आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला मुक्त पंख हवेत!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजचे शिक्षण मनाला जड आणि वृद्ध बनवते. जीवनाचा संपर्क तोडून टाकते. ज्ञान आनंद आणि सौंदर्यापासून वंचित करते. विचाराचा संग्रह जडता आणतो. साचेबंद प्रतिभा वेगळा विचार करू शकत नाही. त्यासाठी वैचारिक, विवेकशील मुक्तपणा असावा लागताे. शिक्षण हे अात्मविवेक देण्यासाठी अाहे, ताे निर्माण झाला तर धर्म अाणि सत्ताधाऱ्यांचे हातचे शस्त्र बनणार नाही. 


आचार्य रजनीश हे नाव उच्चारले तरी अनेक जण दचकतात. ओशोंच्या ६०० पुस्तकांपैकी लोक फक्त एकाच पुस्तकाची चर्चा करतात आणि तेही पुस्तक वाचलेले नसते. जीवनाच्या सर्व पैलूंवर भाष्य करणारे रजनीश हे भारतीय परंपरेचे भाष्यकार आहेत. ओशोंनी शिक्षणावर केलेले भाष्य फारसे परिचित नाही. त्यांच्या केवळ शैक्षणिक विचारांवर ‘शिक्षा मे क्रांती’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे.  रजनीशांच्या नेहमीच्या इतर भाष्यासारखे हे भाष्यही आक्रमक आणि अंतर्मुख करणारे आहे.  


ओशो म्हणतात की, जगात राजकीय क्रांती अपयशी ठरली; सामाजिक - आर्थिक क्रांती अपयशी राहिली. त्यामुळे आता फक्त अपेक्षा शैक्षणिक क्रांतीकडूनच आहे. जग बदलण्याची क्षमता ही फक्त आता शैक्षणिक क्रांतीत असल्याने त्यासाठी सर्वांनी कटिबद्ध व्हायला हवे. ओशोंच्या मते, शिक्षक तोच असतो की, जो जिज्ञासा जागृत करतो आणि मुलांना साहस, अभय शिकवतो. त्यासाठी शिक्षक हा विद्रोही असला पाहिजे.    केवळ माहिती देणे म्हणजे शिक्षण नव्हे. आज शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या ज्ञानात फक्त एक तासाचे अंतर आहे. तो एक तास अगोदर नोट्स वाचतो आणि मुलांना माहिती देतो त्यामुळे त्याने त्या पलीकडे जाऊन जिज्ञासेचे माध्यम बनले पाहिजे. मुलांकडून आदर मिळण्याची अपेक्षा त्याने सोडून दिली पाहिजे. मुलांना अज्ञाताचा बोध करून दिला पाहिजे तरच मुले आदर देतील.  


शिक्षकाला मिळणाऱ्या अादराचे ते वेगळे विश्लेषण करतात. शिक्षकाला स्वस्त आदर देऊन समाज त्याच्याकडून खूप महागाचे काम करून घेतो. प्रत्येक मागची पिढी त्यांचे द्वेष, ईर्षा, वैमनस्य, शत्रुत्व, मूढता शिक्षकाद्वारे नव्या पिढीत संक्रमित करते. त्या पिढीचे अंधविश्वास, अज्ञान, इतिहास, पुराणे याच्याशी नव्या पिढीला शिक्षणाशी बांधून घेतले जात असते. शिक्षकाने ते करावे म्हणून समाज ते काम आदर देऊन करून घेतो. शिक्षणातून धार्मिक मन निर्माण व्हावे, अशी अपेक्षा ते करतात परंतु धार्मिक मन याचा अर्थ हिंदू, मुस्लिम अशा अर्थानं धार्मिक नाही तर स्पर्धात्मक नसलेले, हिंसात्मक नसलेले, ईर्षा नसलेले आणि प्रेम, करुणा असलेले मन याला ते धार्मिक मन असे म्हणतात. शिक्षणातून असे धार्मिक मन निर्माण व्हायला हवे. परंतु असे झाले नाही याकडेही ते लक्ष वेधतात. शिक्षणाचे प्रमाण कमी होते तेव्हा जगात शांतता होती आणि शिक्षणाचे प्रमाण वाढले त्या पाठाेपाठ युद्ध, हिंसाचार वाढले ही विसंगती कशी समजून घ्यायची? शिक्षण केवळ इतरांवर अधिकार गाजवायला शिकवते. जो जास्त अधिकार इतरांवर गाजवू शकेल त्याला जास्त शिकलेला मानले जाते. 


