आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रणवदांच्या भाषणातील मौलिकता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्ही अल्पसंख्यविरोधी आहात, असे एकाने म्हणायचे आणि दुसऱ्याने तुम्ही अल्पसंख्यकांना कसे वापरले, याचे पाढे वाचत बसायचे, हे संवैधानिक राष्ट्रवादात बसत नाही. जात, धर्म, प्रादेशिक अस्मिता, वंश, यांचा राजकारणात वापर करायचा नाही. कारण ते संविधानाला मंजूर नाही. या मर्यादांचे पालन सर्वांनी करणे गरजेचे आहे. प्रणवदा यांनी भारताचे प्रथम नागरिक या भूमिकेतून जे विचारधन मांडले आहे, त्याचे विपरीत अर्थ काढण्याऐवजी त्यावर सकारात्मक विचार केला जावा.

 

जनभावना उत्तेजित करण्यात प्रसारमाध्यमांची शक्ती किती अफाट असते, याचे दर्शन देशाने पुन्हा एकदा ७ जून रोजी केले. भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्ग समारोपासाठी येणार आहेत, ही बातमी जाहीर होताच माध्यमांनी वेगवेगळ्या चर्चांना उधाण आणले. या निमित्ताने संघ शिक्षा वर्ग, त्याचे तृतीय वर्षाचे शिक्षण इत्यादी सामान्य जनतेला माहीत नसलेल्या विषयांवर संघाने न मागताच माध्यमांनी भरपूर माहिती पुरवली. प्रणवदांनी निमंत्रण स्वीकारावे की स्वीकारू नये, कार्यक्रमात त्यांनी काय बोलले पाहिजे, निमंत्रण स्वीकारून ते संघाला प्रतिष्ठित करणार आहेत, भाषण झाल्यानंतर ते काय बोलले यापेक्षा ते काय बोलले नाहीत, संघाचा उल्लेख त्यांनी कसा टाळला, त्यांनी ध्वजप्रणाम केला नाही, प्रार्थना म्हटली नाही, अशा सर्व विषयांवर उदंड चर्चा झाल्या. संघ शिक्षा वर्गाच्या समारोपाचा कार्यक्रम, संघाने न मागताच दूरदर्शन वाहिन्यांवर लाइव्ह दाखवण्यात आला. संघाच्या ९३ वर्षांच्या इतिहासात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एवढी प्रचंड प्रसिद्धी पहिल्यांदाच झालेली आहे.  


प्रणवदा यांच्या संघ व्यासपीठावर जाण्याच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने सहिष्णुतेचा मुद्दा ऐरणीवर आला. संघावर टीका करणाऱ्या सर्व राजकीय लोकांचे ‘संघाची विचारधारा असहिष्णु आहे’ याबद्दल एकमत असते. प्रणवदांच्या नागपूरला जाण्याने संघाच्या असहिष्णुतेवर नगण्य चर्चा झाली. प्रणवदांना विरोध करणाऱ्यांच्या सहिष्णुतेचा बुरखा त्यांनी आपल्या हातानेच फाडला. एका बाजूला लोकशाहीने दिलेल्या भाषण स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची चर्चा करायची आणि दुसऱ्या बाजूला प्रणवदांना अभिव्यक्ती आणि विचारस्वातंत्र्य नाकारायचे. त्यांनी कुठे जावे आणि जाऊ नये, याच्या विषयीचे सल्ले देत बसायचे. यामुळे आपण किती असहिष्णु आहोत, हे आपल्याच मुखाने विरोधकांनी प्रसिद्धी  माध्यमांच्या द्वारे साऱ्या जगाला दर्शन घडवले. आंधळा विरोध सुरू झाला की, आंधळेपणामुळे आपण आपलेच कसे नुकसान करून घेत आहोत, हेदेखील दिसत नाही.  


