आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्ध्वस्त जीवन ते नवजीवन!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

१९८४मध्ये अमेरिकेत लाॅस एंजलिसमध्ये बहिष्कारग्रस्त आॅलिम्पिक झालं, तेव्हापासून चीनसह अमेरिकेने यात मुसंडी मारली. जिम्नॅस्टिक्स ही जलतरण-अॅथलेटिक्स-बास्केटबाॅल यांच्यापाठाेपाठ सोनेरी पदकांची खाण, असं अमेरिका मानू लागली. अशी पदकं आपल्या खात्यात भरत राहणाऱ्या खेळाडूंचे गुरुतुल्य डाॅक्टर म्हणून नासरचा दबदबा वाढत गेला. पदकं मिळत आहेत ना, मग त्यांना शंभर गुन्हे माफ, अशी संघटकांची वृत्ती बनली. नासरला रान मोकळं मिळालं. 


ही आहे कर्मकथा गुरुजींच्या वेशातील लिंगपिसाट डाॅ. लॅरी नासर आदी नराधमांची शिकार झालेल्या निराधार दीडशे ते सुमारे चारशे प्रतिभावान अमेरिकी जिम्नॅस्ट बालिकांची. तशीच ही आहे शौर्यकहाणी, त्या साऱ्या सैतानांना पुरून उरणाऱ्या अन् नवनिर्धाराने जिम्नॅस्टिक्स एरिनात उतरत राहणाऱ्या विजिगीषु बालिकांची अन् युवतींची. ही आहे कर्मकथा गल्लाभरू व आॅलिम्पिक पदकेभरू संघटनांची अन् त्या हावरटपणातून खेळाडूंवरील लैंगिक अत्याचारांकडे २० वर्षे (हो, तब्बल २० वर्षे!) कानाडोळा करण्याचा अक्षम्य अपराध करत राहणाऱ्या पदाधिकाऱ्यांची. तशीच ही स्फूर्तिदायक कथा, या अभूतपूर्व क्रीडाद्रोहास वाचा फोडणाऱ्या तीन छोट्या अमेरिकी दैनिकांची व नियतकालिकांची. 


ही आहे कर्मकथा जिम्नॅस्टिक्सला केवळ आॅलिम्पिकच्या महिन्यात प्रकाशझोतात ठेवणाऱ्या अमेरिकन प्रसिद्धी माध्यमांच्या वृत्तीची. पाच वर्षांपूर्वी अमेरिकनांच्या आवडत्या अमेरिकन फुटबाॅलमध्ये, युवकांशी समलिंगी चाळे करणाऱ्या जेरी सँडुस्की प्रभृतींविरुद्ध लगेच रान उठवणाऱ्या व तीन अधिकाऱ्यांना तुरुंगवास घडवणाऱ्या, बड्याबड्या प्रसारमाध्यमांच्या तत्परतेची. पण जिम्नॅस्टिक्सची लोकप्रियता फुटबाॅलपेक्षा खूप कमी म्हणून जेरी सँडुस्कीपेक्षा शतपटीने गंभीर गुन्हेगार असलेल्या डाॅ. नासरप्रभृतींच्या हलकटपणाची दखल टाळण्याची. तशीच ही प्रेरणादायी कथा, मोठ्या चिकाटीने या लैंगिक घोटाळ्याचा पाठपुरावा करत राहणाऱ्या ‘इंडियाना पोलिस स्टार’, ‘लॅन्सिंग स्टेट जर्नल’, व ‘डेट्राॅइट न्यूज’ यांच्या शोधपत्रकारितेची. त्यांनी हे प्रकरण चव्हाट्यावर आणलं नसतं तर मुलींचं लैंगिक शोषण तसंच अव्याहत चालू राहिलं असतं. 


अमेरिकन जिम्नॅस्टिक्स प्रशिक्षणाची व सरावाची किमान साडेतीन हजार केंद्रं आहेत. ‘इंडियाना पोलिस स्टार’च्या पाहणीनुसार त्यात किमान ३६८ मुलींचं शोषण झालं आहे. या साऱ्या नराधमांतला सैतान म्हणजे डाॅ. लॅरी नासर. त्याचे अत्याचार १४० मुलींना सहन करावे लागले. हे सारं राजरोस दिवसेंदिवस घडत राहिलं. मिशिगन राज्य विद्यापीठात अन् ३० वर्षांपूर्वी रोमेनियातून अमेरिकेचा आसरा घेणाऱ्या बेला व मार्था कॅरोली यांच्या जगप्रसिद्ध जिम्नॅस्टिक्स केंद्रात. 


