आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपशकुनाच्या खेळीने शिवसेना वाढेल?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेची मुंबईवरील पकड निसटली आहे. ठाणे वगळता महाराष्ट्रात एकाही ठिकाणी शिवसेनेचे प्राबल्य नाही वा एकहाती सत्ता नाही. मराठी अस्मिता, मराठी आत्मसन्मान हे शब्द काही काळ उपयोगी पडले, पण ही अस्मिता साधणार कशी याचा कार्यक्रम उद्धव ठाकरेंकडे नाही. 
सेनेतील बरेचसे नेते आता पन्नाशीत गेले आहेत. ते जुन्या मस्तीत रमत असले तरी सेनेकडे येणाऱ्या नवीन पिढीला आकर्षित करणारा कार्यक्रम पक्षाकडे नाही. केवळ भाजप विरोधावर किती काळ राजकारण करणार? 

 

उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्या भेटीतून ताबडतोब काही निष्पन्न होईल अशी अपेक्षा कोणाची नव्हती. भेटीमध्ये काय बोलणी झाली याची माहिती खुद्द उद्धव ठाकरे, अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांच्याशिवाय कोणालाही नाही. यामुळे या भेटीत काय झाले असावे याबद्दल फक्त तर्क करता येतो, खात्रीपूर्वक काही सांगता येत नाही. 
शिवसेनेबरोबर युती पुन्हा साधली जावी अशी मुख्यमंत्र्यांसह भाजपमधील सुज्ञ नेत्यांची अपेक्षा आहे. शिवसेनेच्या जहरी टीकेमुळे भाजपमधील अनेक नेते व कार्यकर्ते दुखावले असले तरी महाराष्ट्रात पुन्हा सत्ता मिळवायची असेल तर शिवसेनेबरोबर मैत्री टिकली पाहिजे याचे स्वच्छ भान मुख्यमंत्र्यांना असावे, असे त्यांच्या वागण्याबोलण्यातून जाणवते.

 

शिवसेनेकडून पातळी सोडून होत असलेल्या टीकेला मध्यंतरी भाजपकडून त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले जात होते, परंतु मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या नेत्यांना चाप लावला. महापालिकेच्या सत्तेतला वाटा सोडला. त्यानंतरच्या गेल्या वर्षभरात भाजप नेत्यांनी सेनेच्या टीकेला अनुल्लेखाने मारायचे ठरवले आहे. शिवसेनेकडून होणारी टीका अधिकाधिक जहरी होत असली तरी भाजपचे त्यावर प्रत्युत्तर नाही. इतकेच नव्हे तर शिवसेनेबरोबर युती हवी आहे असा घोष भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी लावला आहे. 


यातून एक लक्षात येते की, महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता स्थापन करणे कठीण असल्याची जाणीव भाजपला झाली आहे. गेल्या निवडणुकीत मोदी लाट असल्यामुळे फ्लोटिंग व्होटचा फायदा भाजपला मिळाला. तो या वेळी मिळणार नाही. महाराष्ट्रातील सध्याची स्थिती अशी आहे की, कोणत्याच पक्षाचा मताधार वाढताना दिसत नाही. प्रत्येक पक्ष आपल्या ठरावीक मतसंख्येवर थबकला आहे. भाजप निवडणुका जिंकत असला तरी मतांची वाढ म्हणावी तशी नाही. शिवसेनेची मते कमी होत असली तरी त्याचाही वेग कमी आहे.

 

काँग्रेसचा मतदार अजून बराच शाबूत आहे व राष्ट्रवादीही आपल्या ठरावीक मतदारांवर मांड ठोकून आहे. यामुळे प्रत्येक पक्षाला दुसऱ्या पक्षाच्या मदतीची गरज आहे. काँग्रेस वा शिवसेनेकडून मतांचा ओघ भाजपकडे वळलेला नाही ही भाजपची पंचाईत आहे. यामुळे शिवसेनेला पूर्ण बाजूला ठेवून भाजपला सत्ता मिळणे अशक्य आहे. 


