आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुले पगडी पवारांना परवडेल काय?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फुले पगडी वारकरी, शेतकरी वर्षानुवर्षे घालतात. संत तुकाराम महाराजही अशी पगडी घालत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक काळी टोपी घालतात. स्वातंत्र्य चळवळीत आणि नंतरच्या काळात काँग्रेस कार्यकर्ते पांढरी गांधी टोपी घालत. अलीकडे अण्णा आंदोलनात ‘मी अण्णा’ लिहिलेल्या पांढऱ्या टोप्या या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाच्या प्रतीक बनल्या होत्या. 

 

पुणेरी पगडी आणि ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ. बाबा आढाव यांच्याबद्दलचा एक प्रसंग प्रसिद्ध आहे. बाबांचा पुणे मनपाने ‘पुणे भूषण’ पुरस्कार देऊन गौरव केला होता. तेव्हा बाबांनी सत्कार स्वीकारताना, मी पुणेरी पगडी घालणार नाही, अशी जाहीर भूमिका घेतली. बाबा आढाव हे म. फुले यांच्या विचारांचे पाईक. बाबांनी जानवं व पुणेरी पगडी ही जात वर्ण वर्चस्वाची प्रतीकं आहेत. जात व्यवस्था मोडायची तर अशी प्रतीकं नाकारायला हवीत, अशी भूमिका घेतली होती. बाबांनी ही भूमिका आयुष्यभर प्रामाणिकपणे जपली आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या २० व्या वर्धापनदिन मेळाव्यात पुण्यात पुणेरी पगडीला बगल दिली. फुले पगडीचा स्वीकार करायच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या. छगन भुजबळांच्या डोक्यावर फुले पगडी दिली. त्यानंतर पुणेरी पगडी विरुद्ध फुले पगडी असा अकारण वाद पवारांनी ओढवून घेतला. खुद्द याच कार्यक्रमात सुरुवातीला पवार, भुजबळांनी पुणेरी पगडी घातली आणि नंतर फुले पगडीचं माहात्म्य त्यांच्या ध्यानात आलं. ही विसंगतीही महाराष्ट्राच्या समोर आली. बाबा अाढावांचा पुणेरी पगडी नाकारण्याचा किस्सा म्हणूनच आठवला. 

 

पवारांना फुले पगडी नंतर का आठवली? राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात फुले पगडी आणायला पवारांना २० वर्षे लागावी? राष्ट्रवादी काँग्रेसला २० वर्षे झाली, पण पवार त्याआधी राष्ट्रीय काँग्रेस पक्षात होते. काँग्रेसमध्ये येण्यापूर्वी पवारांनी समाजवादी काँग्रेस हा पक्ष चालवून पहिला होता. नंतरच्या राजकीय प्रवासात पवारांनी पुण्यातल्या कार्यक्रमात अनेकदा पुणेरी पगडी घातली. तेव्हा त्यांना ती खटकली नाही. मग आत्ताच असं काय झालं की अचानक कार्यक्रमात फुले पगडी आली. तीही त्यांनी स्वतःच्या डोक्यावर न घालता भुजबळांच्या डोक्यावर का चढवली? 
२०१९च्या लोकसभेच्या निवडणुकीची सर्वच पक्ष तयारी करत आहेत.
 
पवारही फुले पगडीच्या प्रतीकातून काही नवं सोशल इंजिनिअरिंग घडवू पाहत आहेत काय? राजकारणात प्रतीकं आणि विचारांना खूप महत्त्व असतं. पवारांसारख्या जाणत्या नेत्यांना ते माहीत आहे. फेटा, पागोटे, मुंडासे आणि पगडी यांचा मुख्य उद्देश डोकं, मेंदू यांचं संरक्षण करणं हा असला तरी त्या संस्कृती आणि विचारांची प्रतीकं आहेत.  
 
