आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताचं ब्राँझ ही किमया कशाची?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक संघटनेने केव्हाच हेरलेलं आहे की भारताइतकी लोकप्रियता, जगात हॉकीसाठी कुठेही नाही. साहजिकच अशा भारताला किमान चार सामने लाभले तर निदान त्या चार सामन्यांसाठी स्टेडियम हाऊसफुल्ल होईल आणि टीव्हीच्या आजच्या व उद्याच्या जाहिरातदारांना करोडो लोकांपर्यंत पोहोचण्याची हमी देता येईल!

 

जगातील निवडक आठ संघांतील दर्जेदार हॉकी वर्ल्ड लीग फायनल्समध्ये पुन्हा एकदा भारताने पटकावलेल्या ब्राँझ पदकाचं असली मोल काय? भारतीय यश व भारतीय जिगर यांना कोणत्या कसोटीवर अाजमावावं? 


प्राथमिक साखळीत भारताच्या नावावर दोन पराजय आणि दिलासा देणारी व गुणांचं खातं उघडून देणारी, गुणांचा भोपळा टाळणारी एकमेव बरोबरी. ही कहाणी जशी यंदा भुवनेश्वरला झालेल्या स्पर्धेतली तशीच दोन वर्षांपूर्वी रायपूरला रंगलेल्या हॉकी वर्ल्ड लीग फायनल्सची. पण त्यानंतर? त्यानंतर बाद पद्धतीच्या स्पर्धेत एका गटविजेत्या संघावर मात, उपांत्य फेरीत अपयश, तरी ब्राँझ पदकाच्या झुंजीत फत्ते! जशी २०१५ मध्ये रायपूरला तशीच यंदाही! 
यंदा प्राथमिक साखळीत, गतविजेत्या ऑस्ट्रेलियाशी कौतुकास्पद १-१ बरोबरी. पण लगेच इंग्लंडकडून २-३ अन् जर्मनीकडून ०-२ असे पराभवाचे चटके. दोन वर्षांपूर्वीही प्राथमिक साखळीत अर्जेंटिनाकडून ०-३ असा चोप, मग जर्मनीशी १-१ अशी तोडीस तोड कामगिरी, पण लगेच नेदरलँड्ससमोर १-३ अशी वाताहत! पाठोपाठच्या जागतिक साखळीत, प्राथमिक फेरीत तीन सामन्यांतून नाममात्र एक गुण. अव्वल दर्जाच्या स्पर्धेत भारताला जणू त्याचं स्थान (तळाचं स्थान!) दाखवून दिलेलं. 


पण या पराभवांचं हलाहल पचवणारी जिगर त्यानंतर तगड्या संघाशी झालेल्या मुकाबल्यात. स्पर्धेच्या नियमांनुसार बाद पद्धतीच्या झुंजीतील जोड्या लावताना एका गटातील सर्वोत्तम संघाची गाठ दुसऱ्या गटातील सर्वात खालच्या संघाशी. वरपांगी अशा असमतोल वाटणाऱ्या लढतीत तेव्हा भारताचा इंग्लंडला २-१ असा धक्का व यंदाही बेल्जियमवर ‘सडन डेथ’मध्ये जय! या दोन्हीही स्पर्धात उपांत्य फेरीतील पराभवांनंतर ब्राँझ पदक लढतीत यश! पुनश्च स्पर्धेअखेर भारतीय खात्यात दोन जय, एक बरोबरी, तीन पराजय अन् एकेक ब्राँझ! तेव्हा गटविजेते इंग्लंड व यंदा बेल्जियम ४-४ विजयानंतर पदकाविना मायदेशी परत! 


ब्राँझची कमाई हा चमत्कार भारतीय हॉकीपटूंच्या मैदानी कर्तृत्वाचा की स्पर्धेच्या ढाच्याचा, स्पर्धा संयोजन पद्धतीचा? गटवार साखळीतून सारेच्या सारे म्हणजे चारपैकी चारही संघ बाद पद्धतीच्या टप्प्यात स्थान मिळवणार असतील तर या ‘प्राथमिक’ साखळीचं प्रयोजनच काय? गटवार प्राथमिक साखळीतून पहिल्या दोन-दोन संघांची आगेकूच अन् तळाच्या दोन संघांना डच्चू अशी चाळणी लावणं सामान्यत: अपेक्षित असतं. मग हॉकी वर्ल्ड लीगला ही विचित्र पद्धत का? 


