायचे टाळतात. ज्यांच्याकडे मागासवर्ग आयोगाच्या अहवालाशिवायच आरक्षण देण्याचा मार्ग आहे, त्यांनी आपल्या कायदेपंडितांना घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घ्यावी, असेही ते ठणकावून सांगतात. त्यावर मात्र विरोधकांकडून प्रतिक्रिया येत नाही हे लक्षात घेण्यासारखे आहे. शरद पवारांसारखे नेते जर आज धरणे आंदोलनात जाऊन बसत असतील तर चार वेळा मुख्यमंत्री असताना त्यांनी काय केले? या राणे यांच्या प्रश्नाचे उत्तरही पवारांनी द्यायला हवे.


    मंगळवारी बीड जिल्ह्यात एका तरुणाने आरक्षणाची मागणी करीत गळफास घेतला. त्यामुळे या आंदोलनात प्राणांची आहुती देणाऱ्यांची संख्या सातवर पोहोचली आहे. ही संख्या इतक्या झपाट्याने वाढू लागली आहे की आता तरी आंदाेलनाच्या सूत्रधारांनी पुढचा धोका ओळखला पाहिजे. जागोजागी सार्वजनिक संपत्तीची हानी करून आणि तरुण मुलांच्या बळींची संख्या वाढूनदेखील आरक्षण मिळणारच नसेल आणि त्यासाठी न्यायालयीन लढाईच अंतिम असेल तर ही आंदोलने थांबत का नाहीत, हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. त्याचे वेळेवर योग्य उत्तर मिळाले नाही तर संपूर्ण मराठा समाजच टीकेचा धनी होऊन बदनाम होईल, त्यातून जातीय ध्रुवीकरणच होत राहील हे आंदोलनाचे नेते लक्षात का घेत नाहीत? सरकारशी कोणी चर्चा करायची? आपल्या मागण्या कोणी मांडायच्या? याबाबतीत आंदोलनांच्या सर्व घटक नेत्यांचे आता तरी एकमत व्हायला हवे. ते होत नसेल आणि सर्वांनाच आरक्षण मिळवण्याचे श्रेय घ्यायचे असेल तर हा प्रश्न न्यायालयाचा अंतिम निर्णय होईपर्यंत मिटणारच नाही. तसे झाले तर एकूणच समाजव्यवस्थेचे किती आणि काय नुकसान झालेले असेल याची कल्पनाही न केलेली बरी. नारायण राणेंना श्रेय मिळू द्यायचे नसेल तर ज्याला कोणाला ते घ्यायचे त्याने ते घ्यावे. पण आणखी कोणा काकासाहेबाचा बळी जाणार नाही हे आधी पाहावे. फडणवीस सरकार आणि नारायण राणेंनाही मराठा समाजाचे हित करायचे नसेल असे एकवेळ गृहीत धरूया. पण हे आंदोलन अजूनही पेटते ठेवणाऱ्यांना तर ते मुळीच करायचे नाही हेही तितकेच खरे आहे, याविषयी मात्र कोणाचे दुमत असणार नाही.

Trending