आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Sudhir Joglekar Write About The Power Of BJP And BJP Friendly Parties In 21 States

दोन ते दोन... प्रवास 360 अंशांचा!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील २१ राज्यांमध्ये भाजप व भाजप मित्रपक्षांची  सत्ता आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी उर्वरित १० राज्ये जिंकण्याचा मनसुबा आता शहा-मोदी यांनी घोषित केला आहे. काँग्रेसला पुन्हा एकपासून गणती सुरू करावी लागेल, अशा स्थितीत नेऊन सोडणे हाच त्याचा गर्भितार्थ आहे. 


१९८४ ते २०१८ भारतीय जनता पक्षाच्या ३७ वर्षांच्या वाटचालीतली अत्यंत लक्षवेधी ठरावी अशी ३४ वर्षे. जीवघेण्या उपेक्षेपासून ते दोनतृतीयांश राज्यांवर सत्ता स्थापण्याच्या क्षणापर्यंतची रोमहर्षक ठरावी अशी ही वाटचाल. या कालखंडाच्या प्रारंभीच्या उपेक्षेला कारणीभूत ठरली ती १९८४ ची लोकसभेची मध्यावधी निवडणूक. श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर झालेली ही निवडणूक. पंजाब आणि अासाम ही दोन राज्ये वगळता ५२५ मतदारसंघांमध्ये पार पडली. आंध्र, कर्नाटक आणि बंगाल ही तीन राज्ये वगळता सारा देश सहानुभूतीच्या लाटेत वाहून गेलेला असताना ही निवडणूक झाली हाेती. भाजपचा या निवडणुकीत पार धुव्वा उडाला होता, अवघे दोन खासदार संपूर्ण देशभरातून निवडून आले होते. त्या दोनमध्ये एक होते मेहसाणातून विजयी झालेले ए. के. पटेल. पटेल स्वतः लोकप्रिय होतेच, परंतु याच मेहसाणा मतदारसंघात अटलबिहारी वाजपेयींवर जीवघेणा हल्ला झाला होता आणि वाजपेयी बचावले होते. वस्तुतः वाजपेयींवरचा हा दोन वर्षांतला तिसरा हल्ला होता. या घटनेत त्यांच्या हाताचे हाड तर मोडले होतेच, पण शरीरावरही जखमा झाल्या होत्या. हा हल्ला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप गुजरात भाजपने केला, पण स्वतः अटलजी यांनी माैन पाळले हाेते. हाताला प्लास्टर घालून वाजपेयी पुन्हा प्रचारात उतरले.   


दुसरा मतदारसंघ होता आंध्र प्रदेशातला हणमकोंडा. तिथले भाजपचे उमेदवार होते सी. जे. रेड्डी. त्यांनी दणदणीत विजय मिळवताना पुढे पंतप्रधान बनलेले काँग्रेस उमेदवार पी. व्ही. नरसिंह राव यांचा तब्बल ५३ हजार मतांनी पराभव केला होता. नरसिंह राव त्या मतदारसंघातले मावळते खासदार होते. भाजपसाठी भाग्यशाली ठरलेल्या या दोन मतदारसंघांत अटलबिहारी वाजपेयी यांच्या मतदारसंघाचा अंतर्भाव नव्हता. आंध्र प्रदेशात तुफान यश मिळवलेल्या एन. टी. रामाराव यांनी खरे तर नरसिंह राव यांना निवडणूक सोपी जावी यासाठी हणमकोंडात आपल्या पक्षाचा उमेदवारही दिलेला नव्हता. रेड्डी तरीही जिंकून आले आणि वाजपेयीना हरवण्यासाठी म्हणून काँग्रेसने अखेरच्या क्षणी माधवराव सिंधिया यांना मैदानात उतरवले. वस्तुतः माधवरावांची निवडणूक लढवण्याची अजिबात इच्छा नव्हती. पण सिंधिया राजघराणे आणि अटलजी यांच्यात काही तडजोड झाल्याचा संशय राजीव गांधीना आला आणि त्यांनी अखेरच्या क्षणी माधवरावांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा स्पष्ट आदेशच दिला. तो क्षण इतका उशिराचा होता की, वाजपेयींना दुसऱ्या मतदारसंघातून अर्ज दाखल करण्याइतकी सवडच प्राप्त झाली नाही. सिंधिया राजघराण्याविषयी लोकांच्या मनात प्रेम आणि अास्था होतीच, निवडणुकीच्या मतपेटीतून ती प्रकट झाली आणि वाजपेयींचा न भूतो न भविष्यति असा पराभव झाला. अडवाणी यांनी तर ‘यह लोकसभा नही, शोकसभा है’ या शब्दांत आपली भावना प्रकट केली हाेती.   


