आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइस्लामला आणि खासकरून सौदी देशाला अय्याशीच्या वातावरणातून बाहेर काढायचेच, असा संकल्प तेथील राजकुमारांनी केला आहे. सत्य आणि साधेपणा यावरच त्यांचा भर आहे. सौदीच्या उत्पन्नातील भाग गोरगरिबांपर्यंत कसा पोहोचेल यावरच त्यांचा भर असणार आहे. या भूमीतील प्राचीन आणि प्रगतिशील परंपरा पुन्हा स्थापित करण्यासाठी ते प्रयत्नरत आहेत.
आजपासून सहा महिन्यांपूर्वीपर्यंत मक्का- मदिना किंवा रियाधच्या रस्त्यांवर बुरख्यात वावरणाऱ्या महिला किंवा पुरुषांच्या हातात जप करण्यासाठी लांब माळा (तस्बीह) दिसणे ही सामान्य बाब होती. परंतु, आता कोणी तिथे गेल्यास अरबी महिला बुरख्याशिवाय वावरताना दिसतील. इतकेच काय, तेथील महिला पाश्चात्त्य वेशभूषेत दिसल्या तरी आश्चर्य वाटून घेऊ नका. हा चमत्कार कशामुळे झाला, असा प्रश्न तुम्हाला पडू शकेल.
आधीच्या काळी तेथे छोट्या छोट्या गोष्टींवरून ‘इस्लाम खतरे में’ पडत होता. परंतु, आता ती भीती कुठेही दिसत नाही. अचानक हा चमत्कार झाला कसा? साैदी सरकारच्या वागणुकीत ही उदारता आली कशी? आता तिथे गुन्हेगारांना चाबकाचे फटके मारले जात नाहीत किंवा इस्लामी कायद्यानुसार एखाद्या अपराध्याचा शिरच्छेद केला जात नाही. इस्लाम देशातील हे बदल पाहिले तर आगामी काळात इस्लामी दंडसंहितेऐवजी आधुनिक जगाचे कायदेही तेथे लागू होऊ शकतील, असे वाटते. या साऱ्या बदलाचे श्रेय जाते सौदी अरेयातील ३२ वर्षीय युवराज मोहंमद बिन सलमान यांना.
सौदीमधील सत्ता वर्तमान राजघराण्याच्या हाती आली तेव्हा त्यांनी काय केले, हे पाहिले पाहिजे. त्यांनी पवित्र कुराण आणि इस्लामी कायद्यानुसार आपली दंडसंहिता ठरवली होती. कुराण आणि हदीसच्या प्रकाशात इस्लामी नियम लागू केले होते. त्यानुसारच गुन्हेगारांना दंडित केले जात होते. चोरी केल्यास हात तोडणे, दुष्कर्म किंवा हत्या केल्यास इस्लामी नियमाने दंडित करणे, हत्या करणाऱ्याचा सार्वजनिक ठिकाणी शिरच्छेद करणे, इस्लामने हराम ठरवलेल्या वस्तूंचे सेवन करणे आणि चोरी आदी अपराध केल्यास चाबकाचे फटकारे मारणे आदी शिक्षा दिल्या जात होत्या. परंतु, आता हे सारे कायदे रद्द केले आहेत. आधुनिक जगातील कायद्यांचा अंमल सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. एकूणच काय तर अल्ला आणि मुल्ला यांचे कायदे आता रद्द केले आहेत. सरकारी स्तरावर आधुनिक कायदे आणि व्यवस्थेला मान्यता देण्यात आली आहे. या क्रांतीचा नेता आणि प्रणेता आहेत ३२ वर्षीय युवराज मोहंमद बिन सलमान. याच युवराजांनी काही दिवसांपूर्वी सौदीमधील भ्रष्ट राजकुमारांना गजाआड केले आणि त्यांचे बँक खातेही सील केले.
विशेष नोंद घेण्यासारखी बाब म्हणजे कायद्याची पदवी घेतलेले ते सौदीमधील पहिले राजकुमार आहेत. कालपर्यंतच्या बादशहा आणि राजकुमारांच्या हरममध्ये अनेक बायका ठेवलेल्या असत. आता तेथे राजकुमाराची केवळ एक पत्नी आहे. इस्लामला आणि खासकरून सौदी देशाला अय्याशीच्या वातावरणातून बाहेर काढायचेच, असा संकल्प त्या राजकुमारांनी केला आहे. सत्य आणि साधेपणा यावरच त्यांचा भर आहे. सौदीच्या उत्पन्नातील भाग गोरगरिबांपर्यंत कसा पोहोचेल यावरच त्यांचा भर असणार आहे. या भूमीतील प्राचीन आणि प्रगतिशील परंपरा पुन्हा स्थापित करण्यासाठी ते प्रयत्नरत आहेत. एकूणच काय, तर आधुनिक नियमांनी प्रशासन आणि सरकार चालवण्याचा निर्धार तेथील युवराजांनी केला आहे.
