आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहा-मोदींच्या नेतृत्वाचा विजय नव्हे!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पूर्वोत्तर राज्यांमधल्या तीन विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आणि सर्वदूर खळबळ माजली. या राज्यात भगवा पाय रोवू शकतो; यावर विश्वास न ठेवणाऱ्यांना २०-२५ वर्षे सत्तेत असलेल्या कम्युनिस्ट सरकारला भगवा चीत करू शकतो हे या निकालांनी दाखवून दिले. सर्व-सत्ताधीश असलेली कॉंग्रेस नावापुरतेही अस्तित्व राखू शकत नाही, आणि कॉंग्रेस नेतृत्व आपल्या उमेदवारांना अनामत वाचवण्याइतकेही मत मिळवून देऊ शकत नाही हे देखील पहायला मिळाले. परंतु, भाजपाच्या या अभूतपूर्व विजयाचा स्पष्ट व निर्भेळ स्वीकार करण्याची मानसिकता विरोधी पक्षांनी, राजकीय विश्लेषकांनी दाखवली नाही. भाजपाने त्रिपुरात युती केली ती राष्ट्रविरोधी, फुटीरतावादी भूमिका घेणाऱ्या पक्षाबरोबर अशी कारणमीमांसा कम्युनिस्ट व कॉंग्रेस पक्षांच्या प्रवक्त्यांनी केली तर त्रिपुराचं काय घेऊन बसलात, खरी परीक्षा पुढेच आहे; मोठ्या राज्यांच्या निवडणुका जिंकून दाखवल्या, आगामी लोकसभा जिंकून दाखवली तर मोदी प्रभाव अजूनही टिकून आहे असे मानता येईल, अशी मांडणी पत्रकारांनी केली.  

 

पूर्वोत्तर आठ राज्यांपैकी अासाम आणि अरुणाचल प्रदेशात याआधीच भाजपाने आपले पाय रोवले आहेत. त्रिपुरा भाजपने निर्विवादपणे जिंकले आणि नागालँडमध्ये भाजपा सत्तेत सहभागी होण्याच्या स्थितीत आहे. मेघालयात भाजपला अवघ्या दोनच जागा प्राप्त करता आल्या, पण भाजपची युती ज्या एनपीपीशी होती, ती कॉंग्रेसला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करताना दिसते आहे. ईशान्य भारतातील राज्यांना बहुतांशी केंद्रावरच अवलंबून रहावे लागते, त्यामुळे केंद्रातील सत्तेशी जवळीक साधणाऱ्या युतीच्या हातात हात देतील याचीच शक्यता अधिक अाहे. नागालँडमध्ये भाजपची ताकद फार मोठी नाही, परंतु तेथील प्रमुख राजकीय पक्षांतील समविचारींशी जवळीक साधण्याचे प्रयत्न भाजपा फार पूर्वीपासूनच करीत होता. अभाविपच्या माध्यमातून नागभूमीत राष्ट्रप्रेमाचे झरे फुलवलेले पद्मनाभ आचार्य हे नागालँडमध्ये राज्यपालपद भूषवित आहेत, ही त्या विजयाला असलेली मोठी किनार आहे.  
ईशान्येत कमळ फुलल्याचा आनंद व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी त्यामागची सातत्यपूर्ण निर्णय व कृतीप्रक्रिया समजावून सांगितली, जी अत्यंत महत्वाची व आक्षेपकांची थेट बोलतीच बंद करणारी ठरली. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत वाराणसी मतदारसंघाची जबाबदारी सांभाळणाऱ्या सुनील देवधर यांना त्रिपुराची जबाबदारी द्यायचा निर्णय पक्ष धुरिणांनी घेतला आणि गेले तीन वर्षे, चार महिने अथक राबून देवधर यांनी नेतृत्वाने टाकलेला विश्वास सार्थ ठरवून दाखवला. पुढली पाच वर्षे त्रिपुरा सरकार व्यवस्थित चालवायचे असेल तर अन्य जबाबदारी न घेता तिथेच रहावे लागेल हे देवधर यांच्या डोक्यात पक्के आहे, आणि त्यामुळेच आता कोकबराक भाषा शिकण्याखेरीज पर्यायच नाही हे त्यांनी मनाशी पक्के ठरवून टाकले आहे. विप्लब देब हा तरुण दिल्लीत स्थायिक झाला होता. विप्लब संघाचा स्वयंसेवक, त्याला पक्षाने त्रिपुरात आणून पक्षकार्याला जोडले.

