आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘रफाल’ विमान महागडे, पण व्यवहार्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एप्रिल २०१५च्या फ्रान्स दौऱ्यात ‘सरकार ते सरकार’ पातळीवर हवाई दलाने याआधीच निवडलेली ३६ ‘रफाल’ विमाने थेट खरेदी करण्याचे जाहीर केले गेले. ही विमाने खरेदी करत असतानाच त्यासाठी आवश्यक असलेली शस्त्रास्त्रे, अत्याधुनिक पायाभूत सुविधांची उभारणी, भारतीय लढाऊ वैमानिकांचे प्रशिक्षण, विमानांची देखभाल आणि त्यांची खात्रीशीर उपलब्धता इत्यादी मुद्द्यांचा एकाच वेळी विचार करण्यात आला. परिणामी या विमानांची एकूण किंमतही वाढलेली दिसते.


भारतीय हवाई दलासाठी फ्रान्सकडून खरेदी करण्यात येणाऱ्या ‘रफाल’ या मध्यम पल्ल्याच्या अत्याधुनिक बहुउद्देशीय लढाऊ विमानाच्या व्यवहारावरून सध्या वाद निर्माण झाला आहे. हा वाद प्रामुख्याने या विमानासाठी द्याव्या लागलेल्या अवाढव्य किमतीवरून निर्माण झाला आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर फ्रेंच राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रोन यांनी गेल्या महिन्यातल्या आपल्या भारत दौऱ्यामध्ये हा व्यवहार पारदर्शक असून आपला देश त्याविषयीची सर्व माहिती देण्यासही तयार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, त्याच वेळी संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी हा मुद्दा राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असल्यामुळे त्याविषयी माहिती जाहीर करणे योग्य नसल्याचे म्हटले आहे. यामुळे या व्यवहाराविषयी शंका अधिक ठळक झाल्या आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ‘रफाल’ विमानाची वैशिष्ट्ये आणि त्याच्या खरेदी व्यवहाराचा घेतलेला हा आढावा.  


भारतीय हवाई दलाने आपल्या ताफ्यातील जुनी लढाऊ विमाने निवृत्त करून त्या जागी मध्यम पल्ल्याची अत्याधुनिक लढाऊ विमाने सामील करण्याची योजना कारगिल संघर्षानंतर आखली होती. शीतयुद्धोत्तर काळात भारताच्या सुरक्षेच्या वाढत्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी हवाई दलाला अत्याधुनिक लढाऊ विमानांची आवश्यकता भासू लागली होती. प्रत्यक्षात या विमानांच्या खरेदीच्या दिशेने पहिले पाऊल २००७ मध्ये पडले. त्या वेळी हवाई दलासाठी १२६ मध्यम पल्ल्याची बहुउद्देशीय लढाऊ विमाने खरेदी करण्यासाठी निविदा काढण्यात आली. त्यानंतर २०१२ मध्ये ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ‘दसूं एव्हिएशन कंपनी’च्या ‘रफाल’ विमानांची निवड करण्यात आली. कंपनीने या विमानांसाठी वाढीव किंमत मागितल्यावर त्याबाबत वाटाघाटी सुरू झाल्या. मात्र, त्यातून मार्ग दृष्टिपथास येत नव्हता. दरम्यानच्या काळात भारतीय हवाई दलातील लढाऊ विमानांची संख्या आणखीनच कमी होत निघाली होती. परिणामी यातून तातडीने मार्ग निघणे आवश्यक होते.   


