आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाढता विकास दर : ‘हत्ती’चा वेग वाढला!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत नावाचा हत्ती वेगाने पळण्याचा प्रयत्न करू लागला आहे, असे गेल्या काही दिवसांतील आर्थिक आकडेवारी सांगते. पण संपत्ती वितरणाचा मार्ग सापडत नसल्याने त्याचा लाभ काही समूहांना होत नाही, त्यातून देशाच्या विकासाची नकारात्मक चर्चा होत राहते. विकास दर वाढीचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचवणे, हे त्यामुळे आपल्या देशासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. 


भारतीय अर्थव्यवस्थेचा उल्लेख एखाद्या हत्तीच्या चालीसारखा केला जातो. भारतात नव्याने निर्माण होत असलेली क्रयशक्ती, तरुणांच्या वाढत्या संख्येमुळे वाढत चाललेले वर्किंग पॉप्युलेशन आणि गेल्या काही वर्षांत विस्तारत चाललेले संघटित क्षेत्र, याचा भारताला फायदा मिळत असून आर्थिक विकासाला एवढी पूरक परिस्थिती इतर देशांत राहिलेली नाही. जगात सर्वाधिक विकास दर असलेला देश, लक्षणीय एफडीआय मिळवणारा देश, सर्वाधिक रेमिटन्स येणारा देश, हवाई क्षेत्राची सर्वाधिक वाढ नोंदवणारा देश अशी या ‘हत्तीच्या दमदार चाली’ ची अनेक उदाहरणे सांगता येतील. पण नोटबंदी, वस्तू आणि सेवा कर, रेरा अशा आर्थिक सुधारणांमुळे त्याची चाल मंदावली होती. तो आता कधी पुन्हा वेग घेतो, याची केवळ भारतच नाही तर सारे जग वाट पाहत होते. गेल्या काही दिवसांत यासंबंधीची अशी आकडेवारी जाहीर होते आहे की, त्याचा एक भारतीय म्हणून आपल्या सर्वांना आनंद आहे. विशेषतः डिसेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत जीडीपीचा विकास दर ७.२ टक्के इतका आल्याने आर्थिक सुधारणांमुळे ‘बायपास’ला गेलेली विकासाची गाडी आता पुन्हा महामार्गाला लागली आहे, असे मानले जाऊ लागले आहे. 


रोखीच्या आणि काळ्या पैशांवर पोसलेले जमिनीचे व्यवहार, घरांमध्ये आणि सोन्यात होणारी गुंतवणूक असे पैसे कमावण्याचे सोपे मार्ग इतके फोफावले होते की त्यातून आपण नेमके काय गमावतो आहोत, हे कळेनासे झाले होते. ही गुंतवणूक आणि त्यातून मिळणारा अव्वा की सव्वा परतावा, ही सूज होती, हे अनेक जण विसरून गेले होते. त्यामुळे गुंतवणुकीला कायम अशीच भरघोस फळे आलीच पाहिजेत, असे मानले जाऊ लागले होते. पण त्याचा परिणाम काळी अर्थव्यवस्था हाच महामार्ग बनला होता. सोप्या शब्दात सांगायचे तर दररोज घरातल्या नळाला पाणी आले तर ती चांगली व्यवस्था मानली गेली पाहिजे होती, पण पाणी मुबलक असताना टँकरच्या पाण्याचे महत्त्व वाढले होते. भांडवल बँकांत असावे लागते, ते अशा रोखीत सडत पडले होते. अशी ही व्यवस्था मूठभरांच्या आणि तीही ज्यांचा आवाज मोठा आहे, त्यांच्या हिताची असते. त्यामुळेच आर्थिक सुधारणांकडे नकारात्मकदृष्ट्या पाहिले गेले आणि त्यांच्यामुळे अर्थव्यवस्थेचे किती नुकसान झाले, याची चर्चा अधिक झाली. (टँकर लॉबी दुखावली गेली आणि आता पाणीच मिळणार नाही, असा प्रचार तिने सुरू केला.) ही चर्चा शक्य तितकी लांबवण्यात आली, मात्र गेल्या काही दिवसांतील चांगले आकडे तरी या चर्चेला पूर्णविराम देतील, अशी आशा करू यात. असो. 