 

माणिक सरकार यांचा मिडीयाने उभा केलेला चेहरा कसा फसवा आहे हे देवधर वारंवार सांगत होतेच, परंतु त्याची सत्यता पटावी म्हणून दृकश्राव्य पुरावेही गोळा करून मिडीयासमोर ठेवत होते. ९७ टक्के साक्षरता हा असाच एक भ्रम कम्युनिस्टांनी उभा केलेला. प्रत्यक्षात आठवीत उत्तीर्ण झालेल्या मुलांची संख्या त्रिपुरात अवघी १५ टक्के आहे, वीस टक्के बेरोजगारी आहे. दोन मैलांच्या अंतरावरून माणिक सरकारांच्या कुटुंबातील स्त्रियांनाही तलावातील शेवाळे बाजूला करून पाणी भरावे लागते, हे लोकांनी प्रत्यक्ष पाहिले. पंचवीस वर्षात माणिक सरकार सामान्य माणसाच्या जीवनमानात काहीच सुधारणा घडवू शकलेले नाही हे लोकांनी पाहिले, अनुभवले तेव्हा त्यांचा देवधरांवरचा विश्वास वाढायला लागला. माणिक सरकार हे सर्वात गरीब मुख्यमंत्री अशी त्यांची प्रतिमा मिडीयाने उभी केलेली. त्यांच्या बँक खात्यात किती शिल्लक आहे आणि मिळणाऱ्या पगारापैकी किती रक्कम ते पक्षाला देतात, आणि किती स्वतःसाठी ठेवतात याचे हिशेबच मिडीयाने मांडलेले. ते सायकलवरून प्रवास करतात अशी त्यांची आणखी एक प्रतिमा रेखाटलेली. देवधरांनी माणिक सरकारांचा हा बुरखा टराटरा फाडला. माणिक सरकारांचं सायकलवर बसलेलं चित्र दाखवा असं आव्हानच त्यांनी मिडीयाला दिलं. माणिक सरकार यांचे वर्षाचे हेलीकॉप्टर वापराचे बिल १० कोटीवर जाते हे त्यांनी आकडेवारीनिशी दाखवून दिले. चाळीस-पन्नास किलोमीटर अंतराच्या प्रवासासाठी माणिक सरकार चॉपर वापरतात हे त्यांनी नजरेला आणले. त्रिपुरात २००८ साली रेल्वे आली, २०१७ साली मोदींनी त्याचं रूंदीकरण केलं. २००८ ते २०१७ या कालावधीत माणिक सरकार एकदा तरी रेल्वेत बसले का? असा सवालच देवधरांनी उघडपणे केला. मेघना डोके या युवा पत्रकार. जुलै २०१५ मध्ये माणिक सरकार यांच्या पत्नीची मुलाखत घेण्यासाठी त्रिपुरात गेल्या, त्यांचं नाव पांचाली भट्टाचार्य. त्यांनी आपलं नावही बदललं नाही आणि मुख्यमंत्र्यांची पत्नी म्हणून त्या कधी लाल दिव्याच्या गाडीतूनही फिरल्या नाहीत. पांचाली भट्टाचार्य यांच्या साधेपणाने मेघना भारावल्या. त्यांच्या साधेपणावर त्यांनी भरभरून लिहिलं. सरकारांच्या बंगल्यात एक तलाव आहे. त्या परिसरात एक माळी काम करत होता. तलावात कमळ का फुलत नाही हे तो सांगत होता आणि माणिक सरकारांच्या पत्नी बंगालीतला तो संवाद तिला समजावून सांगत होत्या. त्या म्हणत होत्या, ‘कितनी भी कोशिश करलो, इस मिट्टीमे कमल नहीं खिलता.’ तीनच वर्षात आपलं हे मत खोटं ठरेल याची पुसटशीही कल्पना तेव्हा पांचालींना आली नसावी. सुनील देवधर नावाचा मराठी माळी त्रिपुरात गेला आणि त्यानं त्रिपुरात कमळ फुलवून दाखवलं.

