आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किमान आधारभूत किंमत : शेतकऱ्यांसाठी एक चांगले पाऊल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

किमान आधारभूत किंमत (एएसपी) दीडपटीने वाढवून शासनाने एक चांगले पाऊल उचलले आहे. याची गरजच होती. मात्र यात  अडचण फक्त एकच आहे, ती म्हणजे जाहीर केलेल्या आधारभूत भावाप्रमाणे शेतमाल खरेदीची कुठलीही सक्षम यंत्रणा सरकारकडे नसणे.  याचा तोटा असा होतो की सरकार भाव तर जाहीर करते पण प्रत्यक्षात त्या दराने खरेदी होत नाही. उदाहरणच घ्यायचे झाल्यास मागच्या वर्षी जेमतेम २० टक्के इतक्याच तुरीची खरेदी शासन करू शकले. त्यामुळे आधारभूत किंमत दीडपटीने वाढवून प्रत्यक्ष फायदा होत नाही. पण दुसरा एक फायदा अप्रत्यक्षरीत्या शेतकऱ्याला मिळू शकतो, तो म्हणजे शासकीय आधारभूत किमतीच्या थोडीशी खाली बाजारातील खरीखुरी खरेदीची किंमत स्थिर होत असते. जर आधारभूत किंमत वाढलेली असेल तर आपोआपच बाजारातील खरी किंमतही वाढलेली दिसून येते. हा शेतकऱ्याचा फायदा. या अर्थसंकल्पातून शेतकऱ्याच्या पदरी तेवढे पडलेले दिसते. 


या अर्थसंकल्पात ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी मोठा निधी मंजूर केला आहे. त्याची नितांत गरज होतीच. जोपर्यंत बारमाही भक्कम रस्त्यांचे जाळे ग्रामीण भागात उभारले जात नाही तोपर्यंत शेतमालाची वाहतूक चांगल्या पद्धतीने होऊ शकत नाही. त्यामुळे हे पाऊल स्वागतार्हच आहे. पण शंका इतकीच आहे की ही रक्कम खरेच पूर्णपणे खर्च होईल का? याला जोडून दुसरी एक गोष्ट करणे आवश्यक होते जी की झाली नाही. ती म्हणजे शेतमालाच्या साठवणुकीसाठी गोदामे आणि नाशवंत  शेतमालासाठी शीतगृहे यांचे जाळे उभारण्यासाठी निधी मंजूर करायला हवा होता. पण तो झालेला दिसत नाही. तिसरा जो मुद्दा अर्थसंकल्पात दिसतो आहे तो म्हणजे शेतमालाच्या निर्यातीवरची कमी झालेली बंधने. डाळीला याचा फायदा होऊ शकतो. इतरही शेतमालाची निर्यात होऊ शकते. पण त्यासाठी या धोरणात सातत्य हवे. आज उठवलेली बंधने परत काही काळाने लादली तर जागतिक शेतमाल बाजारपेठेतील भारताची विश्वासार्हता धोक्यात येईल. तंत्रज्ञानाच्या संदर्भात शेतकऱ्यांनी सातत्याने आधुनिक तंत्रज्ञानाची मागणी केलेली आहे. पण या सरकारने पूर्वग्रदूषित ठेवून जनुकीय बियाणे (जीएम) तंत्रज्ञानाला अडथळा निर्माण केला आहे. याचा परिणाम म्हणजे कापसामध्ये बोंडअळीची निर्माण झालेली समस्या आहे. शेतीमधल्या समस्या काळाच्या मागे जाऊन सुटणार नसून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भविष्यवेधी पुढे जाणारी दिशाच पकडावी लागेल.


-  श्रीकांत उमरीकर, कृषी क्षेत्राचे अभ्यासक

बातम्या आणखी आहेत...