आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्रायव्हरलेस कार आणि भारत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतात बेशिस्त ड्रायव्हिंगची एक बहुरंगी उन्नत संस्कृती नांदत अाहे. चालकरहित कार आल्यास या संस्कृतीचे बारा वाजतील हे नक्की. ही संस्कृती बुडू न देण्यासाठी सरकार जसे प्रयत्नशील आहे तसे लोकही प्रयत्नशील आहेत. त्यामुळे पुढची पन्नास वर्षे तरी भारतीय रस्त्यांवर चालकरहित (ड्रायव्हरलेस) कार धावू शकणार नाही. 


संगणकीय संरचना आणि आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून चालणाऱ्या स्वयंचलित कार लवकरच जगभरातल्या रस्त्यांवर धावू लागणार आहेत. माणसाला चाकाचा शोध लागून साडेपाच हजार वर्षे झाली आहेत. चाकाच्या प्राथमिक शोधानंतर त्यावर निरनिराळे प्रयोग होत राहिले. सुरुवातीला घोडा आणि बैलांच्या कष्टांवर धावणाऱ्या गाड्या गेल्या शतकात पेट्रोलवर धावू लागल्या आणि त्यांनी जगाचा इतिहास व भूगोल दोन्ही बदलून टाकले. पेट्रोलियम पदार्थांच्या अतिवापरामुळे अवघे जग आज धुराने घुसमटत असताना पेट्रोलियम पदार्थाऐवजी विजेवर चालणाऱ्या आणि कुठलेही प्रदूषण न करणाऱ्या कार हा मानवी संस्कृतीच्या इतिहासातला एक मोठा टप्पा आहे. या कारमध्ये वापरलेली प्रणाली ही एकाच वेळी तिच्या आतमध्ये बसवलेले शक्तिशाली संगणक, उच्च दर्जाचे कॅमेरे आणि उपग्रहाने दिलेल्या माहितीचा वापर करून आपला रस्ता आणि वेग स्वतःच ठरवते आणि कुठल्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय प्रवाशाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाते. स्वयंचलित कारचे तंत्रज्ञान अद्याप बरेचसे प्रायोगिक असले तरी जनरल मोटर्स, गुगल आणि टेस्ला या तीन महत्त्वाच्या कंपन्यांनी या क्षेत्रात सर्वशक्तीनिशी उतरण्यासाठी कंबर कसली आहे. सोबत युरोप, जपान, चीन आणि भारतातल्या काही महत्त्वाच्या कंपन्याही या क्षेत्रात संशोधन करीत असून त्या पेट्रोलियम पदार्थावर चालणारी वाहने लवकरच इतिहासजमा करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. पेट्रोलियम पदार्थांना पर्याय उपलब्ध झाल्यानंतरची वाहनांची बाजारपेठ ही संपूर्णतः नवी असल्याने त्यात जुन्या ‘दादा’ कंपन्यांची मक्तेदारी मोडली जाऊन नवीन तंत्रज्ञानाचा आग्रह धरणाऱ्या कंपन्यांसाठी मोठी संधी उपलब्ध होणार आहे. 


पेट्रोलऐवजी विजेवर चालणारी, ड्रायव्हरची गरज नसणारी आणि आपला रस्ता स्वतःच शोधून घेणारी ही स्वप्नवत वाटणारी कार आपल्या आगमनापूर्वीच जगभरात चर्चेचा विषय ठरली आहे. सर्वप्रथम अशा कार अस्तित्वात आल्यास जगभरात वाहनचालकाचा व्यवसाय करणाऱ्या वा सेवा देणाऱ्या लोकांचा रोजगार एका फटक्यात बंद होऊ शकतो. अशाच तंत्रज्ञानाचा वापर करून ट्रक, बस आणि जहाजेही बनवणे शक्य असल्याने वाहतुकीच्या क्षेत्रातील बेरोजगारीचे प्रमाण कैक पटीने वाढू शकते. या महत्त्वाच्या समस्येचा विचार करतानाच चालकरहित कारचे अनेक फायदेही आहेत. सर्वप्रथम विजेवर चालणाऱ्या या कारमुळे प्रदूषण पूर्णतः बंद होणार आहे. आज जगभरातल्या अनेक महत्त्वाच्या शहरांत प्रदूषणाने धोक्याची पातळी गाठली असून दिल्लीसारख्या शहरात ही समस्या अतिशय गंभीर आहे. भारतात प्रदूषणामुळे होणाऱ्या श्वासांच्या आजारामुळे लाखो लोक मृत्युमुखी पडत असून हा आकडा वाढतच चालला आहे. याशिवाय नानाविध उपाययोजना करूनही रस्त्यांवर होणाऱ्या अपघातांची संख्या आटोक्यात येत नाही. भारतात दर चार मिनिटाला अपघातामुळे एक मृत्यू घडतो. स्वयंचलित वाहने ही माणसापेक्षा जास्त चांगल्या प्रकारे ड्राइव्ह करणार असल्याने अपघातांचे प्रमाण कमी होऊन ते जवळजवळ शून्यापर्यंत येईल इतपत प्रगती आज तंत्रज्ञानाने केली आहे. 


