आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताचे परदेशी भूमीवर तळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही दिवसांपूर्वीच एडनच्या आखाताजवळ वसलेल्या आफ्रिकेतील दिग्बुटी येथे चीनने आपला नाविक तळ सुरू केला आहे. त्याद्वारे चीनचा या क्षेत्रातील प्रभाव वाढू लागल्यामुळे अरबी समुद्रातील आपल्या राष्ट्रहितांना धोका निर्माण होऊ नये, यासाठी भारतीय नौदल आणि हवाई दल आता अधिक सक्रियपणे या क्षेत्रात कार्यरत राहणार आहे. 


हिंदी महासागरातील चीनच्या वाढत्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर आपल्या या क्षेत्रातील राष्ट्रहितांच्या संरक्षणासाठी भारतीय नौदलाने अधिक सक्रिय भूमिका बजावणे क्रमप्राप्त झाले आहे. चीनकडून निर्माण होत असलेल्या आव्हानाचा सक्षमपणे सामना करता यावा यासाठी भारताने नाविक राजनयाबरोबरच या क्षेत्रातील मित्र देशांशी सुरक्षाविषयक सहकार्य सुरू केले आहे. भारतीय नौदलाने अलीकडेच स्वीकारलेले मोहीम आधारित तैनातीचे (मिशन बेस्ड डिप्लॉयमेंट) नवे धोरण आणि सेशल्स, मॉरिशस तसेच ओमानसारख्या देशांबरोबर केलेले जात असलेले सुरक्षाविषयक करार त्याचाच भाग आहेत. मात्र, सेशल्समध्ये भारत सध्या उभारत असलेल्या नाविक तळाला स्थानिकांचा विरोध होऊ लागल्यामुळे त्याबाबत काहीशी साशंकताही निर्माण होऊ लागली आहे. 


भारत आणि सेशल्स यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध राहिले आहेत. हिंदी महासागरात सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणी वसलेल्या सेशल्सबरोबर भारताने सुरक्षाविषयक करार केला आहे. सेशल्सच्या विशेष आर्थिक क्षेत्राच्या सुरक्षेची जबाबदारी भारतीय नौदलाने स्वीकारली आहे. या क्षेत्राची टेहळणी करण्यासाठी भारतीय नौदलाच्या युद्धनौका आणि टेहळणी विमाने नियमितपणे सेशल्सला भेट देत आहेत. सेशल्सच्या तटरक्षक दलाला भारताने गस्ती नौका आणि विमानेही पुरवली आहेत. सेशल्समध्ये काही वर्षांपूर्वीच भारताने टेहळणी रडार उभारले असून त्याद्वारे पश्चिम हिंदी महासागरातील सागरी वाहतूक आणि अन्य हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. संरक्षण क्षेत्रातील याच सहकार्याचा विस्तार करून या देशातील ॲझम्पशन बेटावर आपला नाविक तळ सुरू करण्यासाठी भारत प्रयत्नशील होता. अखेर २८ जानेवारी २०१८ रोजी भारताच्या त्या प्रयत्नांना यश येऊन दोन्ही देशांमध्ये तत्संबंधीचा करारही झाला आहे. त्यानुसार या बेटावर भारत आपल्या युद्धनौकांसाठी धक्का आणि विमानांसाठी धावपट्टी उभारणार आहे. मात्र, हा करार झाल्यावर या बेटावर राहत असलेल्या स्थानिक नागरिकांनी या प्रकल्पाच्या विरोधात आवाज उठवला आहे. त्यांच्या मते, या तळामुळे या बेटावरील पर्यावरणाला हानी पोहोचेल. तसेच या तळामुळे सेशल्ससारखा शांतताप्रिय आणि छोटा देश दोन बड्या देशांच्या सत्तास्पर्धेत विनाकारण ओढला जाईल. या तळाच्या निमित्ताने भारतीयांचे सेशल्समध्ये स्थलांतरही वाढेल, अशी भीती स्थानिकांना वाटत आहे. 