सौदीमध्ये निवडून आलेले सरकार सत्तेत येईल अथवा नाही, हे सांगणे आज तरी कठीण आहे. सार्वजनिक व्यवस्थांचे नव्याने गठन होणार का, होत असलेले बदल कशा रीतीने स्वीकारले जातील, याबद्दल आताच काहीही सांगता येणार नाही. कारण सद्य:स्थितीत सौदीत राज्यघटना किंवा त्यानुसार निवडून आलेले सरकार अस्तित्वात नाही. त्यामुळे तेथे होत असलेले बदल म्हणजे एका अतिउत्साही राजकुमाराचे विचार असेच त्याकडे पाहिले जात आहे. कुणी त्या युवराजाला वेडा म्हणत आहे, तर कुणी स्वप्नाळू राजकुमार म्हणून कौतुक करत आहे. आगामी काळात काय परिस्थिती उद्भवेल हे आजच सांगणे कठीण आहे. ३२ वर्षीय राजकुमारावर हजारो लोकांच्या आशा-आकांक्षा केंद्रित झाल्या आहेत.
न्यूयाॅर्क टाइम्सने यासंबंधी एक वृत्तांत प्रकाशित केले आहे. या बातमीनुसार सौदीतील राजकुमार हे काही नवीन करत आहेत, असे नाही. इस्लाममधील सामान्य नियमांचीच अंमलबजावणी ते करत आहेत. ते कायद्याचे पदवीधर आहेत. त्यांच्या डोळ्यांत कोणीही धूळफेक करू शकत नाही. एखाद्या बाबीसाठी इस्लाममध्ये काय म्हटले आहे, याची जाण या युवराजाला आहे. या ३२ वर्षीय तरुणाची इच्छाशक्ती दांडगी आहे. आपला देश आणि आपल्या देशातील समाजाला कट्टरपंथी लाेकांच्या जाेखडातून मुक्त करायचेच, असा चंगच बांधला आहे. पहिल्यांदा बिघडलेल्या समाजातील नागरिकांना सुधारले पाहिजे, असे युवराजांना वाटते. यासाठी आवश्यकतेनुसार नवीन कायदे तयार करणे आणि त्या कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी केली पाहिजे, असे त्यांना वाटते. आपल्या समाजात सुधारणा करण्यासाठी कठोरातील कठोर कायदे करण्याची गरज पडली तर त्या कामी थोडाही बिलंब करू नये. सरकार आणि खलिफा यांची ती जबाबदारीच आहे, असे युवराजाला वाटते.
न्यूयाॅर्क टाइम्सने वेळोवेळी आपल्या बातम्यांमधून सौदी अरबमधील या क्रांतिकारी राजकुमाराचे विचार प्रकाशित करून इस्लामी जगतात खळबळ उडवून दिली आहे. मोठ्या वृत्तपत्रांमध्ये याबद्दल बरेच काही लिहून येत आहे. सौदी अरेबियातील शासन आणि प्रशासनावर मीडियातून जोरदार चर्चा सुरू असल्याचे दिसते. जगाकडे जागरूक दृष्टीने पाहणारा कोणीही सौदी अरेबियातील होणाऱ्या या बदलांचे स्वागतच करेल यात शंका नाही. एका धाडसी राजकुमाराने अय्याशीला तिलांजली देऊन पहिल्यांदाच इस्लामचे खरे आणि सत्य रूप प्रस्तुत केले आहे. केवळ सौदी अरबियाच नाही, तर इस्लामी जगतातील एकाही देशाने असे धाडस केले नाही. धर्माच्या नावाखाली चालणारे अवडंबर थांबवून सौदी जनतेपर्यंत खरा धर्म पोहोचवणे कौतुकास्पद आहे. इस्लामच्या नावाखाली सौदीतील समाजाला अय्याशी करण्याची सूट होती. ती सूट थांबवण्याचा क्रांतिकारी निर्णय युवराजांनी घेतला आहे.
सौदीच्या ३२ वर्षीय युवराजाने जी क्रांतिकारी पावले उचलली त्यातील प्रमुख १० निर्णयांची दखल न्यूयाॅर्क टाइम्सने विस्तृतपणे घेतल्याचे दिसते. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तेथील पोलिसांच्या अधिकारात मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आली आहे. वाचकांना माहीतच असेल की जगात सर्वात वाईट अवस्था ही सौदी अरेबिया देशातील महिलांची होती. आता तिथे महिलांना चांगले दिवस आले आहेत. थोडक्यात सांगायचे तर सौदीत आता आधुनिकतेचे वारे वेगाने वाहत आहेत.
- मुझफ्फर हुसैन, ज्येष्ठ पत्रकार
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.