शाळांमधून विद्यार्थ्यांसमाेर अादर्श ठेवणे एक थांबले पाहिजे याचा अाेशाे आग्रह धरतात. या अादर्शवादातून मुलांमध्ये आपण सूक्ष्म भीती निर्माण करतो. मुलात जे काही आहे ते पूर्णत्वाने विकसित हाेण्यावर भर द्यायला हवा. कुणासारखे बन असे म्हणून आपण त्याच्यात एक तणाव निर्माण करतो. आज शिक्षणात तुलना करायला शिकवले जाते. पण ओशो सांगतात की बागेत गुलाबाचे झाड कधीच शेवंतीसारखे होण्याचा प्रयत्न करत नाही. गुलाब हा गुलाब म्हणून विकसित होतो आणि शेवंती ही शेवंती म्हणून विकसित होते. पण माणूस हा मुलांना एक-दुसऱ्यासारखा विकसित करण्याचा का प्रयत्न करतो? यातून मुलामध्ये न्यूनगंड निर्माण होतो. इतकी वर्षे शाळेत जाऊन ही आपण जीवन जगण्याचे काही कौशल्य मुलाला देतो का? मुलगा एखाद्या दिवाळखोरासारखा जीवनासमोर काही कागद घेऊन उभा राहतो. विद्यापीठे वाढली, पुस्तके वाढली, पण दुनियेत जीवनाचा स्तर खाली खालीच येत राहिला. शिक्षणातून फक्त अहंकार वाढतो आहे, विनम्रता वाढत नाही. संवेदनशीलता वाढत नाही, तर महत्त्वाकांक्षा वाढते आणि महत्त्वाकांक्षा वाढणे हे मनाच्या हीनतेचे लक्षण आहे. स्पर्धा जर हवीच असेल तर आपल्याशीच स्पर्धा असायला हवी. 

 
पहिल्या दर्जाची प्रतिभा शिक्षणाकडे आकर्षित होत नाही. वास्तविक विद्यापीठ दर्जाचे तज्ज्ञ प्राथमिक शिक्षणासाठी नेमायला हवेत आणि मानसशास्त्रज्ञांनी सातत्याने प्राथमिक शिक्षणावर संशोधन करायला हवे. इतके महत्त्व ते प्राथमिक शिक्षणाला देतात. अलीकडील काळात लग्न उशिरा होत असल्याने तरुण विद्यार्थ्यांची निर्मिती झाली आहे. त्यांच्यात प्रचंड ऊर्जा आहे. त्या ऊर्जेला दिशा देण्यासाठी शिक्षणाची रचना बदलावी लागेल. 


मुलाचे रूपांतर केवळ एका माहिती संग्रहात झाले असून शिक्षणात प्रतिभा विकसित करण्यावर भर दिला पाहिजे, असे अाेशाे सांगतात. शिक्षक हा भूतकाळाशी बांधला गेला आहे आणि विद्यार्थी हा भविष्यकाळाकडे बघतो आहे. आजचे शिक्षण मनाला जड आणि वृद्ध बनवते. जीवनाचा संपर्क तोडून टाकते. ज्ञान आनंद आणि सौंदर्यापासून वंचित करते. विचाराचा संग्रह जडता आणतो. आजचे शिक्षण कृष्णमूर्तींच्या भाषेत what to think शिकवते How to think शिकवत नाही. अशा साच्यात असलेली प्रतिभा वेगळा विचार करू शकत नाही. विचार करण्यासाठी आपण मुक्तपणा असावा लागताे. शिक्षण हे आत्मविवेक देण्यासाठी आहे. आत्मविवेक निर्माण झाला तर शिक्षण हे धर्म आणि सत्ताधारी यांच्या हातातले शस्त्र बनणार नाही. 


- हेरंब कुलकर्णी, शिक्षण तज्ञ
herambkulkarni1971@gmail.com

बातम्या आणखी आहेत...