नागपूरच्या कार्यक्रमात प्रणवदा यांनी ध्वजप्रणाम केला नाही, प्रार्थना म्हटली नाही, याबद्दल एक संघ स्वयंसेवक म्हणून मला कसलेही दुःख नाही. उलट ते शांतपणे उभे राहिले, हे त्यांनी फार उत्तम केले. जर त्यांनी संघ पद्धतीने प्रणाम किंवा प्रार्थना केली असती, तर नंतरच्या चर्चेला कोणते स्वरूप आले, हे सांगता येत नाही. प्रत्येक संस्थेची एक आचार पद्धती असते. पाहुण्याने तिचे जसेच्या तसे पालन केले पाहिजे, असा कुठलाही नियम नाही. घरात आलेला पाहुणा घरातील सगळया नियमांनी बांधलेला नसतो, घरातील लोकांची तशी अपेक्षाही नसते. त्यांनी संघाला खुश करण्यासाठी प्रशंसात्मक भाषण केले नाही, याबद्दलही त्यांचे आभार मानले पाहिजेत. त्यांनी आपले विचार प्रकट केले. ते स्पष्ट, मुद्देसूद आणि अनेक संदर्भ देऊन केले.

सार्वजनिक व्यासपीठावर सामान्यतः तत्त्वज्ञान मांडणारे भाषण कुणी करत नाही. प्रणवदांनी ते केले आणि सुसूत्र रीतीने देशाच्या राष्ट्रवादाची मांडणी केली. त्यांचे भाषण सर्वांनाच (ज्यांना विचार करायचा आहे त्यांना) गंभीर विचार करायला लावणारे आहे. आपण विचाराने परिपूर्ण आहोत, आपल्याला अक्कल शिकवायची कुणाला गरज नाही, जगाला अक्कल शिकवण्यासाठीच आमचा जन्म झालेला आहे, अशी ज्यांची धारणा झालेली असते, ते या भाषणाचे, मनाला येईल तसे अर्थ काढत बसलेले आहेत.  


राष्ट्र म्हणजे काय? राष्ट्रवाद म्हणजे काय? देशभक्ती म्हणजे काय? यांच्या व्याख्या देत त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. आपले राष्ट्र अतिशय प्राचीन असून त्याला दीर्घ पंरपरा आहे. युरोपमध्ये राज्याची संकल्पना विकसित होण्यापूर्वीच आपल्या देशात मौर्य काळात, सम्राट अशोकाच्या, राज्य ही संकल्पना उत्तम प्रकारे विकसित झाल्याचे दिसून येते. कौटिल्याचे अर्थशास्त्र राजनितीवरील उत्तम ग्रंथ असल्याचे सांगून पुढे ते म्हणाले की, नालंदा, तक्षशिला, विक्रमशीला, वल्लभी, ही अठराशे वर्षे शिक्षण देणारी विद्यापीठे होती. मुस्लिम आक्रमणापासून ते इंग्रजांच्या आक्रमणापर्यंत वेगवेगळ्या आक्रमणांचा उल्लेख करून प्रणवदांनी सांगितले की, आलेल्या सर्वांना आपल्यात सामावून घेण्याचीआपली पद्धती राहिलेली आहे. व्हिन्सेंट स्मिथ याचे अवतरण देऊन ते म्हणाले, ‘भारतात खोलवरची सांस्कृतिक एकता आहे. १२२ भाषा, १६०० बोलीभाषा, ६ प्रकारचे उपासना पंथ, ३ प्रकारचे वांशिक समूह यांनी १३० कोटी लोकांचा हा देश बनलेला आहे. आमची राष्ट्रीय ओळख सर्वसमावेशकता आणि सहअस्तित्व यांनी होते.सहिष्णुतेतून आम्हाला शक्ती प्राप्त होते. आमचा राष्ट्रवाद विद्वेष आणि असहिष्णुता याद्वारे जर मांडण्याचा प्रयत्न झाला तर आमची राष्ट्रीय अस्मिता मलीन होईल. वेगळेपण वरवरचे असून अंतर्गत खोलवरची सांस्कृतिक एकता आहे.’  