ॲझम्पशन बेट सेशल्सच्या पश्चिमेला आणि आफ्रिका खंडाच्या मुख्य भूमीच्या जवळ वसलेले आहे. हे बेट हिंदी महासागरातील महत्त्वाच्या सागरी मार्गाजवळ वसलेले आहे. त्यामुळे येथे तळ सुरू झाल्याने भारतीय नौदलाला दक्षिण हिंदी महासागराबरोबरच एडनच्या आखातातही आपला प्रभाव वाढवता येणार आहे. त्याच वेळी भारत आणि आफ्रिका यांच्यातील व्यापारी संबंधांच्या विकासाच्या दृष्टीनेही हा तळ लाभकारक ठरू शकेल. मात्र, सध्या तरी स्थानिकांच्या विरोधामुळे या तळाच्या कामाला विलंब होणार नाही हे पाहावे लागेल. त्यासाठी भारताने सेशल्स सरकारच्या सहकार्याने स्थानिकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न सुरू करणे आवश्यक आहे. स्थानिकांच्या या विरोधाला बीजिंगहून पाठबळ मिळण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही. कारण व्यूहात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणी वसलेल्या सेशल्समध्ये शिरकाव करण्यासाठी चीन प्रयत्नशील आहे.  भारत आणि ओमान यांच्यात प्राचीन काळापासून घनिष्ठ संबंध राहिलेले आहेत. ओमान भारताचा पश्चिम आशियातील एक महत्त्वाचा व्यापारी आणि सुरक्षा सहकारी राहिला आहे. पर्शियाच्या आखाताच्या मुखावर वसलेल्या या देशाबरोबरच्या संबंधांना भारताने कायमच महत्त्वाचे स्थान दिले आहे. भारत आणि ओमान यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांना आधुनिक काळात सामरिकदृष्ट्याही महत्त्व आले आहे. दोन्ही देशांमध्ये २००८ मध्ये व्यूहात्मक भागीदारी स्थापन झाली आहे. त्याच वर्षापासून एडनच्या आखातातून जाणाऱ्या व्यापारी जहाजांना सोमाली चाच्यांपासून सुरक्षा पुरवण्यासाठी भारताने तेथे आपली युद्धनौका कायमस्वरूपी तैनात करण्यास सुरुवात केली आहे. त्या वेळी त्या युद्धनौकांना तसेच तेथे गस्तीसाठी जाणाऱ्या भारतीय हवाई दलाच्या विमानांना विश्रांती आणि रसद पुरवठा करण्यासाठी भारत आणि ओमान यांच्यात करार झाला होता. 


पंतप्रधान मोदी यांच्या फेब्रुवारी २०१८ मधील दौऱ्यात ओमानमधील दुक्म बंदर आणि विमानतळ भारतीय युद्धनौका आणि विमानांना रसद पुरवठ्यासाठी खुले करण्यासंबंधीचा करार करण्यात आला आहे. या आधीपासून भारतीय नौदल आणि हवाई दलाकडून ओमानमधील अन्य नाविक आणि हवाई तळांचा वापर केला जात होताच. त्यात आता दुक्ममुळे आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे. 


अरबी समुद्रातील आपल्या सुरक्षाविषयक गरजांच्या पूर्ततेसाठी भारताच्या युद्धनौका आणि विमाने दीर्घ पल्ल्याच्या तैनातीवर नियमितपणे ओमानमध्ये जात राहिली आहेत. काही महिन्यांपूर्वीच भारतीय नौदलाच्या दोन युद्धनौका, सागरी टेहळणी करणारी दोन दीर्घ पल्ल्याची विमाने आणि एक पाणबुडी दुक्ममध्ये पोहोचली होती. भारतीय पाणबुडीने अनेक वर्षांच्या खंडानंतर प्रथमच एखाद्या परदेशी बंदराला भेट दिली होती. होर्मुझची सामुद्रधुनी आणि एडनच्या आखाताबरोबरच एकूणच पश्चिम अरबी समुद्रात शांतता टिकून राहणे भारतासाठी आवश्यक ठरते. त्यामुळे होर्मुझची सामुद्रधुनी आणि एडनचे आखात येथून जाणारे सागरी मार्ग भारताच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील आहेत. या मार्गांवरून जलवाहतूक अव्याहतपणे सुरू राहणे भारताच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. काही दिवसांपूर्वीच एडनच्या आखाताजवळ वसलेल्या आफ्रिकेतील दिग्बुटी येथे चीनने आपला नाविक तळ सुरू केला आहे. त्याद्वारे चीनचा या क्षेत्रातील प्रभाव वाढू लागल्यामुळे अरबी समुद्रातील आपल्या राष्ट्रहितांना धोका निर्माण होऊ नये, यासाठी भारतीय नौदल आणि हवाई दल आता अधिक सक्रियपणे या क्षेत्रात कार्यरत राहणार आहे. ते कार्य अधिक प्रभावी आणि अविरत सुरू राहण्यामध्ये दुक्म येथे भारताला खुली झालेली सुविधा उपयुक्त ठरणार आहे. 