हे टोप्या, पगडी यांचं सामर्थ्य, महत्त्व लक्षात घेऊन पवारांनी फुले पगडी वापरण्याचा सल्ला राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दिला. पण हे पगडी पॉलिटिक्स पवारांना झेपेल काय? पवारांचा आजपर्यंतचा राजकीय व्यवहार काय सांगतो? ज्येष्ठ पत्रकार, खासदार कुमार केतकर यांनी पवारांच्या राजकीय चारित्र्याचं विश्लेषण करताना ‘पवार हेच पवारांचे शत्रू’ असं अग्रलेख लिहून केलं होतं. पवार हे आर्थिक, सामाजिक भान, अभ्यास असलेले, अफाट ऊर्जा असलेले नेते आहेत. पण त्यांच्या भूमिकांवर सतत विश्वासार्हतेचं प्रश्नचिन्ह उभं राहत आलंय. पवारांनी १९७८ मध्ये महाराष्ट्रात पुलोदचा प्रयोग करून तरुण वयात मुख्यमंत्रिपद मिळवलं. तेव्हा त्यांच्यावर वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप झाला. पुलोद प्रयोगात जनसंघाला बरोबर घेऊन त्यांनी महाराष्ट्रात भाजप रुजवायला संधी मिळवून दिली. बाळासाहेब ठाकरेंशी पवारांची मैत्री सर्वश्रुत होती. त्या मैत्रीचा उपयोग ठाकरेंनी शिवसेना वाढवण्यासाठी चलाखीने करून घेतला. अगदी चार वर्षांपूर्वी राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अल्पमतावर सत्तेत आलेल्या भाजप सरकारला पहिला पाठिंबा पवारांच्या राष्ट्रवादीनेच दिला होता.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर पवारांना बोटाला धरून गुरूच मानलेलं आहे. मोदींना बारामतीत पवारांनी आणलं. तेव्हा हे गुरुमाहात्म्य देशाला कळलं होतं. पवारांचं हे राजकीय चारित्र्य बघितलं तर ‘सिर सलामत तो पगडी पचास’ अशा स्वरूपाचं दिसतं. शेतकरी नेते खासदार राजू शेट्टी यांनी शिक्षक, पदवीधर निवडणुकीच्या निमित्ताने नुकतीच मुंबईत पत्रकार परिषद घेतली. मुंबईचे शिक्षक मतदारसंघातील उमेदवार आमदार कपिल पाटील आणि पदवीधर मतदारसंघातील उमेदवार जालिंदर सरोदे यांना पाठिंबा देण्यासाठी ही पत्रकार परिषद होती. त्या पत्रकार परिषदेत राजू शेट्टी म्हणाले की, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या बड्या पक्षांना ते स्वतः संकटात सापडले की पुरोगामी विचार आणि धर्मनिरपेक्षता आठवते.
 
एरवी हे पक्ष त्यांचे बडे नेते पुरोगामी चळवळीतल्या कार्यकर्त्यांना नेस्तनाबूत करतात. भाजपविरोधी एकत्र येणाऱ्या पक्षांची व्यापक एकजूट टिकवण्यासाठी मोठ्या पक्षांनी छोट्या पक्षांना आणि संघटनांना त्यांचा रास्त वाटा दिला पाहिजे. राजू शेट्टी पवारांच्या राजकारणावर स्वानुभव सांगत प्रश्नचिन्ह लावत आहेत. पुरोगामी चळवळीतील आणि छोट्या उदारमतवादी पक्षांचं नेतृत्व प्रस्थापितांनी उभं राहू दिलं नाही, अशी पवारांकडे बोट दाखवत राजू शेट्टींची तक्रार दिसतेय.  
  
राजू शेट्टी यांच्यासारखाच सूर प्रकाश आंबेडकर यांनी काही दिवसांपूर्वी लावला होता. आंबेडकर यांनी पवारांचं राजकीय वर्ग चारित्र्य कार्ल मार्क्सच्या भाषेत सांगितलं. आंबेडकर म्हणाले होते, पवार हे शेतकऱ्यांचे नेते नसून शेती मालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योग समूहाचे नेते आहेत. त्यामुळे पवारांना साखर लॉबी, दूध लॉबीचं प्रेम आहे पण शेतकऱ्यांशी घेणं-देणं नाही. आंबेडकरांनी शेतकरी समूहांना सल्ला दिलाय की, जातीसाठी माती खात राहाल तर वारंवार संप करत राहावं लागणार आणि शेतमालाला योग्य भाव कधीही मिळणार नाहीत. पवारांचं राजकारण शेतकरीविरोधी आहे. शेतकरी जातींनी हे लवकर ओळखावं. 
 