 

भारताचा हा प्राचीन राष्ट्रवाद आहे, हे प्रणवदांना सांगायचे आहे आणि तो आपण स्वीकारलेल्या राज्यघटनेत कशा प्रकारे प्रकट झालेला आहे, हेदेखील त्यांनी सांगितले आहे. ‘भारतीय राष्ट्रवाद ही संवैधानिक देशभक्ती आहे. यात आमच्यात विविधतेची जपवणूक, स्वतःला सुधारण्याची क्षमता आणि सामाजिक, आर्थिक परिवर्तनाचा मार्ग दाखवला गेलेला आहे. समोर बसलेल्या स्वयंसेवकांना उद्देशून ते म्हणाले, ‘तुम्ही तरुण आहात, शिस्तबद्ध आहात, उत्तम प्रकारे प्रशिक्षित आहात, आणि उच्च विद्याविभूषित आहात, शांतता, सहकार्य, आणि सुखासाठी आपण सर्वांनी झटले पाहिजे. आमच्या मातृभूमीची ही अपेक्षा आहे. आमच्या मातृभूमीला याची आवश्यकतादेखील आहे.’ 


प्रणवदा यांच्या भाषणापूर्वी सरसंघचालक मोहनजी भागवत यांचे भाषण झाले. मोहनजींनी अनेकता ही भारताची ओळख आहे. भाषा, संप्रदाय यांची विविधता, वेगळया राजकीय विचारसरणी फार पूर्वीपासून आहेत. आपली विविधता जपत, दुसऱ्यांच्या विविधतेचे स्वागत करत, सन्मान करत, मिळूनमिसळून राहायचे आहे. भारतात जन्मलेले सर्वच आमचे आहेत. आपण सर्वांनी मिळून भारताला गौरव प्राप्त करून देण्यासाठी झटले पाहिजे. मोहनजींचे भाषण संघ परिभाषेतील आहे, तर प्रणवदांचे भाषण संघा बाहेरील परिभाषेतील आहे. आशयात समानता आहे, मांडणीत विविधता आहे.  


प्रणवदा हे काँग्रेस पक्षात वाढलेले ज्येष्ठ राजनेता आहेत. काँग्रेसची एक विचारधारा आहे. प्रणवदांनी ती, त्यांना जशी समजली तशी मांडली. संघ हीदेखील एक विचारधारेवर चालणारी संघटना आहे. मोहनजी भागवत यांनी ती संघाच्या भाषेत मांडली. ही दोन्ही भाषणे ऐकल्यानंतर काँग्रेस संघाचा विरोध का करते आणि संघस्वयंसेवकदेखील काँग्रेसचा एवढा विरोध का करतात, हा बुचकळ्यात टाकणारा प्रश्न निर्माण होतो. संघाच्या नावात ‘राष्ट्रीय’ शब्द आहे, काँग्रेसच्या नावातदेखील ‘राष्ट्रीय’ शब्द आहे. आज देशात प्रत्येकाला रोज जाणवेल इतक्या प्रकारची राजकीय असहिष्णुता निर्माण झालेली आहे. एकमेकांवर आरोप आणि प्रत्यारोप रोज होत असतात. संसदीय पद्धतीच्या लोकशाही राज्यव्यवस्थेत सत्तेसाठी राजकीय पक्षात स्पर्धा अपरिहार्य आहे. अशी स्पर्धा करताना काही मर्यादांचे पालन सर्वांनी करणे आवश्यक आहे. प्रणवदांनी संवैधानिक राष्ट्रवादाची संकल्पना मांडलेली आहे. त्याबाबतीत सर्वांचे एकमत झाले पाहिजे. तुम्ही अल्पसंख्यविरोधी आहात असे एकाने म्हणायचे आणि दुसऱ्याने तुम्ही अल्पसंख्यकांना कसे वापरले, याचे पाढे वाचत बसायचे, हे संवैधानिक राष्ट्रवादात बसत नाही. जात, धर्म, प्रादेशिक अस्मिता, वंश, यांचा राजकारणात वापर करायचा नाही. कारण ते संविधानाला मंजूर नाही. या मर्यादांचे पालन सर्वांनी करणे गरजेचे आहे. प्रणवदा यांनी भारताचे प्रथम नागरिक या भूमिकेतून जे विचारधन मांडले आहे, त्याचे विपरीत अर्थ काढण्याऐवजी त्यावर सकारात्मक विचार केला जावा, आज त्याची गरज आहे. 

 

रमेश पतंगे
ज्येष्ठ पत्रकार

बातम्या आणखी आहेत...