आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हलगर्जीपणा अन् शेतकऱ्यांची त्रेधा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रब्बीची सुगी अंतिम टप्प्यात अालेली असतानाच राज्यात १५ मार्चपासून ढगाळ हवामान निर्माण हाेण्यास सुरूवात झाली. काेकण, मराठवाडा, विदर्भ, खानदेश, प. महाराष्ट्रात सर्वदूर असेच वातावरण अद्यापही कमी-अधिक फरकाने दिसून येत अाहे. यामुळे भाजीपाल्यासह बागायती पिकांवर किडीच्या प्रादुर्भावाचे सावट बळावले. अांंब्याचा माेहाेर जवळपास हातचा गेलाच अाहे. द्राक्षाच्या मण्यांवर ‘चिकट्या’चा प्रादुर्भाव दिसत असून डाळींब, गहू, कांदा देखील हातचा जाण्याची भीती गडद हाेत चालली अाहे. खरे तर हाेळीनंतर उन्हाळ्याची चाहूल लागते, परंतु बदलत्या हवामानामुळे राज्यभर चिंतेचे ढग दाटून अाले अाहेत.


गारपीट, अवकाळी पाऊस अाणि शेतकऱ्यांचे नुकसान या बाबी व्यवस्थेसह सर्वांच्याच अंगवळणी पडत चालल्या अाहेत. गारपीटीने राज्यातील ४ लाख हेक्टरवरील रब्बीचे पीक गारद केले, त्यापूर्वी बाेंडअळीने शेतकऱ्यांना पाेखरून काढले. अस्मानी संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना व्यवस्थेकडून दिलासा मिळण्याचे तर दूरच परंतु नव्या अडचणींची पेरणी हाेत अाहे. त्यात अाता हवामान खात्याच्या अंदाजाची भर पडली. हवामान खात्याकडून साधारणपणे ठाेकताळे दिले जातात. त्यामुळे शेतकऱ्यांचा धीर सुटत चालला अाहे. जिल्हानिहाय अंदाज देणाऱ्या या विभागाने जणू हवामानातील बदलासारखाच पवित्रा अंगिकारल्याचे दिसते. निधी अाणि देयकाच्या वादातून हे घडत असेल तर निश्चितच त्यास हलगर्जीपणा कारणीभूत अाहे, असेच म्हणावे लागेल. एेन महत्वाच्या क्षणी नि:संदिग्ध, स्पष्ट हवामानाचा अंदाज दिला जात नसेल तर त्यामागे विमा कंपन्यांचे पाेट भरण्याचा तर डाव नसेल? साहजिकच असा प्रश्न काेणालाही पडू शकताे. यापूर्वी हवामानाचा अंदाज फारसा गांभीर्याने घेतला जात नसे, कारण बहुतेक वेळा ते चुकीचे ठरत असत. मात्र हवामानात सातत्याने हाेत असलेला बदल, पिकांचे हाेणारे नुकसान लक्षात घेता शेतकऱ्यांप्रमाणेच सामान्य लाेक देखील हवामान खात्याच्या अंदाजावर अाता गांभीर्याने विचार करीत अाहेत. म्हणूनच या विभागाने देखील अंदाज वर्तवण्याचा पॅटर्न बदलला पाहिजे, असे सुचवावेसे वाटते.


कारण हवामान खात्याच्या अंदाजाने राज्यभरातील शेतकऱ्यांची तारांबळ उडते अाहे. पावसाच्या धास्तीने ८-१० दिवस अगाेदरच दिवस-रात्र एक करून गहू काढून घेतला जात अाहे. द्राक्षांचे मणी चिरू नयेत, चिकट्याचा प्रादुर्भाव हाेऊ नये म्हणून द्राक्षांमध्ये साखर पुरेशी उतरलेली नसतानाच खुडणी केली जात अाहे. कांद्याच्या साठवणुकीसाठी शेतकऱ्यांची दमछाक चालली अाहे. महाराष्ट्रापासून काेमाेरिन पर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मराठवाड्यासह उत्तर व पश्चिम महाराष्ट्रात, विदर्भात ढगाळ वातावरण रेंगाळत अाहे. पावसाच्या हलक्या सरी शिडकावा करून जात अाहेत. अशा स्थितीत गारपीटीची अफवा पसरली. स्वाभाविकच शेतकरी अधिकच हवालदिल झाला. पातीअाड झाकलेला कांदा पावसाच्या धास्तीने सुरक्षित ठेवण्यासाठी, शेतात उभा असलेला अाेला गहू हार्वेस्टरने काढून घेण्यासाठी त्याच्या जीवाचा अाटापिटा चालला अाहे.

 

नैसर्गिक प्रकाेपाचा अाकस्मिक मुकाबला करता-करता जेरीस अालेल्या शेतकऱ्यांची व्यवस्थेकडून हाेणारी हेळसांड मात्र काही थांबलेली नाही. २० मार्च २०१४ राेजी यवतमाळ जिल्ह्यातील दाभाडीत ‘चाय पे चर्चा’ झाली हाेती. भाजपने उपग्रहाच्या माध्यमातून देशातील ५०० शहरात या चर्चेचे थेट प्रक्षेपण दाखवले, बराच गाजावाजा केला. या घटनेला अाता चार वर्ष लाेटली. नरेंद्र माेदींनी त्या चर्चेच्या वेळी १६ अाश्वासने दिली, ती सारी चहाच्या कपातच विरून गेली असेच म्हणण्यासारखी स्थिती अाहे. कारण, गेल्या चार वर्षात दाभाडी परिसरातील ९५ शेतकऱ्यांनी नापिकीला कंटाळून अात्महत्येचा मार्ग निवडला, यातच सारे अाले. उल्लेखनिय म्हणजे १९ मार्च १९८६ राेजी कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून पत्नी व चार मुलांसह साहेबराव पाटील करपे या शेतकऱ्याने अात्महत्या केली. राज्यातील पहिल्या शेतकरी आत्महत्येच्या घटनेला १९ मार्च २०१८ ला ३२ वर्षे पूर्ण झाली. या घटनेच्या स्मृत्यर्थ राज्यभर अन्नत्याग आंदोलन झाले. कदाचित राज्य सरकारला या बाबीकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवे असे वाटले नसावे. जसा माेदींना ‘चाय पे चर्चा’चा विसर पडला तसाच राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या दृष्टीने जिव्हाळ्याच्या असणाऱ्या या मुद्याचा साेयीस्कर विसर पडलेला असू शकताे, असे म्हटले तर वावगे ठरू नये. एक मात्र खरे की, अस्मानी अाणि सुलतानी संकटाशी धैर्याने, संयमाने मुकाबला करण्यातच शेतकऱ्यांचे हित अाहे. हवामान बदलामुळे हाेणारे अार्थिक नुकसान टाळण्यासाठी शेतमालाच्या बाजारभावाचा अंदाज त्यांनी जरूर घ्यावा. सरकारवर भिस्त ठेवण्यापेक्षा स्वत:लाच सर्वार्थाने सक्षम करण्यावर प्राधान्याने भर दिला, तरच हलगर्जीपणाच्या गर्तेतून सुटका हाेऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...