गेल्या ३४ वर्षांत तब्बल ३६० अंशांमध्ये फिरलेलं राजकारण. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्वोत्तर भारतातील निवडणूक निकालानंतर पक्ष कार्यकर्त्यांपुढे बोलताना याच ३६० अंशांचा उल्लेख आपल्या बोलण्यात अप्रत्यक्षपणे केला होता. त्यांनी स्पष्ट उल्लेख केला नसला तरी दोन राज्यांत मिळत असलेली सत्ता आणि तिसऱ्या राज्यात वाट्याला आलेल्या अवघ्या दोन जागा त्यांना व्यथित करत असणार हे त्या ३६० अंशांच्या उल्लेखावरून स्पष्ट जाणवत होतं. गुजरातमध्ये अपेक्षित यश पदरात न पडल्यानं दुखावलेल्या भाजप नेतृत्वाला २०१८ ची सुरुवात सुखावह ठरत होती हे निश्चित, परंतु तरीही मेघालयात एकहाती सत्तेची स्वप्नं पाहणाऱ्या भाजपला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले याची ठसठस मनात होतीच. नागालँड आणि त्रिपुरा ही दोन राज्ये पदरात पडली होती खरी, पण मेघालयानं ८४ च्याच निकालांची आठवण करून दिली होती. 

 
मेघालयात दोन जागा पदरात पडल्या होत्या खऱ्या, पण त्या दोन जागा पटकावलेली भाजप बरोबर असेल तरच आम्ही सत्ता स्थापनेचा दावा करू, अशी भूमिका १९ जागा पटकावलेली एनडीपीपी ही पार्टी करत होती आणि भाजप आमचा पूर्वाश्रमीचा सत्तासाथी आहे, तो सोबत आल्याखेरीज मी सत्ताच सोडणार नाही, अशी भूमिका घेऊन नागालँडमधील एनडीपीपीचे मावळते मुख्यमंत्री टी. आर. झेलीयांग अडून बसले होते. मेघालयात काँग्रेस सत्तेबाहेर जाण्याची चिन्हे तर स्पष्टपणे दिसू लागली होती, परंतु नागालँडने मात्र भाजपसाठी महत्त्वाचा पेच निर्माण करून ठेवल्याचे चित्र सोमवारी दिसत होते. आज-उद्याच हे पेच सुटतील आणि पूर्वोत्तर क्षेत्रातील तीनही राज्यांत भाजप सरकारे सुस्थापित होतील ही आता काळ्या दगडावरची रेघ ठरली आहे. नरेंद्र मोदींनी निवडणूक निकालानंतर पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांपुढे बोलताना जो ३६० अंशांचा संदर्भ दिला होता तो आणखी एका अर्थानं महत्त्वाचा होता. १९८४ च्या निवडणुकीत भाजपला मानहानीकारक पराभव पत्करावा लागला होता. लोकसभेत तर भाजप उरलाच नव्हता, पण तेव्हाच्या राज्य विधानसभांमधली एकही विधानसभा भाजपच्या हाती राहिलेली नव्हती. शून्यावस्थेतून सुरू होत असलेला तो प्रवास होता. आज तिथून सुरुवात करून २८२ जागा पटकावत भाजप लोकसभेतील सर्वाधिक मोठा पक्ष बनला आहे आणि भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला तर ३३६ जागा प्राप्त झाल्या आहेत.  


