आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रश्न मानसिकता बदलण्याचा (अग्रलेख)

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज जागतिक लोकसंख्या दिन. अन्य दिवस साजरे होतात ते बहुधा त्या त्या कारणाच्या वाढीसाठी अथवा प्रचार-प्रसारासाठी. पण, या दिवसाची बात थोडी वेगळी असल्याने लोकसंख्येला आळा घालण्याचा उद्देश त्यामागे आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेतर्फे दरवर्षी हा दिवस वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे साजरा होतो. यंदा त्यासाठी निश्चित करण्यात आलेली 'कुटुंब नियोजन हा मानव अधिकार' ही संकल्पना सद्य:स्थितीला साजेशी आहे. कारण, जगभरात सगळीकडेच लोकसंख्यावाढीचा विषय चिंतेचा बनत आहे. भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशात तर याविषयीच्या जनजागृतीचा प्रभाव कुटुंब पातळीपर्यंत वाढत जाणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. 


गेल्या शतकाच्या अखेरच्या दोन दशकांत लोकसंख्यावाढीच्या परिणामांबाबत सातत्याने चर्चा सुरू असतानाच ११ जुलै १९८९ रोजी जगाची लोकसंख्या ५०० कोटी एवढी झाली. ते पाहता लोकसंख्यावाढीच्या वेगाला प्रतिबंध घालण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेने दरवर्षी ११ जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिन साजरा करायचे ठरवले. लोकसंख्यावाढीच्या संभाव्य परिणामांचा वेळीच वेध घेतला जावा आणि तसे नियोजन व्हावे हा हेतू त्यामागे होता. त्यानुसार जगभरात या विषयाच्या अनुषंगाने विविध स्तरांवर अभ्यास सुरू झाला. लोकसंख्येविषयी अनेक अंगांनी आकडेवारी जमा केली जाऊ लागली. एका अभ्यासानुसार जगाची लोकसंख्या १०० कोटी होण्यासाठी जवळपास दोन लाख वर्षे लागली. मात्र, त्यानंतर अवघ्या दोनशे वर्षांत ती तब्बल ७०० कोटींपर्यंत जाऊन पोहोचली. लोकसंख्यावाढीचा हा वेग धडकी भरवणाराच म्हटला पाहिजे. 


भारतासारख्या अफाट लोकसंख्येच्या देशाने तर याबाबत अधिकच सजग राहायला हवे. कारण, लोकसंख्येचे प्रचंड प्रमाण हा आपल्याकडच्या विकास प्रक्रियेतील एक मोठाच अडथळा आहे. पाश्चात्त्य आणि विकसित देशांमध्ये सक्षम व्यवस्था उभ्या राहण्यात तेथील मर्यादित लोकसंख्येचा महत्त्वाचा वाटा आहे. केवळ व्यवस्थाच नव्हे, तर अन्न, पाण्यापासून ते कोणत्याही संसाधनांपर्यंत सगळ्याच बाबतीत लोकसंख्येचा मुद्दा कळीचा ठरतो. अशा स्थितीत आज जगभरातली जवळपास पस्तीस टक्के लोकसंख्या केवळ चीन आणि भारत या दोन शेजारी देशांमध्येच सामावलेली असल्याने इथे लोकसंख्येचा प्रश्न किती बिकट असेल त्याची कल्पना येऊ शकते. तथापि, याबाबतीत आपल्यापेक्षा चीन लवकर जागा झाला आणि त्याने प्रसंगी सक्तीच्या कुटुंब नियोजनासारखे कठोर निर्णय घेत लोकसंख्यावाढीच्या वेगावर चांगलीच मर्यादा आणली. शिवाय, मोठी लोकसंख्या ही जणू इष्टापत्ती मानत चीनने धोरणे आखली आणि त्यामाध्यमातून औद्योगिक, भौतिक विकास प्रक्रियेला चलना दिली. त्यातून गेल्या काही वर्षांत सातत्याने आपला विकासदर साडेआठ टक्क्यांच्या पुढे ठेवण्यात चीन यशस्वी झाला आणि प्रगती साधत गेला. तिथल्या पोलादी पडद्यातल्या व्यवस्थेमुळे, सक्तीच्या मार्गांतून हे शक्य झाले. त्या तुलनेत भारतातले चित्र बरेच वेगळे दिसते. 


आपल्याकडेही आता या विषयाचे महत्त्व पटू लागले असले तरी लोकसंख्यावाढीचा वेग मात्र म्हणावा तसा आटोक्यात येऊ शकलेला नाही. परिणामी येत्या काही वर्षांत म्हणजे २०२५ सालापर्यंत चीनला मागे टाकत भारत सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनेल, असे आकडेवारीवरून स्पष्ट होते. म्हणजे नजीकच्या भविष्यात भारताच्या प्रगतीत, विकासाच्या मार्गात या अवाढव्य लोकसंख्येचा अडसर निर्माण होतच राहणार. किंबहुना, येत्या काळात हे आव्हान अधिकच मोठे होत जाईल. हे लक्षात घेता लोकसंख्येच्या मुद्द्याकडे आपण आणखी गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. सरकारी पातळीवरून त्याविषयी जनजागृतीचे अनेक कार्यक्रम होतच असतात. पण, तेवढे पुरेसे नसून विविध पातळ्यांवरून हे काम पुढे नेणे गरजेचे आहे. हे ओळखूनच दैनिक भास्कर समूहानेदेखील जनजागृतीच्या हेतूने लोकसंख्या दिनाचे औचित्य साधत या विषयावरील रंजक आकडेवारी व अभ्यासपूर्ण पैलू उलगडून दाखवणारे विशेष पान आजच्या अंकाद्वारे वाचकांपुढे ठेवले आहे. त्यातून लोकसंख्यावाढीच्या गांभीर्याची जाणीव निश्चितपणे होईल. 


वेगवेगळ्या स्तरांवरून लोकसंख्यावाढीला आळा घालण्याचे असे प्रयत्न सुरू असले तरी मुख्य मुद्दा आहे तो मानसिकता बदलण्याचा. नवपरिणित दांपत्याला आपल्याकडे सर्वात जास्त विचारणा होत असते ती 'गोड बातमी'बाबत. शिवाय एकाच्या जोडीला दुसरे हवे, मुलगा होईपर्यंत 'ट्राय' करायलाच हवा, असे सल्ले अनेक कुटुंबांतील ज्येष्ठांकडून आणि परिचितांकडून दिले जातातच. ही मानसिकता एकदम बदलणे शक्य नसले तरी कुटुंब नियोजनाबाबत सातत्याने जगजागृती करत राहणे हाच त्यावरचा प्रभावी उपाय आहे. लोकसंख्या दिनाचा उपक्रम सुरू झाल्यानंतर जागतिक लोकसंख्यावाढीचा ०.७ टक्क्याने कमी झालेला दर हे त्याचे ठळक उदाहरण. ते नजरेसमोर ठेवून आपापल्या स्तरावर लोकसंख्येविषयी जनजागृतीचा संकल्प प्रत्येकानेच आजच्या दिवशी सोडायला हवा.

बातम्या आणखी आहेत...