लॅरी नासर, आज वय ५४, हे मिशिगन विद्यापीठात असोसिएट प्राध्यापक. महिला संघाचे डाॅक्टर. २० वर्षांच्या कारकीर्दीत चार आॅलिम्पिकमध्ये तेच महिला जिम्नॅस्टिक्स संघाचे डाॅक्टर. या खेळात रशिया, पूर्वाश्रमीचा चेकोस्लोवाकिया, रुमेनिया, जपान, व जर्मनी अग्रेसर. पण १९८४मध्ये अमेरिकेत लाॅस एंजलिसमध्ये बहिष्कारग्रस्त आॅलिम्पिक झालं, तेव्हापासून चीनसह अमेरिकेने यात मुसंडी मारली. जिम्नॅस्टिक्स ही जलतरण-अॅथलेटिक्स-बास्केटबाॅल यांच्यापाठाेपाठ सोनेरी पदकांची खाण, असं अमेरिका मानू लागली. अशी पदकं आपल्या खात्यात भरत राहणाऱ्या खेळाडूंचे गुरुतुल्य डाॅक्टर म्हणून नासरचा दबदबा वाढत गेला. पदकं मिळत आहेत ना, मग त्यांना शंभर गुन्हे माफ, अशी संघटकांची वृत्ती बनली. नासरला रान मोकळं मिळालं. 


गुणवान व कष्टाळू मुलींशी, आपल्या मुलीच्या वयाच्या, १३ ते १७-१८ वयाच्या मुलींशी नासर कसे वागत? डाॅक्टर असल्याने शारीरिक फिटनेस आजमावण्याच्या बहाण्याने काय काय करायला धजावत? 


२०१२च्या लंडन आॅलिंपिकमध्ये सांघिक सुवर्ण व वैयक्तिक रौप्यपदक पटकावण्याआधी अॅली राइसमनला कोणता अनुभव आला? “आमच्या योनीत हाताची बोटं घुसवण्याचा शौक त्यांनी तेव्हा पुरवून घेतला. असले चाळे करण्याची संधीच ते सदैव शोधत असत, असे वैद्यकीय उपचार आम्ही मुकाट करवून घेण्याची पद्धतच त्यांनी रूढ केली होती.’ मॅकेला मरोनी हीसुद्धा आॅलिंपिक विजेती. तिलाही हेच उपचार करवून घ्यावे लागले. करणार काय? खोलीत डाॅक्टर व खेळाडू. कॅरोली. केंद्रात पालकांना मज्जावच असे!  


‘इंडियाना पोलिस स्टार’ या दैनिकाने प्रकरणाची चौकशी हाती घेतली, ती २०१६मध्ये. त्यांना आढळलेली एक गोष्ट धक्कादायक होती : अमेरिकेने जिम्नॅस्टिक्स संघटनेला (यूएसए जिम्नॅस्टिक्स) बऱ्याच गैरप्रकारांची आधीपासूनच जाणीव होती. पण संघटक चूप बसणं पसंत करत होते. 


शोध क्रीडा पत्रकारितेने शाेषित मुलींना नुसता धीरच दिला नाही, तर धैर्यही दिलं. सुरुवातीस १० जिम्नॅस्ट पुढे आल्या, मग अनेक. पत्रकार या निष्कर्षावर आले की, प्रशिक्षक, डाॅक्टर, फिजिओ, जिमचे चालक-मालक व प्रभावशाली प्रौढ संघटक यांच्या शोषणाच्या शिकार होत्या ३५०० क्लबमधील ३६९ मुली. त्यापैकी १४० ते १५० तावडीत सापडल्या होत्या डाॅ. नासर यांच्या चाळ्यात/जाळ्यात! 