देशात राज्ये एकतीस. मेघालयात आता भाजपची सत्ता आल्यामुळे कर्नाटक, पंजाब, मिझोरम आणि पुदुच्चेरी अशी अवघी चार राज्ये काँग्रेसशासित राहिली आहेत, तर दिल्ली, बंगाल, केरळ, ओडिशा, तामिळनाडू आणि तेलंगणा अशी अन्य सहा राज्ये बिगरकाँग्रेसी पक्षांच्या हाती आहेत. ही चार आणि सहा मिळून दहा राज्ये वगळता उर्वरित २१ राज्यांमध्ये आता भाजप सत्तेत आहे. त्यात  पूर्वोत्तर राज्यातील सात राज्यांपैकी आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, नागालँड, त्रिपुरा आणि सिक्कीमचा अंतर्भाव आहे, तर अन्य राज्यांमध्ये जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, बिहार, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गोवा, गुजरात, हरियाणा, राजस्थान, आंध्र प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांत भाजप सत्तेत आहे.  


१९८४ ला काँग्रेस सर्व राज्ये आणि लोकसभेत सत्तास्थानी होती आणि भाजप कुठेच उरला नव्हता. मोदींना ३६० अंशांचे वळण हवे आहे ते काँग्रेसला अशी अवस्था देणारे. काँग्रेसमुक्त भारत ही २०१४ सालच्या निवडणुकीत त्यांनी दिलेली घोषणा काँग्रेसला त्याच शून्यावस्थेकडे नेणारी आणि भाजपला सर्वावस्थेत नेऊन पोहोचवणारी होती. ‘चलो पलटाये’ ही घोषणा भाजपने त्रिपुरात दिली; तीही अशीच  पंचवीस वर्षांची कम्युनिस्टांची सत्ता उलथवण्याच्या जिद्दीने. मोदींना हे वळण तर प्राप्त होईल, अशी शक्यता आता दिसू लागली आहे हे खरेच, पण मोदींच्या ३६० अंशांचा एक संदर्भ २०१९ च्या निवडणुकीत किमान ३६० जागी विजय प्राप्त करावा, याच्याशीही जोडला गेलेला आहे. सुनील देवधर यांच्या मुलाखतीत परवा एक मार्मिक उल्लेख आला होता. त्रिपुरात वीस मतदारसंघ हे आदिवासी जाती-जमातींचे आहेत. आजवर हे सर्वच्या सर्व मतदारसंघ कम्युनिस्टांचे बालेकिल्ले हाेते. कम्युनिस्ट त्यांचे विजयी मतदारसंघ मोजत ते एकवीसपासून. देवधरांनी त्रिपुरात कामाला सुरुवात केल्यानंतर आपले लक्ष केंद्रित केले ते याच वीस मतदारसंघांवर. परवाच्या निवडणुकीत यातले १८ मतदारसंघ भाजप आघाडीला मिळाले आणि कम्युनिस्टांचा पराभव तिथेच निश्चित झाला. देशातली २१ राज्ये आता भाजपच्या व भाजप मित्रपक्षांच्या सत्तेखाली आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी उरलेली दहाही राज्ये जिंकण्याचा मनसुबा आता शहा-मोदी यांनी घोषित केला आहे. काँग्रेसला पुन्हा एकपासून गणती सुरू करावी लागेल, अशा स्थितीत नेऊन सोडणे हाच त्याचा गर्भितार्थ आहे.  


- सुधीर जोगळेकर, राजकीय विश्लेषक  
sumajo51@gmail.com

बातम्या आणखी आहेत...