Home | Editorial | Agralekh | Editorial article About Rahul Gandhi

दोन नेते, एक 'अजेंडा' (अग्रलेख)

दिव्य मराठी | Update - Jul 23, 2018, 05:58 AM IST

नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधातला अविश्वासदर्शक ठराव फेटाळला जाणार याची कल्पना तेलुगू देसम आणि काँग्रेसला पक्की होती.

  • Editorial article About Rahul Gandhi

    नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधातला अविश्वासदर्शक ठराव फेटाळला जाणार याची कल्पना तेलुगू देसम आणि काँग्रेसला पक्की होती. मोदी सरकारलाही हा ठराव मंजूर होण्याची भीती नव्हती तरी दोन्ही बाजूंनी १२ तासांचा खेळ देशाच्या सर्वोच्च लोकशाही मंदिरात खेळला. भाजपप्रणीत 'एनडीए'ने ३२५ खासदारांचा घसघशीत पाठिंबा मिळवून दाखवला आणि विरोधी आघाडी जेमतेम १२६ पर्यंतच मजल मारू शकली. यामुळे कशासाठी केला अट्टहास, हा प्रश्न सार्वत्रिक झाला. भाजप आणि काँग्रेस या प्रमुख राष्ट्रीय पक्षांचे आडाखे मात्र वेगळे होते. अविश्वासदर्शक ठरावाच्या माध्यमातून राहुल गांधी यांचे नेतृत्व काँग्रेसला राष्ट्रीय पातळीवर ठसवायचे होते. डोळ्यांवर नियंत्रण राहिले असते तर राहुल गांधींच्या नेतृत्वाने निराळी उंची गाठल्याचे देशाने मान्य केले असते. दुसरे म्हणजे संविधान, सर्वधर्मसमभाव यावरून मोदींविरोधात वातावरण तापवू पाहणारी काँग्रेस स्वतः वेगळ्याच पेचात सापडल्याचे दिसते आहे.

    गुजरात, कर्नाटक विधानसभा निवडणुकांचा प्रचार आणि आताच्या अविश्वासदर्शक ठरावावरचे राहुल यांचे भाषण या सर्वातून हिंदुत्वाचा मुद्दा काँग्रेसला महत्त्वाचा वाटू लागल्याचे स्पष्ट झाले आहे. राहुल यांचे वाढते मंदिर पर्यटन-पूजापाठ आणि यातून निर्माण झालेली 'जानवेधारी राहुल' ही प्रतिमा हे काँग्रेसच्या बदलत्या धोरणांचे दर्शन आहे. संसदेच्या पटलावरही 'खरा' हिंदू कोण हे राहुल यांना सांगावेसे वाटले. एवढेच नव्हे, तर 'खरे' हिंदुत्व सिद्ध करण्यासाठी त्यांना मोदींना अालिंगनही द्यावेसे वाटले. काँग्रेसला त्यांचे हिंदुत्व असे उघड करण्याची आवश्यकता यापूर्वी अभावानेच भासली. नरेंद्र मोदींच्या आक्रमक आव्हानाचा सामना करण्याच्या गरजेतून ही अपरिहार्यता निर्माण झाली आहे. केरळातले कट्टर मार्क्सवादीही हिंदू सणांमध्ये सार्वजनिक सहभाग घेऊ लागले आहेत. काँग्रेस आणि इतर विरोधकांना हिंदू मनाची काळजी करावीशी वाटू लागली आहे. विरोधकांच्या परंपरागत राजकारणाने बदललेली कूस म्हणजे ते भाजपच्या जाळ्यात अडकत असल्याचे मानावे का, हा प्रश्न आहे. काँग्रेसचा पातळ होत चाललेला कथित 'सेक्युलरवाद' त्यांना वर्षानुवर्षे साथ दिलेल्या दलित, अल्पसंख्याक, आदिवासींच्या मनात संशय निर्माण करणारा ठरेल. ध्रुवीकरणाची ही लढाई तीव्र करण्याचे जे कसब मोदींकडे आहे त्याला तोंड देण्याचे आव्हान राहुल स्वहस्ते ओढवून घेत आहेत.


    'भाजप सोडून कोणीही' हा संदेश देशभरात पोहोचवण्यासाठी कर्नाटकात काँग्रेसने धाकलेपण स्वीकारून मुख्यमंत्रिपद सोडले. प्रादेशिक पक्षांना एकत्र आणत भाजपविरोधी आघाडी स्थापण्याच्या प्रयत्नांना तेव्हापासून राष्ट्रीय पातळीवर गती मिळाली आहे. या आघाडीत काँग्रेस हा एकमेव देशव्यापी पक्ष असल्याने त्यांचे स्थान काय हा कळीचा मुद्दा असेल. हे नेतृत्व राहुल यांच्याकडे येण्यासाठी काँग्रेस झटते आहे. मात्र प्रादेशिक पक्षांची याला अजून तयारी नसल्याचे अविश्वासदर्शक ठरावादरम्यान स्पष्ट झाले. ज्या तेलुगू देसमने हा ठराव आणला त्यांनीच आंध्र प्रदेशाच्या अन्यायी विभाजनाला भाजप आणि काँग्रेस या दोघांना सारखेच जबाबदार ठरवत काँग्रेसला तोंडघशी पाडले. उलट शिवसेनेने मराठी 'बाणा आणि कणा' या दोन्हीचा अभाव दाखवल्यानंतरही मोदींनी पाठबळ वाढवून दाखवले. निर्नायकी अवस्था आणि निर्णयच न घेता येण्याची नामुष्की यामुळे शिवसेना पुरती बेदखल ठरली. अधोरेखित झाली ती केवळ त्यांची सत्तालोलुपता. या पार्श्वभूमीवर २०१९ ची निवडणूक राष्ट्रीय नेता कोण याचभोवती फिरावी हा भाजपचा 'अजेंडा' राहुल यांच्या आक्रमक भाषणाने पुढे रेटला.


    बिजू जनता दल, तेलंगणा राष्ट्रीय समिती आणि शिवसेना हे विरोधकांच्या गोटात अजूनही सामील झालेले नाहीत. उलट 'एआयडीएमके' उघडपणे मोदींना मिळाले. 'मोदी विरुद्ध राहुल' हीच चर्चा देशभर रंगल्याने आंध्रसाठी अविश्वासदर्शक ठराव आणणाऱ्या तेलुगू देसमचीही कोंडी झाली. असाच ठराव पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्याविरोधात आला होता. त्यांनीही तो मोदींप्रमाणेच हाणून पाडला. निवडणुकीत मात्र नरसिंह रावांच्या काँग्रेसला जनतेने नाकारले. त्या तुलनेत मोदींची तयारी अधिक भक्कम दिसते आहे. संसदेतले भरभक्कम पाठबळ आणि विरोधकांमधली बेकी हे त्यांनी साधले. त्याहून महत्त्वाचे म्हणजे 'देशाचा नेता कोण' या त्यांना हव्या असणाऱ्या 'अजेंड्या'च्या मागे राहुल यांना खेचण्यात मोदी यशस्वी झाले आहेत. भाजपविरोधातली मोट बांधण्यासाठी आणि नेतृत्वाचा तिढा सोडवण्यासाठी काँग्रेसला बरीच मजल मारावी लागेल. अवघ्या दीड राज्यात सत्ता असणाऱ्या काँग्रेसला प्रादेशिक पक्षांपुढे झुकावे लागेल आणि तरीही राष्ट्रीय पक्षाचा नेता म्हणून राहुल यांना नरेंद्र मोदींपुढे उभे ठाकावे लागेल.

Trending