आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रासंगिक : मराठवाड्याला हक्काचं पाणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाडा, नाशिक-नगर हे एकाच गाेदावरी खाेऱ्यातले विभाग, त्यांना पाण्याच्या माध्यमातून नियतीने एकत्र बांधले. अाता त्यांच्यातील पाणी वाटप समप्रमाणात व्हावे यासाठी कायदा असतानाही वरच्या भागातील धरणांतून पाणी साेडण्यास एक तर विराेध केला जाताे किंवा पाणी साेडण्यात अालेच तर चाेरले जाते अथवा बिनबाेभाटपणे अन्यत्र वळवण्यात येते. त्यामुळे धरणाखालील भागात निर्माण हाेणारी तूट समप्रमाणात विभागली जाणे अपेक्षित असतानाही केवळ जायकवाडीच्या माथी मारली जाते.

 

मात्र, अाता या पाणी चाेरीला तसेच पाणी वळवण्याच्या शिरस्त्याला चाप लावण्याचा अाणि मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळवून देण्याचा प्रयत्न समन्यायी पाणी वाटपासाठी नियुक्त 
समिती करणार अाहे, ही बाब पाण्यासाठी व्याकुळ हाेणाऱ्या मराठवाड्यास दिलासादायक ठरावी. 
२००५ च्या समन्यायी पाणी वाटप कायद्यामुळे मराठवाडा, नाशिक, नगरमध्ये पाट पाण्याचा बखेडा निर्माण झाला, असे मानणारा एक प्रवाह अाहे. वैतरणेचे पाणी मुकणे धरणात अाणून अाैरंगाबाद अाणि परिसरात १७ टीएमसी पाणी का वळवले जात नाही? उर्ध्व गाेदावरीचे खाेरे हे अतितुटीचे अाहे, तुटीच्या पाण्याचे वाटप शक्य नाही. त्यासाठी अतिरिक्त पाणी उपलब्ध करणे हाच पर्याय ठरू शकताे, असाही युक्तिवाद केला जाताे. अर्थातच या तीन विभागांच्या भूमिका त्यांच्या ठिकाणी वाजवी अाहेत. मात्र, प्रादेशिक राजकीय स्वार्थापाेटी व्यवहार्य ताेडग्याला सातत्याने बगल दिली गेली. त्यामुळे हा तिढा सर्वाेच्च न्यायालयात पाेहाेचला. अखेरीस समन्यायी पाणी वाटपाचे सूत्र स्वीकारणे सर्वांनाच अपरिहार्य ठरले.

 

नाशिक जिल्ह्यातील गंगापूर व दारणा या मोठ्या तर काश्यपी, गौतमी-गोदावरी, भावली, मुकणे, वालदेवी, कडवा, आळंदी भोजापूर, पालखेड, करंजवण, वाघाड, ओझरखेड, पुणेगाव व तिसगाव आदी लघु व मध्यम धरणांचा पाणीसाठा हा कळीचा मुद्दा ठरला आहे. त्यामुळे ऊर्ध्व अाणि निम्न भागातील धरणांचे समन्यायी पाणी वाटप करताना तीन पथ्ये पाळली जावीत अशी अपेक्षा अाहे. (१) ऊर्ध्व भागातील धरणांतून साेडावयाच्या पाण्याचे परिमाण ठरवावे. पाणी साेडल्यानंतर जायकवाडी धरणात अावश्यक त्या प्रमाणात प्राप्त हाेईल हे पहावे. कारण, पाणी साेडण्याचे परिमाण कमी असेल तर वहनव्ययात ते खर्ची पडेल अाणि वापरकर्त्यांना उपलब्ध हाेणार नाही. (२) ऊर्ध्व भागातून साेडलेले पाणी वापरण्याचे नियाेजन केलेले असावे.

 

अन्यथा बाष्पीभवन, पाणी चाेरीद्वारे वापरले गेले तर गरजूंना पाण्याचा लाभ मिळणार नाही. (३) नदी नैसर्गिकरीत्या अाेली किंवा प्रवाहित असताना म्हणजेच सप्टेंबर-अाॅक्टाेबरमध्ये पाणी साेडल्यास त्याचा वहनव्यय कमी हाेईल अाणि अधिकाधिक पाणी वापरण्यास उपलब्ध हाेईल. 
कल्याणकारी आर्थिक तत्त्वामध्ये समता, कार्यक्षमता आणि न्याय या प्रमुख तत्त्वांचा अंतर्भाव असताे. जलमूल्याचे समान वाटप म्हणजे समता, जल वापरातील उत्पादकता म्हणजे कार्यक्षमता आणि दरडोई उपलब्ध होणारी लाभता म्हणजेच न्याय. हंगाम, पीक, हवामान, मृद, जमिनीचा उतारा, जलनिस्सारण आणि इतर सामाजिक घटकांचा प्रभाव न्याय या संकल्पनेवर हाेत असतो.

 

त्यामुळे जल वापर आणि वाटपामध्ये न्याय निर्माण करणे अत्यंत अवघड ठरते. मात्र, या वेळी समता आणि कार्यक्षमता या संकल्पनांचा धाेरणात्मक कृतिशील वापर उपयुक्त ठरताे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या निर्देशानुसार समन्यायी पाणी वाटपाबाबत नियुक्त समिती या अनुषंगाने ठाेस भूमिका घेईल, अशी अपेक्षा अाहे. येत्या १ जुलैपासून दरराेज दर ६ तासांनी पाणी वाटपाची तपासणी केली जाणार अाहे. त्याविषयी दर १५ दिवसांनी बैठक हाेईल. १४ अाॅक्टाेबरच्या अाढाव्यात ऊर्ध्व भागात किती पाणी वापरले गेले अाणि जायकवाडीसाठी किती साेडण्यात अाले, तुटीचे प्रमाण किती अशा अनेक आनुषंगिक बाबी स्पष्ट हाेतील. महत्त्वाचे म्हणजे ऊर्ध्व भागातील पाणी चाेरीला चाप बसेल. जल व्यवस्थापनातील ‘डब्लिन’ तत्त्वानुसार पाणी ही मर्यादित जलसंपत्ती असून त्यास ‘अार्थिक मूल्य’ असते. या तत्त्वाचा स्वीकार ऊर्ध्व गाेदावरी उपखाेऱ्यातील पाणी वापरकर्त्यांनी केला तर मर्यादित पाण्यापासून अधिकाधिक लाभ सर्व घटकांना मिळू शकताे. पाणी हे अानंददायी निसर्गाचे निखळ रूप अाहे. युराेपसह जगभरात पर्यटनामध्ये पाण्याचा खुबीने वापर केला जाताे. अापण ते साध्य करू शकताे, मात्र त्यासाठी पावसापासून धरणापर्यंत, शेतीपासून सांडपाण्यापर्यंत, उद्याेगापासून उद्यानापर्यंत त्या दृष्टिकाेनातून पाणी वापराचा विचार करावा लागेल, हे अगदीच अशक्य नाही. महाराष्ट्रातील गाेदावरी खाेऱ्याच्या नियाेजनातून या प्रक्रियेची सुरुवात व्हावी, अशी अपेक्षा अाहे.

 

श्रीपाद सबनीस

बातम्या आणखी आहेत...