दुसऱ्या बाजूला भारतातील संरक्षण सामग्रीची प्रक्रिया बरीच किचकट आणि वेळखाऊ आहे. त्यातून सैन्यदलांच्या तातडीच्या गरजा भागवण्यासाठीही अनेक वर्षे जावी लागतात. भारतात आजपर्यंत लढाऊ विमाने खरेदी करताना विमाने, त्यांची देखभाल व सुट्या भागांचा पुरवठा, त्यावर बसवण्यात येणारी शस्त्रास्त्रे अशा प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळे करार केले जात. त्यामुळे एखादे लढाऊ विमान हवाई दलात सामील होण्यात आणि त्यानंतर पूर्ण क्षमतेने कार्यरत होण्यात बराच काळ जात असे. भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसमोरील आव्हाने आणि त्यांना सामोरे जाण्यासाठी हवाई दलाच्या गरजा लक्षात घेता प्रत्येक टप्प्यावर दीर्घकाळ प्रतीक्षा करणे शक्य नव्हते. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एप्रिल २०१५च्या फ्रान्स दौऱ्यात ‘सरकार ते सरकार’ पातळीवर हवाई दलाने याआधीच निवडलेली ३६ ‘रफाल’ विमाने थेट खरेदी करण्याचे जाहीर केले गेले. ही विमाने खरेदी करत असतानाच त्यासाठी आवश्यक असलेली शस्त्रास्त्रे, अत्याधुनिक पायाभूत सुविधांची उभारणी, भारतीय लढाऊ वैमानिकांचे प्रशिक्षण, विमानांची देखभाल आणि त्यांची खात्रीशीर उपलब्धता इत्यादी मुद्द्यांचा एकाच वेळी विचार करण्यात आला. परिणामी या विमानांची एकूण किंमतही वाढलेली दिसते. पुढे भारत आणि फ्रान्स यांच्यात २३ सप्टेंबर २०१६ रोजी ‘रफाल’ विमानांच्या खरेदीसंबंधीचा तब्बल ५९ हजार कोटी रुपयांचा करार झाला.  


‘रफाल’ हे ४.५ श्रेणीतील म्हणजे पाचव्या पिढीच्या लढाऊ विमानाच्या जवळचे विमान आहे. भारत ‘रफाल’ची ‘एफ 3आर’ ही सर्वांत नवी आवृत्ती खरेदी करत असून आपल्या हवाई दलाच्या गरजांनुरूप त्यामध्ये बदल करून घेत आहे. त्या वेळी या विमानावर मूळच्या काही यंत्रणांच्या जागी आपल्याकडील इस्रायली बनावटीचे हेल्मेट माउंटेड डिस्प्ले, रडार वॉनिंग रिसिव्हर्स, लो बँड जॅमर्स, इन्फ्रा-रेड सर्च अँड ट्रॅकिंग सिस्टिम अशा आणखी काही यंत्रणाही बसवण्यात येत आहेत. फ्रान्समध्ये ही विमाने तयार होत असतानाच या यंत्रणा त्यात एकीकृत केल्या जात आहेत. त्यामुळे मूळच्या विमानामध्ये गरजेनुसार काही फेरफारही करावे लागणार आहेत. त्यासाठीची किंमत या व्यवहारात समाविष्ट झालेली आहे.  