आणखी एक मुद्दा म्हणजे महाराष्ट्र पुन्हा काँग्रेसकडे जाणे हे मोदी-शहा यांना आ‌वडणार नाही. कर्नाटक काँग्रेसने स्वत:कडे राखले आहे. दीड वर्षानंतर महाराष्ट्र पुन्हा काँग्रेसकडे गेला तर काँग्रेसला आर्थिक ताकद मिळेल. मध्य प्रदेश, राजस्थान यातील विजयापेक्षा महाराष्ट्रातील विजय काँग्रेसला मोलाचा आहे हे मोदी-शहा जाणून आहेत. देशाच्या राजकारणात उत्तर प्रदेशाहून महाराष्ट्राचे महत्त्व जास्त आहे. 


स्वबळावर सत्ता मिळवण्याची ताकद नसल्यामुळे भाजपविरोधात उभ्या होत असलेल्या विरोधी पक्षांच्या आघाड्यांमध्ये शिवसेना वा राष्ट्रवादीला नेहमी दुय्यम स्थान मिळेल. भाजपकडून पुरेसा मान मिळत नाही म्हणून उद्धव ठाकरे रागावत असले तरी तिसऱ्या आघाडीत त्यांना सध्या मिळते तितकीही किंमत मिळणार नाही हे ते जाणून आहेत. म्हणून कुमारस्वामींचे आमंत्रण असूनही ते कर्नाटकातील शपथ सोहळ्याला गेले नाहीत. शिवसेना भाजपपासून फुटावी असे विरोधी पक्षांच्या आघाडीतील सर्व पक्षांना वाटत असले तरी सेनेला आघाडीत स्थान देण्याची तयारी ते दाखवणार नाहीत. शिवसेना फक्त एनडीएमध्येच जाऊ शकते.  


शिवसेनेची कोंडी विविध स्तरावर आहे. पक्षाची वाढ खुंटली आहे. फडणवीस सरकारच्या विरोधात तिखट टीका करूनही मतांची संख्या कमी होत आहे. सत्ता कशी राबवावी याचे तंत्र माहीत नसल्यामुळे सत्तेत राहूनही फायदा होत नाही, केवळ चिडचिडेपणा येतो. सत्तेपेक्षा सत्तेबाहेरचे राजकारण शिवसेनेला जास्त मानवते. कारण संघटनेकडून राजकीय पक्ष अशी शिवसेनेची वाढ अद्याप झालेली नाही. याशिवाय बाहेरून दिसतो तितका एकसंघपणा शिवसेनेत नाही. संघटनेप्रमाणे एकांडी शिलेदारी करण्यापेक्षा भाजपसारख्या पक्षाबरोबर राहून सत्तेचा उपभोग घेणे सेनेतील एका गटाला आवडू शकते. शिवसेनेत असा गट नसता तर शिवसेना सत्तेतून कधीच बाहेर पडली असती. या गटाचा दबाव उद्धव ठाकरे यांच्यावर आहे. 


शिवसेनेसमोरच्या या अडचणींचा कसा फायदा उठवायचा हा पेच भाजपसमोर आहे. शिवसेना व भाजप यांचा मतदार बराचसा सारखा आहे. दोन्ही पक्षातील वाद नेत्यांना हवे असले तरी मतदार त्यावर नाखुश आहेत. शिवसेनेचा मतदार भाजपवर अधूनमधून रागावत असला तरी काँग्रेसला जवळ करण्याची मानसिकता त्याच्याकडे नाही.

 

भाजपच्या मतदारालाही शिवसेनेबद्दल आस्था वाटते. हे वास्तव लक्षात घेऊन शिवसेनेतील अस्वस्थ मतदाराला आपल्याकडे ओढण्यासाठी भाजपकडून युतीचा जप केला जात असावा. आम्ही मैैत्री टिकवत आहोत, पण शिवसेनेचे नेते ऐकत नाहीत, अशी प्रतिमा तयार करण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. मतदारांमध्ये ‘गुडविल’ निर्माण करण्याची ही धडपड अाहे. हा प्रयत्न यशस्वी झाला तर भाजपची मतसंख्या वाढू शकते. मात्र स्वबळावर सत्ता मिळवण्याइतकी ती वाढेल का, याची शंका आहे. उद्या महाराष्ट्रात युती झाली नाही तरी निवडणुकीनंतर शिवसेनेला भाजपबरोबर जाण्याशिवाय गत्यंतर राहणार नाही हे भाजपचे नेते जाणून आहेत.