उघडच आहे की, अशी स्पर्धा संयोजन आखणी, हलक्या संघांना एक जीवदान देते, दुसरी संधी देते आणि त्याच ओघात सरस संघांना (विनाकारण) एक जादा आव्हानास तोंड द्यायला लावते. 
उघडच आहे, ही आखणी आहे भारताची सोय पाहणारी. विशेषत: यजमान भारताची सोय पाहणारी! कारण जागतिक संघटनेने केव्हाच हेरलेलं आहे की भारताइतकी लोकप्रियता जगात हॉकीसाठी कुठेही नाही. साहजिकच अशा भारताला किमान चार सामने लाभले तर निदान त्या चार सामन्यांसाठी स्टेडियम हाऊसफुल्ल होईल आणि टीव्हीच्या आजच्या व उद्याच्या जाहिरातदारांना करोडो लोकांपर्यंत पोहोचण्याची हमी देता येईल! ऑस्ट्रेलिया, जर्मनी, नेदरलँड्स, अर्जेंटिना, बेल्जियम, इंग्लंड, स्पेन आदी देशांचे संघ, भले भारतापेक्षा शक्तिशाली असोत - एक तर हे देश भारताच्या तुलनेत छोटे वा अति-अति छोटे आहेत. त्या देशांतील क्रीडा शौकिनांत हॉकीचे स्थान नगण्य आहे व त्यांच्या बाजारपेठा भारतीय हॉकीपेक्षा खूप खूप छोट्या आहेत. म्हणून भारताला मदतीचा हात देणाऱ्या जागतिक हॉकीतील बनियांनी आपलं हितही साधून घेतलंय. 


हाच मुद्दा अधोरेखित करणाऱ्या घटना सांगतो. जागतिक संघटनेला भरवायची आहे जगज्जेतेपदाची दुहेरी साखळी स्पर्धा. प्रमुख संघांनी आपापसात मायदेशी-परदेशी सामने खेळायचे! पण केवळ एकेक सामन्यासाठी सात वा अकरा वा पंधरा देशांचा दौरा करणं फार महागडं न परवडणारं, असे सांगून भारताने त्या संकल्पित स्पर्धेतून अंग काढून घेतलंय अन् स्पर्धाच अधांतरी लोंबकळू लागलीय!  गोऱ्या खेळाडूंनाही अशा उपक्रमात भवितव्य वाटत नाही. 
याच्या नेमकी उलटी परिस्थिती आहे भारतीय संघटनेच्या व्यावसायिक साखळी स्पर्धेबाबत. या स्पर्धातील लिलावात, उत्तम परदेशी खेळाडूंवर भरघोस रकमांच्या बोली लागल्या. दोन-तीन वर्षात, त्यांच्या हाती पडले एक-दीड कोटी रुपये. ऑस्ट्रेलियन, जर्मन, डच (नेदरलँड्स) बेल्जियम, अर्जेंटिनियन हॉकीपटूंनी स्वप्नातही न पाहिलेल्या या धनराशी त्यांच्या देशातील व्यावसायिक स्पर्धांतील मानधनांच्या कैकपटीने मोठ्या अशा धनराशी. त्यातून कुणी बंगले बांधून घेतले. कुणी व्यवसाय उभे केले. यंदाही स्पर्धा होत नाहीये. हीच त्यांची व्यथा. किती आसुसलेले आहेत ते सारे भारतात परतायला! भारतातील खऱ्या-खोट्या उणिवांबाबत जाहीर तक्रारी करण्याचं ते किती चतुराईने टाळत आहेत! पावसात उपांत्य सामना खेळावा लागला तरी अर्जेंटिनाने कुठे निषेध केला? 