‘रफाल’ त्याच्या श्रेणीतील वैशिष्ट्यपूर्ण विमान आहे. हवेतून जमिनीवर आणि हवेतून हवेत हल्ले करण्यासाठी, टेहळणीसाठी, आकाशात वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी, जमिनीवरील आपल्या सैन्याला हवाई छत्र पुरवण्यासाठी, जहाजविरोधी, शत्रूच्या प्रदेशात दूरवर हल्ला करण्यासाठी आणि अण्वस्त्रवाहक म्हणूनही भूमिका ‘रफाल’ बजावू शकते. त्यामुळे या विमानावर मोहिमेच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रास्त्रे बसवली जाऊ शकतात. या विमानात डायरेक्ट व्हॉइस इनपुट बसवण्यात आलेला आहे. त्याच्या मदतीने वैमानिकाला विमानाच्या यंत्रणांना (शस्त्रास्त्रे डागण्याची सोडून) तोंडी सूचना देऊनही कार्यान्वित करता येते. त्याबरोबर ‘एईएसए’ रडारच्या मदतीने ‘रफाल’ एका वेळी आकाशातील अनेक लक्ष्यांचा वेध घेऊन त्यांच्यावर हल्ला करू शकते. ‘एईएसए’ यंत्रणा भारतीय हवाई दलाच्या विमानांमध्ये पहिल्यांदाच बसवलेली असेल. उडत असताना समतोल राखण्यासाठी ‘रफाल’वर डिजिटल फ्लाय-बाय-वायर उड्डाण नियंत्रण यंत्रणा बसवलेली आहे. हवेत उडत असताना शत्रूच्या प्रदेशातील माहिती मिळवण्यासाठी यावर अनेक प्रकारचे संवेदक बसवलेले आहेत. त्याची एकत्रित माहिती वैमानिकासमोर असलेल्या होलोग्राफिक हेड-अप डिस्प्ले यंत्रणेवर उपलब्ध होते.  ‘रफाल’वर बसवलेली ‘स्पेक्ट्रा’ स्वसंरक्षण यंत्रणा विमानाचे हवेतील आणि जमिनीवरील शत्रूपासून संरक्षण करते. लिबियामधील ‘नाटो’च्या हल्ल्यांच्या वेळी या यंत्रणेची बरीच मदत झाली होती. विविध प्रकारच्या यंत्रणांच्या मदतीने वैमानिकाला विमानाच्या आजूबाजूच्या परिस्थितीविषयीची माहिती सतत उपलब्ध होत राहते. हे विमान शत्रूच्या प्रदेशाच्या टेहळणीचीही भूमिका बजावू शकते. मिळालेल्या सगळ्या माहितीचे विमानावरील ‘एमपीडीयू’ यंत्रणेकडून तातडीने विश्लेषण होते आणि ती माहिती जमिनीवरच्या आपल्या सैन्याला, आपल्या नियंत्रण कक्षाला आणि वैमानिकालाही लगेच उपलब्ध होऊ शकते. ‘रफाल’ आपल्याला मिळालेली लक्ष्याची माहिती आपल्या आसपासच्या आपल्या इतर विमानांनाही पुरवू शकते. म्हणजेच ‘मिनी अॅवॅक्स’प्रमाणे ‘रफाल’ काम करू शकते.  


‘रफाल’वर १४ हार्ड पॉइंट्स आहेत. त्यावरून सुमारे ९ टन वजनाची शस्त्रास्त्रे वाहून नेता येतात. याच्यावरील ३० मिलिमीटरची स्वयंचलित तोफ मिनिटाला १२५ गोळ्यांचा मारा करू शकते. तसेच मॅजिक-२, मायका, मेटिओर ही हवेतून हवेतील लक्ष्ये भेदणारी विविध पल्ल्यांची क्षेपणास्त्रे ‘रफाल’वर बसवली जाऊ शकतात. यापैकी मेटिओर या मानवी दृष्टीच्या पलीकडचे लक्ष्य भेदू शकणाऱ्या क्षेपणास्त्राचा पल्ला १५० किलोमीटर आहे. भारत ‘रफाल’बरोबर ही क्षेपणास्त्रेही खरेदी करत आहे. तसेच या विमानाबरोबर ‘स्काल्प’ ही दीर्घ पल्ल्याची क्रूझ क्षेपणास्त्रेही खरेदी करण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. मोहिमेच्या गरजेनुसार इंधनाचा अतिरिक्त साठा सोबत नेण्याची सोय (ड्रॉप टँक्स) या विमानात आहे. अशा तीन ड्रॉप टँक्सच्या मदतीने ‘रफाल’चा पल्ला ३,७०० किलोमीटरपर्यंत वाढवता येऊ शकतो. त्याबरोबरच यामध्ये हवेत उडत असतानाच इंधन भरण्याचीही सोय उपलब्ध आहे. याच्यावर बसवण्यात येणाऱ्या ‘बडी-रिफ्युलर’च्या मदतीने हवेत उडत असताना आणीबाणीच्या प्रसंगी एका ‘रफाल’मधून दुसऱ्या ‘रफाल’मध्ये इंधन भरणे शक्य होते. एकूणच ‘रफाल’ भारतीय हवाई दलातील सर्वांत अत्याधुनिक लढाऊ विमान ठरणार आहे. त्यामुळे व्यवहार महागडा दिसत असला तरी ‘रफाल’मुळे भारतीय हवाई दलाची क्षमता वाढणार आहे हे नक्की. 


- पराग पुरोहित (संरक्षण अभ्यासक)
Parag12951@gmail.com

बातम्या आणखी आहेत...