आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विशेष संपादकीय: गुस्सा आणि अहंकार...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अविश्वास ठराव मांडला गेला असला तरी नरेंद्र मोदी सरकार पडणार नाही याची खात्री गुरुवार सायंकाळीच पटली होती. तरीही एनडीएचे संख्याबळ किती हे जाणण्याची उत्सुकता होती. त्यामध्ये अपेक्षेपेक्षा जास्त मते घेऊन मोदींनी बाजी मारली. याचबरोबर उत्सुकता होती ती सत्ताधारी व विरोधी पक्षातील आरोप-प्रत्यारोपांच्या जुगलबंदीची. अविश्वासाचा ठराव हा क्रिकेट सामन्याप्रमाणे कोट्यवधी भारतीयांनी पाहिला. जुगलबंदीचा आनंद त्यांनी मनमुराद लुटला. ११ तासांचे भरभक्कम मनोरंजन नेटफ्लिक्सवरील खळबळजनक मालिकाही देऊ शकणार नाहीत. चर्चेच्या सुरुवातीच्या टप्प्यात राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्ला चढवला व नाटक रंगत गेले. हा हल्ला जोरदार होता व वक्ते म्हणून राहुल गांधी यांनी बरीच प्रगती केल्याचे त्यातून देशाला दिसले. पण त्यामध्ये दोन गोष्टींची कमी होती. एक तर नवा आरोप वा नवी माहिती काहीही नव्हती आणि बोलण्यात दृढ विश्वासाचा अभाव होता. 


मोदी सरकारच्या विरोधात गेली तीन वर्षे जी पटकथा रटविण्यात येत आहे, तिचाच आविष्कार राहुल गांधींनी केला. हा आविष्कार त्यांनी भाषणाच्या पहिल्या भागात चांगला केला तरी दोन गोष्टींमुळे तो फसला. राफेल खरेदीवर त्यांनी चुकीची माहिती घेऊन आरोप केले व ते फोल असल्याचे तेथेच सिद्ध झाले. इतकेच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही राहुल तोंडघशी पडले. आंतरराष्ट्रीय कराराबद्दल देशातील भावी नेतृत्व इतक्या हलकेपणाने बोलत असेल तर या देशाशी व्यवहार करावे की नाही, असा प्रश्न अन्य राष्ट्रांना पडेल. त्यानंतर राहुल गांधींची फसगत झाली ती जादूची झप्पी देताना. काँग्रेसच्या समर्थकांना ही झप्पी हा फार मोठा आविष्कार वाटला. काही जणांना हिंदू धर्माचे खरे स्वरूप राहुल गांधींच्या कृतीतून व वक्तव्यातून प्रगट झाल्याचा साक्षात्कार झाला. वृत्तवाहिन्यांनी हे नाटक दिवसभर रंगविले, पण त्यातून काय साधले? राहुल गांधी फक्त गळाभेटीपुरते थांबले असते तर त्याचा योग्य परिणाम कदाचित झाला असता. पण त्यानंतर जागेवर बसताना त्यांनी सहकाऱ्यांना डोळा मारला आणि आपल्या अभिनयावर पाणी ओतले. गळाभेट ही दृढ विश्वासाची कृती न राहता ती बालिश कृती झाली आणि मग मोदींनी आपल्या भाषणातून त्याचा वचपा काढला. नाटकीय भाषण करण्यात मोदी राहुल यांच्या बरेच पुढे आहेत. ते कौशल्य वापरत त्यांनी राहुल गांधींच्या वक्तव्याचे वाभाडे काढले. असे वाभाडे काढताना त्यांनी केलेला अभिनयही पंतप्रधान पदावरील व्यक्तीला शोभणारा नसला तरी जनतेला तेच आवडले असेल.


मात्र दोघांच्या भाषणात काही भाग देशासाठी महत्त्वाचा होता. दोघांच्या नाटकामुळे त्याकडे दुर्लक्ष झाले. राहुल गांधींनी नवे आरोप केले नसले तरी त्यांनी मांडलेले मुद्दे गंभीर होते व त्याला उत्तर देण्यासाठी मोदींना बरीच आकडेवारी समोर ठेवावी लागली. राहुल गांधींच्या भाषणात आरोपांच्या फैरी होत्या पण त्यामागे डेटा नव्हता. मोदींकडे डेटा होता. अर्थात कोणत्याही पंतप्रधानांना असा डेटा समोर ठेवूनच भाषण करावे लागते. आरोपांच्या फैरी झाडताना राहुल गांधी यांना काँग्रेसची विचारधारा अधिक स्पष्टपणे मांडता आली नाही. गरिबांची भाषा करीत आपण पुन्हा जनतेचा विश्वास मिळवू असे अजून त्यांना वाटत असेल तर ते चुकीचे आहे. राफेल करारासंबंधी केलेल्या आरोपामुळे राहुल गांधींवर हक्कभंग दाखल होण्याची शक्यता आहे. त्यावरील चर्चेत सरकार बरोबर ठरले तर मोदींची विश्वासार्हता वाढेल आणि राहुल यांच्या सर्वच आरोपांवर जनता शंका व्यक्त करील. मात्र राहुल गांधी खरे ठरले तर मोदींना बोफोर्ससारख्या आरोपांना उत्तर द्यावे लागेल आणि निवडणुकीत त्याचा जबर फटका बसेल. राफेल या दोघांसाठी कळीचा मुद्दा ठरू शकतो.