भुवनेश्वरमधील हॉकी वर्ल्ड लीगमधील संघ उतरले होते ‘हॉटेल मेफेयर लगून’ या पंचतारांकित हॉटेलात. स्पर्धा चालली जेमतेम दोन आठवडे. पण हे संघ स्पर्धेआधीच आठवडा-दोन आठवडे भुवनेश्वरला दाखल झाले होते (या स्पर्धेत प्रवेश मिळवू न शकलेला दक्षिण कोरियन संघही ऑलिम्पिक पूर्वतयारीचा भाग म्हणून त्यात सामील झाला होता.) पण स्पर्धेदरम्यान बऱ्याच परदेशीयांना अपचनाचा जबरदस्त त्रास झाला. प्रत्येक संघात अठरा खेळाडू. त्यातून अर्जेंटिनाचा एक, इंग्लंड-नेदरलँड्सचे तीन-तीन अन् जर्मनीचे चार ते सहा खेळाडू हे खेळाडूऐवजी रुग्ण बनले! एरवी उत्तम चाललेल्या स्पर्धेस हे गालबोट : याला जबाबदार आरोग्यास हानिकारक अन्न की खेळाडूची मर्यादेबाहेरची खाबुगिरी? 


ओडिशा सरकारच्या क्रीडा सचिवांनी खेळाडूंच्या हॉटेलात तातडीने तपासणी पथकं बजावली. स्वयंपाकगृहांची पाहणी करवली. आचाऱ्यांकडे चौकशी केली. पाणी, पेयं व खाद्यवस्तू तपासल्या. काही खेळाडूंनी रुचीपालट म्हणून नियंत्रित मेन्यूत नसलेल्या चमचमीत पिझ्झावर ताव मारला हेही त्यातून उघडकीस आलं! यात सांगण्यासारखी, समजून घेण्यासारखी बाब म्हणजे पाश्चात्त्यांनी अशा अडचणींचं फारसं भांडवल करण्याचं टाळलं. उलट भारतीयांनीच त्यावर टीका केली. त्यांच्या दु:खात समरस होण्याचा उमदेपणा दाखवला. ब्राँझ पदकाच्या सामन्यात भारताकडे होते अठराच्या अठरा पूर्णपणे फिट खेळाडू, तर जर्मनीकडे सामन्यास लागणारे किमान व मोजून अकरा खेळाडू! दोन्ही गोलरक्षक खेळवण्यास त्यांना पर्यायच उरला नव्हता. राखीव गोलरक्षक मार्क अॅपलला त्यांनी बनवले सेंटर-फॉरवर्ड. तेवीस वर्षांचा हा युवक, गेल्या पंधरा वर्षांत कधी पॅड्सविना, गोल-वर्तुळाबाहेर न खेळलेला! आक्रमक खेळातील बारकावे, डावपेच त्याला अज्ञात. मुक्त खेळण्याची पूर्ण मुभा त्याला दिलेली. त्यानंही कमाल केली. चक्क एक झकास गोल केला! 


त्यावरून डोळ्यांपुढे येते १९६४ ची ब्रेबॉर्न स्टेडियममधील क्रिकेट कसोटी. माइक स्मिथच्या इंग्लिश संघास अपचनाने हैराण केलं आणि त्यांच्याकडेही उरले होते मोजून अकराच फिट खेळाडू. अन् त्यात दोघेही यष्टिरक्षक! तरीही त्यांनी सामना अनिर्णीत ठेवला होता हेच विशेष. आता १९६४ नंतर ५३ वर्षांनी भारतीय पंचतारांकित हॉटेल आरोग्यदायी नसतीलच तर चिंतेची बाब. 


असो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अखेर भारतीय संघाने कमावलंय ब्राँझ पदक. त्यासाठी हरवलंय बेल्जियम व जर्मनीला अन् बरोबरीत रोखलंय ऑस्ट्रेलियाला. आठदा ऑलिम्पिक जिंकणाऱ्या भारताला हवी आहे हॉकी. पण आजच्या जमान्यात त्यापेक्षाही जागतिक हॉकीला हवाय भारत अन् भारतीय बाजारपेठ!

 

- वि. वि. करमरकर, (ज्येष्ठ क्रीडा पत्रकार)

बातम्या आणखी आहेत...