 

लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या दोनही उमेदवारांची अनामत जप्त झालेली असताना विधानसभा निवडणुकीत दोन तृतीयांश बहुमत मिळवून कम्युनिस्टांना पायउतार करण्याचा चमत्कार त्रिपुरात प्रथमच घडला. याआधी असा चमत्कार केवळ एन. टी. रामाराव यांच्या नावावर लिहिला गेला होता. पूर्वोत्तर भारताकडे भारत सरकारचं दुर्लक्ष होत असलेलं प्राधान्यानं दिसून आलं ते १९६२ च्या चीन-भारत युध्दानंतर. आपण लष्करी तयारीतच कमी पडलो असे नाही तर राज्यकर्त्यांची दुर्बल इच्छाशक्तीही या पराभवाला तितकीच कारणीभूत होती हे देशानं जाणलं आणि अवघ्या पस्तिशीत असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं पाय ठेवायला बोटभरही जागा नसण्याच्या काळात प्रचारकांची तरुण फळी या राज्यात पाठवली. निवडणूक काळात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे दोन मोठे कार्यक्रम आसाम आणि त्रिपुरात पार पडले. पन्नास-साठ वर्षातल्या संघाच्या वाटचालीला ज्यांची ज्यांची साथ लाभली अशी शेकडो स्थानिक जनजातीतील माणसे या कार्यक्रमाला उपस्थित होती. १९७० साली विवेकानंद स्मारक कन्याकुमारीत उभे राहिले आणि विवेकानंदांचा विचार देशभर नेत ‘शिव सेवा हीच जीव सेवा’ मानणारी नॉनसंन्यासी ऑर्डरची देशकारणाला वाहून घेतलेली जीवनव्रतींची तुकडी एकामागे एक या पद्धतीने एकनाथ रानडे यांनी उभी केली. त्यांनी शाळा, वसतिगृहे, संस्कार केंद्रे, वैद्यकीय उपचार केंद्रे, संस्कृती संवर्धनाचे असंख्य प्रयोग तिथे राबवले. शिक्षित तरुणांच्या ज्या पिढ्या त्यातून उभ्या राहिल्या त्यांनी राष्ट्रवादी विचारांसाठीची सुपीक, सुजलाम, भुसभुशीत भूमी तयार करवून घेतली. भाजपा कार्यकर्त्यांना संबोधित करताना नरेंद्र मोदीही काही काळ भावूक झाले. पक्षाचं काम उभं करताना ज्यांना हौतात्म्य पत्करावं लागलं, अशांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांनी श्रोत्यांना दोन मिनिटं उभं केलं. हा विजय आम्ही त्या हुतात्म्यांना अर्पित करतो आहोत, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. ती रास्तच होती, पण खऱ्या अर्थानं विजय अर्पित करायला हवा होता, तो आपलं नावही पुसून टाकून वर्षानुवर्षं स्वतःला पूर्वोत्तरात गाडून घेतलेल्या त्या हयात आणि दिवंगत कार्यकर्त्यांना. पूर्वोत्तर राज्यातला विजय हा खऱ्या अर्थाने त्यांच्या त्यागाचा, समर्पणाचा विजय आहे.

 

sumajo51@gmail.com

 

बातम्या आणखी आहेत...