आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजीव सातव, नाना पटाेले उमेद जागवतील?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजप बूथ स्तरावर पोहोचत असताना, काँग्रेसने किमान तालुका पातळीवर तरी पोहोचावे अशी अपेक्षा कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. फादर बॉडीसोबतच युवक आणि महिला काँग्रेसचीही शिबिरे याच वेळी घेण्यात येत आहेत. एकवेळ युवक काँग्रेसच्या बॅनरखाली चार-दोन युवक तरी जमतात, पण महिला काँग्रेसचे तर जिल्हा आणि शहर पातळीवर नामोनिशाण उरलेले नाही. विशेष म्हणजे, संस्थानिक नेतृत्वावर सामान्य कार्यकर्ते प्रचंड नाराज आहेत. त्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांना उमेद देईल, ऊर्जा देईल अशा चेहऱ्याची सगळ्यांना अपेक्षा आहे. 


भाजपवरील नाराजीच्या तापल्या तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस ‘हल्लाबोल’ची पोळी भाजून घेत असताना शिवसेना सत्तेत राहूनही विरोधकाप्रमाणे डरकाळ्या फोडू लागली. एवढ्यातच सत्ताधारी भाजपतर्फे तालुका स्तरावर बूथ प्रमुखांच्या नेटवर्कचे काम सुरू झाले अाणि काँग्रेस पक्ष संघटनेत आलेले संस्थानी सुस्तावलेपण आणि मरगळ कार्यकर्त्यांना अस्वस्थ करीत आहे. राष्ट्रीय पातळीवर राहुल गांधींकडे पक्षाची धुरा साेपवली खरी, मात्र महाराष्ट्रातील काँग्रेसमध्ये संघटनात्मक ऊर्जा, उमेद आणि उत्साह निर्माण करण्यासाठी नव्या उमेदीची फवारणी कधी आणि कशी करणार याकडे राज्यातील कार्यकर्ते आशेने पाहत आहेत. 


राहुल गांधींच्या प्रतिमेत झालेला बदल, गुजरात निवडणुकीच्या प्रचारात पक्षाला मिळालेली संजीवनी आणि पोटनिवडणुकांमधील मुसंडी या निमित्ताने गेल्या तीन वर्षांत पहिल्यांदाच काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर थोडा उत्साह दिसू लागला आहे. कर्जमाफीसाठी होणारा विलंब, कधी गोण्या तर कधी सुतळी अशा फालतू कारणांसाठी रखडणारी तूर खरेदी, हमीभाव देऊन शेतकऱ्याचे कल्याण केल्याच्या फसव्या घोषणा, जीएसटीच्या अंमलबजावणीतील अडथळ्यांच्या शर्यतीमुळे जेरीस आलेले लघु उद्योजक, गुंतवणूक, रोजगार याबाबत सरकारी जाहिरातींमध्ये आणि भाजपच्या नेत्यांच्या भाषणांमध्ये दिल्या जाणाऱ्या आकड्यांचे वास्तवातील रूप, मंत्रालयातच आत्महत्या करण्याचे सुरू झालेले नवीन प्रकार या सर्व घटनांमधून पुढे येणाऱ्या जनतेतील नाराजीची धग कायम ठेवण्यासाठी सर्व विरोधक सरसावले आहेत. सत्तेत राहूनही शिवसेना भाजपविरोधात डरकाळ्या फोडत स्वत:चे पाय घट्ट करून घेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने विविध आंदोलनांच्या माध्यमातून ‘हल्ला’ सुरू केला आहे. याशिवाय दलित, आदिवासी आणि मुस्लिम मतांवर भिस्त असणाऱ्या लहानमोठ्या पक्ष, संघटनांनी त्यांच्या प्रभाव क्षेत्रात आणि आघाडीच्या विषयांवर जनमानसात घुसळण सुरू केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर, देशातील सर्वात जुना-जाणता पक्ष असा वारसा सांगणारा काँग्रेस मात्र आपापली संस्थाने जपणारे तेच तेच जुने चेहरे, त्यांची प्रभावहीन वक्तव्ये, जनतेपासून नाळ तुटल्याने आलेला कृत्रिमपणा, सत्तेची ऊब संपल्यावर निष्प्रभ ठरलेल्या माजी मंत्री, आमदार, खासदार, पदाधिकाऱ्यांमधील सुस्तावलेपणा यामुळे जनता दूरच, स्वपक्षीय कार्यकर्त्यांमध्येही अंगार पेटवण्यात अपयशी ठरताना दिसतो आहे. 