सरकारी शासकीय पातळीवरील डोपिंग, उत्तेजकं, स्टेराॅइड्स यांचा वर्षानुवर्षं हजारो युवा क्रीडापटूंवर वापर उघडकीस आलेला आहे. पूर्व जर्मनीत रेड आर्मीच्या जोरावर चाललेली कम्युनिस्ट राजवट, चीनमधील लोकमुक्ती सेनेवर आधारित कम्युनिस्ट स्टेट कॅपिटलिझमची राजवट आणि रशियात पुतीनची राजवट - यांनी आॅलिम्पिक पदकांनी गौरवित होण्यासाठी उभारलेली उत्तेजकांची यंत्रणा जगास हादरवत आलेली आहे. त्यापेक्षाही हिडीस असं लोकशाहीप्रधान अमेरिकेतील हे शोषणाचं वास्तव, ज्याची पुरेशी दखल घेण्यास अमेरिका व युरोप अजून कचरत आहेत. 


हे शोषण जेवढं निंद्य, तेवढंच ते गुंडाळून टाकण्याचे सत्ताधाऱ्यांचे खटाटोपही निंद्य. २०१२ आॅलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेत्या मॅकेला मरोनीला तोंड बंद ठेवण्यासाठी साडेबारा लाख डाॅलरची (सुमारे आठ कोटी रुपये) लाच तिच्या मातोश्रींना देऊन चूप बसण्याच्या (non disclosure agreement) करारात अडकवलं गेलं. त्याही तेव्हा पैशांच्या मोहात पडल्या. त्याचा करारभंग करण्यासाठी एक लाख डाॅलरचा दंड भरण्यास पुढे आली एक माॅडेल, क्रिसी टायगेन नामक सुंदरी. 


मिशिगन राज्य विद्यापीठातील बुजुर्गही डाॅ. नासर यांचे समर्थन दीर्घकाळ करत राहिले. विद्यापीठांतर्गत चौकशांतून त्यांना निष्पाप ठरवत राहिले.  
आता न्यायालय ठोठावत आहे ५४ वर्षीय नासरला ४० ते १७५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा. याला काय म्हणावं? ‘भगवान के घर देर है, अंधेर नहीं है’! की ‘जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाइड’ : (न्यायदानात उशीर म्हणजे न्याय नाकारणं)? पण या चिखलातून उगवत आहेत कमळं. आॅलिम्पिक पदकांसाठी जिम्नॅस्टिक्स कसरतींच्या प्रेक्षणीयतेचे, तसेच सादरीकरणाच्या सफाईचे शिखर गाठण्यासाठी नवनवीन अमेरिकी युवतींचे संच जोमाने सरावावर एकत्रित झालेले आहेत. डाॅ. नासरच्या चाळ्यांना बळी पडलेली, पण गेल्या आॅलिम्पिकमध्ये चार सोनेरी पदकं रुबाबात पटकवणारी सिमाॅन बाइल्सनेही उचललंय नवभरारीचं निशाण. 


सिमॉन म्हणते, दीर्घकाळ मी एक सवाल स्वत:ला विचारत होते. मी भोळीभाबडी होते का, जे काही घडलं त्याला मीच जबाबदार आहे का, आता मला या प्रश्नांची उत्तरं गवसली आहेत. नाही, मुळीच नाही. जे काही घडलं त्याला मी जबाबदार नाही. लॅरी नासर, यूएसए जिम्नॅस्टिक्स व इतरांचंच हे पाप आहे, आम्हा खेळाडूंचं नाही. 


सिमॉन असंही म्हणते की, “इतकी वर्षं, दशकं हे घडत राहू तरी शकलं कसं याचं उत्तर आम्हाला हवंय. असले गैरप्रकार यापुढे होणार नाहीत याची हमी आम्हाला (यूएसए जिम्नॅस्टिक्सकडून) हवी आहे. माझ्यापुरतं सांगायचं तर अशा जाचामुळे मी मागे हटणार नाही. या गुन्हेगारीपेक्षा माझ्या कर्तृत्वाचे कथन परिणामकारक ठरले पाहिजे, अशा निर्धाराने मी सरावाला लागले आहे.” उद्ध्वस्त जीवनातून नवजीवनाचे भक्कम घरकुल उभारणाऱ्या साऱ्या अमेरिकी जिम्नॅस्ट युवतींना सलाम व शुभेच्छा.  


- वि. वि. करमरकर 
(ज्येष्ठ क्रीडा पत्रकार)

बातम्या आणखी आहेत...