साधारण पंचवीस वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय सॉफ्टवेअरच्या बाजारात कुशल आणि स्वस्त तंत्रज्ञ उपलब्ध करून दिल्यानंतर तंत्रज्ञानाच्या येऊ घातलेल्या या संधींमध्ये भारताचा सहभाग किती असेल याबाबत मात्र अनेक विश्लेषक साशंक आहेत. जगभरात सॉफ्टवेअर क्रांती होत असताना भारताने स्वस्तात कुशल तंत्रज्ञ उपलब्ध करून दिले असले तरी संशोधन आणि उपयोगी उत्पादनांचे शोध लावण्यात भारत बराचसा अपयशी ठरला आहे. मूलभूत तंत्रज्ञान कुठल्या तरी प्रगत देशांतल्या लोकांनी बनवायचे आणि आपण फक्त ते व्यवस्थित काम करते आहे की नाही ते पाहायचे अशी काहीशी पद्धत भारतीय कंपन्यांनी आचरणात आणली होती. या पद्धतीमुळे भारताला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळाले असले तरी संशोधनाच्या बाबतीत मात्र भारत कोरडाच राहिला. गेली तीन वर्षे वेगाने विकसित होत असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या संशोधन क्षेत्रात काही भारतीय नावे असली तरी त्यांची संख्या ही हाताच्या बोटावर मोजता येईल इतपत लहान असून त्यांची बांधिलकी भारतापेक्षा त्यांच्या कंपनीशी जास्त आहे. अशा निराशाजनक परिस्थितीत महिंद्रा आणि टाटा एल्क्सी या दोन कंपन्यांनी भारतात स्वयंचलित वाहनांच्या निर्मितीसाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत.

 
टाटा एल्क्सी या कंपनीचे नाव उच्चारायला जसे अवघड आहे तसेच त्यांचे नेमके कामही समजून घेण्यास जरासे क्लिष्ट आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात अमेरिकन कंपन्यांच्या तात्त्विक भूमिकेपेक्षा टाटा एल्क्सीची भूमिका जास्त मानवी आणि भारताच्या दृष्टीने अधिक सौहार्दशील आहे. टाटांचे व्यापारासंबंधी असलेले मानवतेचे तत्त्वज्ञान एल्क्सीच्या मुळाशीही असून तंत्रज्ञानाला मानवी भावनांची किनार देण्यासाठी टाटा एल्क्सी कटिबद्ध असल्याचे दिसून येते. अर्थात, टेस्लाची भव्यता आणि आणि इलॉन मस्कसारखा ग्लॅमरस हीरो टाटांकडे नसल्याने त्यांच्या कार्याला अद्याप हवी तशी प्रसिद्धी मिळालेली नाही. परिवहन क्षेत्रातली दुसरी महत्त्वाची कंपनी महिंद्रा हीदेखील स्वयंचलित कारच्या बाबतीत भरीव कामगिरी करीत असून त्यांच्यातर्फे तूर्तास ड्रायव्हरची गरज तशीच ठेवून विजेवर चालणारी कार लवकरच बाजारात आणण्यात येणार आहे. महिंद्रा ही ट्रॅक्टर उत्पादनाच्या बाबतीत जगातली सर्वात मोठी कंपनी असल्याने स्वयंचलित कारऐवजी  ट्रॅक्टर्सवर त्यांनी जास्त लक्ष केंद्रित केले आहे. हा स्वयंचलित ट्रॅक्टर भारतीय शेतीव्यवस्थेत महत्त्वाचे बदल घडवून आणू शकतो. 


