आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाल परी पूर्वपदावर!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटीच्या कर्मचाऱ्यांचा संप मिटल्याने राज्यभरातील कोट्यवधी प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. काही महिन्यांपूर्वीही असाच संप पुकारला गेला अन् तो नेटाने तीन-चार दिवस चालल्यामुळे सरकार चांगलेच अडचणीत सापडले होते. एका  बाजूला एसटीतील विविध पक्ष- संघटनांची बांधिलकी मानणाऱ्या जवळपास २२ कर्मचारी संघटनांतील लाखभराच्या वर सदस्य अन् दुसरीकडे एसटी बसने प्रवास करणारे लाखो प्रवासी असा प्रचंड मोठा पसारा महामंडळाचा आहे. मुंबईची लोकल जशी मुंबईकरांची लाइफलाइन मानली जाते तद्वतच एसटी बस ही गावखेड्याची लाइफलाइन आहे. तिची सेवा अचानक खंडित झाली वा विस्कळीत झाली तरी दैनंदिन बसने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना त्याचा फटका बसतो. आजही गावाकडची मंडळी एसटीला गमतीने ‘लाल परी’ म्हणतात. ती रस्त्यावर धावली नाही वा दिवसभरात दर्शन झाले नाही तरी प्रवाशांना चुकल्या चुकल्यासारखे होते. आदिवासी भागातील अतिदुर्गम ठिकाणच्या हजार-पाचशे लोकसंख्येच्या गाव-पाड्यावर मुक्कामाला थांबणाऱ्या एसटी बसच्या चालक-वाहकाचे नाते स्थानिक माणसांशी कुटुंबातील सदस्याप्रमाणे झालेले असते.  त्यामुळे एसटीचा संप म्हटला की सर्वात प्रथम पोटात गोळा येतो तो शहरी व ग्रामीण भागातील प्रवाशांच्या.

 

अलीकडे दळणवळणाची अनेक साधने उपलब्ध झाली आहेत. पट्ट्यावर चालणाऱ्या काळ्यापिवळ्या रंगाच्या टॅक्सी, खासगी बसेस, जीपगाड्या ही सर्व काही प्रवाशांच्या सेवेसाठी तयार असतात. पण, प्रवाशांना गेल्या अनेक दशकांपासून रस्त्यावर धावणाऱ्या लाल रंगाच्या बसचेच आकर्षण राहिले आहे.  बसचा चालक भले रस्त्यातील खड्डा बघणार नाही, ओबडधोबड रस्त्याची पर्वा करणार नाही, तरी प्रवाशांची ओरड नसते. कारण त्या प्रत्येक प्रवाशाला तिच्याप्रती आपुलकीचा भाव असतो. बसचे भाडे परवडत असो वा नसो, त्याच प्रवासाला प्राधान्य देतात. त्याचे प्रमुख कारण सुरक्षित प्रवासाची खात्री. ग्रामीण भागातील शाळा-कॉलेजचे विद्यार्थी याच बसने प्रवास करतात. अशा या महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले, महामंडळालाही कोट्यवधींचा तोटा सहन करावा लागला. परिवहन खात्याचा कारभार शिवसेनेचे मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे आहे.


शिवसेनेच्या अखत्यारित कारभार असल्यामुळे तो लोकाभिमुख असावा, अशी जनतेची अपेक्षा असणे स्वाभाविक आहे. पण तसे होताना दिसत नाही. चार वर्षांच्या काळात या खात्याच्या मंत्रिमहोदयांनी घेतलेल्या कुठल्या ना कुठल्या निर्णयामुळे वादंगच उभे राहिले आहे. शिवनेरी बसच्या जागी कंत्राटीरीत्या चालवली जाणारी शिवशाही बस रस्त्यावर आणण्याचा निर्णयदेखील सरळसोपा राहिला नाही. त्यामुळेही वादाची ठिणगी पडली. कारण, शिवशाही बसेस या कंत्राटी पद्धतीने चालवायला घेतल्या अन् त्याचे सारथ्य महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या हाती ठेवले. प्रवाशांच्या सेवेसाठी असलेल्या महामंडळाच्या कारभारात कालानुरूप सुधारणा करायला हव्यात, नवनवीन प्रयोग राबवायला हवेत याबाबत कुणाचेच दुमत असू शकत नाही. पण, एसटी महामंडळाचा आजवरचा नावलौकिक पाहता तसेच त्याच्याशी राज्यभरातील काही कोटी प्रवाशांचा जोडल्या गेलेल्या भावनांचा विचार करता एका झटक्यानिशी राज्याच्या प्रमुख मार्गावर चांगल्या रीतीने चालणारी बससेवा ‘शिवनेरी’ हटवली अन्् ‘शिवशाही’ आणली असे होत नाही. प्रवाशांना पुरवल्या जाणाऱ्या उत्तमोत्तम सेवेबरोबरच महामंडळाचे लाखभराहून अधिक कर्मचारी व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबांतील सदस्यांच्या बाबतही कुटुंबप्रमुख म्हणून मंत्रिमहोदयांनी योग्य भूमिका घ्यायला हवी. ठिकठिकाणच्या आगारातील सोयी-सुविधा, विशेषकरून चालक-वाहकांसाठी आगारात वा बसस्थानकांमध्ये विश्रांतीगृहे निर्माण केली आहेत, त्यांची अवस्था नरकापेक्षा निश्चित वेगळी नाही. पान, तंबाखू, गुटखा याच्या पिचकाऱ्यांनी अवघा परिसर रंगलेला असतो तसेच सिगारेट-विड्यांच्या थोटकांचा खच यामुळे पसरणारी दुर्गंधी. अशा ठिकाणी रात्री. पहाटे सेवा देऊन आलेल्या कर्मचाऱ्यांना विश्रांती मिळू शकते का? याला जसा महामंडळाचा कारभार कारणीभूत आहे तसाच कर्मचाऱ्यांमध्ये असणारा स्वयंशिस्तीचा अभाव. तथापि, कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा मुद्दा हादेखील गंभीर आहे. खासगी बसवरच्या चालक व वाहकांचे वेतन, त्यांना मिळणारे भत्ते वा अन्य सुविधा यात प्रचंड मोठी तफावत आहे. नेमकी हीच बाब महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या असंतोषाचे एक प्रमुख कारण आहे. त्यामुळे ‘गाव तिथं एसटी’ सुरू ठेवायची असेल तर या खात्याचे दायित्व असलेल्या शिवसेनेलाच काही भूमिका निभावाव्या लागतील हे निर्विवाद.  


 

बातम्या आणखी आहेत...