आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्थितिशील डावे (अग्रलेख)

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

त्रिपुरा, नागालँडमध्ये नेत्रदीपक विजय मिळवल्यानंतर आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विजयातून काँग्रेस संस्कृतीला राज्याच्या राजकारणात शिरकाव करण्यास वाव देऊ नका, असे महत्त्वाचे राजकीय विधान केले. मोदी गेली ४० वर्षे राजकारणाला जवळून पाहत आहेत. ९० च्या दशकानंतर भारतीय राजकारणातील काँग्रेसचा जनाधार वेगाने कमी होत चालल्याचे ते साक्षीदार आहेत. मोदींना हा इतिहास कदाचित माहीत असेल की, १९९३मध्ये केंद्रातल्या नरसिंह राव सरकारने आपले अल्पमतातील सरकार वाचवण्यासाठी डाव्यांच्या दादागिरीला बळी पडून त्रिपुरातील स्वत:चे काँग्रेस सरकार हटवून तेथे राष्ट्रपती राजवट लादली होती. काँग्रेससाठी ही आत्महत्या ठरली. कारण त्यानंतर तिथे झालेल्या सर्व विधानसभा निवडणुकीत डाव्यांनी आपला प्रभाव विस्तारत काँग्रेसला नेहमीच धोबीपछाड केले व सलग २५ वर्षे सत्ता गाजवली.


रविवारी राज्यातल्या नवख्या भाजपने माणिक सरकार राजवटीचा दारुण पराभव केला खरा; पण मोदींच्या भाषणाचा सूर त्रिपुरातून काँग्रेसला हद्दपार केल्याचा होता. डावे व काँग्रेस यांची मैत्री असल्याचा एक प्रचार भाजपकडून सातत्याने केला जात असतो. कारण या दोन प्रमुख विचारधारा हिंदुत्व, प्रखर राष्ट्रवादाच्या विरोधी आहेत, असा भाजपचा प्रचार असतो. प्रत्यक्षात त्रिपुरात राजकीय समीकरणे जुळवताना भाजपने विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या उमेदवारांना संजीवनी दिली, त्यांचे व डाव्यांचेही केडर वापरले आणि सत्ता हस्तगत केली. पण या पराभवाला डावेही तितकेच जबाबदार आहेत. त्यांच्यामध्ये स्थितिशीलता मुरली आहे, शिवाय वैचारिक गोंधळलेपण सुधारण्याच्या पलीकडे गेले आहे. त्यात बदलत्या समाजाचा मूडही त्यांच्या  लक्षात आला नाही. गेल्या जानेवारी महिन्यात माकपचे माजी सरचिटणीस प्रकाश करात यांनी एकाच फटक्यात काँग्रेस व भाजपला ‘निओ लिबरल’ शक्ती ठरवून राष्ट्रीय पातळीवरील मोदीविरोधी राजकीय मोट बांधण्यास नकार दिला होता. त्यांनी संघ परिवाराला ‘सेमी फॅसिस्ट’ संबोधले, पण भाजपच्या हिंदुत्वावरून त्या पक्षाला फॅसिस्ट म्हणता येणार नाही, असे सगळ्यांनाच बुचकळ्यात टाकणारे विधान केले. मार्क्सवादी पक्ष हा नेहमीच भांडवलवादविरोधी, साम्राज्यवाद विरोधी व धर्मांधतेच्या विरोधात असल्याने काँग्रेसशी मैत्री करण्याचा प्रश्नच येत नाही, असे त्यांचे म्हणणे होते. करात यांच्या या अशा बौद्धिक मांडणीला पॉलिटब्युरोतून पाठिंबा मिळाला व आजी सरचिटणीस सीताराम येचुरी यांची काँग्रेसशी युती करण्याची व्यूहरचना मोडीत निघाली. करात यांची भाजपविरोधात आघाडी न बांधणे ही चूक होती याचे पहिले उदाहरण त्रिपुरात ज्या पद्धतीने पक्षाला पराभव पत्करावा लागला त्यावरून दिसून येते.


वाचकांना आठवत असेल की, अमेरिकेसोबतच्या अणुकरारावरून यूपीए-१ सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय करात यांनीच घेतला होता. त्यानंतर २००९ व २०१४च्या लोकसभा निवडणुकांत डाव्यांचा धुव्वा उडाला होता. प. बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने सलग दोन वेळा त्यांचा पराभव केला. थोडक्यात, राजकीय दुराग्रहातून ज्या काही चुका करून ठेवल्या आहेत त्यातून डावे अजूनही शिकलेले नाहीत. भाजपचा रथ एवढ्या वेगाने केवळ तटबंदी नव्हे तर किल्लाच उद्ध्वस्त करू शकतो याची कल्पना त्यांनी स्वप्नातही केली नसावी. तशी केली असती तर माणिक सरकारविरोधात जी अँटी इन्कम्बन्सी होती त्याचा अंदाज त्यांना आला असता. माणिक सरकार यांची स्वच्छ, प्रामाणिक, गरीब अशी प्रतिमा गेल्या विधानसभा व लोकसभा निवडणुकांत लोकांपर्यंत गेली होती. तीच प्रतिमा पुन्हा रेटण्याची चूक डाव्यांनी केली. माणिक सरकार यांनी त्रिपुराला भेडसावणारी अंतर्गत अशांतता कमी केली असली तरी या राज्यातला बेरोजगारीचा दर १९ टक्क्यांपर्यंत गेला होता. औद्योगिक विकास दूरच होता, पण गेल्या पाच वर्षांत एक नवा मतदार वर्ग जन्मास येत असताना या मतदाराच्या मोठ्या अपेक्षा असतात याचा अंदाज त्यांना घेता आला नाही.  

 

भाजपचे यश यासाठी की त्यांनी त्रिपुरातील मोठ्या प्रमाणातील नोकरशाही व तरुण वर्ग ७ व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी व रोजगार निर्मितीच्या मुद्द्यावरून आपल्याकडे वळवला. संघाचे जाळे ईशान्य भारतात पूर्वीपासून आहे. त्यांनी राष्ट्रवाद, संस्कृतीचा मुद्दा प्रकर्षाने पुढे आणला तर भाजपने रोजगार, पर्यटन, डिजिटल तंत्रज्ञान असे मुद्दे मतदारांपुढे उभे करून सत्ताधाऱ्यांसह काँग्रेसची गोची केली. मतदारांना परिवर्तन हवेच होते. सलग २५ वर्षे सत्ता पाहिलेला वर्ग व नवा मतदार वर्ग याच्या राजकीय धारणा व अपेक्षाही बदलत असतात. मतदार बदलला पण डाव्यांना बदलता आले नाही. त्यांची इच्छाही नव्हती.

बातम्या आणखी आहेत...