स्वयंचलित वाहनांच्या या नव्या क्रांतीत भारतीय कंपन्या प्रवेश करण्यासाठी सज्ज होत असल्या तरी भारतात स्वयंचलित कारला परवानगी देण्यास परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी गेल्या वर्षी स्पष्टपणे नकार दिला होता. या तंत्रज्ञानामुळे लाखो लोक जर बेरोजगार होणार असतील तर हे तंत्रज्ञान भारताच्या उपयोगाचे नाही अशी त्यामागे त्यांची स्पष्ट भूमिका होती. वरवर पाहता त्यांचा हा निर्णय सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचा वाटू शकतो, पण उद्या चालकरहित कारला भारतीय रस्त्यांवरून धावू देण्याची परवानगी दिली तरी त्या भारतात किती दूरपर्यंत धावू शकतील याबाबत सर्व उत्पादक साशंक आहेत. याचे मुख्य कारण भारतीयांच्या मानसिकतेत आणि त्यामुळे होणाऱ्या परिवहनाच्या कोंडीत लपलेले आहे. भारतात लग्न करणे आणि घर बांधणे या दोन महत्त्वाच्या संस्कारानंतर कार विकत घेणे हा तिसरा संस्कार असतो. लोक आपली कार ही आपले घर आणि आपल्या पत्नीइतकीच मिरवण्याची गोष्ट समजतात (आठवा सुनील बाबूंची जाहिरात). भारतातल्या पुणे अथवा कोल्हापूरसारख्या शहरातले रस्ते हे कधीकाळी घोडदळ, पायदळ वा हत्तींच्या वाहतुकींसाठी बनले होते. त्याच्या दुतर्फा असलेले बांधकाम तसेच ठेवून त्या अरुंद रस्त्यांवरून आपण सध्या कार आणि दुचाकी चालवतो आहोत. रस्ता हा वाहनांसाठी असताना त्याचसोबत तो पवित्र गायी आणि म्हशींच्या वावरासाठीही काळजीपूर्वक राखून ठेवावा लागतो. राजस्थानच्या रस्त्यांवर गायीऐवजी उंटांचे प्रमाण जास्त असून दक्षिणेत उंटाऐवजी हत्तीचा वावर जास्त असतो.


भारतीय लोक आपल्या गाड्यांमध्ये पेट्रोलसोबत बराचसा गर्वही टाकतात आणि हा गर्व वाहतुकींचे नियम पाळताना, नंबर प्लेटवर नंबर टाकताना, सिग्नलवर उभे असताना जागोजागी ओसंडत असतो. बुलेट उडवत हिंडणारी बेरोजगार तरुणाई पेट्रोलच्या प्रदूषणासोबत आवाजाच्या प्रदूषणातही हिरीरीने पुढे आहे. ड्रायव्हिंग करताना समोर पाहत गाडी चालवण्याचे दिवस कालबाह्य होत असून त्याऐवजी व्हॉट्सअॅपमध्ये पाहत पाहत गाडी चालवण्याचे प्रमाण वाढले आहे. भारतात झेब्रा क्रॉसिंगच्या मागे थांबणे ही आजही एक भ्रामक कल्पना ठरते त्यावर मोठ्या लोकसंख्येचा विश्वास नाही. भारतात बेशिस्त ड्रायव्हिंगची एक बहुरंगी उन्नत संस्कृती नांदत अाहे. चालकरहित कार आल्यास या संस्कृतीचे बारा वाजतील हे नक्की. ही संस्कृती बुडू न देण्यासाठी सरकार जसे प्रयत्नशील आहे तसे लोकही प्रयत्नशील आहेत. त्यामुळे पुढची पन्नास वर्षे तरी भारतीय रस्त्यांवर चालकरहित कार धावू शकणार नाही. 


- राहुल बनसोडे
rahulbaba@gmail.com

बातम्या आणखी आहेत...