या वेळी एक बाब लक्षात घेणे आवश्यक आहे की, ओमानबरोबरच्या कराराचे स्वरूप सेशल्स आणि मॉरिशस यांच्याबरोबरच्या करारापेक्षा वेगळे आहे. सेशल्स आणि मॉरिशसमध्ये उभारल्या जात असलेल्या भारतीय नौदलाच्या तळांवर भारतीय युद्धनौका, पाणबुड्या कायमस्वरूपी तैनात असणार आहेत. मात्र, ओमानमधील दुक्म येथे भारतीय नौदल आणि हवाई दलाची अशी कायमस्वरूपी तैनाती राहणार नसून भारतीय तळांवरून गेलेल्या आणि  पश्चिम अरबी समुद्रात तैनात असलेल्या युद्धनौका, पाणबुड्या आणि विमानांसाठी तेथे रसद, देखभाल-दुरुस्ती आणि विश्रांतीची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. 


सेशल्स आणि ओमान यांच्या लष्करी दलांबरोबर भारताचे नियमित युद्धसराव होत असून त्याद्वारे परस्परांबद्दलचा विश्वास आणि सहकार्य वाढवले जात आहे. अॅझम्पशनच्या पूर्वेला असलेल्या मॅारिशसमधील अगालेगा बेटावरही भारत आपला नाविक तळ सुरू करणार आहे. तसेच मॅारिशसच्या दक्षिणेला असलेल्या फ्रान्सच्या रियुनियन बेटावरील नाविक तळावरील सुविधांचा वापर करण्यासंदर्भात चर्चा केली जात आहे. काही महिन्यांपूर्वीच फ्रेंच संरक्षण मंत्री फ्लोरेन्स पार्ली भारत दौऱ्यावर येऊन गेल्या. त्या वेळी भारत-फ्रान्स सामरिक भागीदारी आणखी मजबूत करण्यावर दोन्ही देशांमध्ये एकमत झाले असून हिंदी महासागरात शांतता आणि स्थैर्यासाठी भारतीय नौदलाबरोबर सहकार्य वाढवण्यासाठीही फ्रान्स इच्छुक असल्याचे पार्ली यांनी सांगितले होते. एकूणच अॅझम्पशन असो की दुक्म किंवा रियुनियन ही सर्व सामरिकदृष्ट्या महत्त्वाची ठिकाणे भारतीय नौदलाच्या प्राथमिक जबाबदारीच्या कार्यक्षेत्रात येत आहेत. त्यामुळे भारताने तेथे आपल्या नौदल आणि हवाई दलासाठी सुविधा विकसित करणे अतिशय महत्त्वाचे ठरत आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या २००३ मधील ताजिकिस्तानात दौऱ्याच्या वेळी तेथील ऐनी येथे भारताचा हवाईतळ सुरू करण्यासंबंधीचा करार झाला होता. भारताचा परकीय भूमीवरील तो पहिलावहिला तळ ठरणार होता. मात्र, मध्यंतरीच्या काळात भारताचा अमेरिकेकडे वाढलेला जास्त ओढा भारताला त्या तळावर आपली लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर तैनात करण्यात अडथळा ठरला. 


- पराग पुरोहित (संरक्षण अभ्यासक) 
parag12951@gmail.com

बातम्या आणखी आहेत...