पुणेरी पगडी वादावर वाद वाढल्यानंतर पवारांनी माझा कुणा वर्गाला दुखावण्याचा हेतू नव्हता. म. फुलेंचा विचार सांगण्याचा प्रयत्न होता. समता, परिवर्तनाचा पुरस्कार करणाऱ्या म. फुलेंचा विचार पुढे नेणे ही राष्ट्रीय आणि सामाजिक गरज आहे. या प्रक्रियेत मी आहे. मात्र, त्याबाबतीत वैयक्तिक किंवा ठराविक वर्गाच्या विरोधात भूमिका घेतल्याचं मानणे चुकीचं आहे, असं सांगण्याचा प्रयत्न पुण्यातच केला.
 
पण आजवरचा पवारांचा राजकीय व्यवहार पाहता त्याविषयी प्रश्न उभे राहणं स्वाभाविक आहे. फुले विचार पुढे नेणे म्हणजे उपेक्षित जातींना त्यांचा सत्तेतला हिस्सा देणं. पवारांनी पन्नास वर्षांत राजकारण करताना तो किती दिला? पवारांनी मंडल आयोगाला पूरक भूमिका घेतली जरूर, पण राज्यातल्या इतर मागासवर्गीयांनी (ओबीसींनी) भाजपचा आसरा शोधला. हे असं का झालं? पवार काँग्रेसमध्ये होते. तेव्हाही आणि स्वतंत्र राष्ट्रवादी पक्ष चालवते झाले तेव्हाही या बड्या पक्षांत ओबीसी आमदारांची संख्या अल्प राहिली. कोकणातले ओबीसी शिवसेनेत गेले आणि तिथं त्यांना सत्ता मिळाली. उर्वरित महाराष्ट्रातले ओबीसी आजही भाजपला मानतात. कुणबी, तेली, लेवा पाटील, धनगर, वंजारी हे जातसमूह आजही भाजपचा झेंडा खांद्यावर घेऊन राजकारण करत आहेत. मराठा समाजाचे मोर्चे निघाले तेव्हाही या परिस्थितीला काँग्रेस-राष्ट्रवादीचं राजकारण जबाबदार आहे. मराठा समाजाचे प्रश्न काँग्रेस-राष्ट्रवादी का सोडवू शकली नाही, असा आरोप केला गेला.  
 
२०१९च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पवारविरोधी पक्षांची मोट बांधण्याच्या प्रयत्नात आहेत. राहुल गांधींसह ते विरोधी नेत्यांना एकत्र करत आहेत. मोदी हटावसाठी हा खटाटोप आहे. पण मोदी का नको हे लोकांना पटवण्यासाठी पवार, राहुल यांच्याकडे अजेंडा काय आहे? मोदींनी लोकांना ‘न्यू इंडिया’चं स्वप्न दाखवलंय. ते स्वप्न खोटं आहे हे सांगताना पवारांना त्यांचा ‘न्यू इंडिया’ कसा असेल हे सांगावं लागेल. मोदींनी संस्था खिळखिळ्या केल्या, सामाजिक ऐक्याचं वस्त्र फाडलं आणि लोकशाही, संविधान धोक्यात आणलं. म्हणून मोदी हटवा आणि आम्हाला सत्ता द्या म्हणताना नवं काय घडेल हा अजेंडा पवारांजवळ आज तरी दिसत नाही. तेव्हा नुसती फुले पगडी भुजबळांच्या डोक्यावर बघून लोकांनी विश्वास कसा ठेवायचा? फुले पगडी डोक्यावर घालणं सोपं आहे. पण तिच्या खालचा विचार जगण्यासाठी किंमत चुकवावी लागते. बाबा आढावांनी ती चुकवली आहे. शरद पवारांनी ती आजपर्यंत चुकवल्याचं दिसत नाही. मग यापुढे ती चुकवणं त्यांना परवडेल काय? 
 
राजा कांदळकर
राजकीय विश्लेषक rajak2008@gmail.com

बातम्या आणखी आहेत...