तथापि मोदींनी बँकांची बुडीत खाती आणि २०१४मधील अर्थव्यवस्थेची स्थिती यावर जी माहिती दिली ती महत्त्वाची होती. तेलगू देसमच्या गोंधळात त्याकडे अनेकांचे लक्ष गेले नाही व माध्यमांतील चर्चेतही ही बाब आली नाही. पुढील काळात त्यावर खोल चर्चा झाली पाहिजे. २०१४मध्येच अर्थव्यवस्थेची श्वेतपत्रिका मांडायला हवी होती, असे ते म्हणाले. त्याचबरोबर फोन बँकिंगच्या माध्यमातून कर्ज देण्याचे अनेक गैरव्यवहार बँकांतून कसे झाले याची माहिती त्यांनी दिली. मात्र ही माहिती त्यांनी अधिक नाट्यमय रीतीने व उदाहरणासह दिली असती तर देशाच्या नागरिकांना बरीच नवी माहिती मिळाली असती. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आर्थिक आघाडीवर मोदी अपयशी ठरत असल्याचा प्रचार जोर पकडत असताना ही माहिती महत्त्वाची होती. दुर्दैवाने अशा महत्त्वाच्या माहितीवर चर्चा करण्यास ना पुढारी तयार असतात व ऐकायला जनताही तयार नसते. अजूनही वेळ गेलेली नाही. मोदींनी आर्थिक श्वेतपत्रिका जरूर मांडावी.


लोकसभेत १२ तास अविश्वासाचे नाटक चालले. त्याचा राजकीय फायदा उठविण्याचा प्रयत्न राहुल गांधींपेक्षा मोदींनी अधिक केला. मोदींवरील अविश्वास देशाला दाखवून देणे हे काँग्रेसचे ध्येय होते. शिवसेनेची केविलवाणी तटस्थता, बिजू जनता दलाचा सभात्याग व अण्णा द्रमुकचे तळ्यात-मळ्यात यामुळे मित्रपक्षांचाच भाजपवरील विश्वास उडाला आहे, जेथे मित्रपक्षच बरोबर नाहीत ते सरकार कसे विश्वासार्ह हा काँग्रेसचा सवाल होता. याला प्रत्युत्तर म्हणून मोदींनी काँग्रेसला लक्ष्य केले. काँग्रेसचे नेतृत्व अत्यंत अविश्वसनीय आहे, कधी केसाने गळा कापतील हे सांगता येत नाही याची अनेक उदाहरणे त्यांनी दिली. प्रादेशिक पक्षांबद्दल मोदींनी चकार शब्द काढला नाही वा ते दुखवले जातील अशी भाषा केली नाही. अविश्वास ठराव मांडणाऱ्या तेलगू देसमबद्दलही त्यांनी सौम्य भूमिका घेतली. तुमच्या जिवावर राहुल गांधी यांना सत्ता काबीज करायची आहे व एकदा सत्ता मिळाली की ते तुम्हाला झुगारून देतील असे इतिहास सांगतो, हे सांगण्याची मोदींची धडपड होती. काँग्रेसच्या विश्वासार्हतेवर मोदींना प्रश्न उपस्थित करायचे होते. अर्थात मुलायम, मायावतींपासून सर्व प्रादेशिक नेत्यांना हे सत्य माहीत आहे. त्यांच्यासाठी ही नवीन बाब नाही. पण देशातील जनतेसमोर हा इतिहास ठेवून विरोधी पक्षांच्या संभाव्य आघाडीच्या एकजुटीबद्दल संशय निर्माण करण्याचा मोदींचा उद्देश होता. विरोधी एकजुटीबद्दल अविश्वास निर्माण करण्याचा निश्चित राजकीय उद्देश समोर ठेवून मोदींनी भाषण केले. 


ही राजकीय लढाई होती. संख्याबळात मोदी बाजी मारणार हे नक्की असले तरी एनडीएला ३२५ मते कुठून मिळाली हा कुतूहलाचा विषय आहे. त्याचबरोबर विरोधी पक्षांनाही अपेक्षेइतकी मते मिळालेली नाहीत. शिवसेना तटस्थ राहिली पण त्यातून काहीच साधले नाही. एनडीएच्या संख्याबळाला त्याने भगदाड पडले नाही. सेनेची तटस्थता हा थट्टेचा विषय झाला. या तटस्थतेमुळे शिवसेना नेतृत्वाची विश्वासार्हता आणखी बुडाली. आता केंद्रात व महाराष्ट्रात सत्तेतून बाहेर पडल्याशिवाय सेनेला पुन्हा विश्वासार्हता मिळविता येणार नाही.


यातून जनतेच्या हाती काय पडले असा प्रश्न नेहमीप्रमाणे केला जाईल. अशा प्रश्नांना फारसा अर्थ नसतो. जनतेला फार अपेक्षाही नसते. सत्तेचा खेळ जनता कौतुकाने पाहते व आपल्या कामाला लागते. मोदी सरकार नालायक आहे, भ्रष्ट आहे हे जनतेला पटवून देण्यासाठी काँग्रेससह विरोधी पक्षांना अविश्वास ठरावाचा उपयोग केला तर विरोधी आघाडीच्या विश्वासार्हतेवर संशय निर्माण करण्यासाठी मोदींनी याचा उपयोग केला. मोदींचा गुस्सा हा देशाला घातक असे राहुल गांधीचे म्हणणे होते तर गांधी घराण्याचा सत्तेचा अहंकार अतिघातक हे मोदींचे मत होते. गुस्सा व अहंकार यामध्ये हे नाटक रंगले. राजकीय अभिनयाच्या जुगलबंदीत कोण यशस्वी ठरणार हे पुढील वर्षी कळेल. निवडणुक प्रचाराला लोकसभेतून सुरुवात झाली आहे एवढे जनतेने लक्षात घ्यावे

बातम्या आणखी आहेत...