गेल्या काही दिवसांतील चांगले संकेत असे आहेत.  
१.  उत्पादन, बांधकाम क्षेत्र आता मूळ पदावर येत असून शेतीमध्येही हे संकेत दिसू लागले आहेत.  
२ २०१७-१८च्या दुसऱ्या तिमाहीत भांडवल निर्मिती ६.९ टक्के वेगाने होत होती, ती तिसऱ्या तिमाहीत १२ टक्क्यांनी झाली .  
३ सिमेंट, वीज, कोळसा, रिफायनरी उत्पादने व स्टील या मूलभूत क्षेत्रात जानेवारीत ६.७ टक्के वाढ नोंदवली गेली आहे, जी डिसेंबरमध्ये ४.२ टक्के होती.  
४. खासगी क्षेत्रातून होणारी गुंतवणूक गेले काही दिवस थांबली होती, त्यामुळे ती जबाबदारी सरकारी गुंतवणुकीने घेतली होती, पण आता खासगी क्षेत्र गुंतवणुकीसाठी पुढे येऊ लागले आहे.  
५. कमर्शियल वाहनांची विक्रीत वाढ होणे, हा विकास दर वाढीचा एक निकष मानला जातो. त्यानुसार टाटा मोटर्सच्या अशा वाहनांची विक्री ३६ टक्क्यांनी वाढली आहे.  
६. केवळ कमर्शियलच नाही तर सर्वच वाहनांची विक्री वाढली आहे. मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, महिंद्रा कंपनीने फेब्रुवारीचे विक्रीचे आकडे जाहीर केले, त्यानुसार मारुती सुझुकीने १४.२ टक्के अधिक (एक लाख ३७ हजार ९००), महिंद्राने २० टक्के अधिक (४८ हजार ४७३) आणि टाटा मोटर्सने ३८ टक्के अधिक (५८ हजार ९९३) प्रवासी मोटारी फेब्रुवारी महिन्यात विकल्या आहेत. तसेच बजाज ऑटो, रॉयल एन्फील्ड, टीव्हीएस मोटार आणि हीरो या कंपन्यांचे दुचाकी विक्रीचे आकडे असेच वाढले आहेत. 
७. देशांतर्गत हवाई प्रवास करणाऱ्यांची संख्या २०१७ या वर्षांत १० कोटींवर गेली असून ही वाढ १७.४ टक्के आहे. जानेवारीत तर ही वाढ २० टक्के झाली आहे.  
८.जीएसटी करपद्धती स्थिरावली असून दर महिन्याला अप्रत्यक्ष करातून मिळणारा महसूल वाढतो आहे, एवढेच नव्हे तर इन्कम टॅक्ससारख्या प्रत्यक्ष करांतून मिळणारा महसूलही वाढला आहे. 
९. भारतीयांची शेअर बाजारातील गुंतवणूक वाढली आहे. 


थोडक्यात, भारतीय अर्थव्यवस्थेला पुन्हा गती मिळते आहे, असे सांगणारे हे संकेत आहेत. जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, विदेशी संस्था आणि सरकारचा सांख्यिकी विभाग यांच्या आकडेवारीविषयी सतत संशय घेतला जातो, पण जेव्हा ही आकडेवारी आपल्या म्हणण्याला पूरक आहे, तेव्हा तिचाच आधार घेणारे तज्ज्ञ कमी नाहीत. पण ही आकडेवारी जगभर याच पद्धतीने वापरली जात असल्याने तिच्याशिवाय आज तरी पर्याय नाही. 


आता मुद्दा समोर येतो, तो म्हणजे असे सर्व चांगले घडत असताना अर्थव्यवस्था अजूनही हलत नाही, अशी जी वर्तमानात चर्चा होते आहे, त्याची कारणे काय आहेत?
ती थोडक्यात अशी :  
१. नोटबंदीने अर्थव्यवस्थेची सूज कमी झाली आहे. काळ्या अर्थव्यवस्थेत जी वाढ काही समूहांना साध्य होत होती, ती आता मिळेनाशी झाल्याने ते समूह नाराज आहेत. 
२. शेतीमालाचे उत्पादन जास्त आणि अनियमित असल्याने त्याला चांगला भाव देण्याचे सूत्र अजूनही सरकारी व्यवस्था शोधू शकलेली नाही, त्यामुळे शेतकरी समूह कायम आर्थिक अडचणीत राहतो आहे.  
३.विकास दराच्या वाढीचे फायदे संघटित क्षेत्राला अधिक मिळत असल्याने जे त्यात अजून आलेले नाही, त्यांची आर्थिक स्थिती अजूनही सुधारत नाही.  
४. ऑनलाइन खरेदी विक्रीचा व्याप आतापर्यंत कमी होता, पण तो आता वेगाने वाढत असल्याने त्याचा बाजारांवर परिणाम होत असल्याने काही वस्तूंच्या विक्रीवर त्याचा परिणाम झाला आहे.  
५. अत्याधुनिक यंत्रांचा वापर वाढल्याने उत्पादन वाढते आहे, त्या प्रमाणात रोजगारात वाढ होत नाही, हा जागतिक प्रवाह असून या प्रश्नाचे उत्तर अजून सापडलेले नाही.  
६. पायाभूत सुविधांसाठी सरकारने मोठी गुंतवणूक करूनही अजूनही ती सर्व कामे सुरू झालेली नाहीत.  
७. पीएनबी गैरव्यवहारासारख्या प्रकरणांमुळे अर्थव्यवस्थेची नकारात्मक चर्चा होते आहे. 


याचा अर्थ अर्थव्यवस्थेपुढील खरे आव्हान हे निर्माण झालेल्या संपत्तीच्या न्याय्य  वाटपाचे आहे. अर्थव्यवस्था एखाद्या रेल्वेगाडीसारखी असते. त्या गाडीचे इंजिन हे खासगी उद्योजक, व्यावसायिक असतात. ते संपत्तीची निर्मिती करत असतात. त्यानंतरचे डबे हे उच्च आणि मध्यमवर्गाचे प्रतिनिधित्व करत असतात. शेवटचे डबे हे निम्न मध्यमवर्ग आणि गरिबांचे प्रतिनिधित्व करत असतात. सरकार हे या गाडीला मागून जोर लावणारे इंजिन आहे. या दोन्ही इंजिनांनी वेग घेतला की तो वेग खरे म्हणजे सर्व डब्यांना आपोआपच मिळायला हवा. पण जागतिकीकरणातील नव्या बदलांमुळे हल्ली तसे होत नाही. गाडी वेगात पळू शकते, हे आकडेवारी सांगते आहे. पण जोपर्यंत ती एकसंघ नाही, तोपर्यंत तो वेग शाश्वत नाही. तो शाश्वत कसा होईल, हे भारत नावाच्या हत्तीसमोरील मोठे आव्हान आहे.


- यमाजी मालकर, ज्येष्ठ पत्रकार 
ymalkar@gmail.com

बातम्या आणखी आहेत...