 

मात्र शिवसेनेमुळे भाजपच्या जागा मोठ्या प्रमाणात कमी होऊ नयेत ही दक्षता भाजपला घ्यावी लागणार आहे. ही कसरत फार कठीण आहे. राष्ट्रीय स्तरावर युती ही भाजपची गरज आहे, पण अनिवार्यता नाही. लोकसभा निवडणुकीत भाजपला २२० ते २४० जागा मिळाल्या तर शिवसेनेला बाजूला ठेवूनही भाजपला सत्तेसाठी नवे मित्र मिळू शकतात. मात्र विधानसभेत भाजपला शिवसेनेशिवाय गत्यंतर नाही.

 

शिवाय वर म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्रातून भाजपची सत्ता काँग्रेसकडे गेली तर काँग्रेसला हतबल करण्याचा मोदी-शहा यांचा उद्देश साध्य होणार नाही. अहंकार व हेटाळणी बाजूला ठेवून शहा मातोश्रीवर गेले याचे कारण काँग्रेसमुक्त राजकारण हे असावे. मात्र त्यासाठी भाजपला शिवसेनेची पूर्ण साथ मिळण्याची शक्यता सध्या दिसत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे शिवसेनेला कोणत्या दिशेने घेऊन जावे याचा निश्चित कार्यक्रम उद्धव ठाकरे यांच्याकडे नाही.

भाजपकडे निश्चित उद्देश आहे व त्यासाठीचा कार्यक्रमही आहे. शिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची साथ आहे. शिवसेनेकडे यातील काहीही नाही. भाजपची अडवणूक यापलीकडे सध्या पक्षाकडे कार्यक्रम नाही.  

 

शिवसेनेसमोरील हा मोठा प्रश्न आहे. मुंबईवरील पक्षाची पकड निसटली आहे. ठाणे वगळता महाराष्ट्रात एकाही ठिकाणी शिवसेनेचे प्राबल्य नाही वा एकहाती सत्ता नाही. मराठी अस्मिता, मराठी आत्मसन्मान हे शब्द काही काळ उपयोगी पडले, पण ही अस्मिता साधणार कशी याचा कार्यक्रम उद्धव ठाकरेंकडे नाही. सेनेतील बरेचसे नेते आता पन्नाशीत गेले आहेत. ते जुन्या मस्तीत रमत असले तरी सेनेकडे येणाऱ्या नवीन पिढीला आकर्षित करणारा कार्यक्रम पक्षाकडे नाही. केवळ भाजप विरोधावर किती काळ राजकारण करणार? 


शिवसेना भाजपला अपशकुन करू शकते. तितकी ताकद अद्याप सेनेमध्ये निश्चित आहे. म्हणूनच सेनेला आपल्याबरोबर घेण्याची भाजपची धडपड आहे. तथापि, भाजपला अपशकुन करून शिवसेनेची वाढ होईल का? तशी चिन्हे गेल्या चार वर्षांत दिसलेली नाहीत. ही वाढ होत नसल्याने शिवसेनेलाही युतीची गरज आहे. मात्र अहंकाराला मागे सारून व्यावहारिक सौदा करण्याची तयारी गुजराती नेतृत्वाकडे असते. मराठी बाण्याच्या शिवसेनेकडे ती नसल्याने शहा दारी आले तरी सेनेचे धोरण बदलेल याची खात्री नाही. याची चुणूक उद्धव ठाकरेंच्या पालघरच्या भाषणातून मिळाली आहे. पण भाजप प्रयत्न सोडणार नाही. 

 

प्रशांत दीक्षित
 राज्य संपादक
prashant.dixit@dbcorp.in

 

बातम्या आणखी आहेत...