सत्ताधाऱ्यांपासून सगळ्याच पक्षांनी निवडणुकीचा गिअर टाकला आहे. भाजपच्या बूथ-प्रमुख कार्यकर्त्यांची फळी केव्हाच उभी राहिली आहे. त्यांच्या मार्गदर्शन बैठकांच्या दोन फेऱ्या होवून गेल्या आहेत. बूथनिहाय कार्यकर्त्यांची तालुका पातळीवरील संमेलने सुरू झाली आहेत. त्यात भाजप युवा मोर्चा आणि महिला आघाडी आघाडीने उतरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळापासून रस्त्यावरील आंदोलनांपर्यंत आक्रमकपणे विरोधात उतरली आहे. त्या तुलनेत  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस संघटना मात्र पक्षाला संजीवनी देण्यासाठी आणि भाजपसारख्या बलाढ्य सत्ताधाऱ्यांच्या समोर विरोधकांची फौज तयार करण्यात तोकडी पडत आहे. आतापर्यंत जळगाव, औरंगाबाद आणि परभणी अशी तीन जिल्हा शिबिरे घेण्यात आली. त्यात अशोक चव्हाणांपासून पृथ्वीराज चव्हाणांपर्यंत सर्व नेते एका स्टेजवर बघायला मिळाले हीच काय ती जमेची बाजू. मात्र, स्थानिक पातळीवर नेस्तनाबूत झालेल्या संघटनेला पुनरुज्जीवित करण्यासाठी ही शिबिरे पुरेशी नसल्याचे सगळेच कार्यकर्ते सांगतात. त्यातही नेतेच बोलतात. कार्यकर्त्यांच्या काय अडचणी आहेत, त्यांना काय वाटते हे मांडण्याची संधीच नाही. भाजप बूथ स्तरावर पोहोचत असताना, काँग्रेसने किमान तालुका पातळीवर तरी पोहोचावे अशी अपेक्षा कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. फादर बॉडीसोबतच युवक आणि महिला काँग्रेसचीही शिबिरे याच वेळी घेण्यात येत आहेत. एकवेळ युवक काँग्रेसच्या बॅनरखाली चार-दोन युवक तरी जमतात, पण महिला काँग्रेसचे तर जिल्हा आणि शहर पातळीवर नामोनिशाण उरलेले नाही. विशेष म्हणजे, संस्थानिक नेतृत्वावर सामान्य कार्यकर्ते प्रचंड नाराज आहेत. त्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांना उमेद देईल, ऊर्जा देईल अशा चेहऱ्याची सगळ्यांना अपेक्षा आहे. 


काँग्रेसने सुरू केलेल्या या जिल्हा शिबिरांमुळे कार्यकर्त्यांमध्ये आशा निर्माण झाल्या आहेत. भाजप सरकारचे दावे आणि प्रत्यक्ष परिस्थिती, २०१४ च्या निवडणुकीतील जाहीरनामे आणि प्रत्यक्षातील पूर्तता याबाबत या शिबिरांमध्ये कार्यकर्त्यांची बौद्धिके घेण्यात येत आहेत. पण नेत्यांच्या साचलेपणात ही शिबिरे विखुरलेली पक्षसंघटना सावरण्यात, स्थानिक गटबाजी संपवून तरुण आणि सामान्य कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करण्यात अपुरी पडत आहेत. एकटे केंद्रीय नेतृत्व ‘तरुण’ होऊन गरजेचे नाही, तर राज्य आणि जिल्हा पातळीवरील नेतृत्वात तसे बदल होणार का, हा खरा मुद्दा आहे. 


सध्या कापूस उत्पादक पट्ट्यात शेतकऱ्यांना हैराण करणारी बोंडअळी थेट मुळांच्या गाठीवाटे जमिनीपर्यंत पोहोचली आहे. त्यासाठी आता कोणतीच फवारणी कामी येत नाही. मुळासकट जुनी झाडं उपटून बाजूला करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्याप्रमाणे, पक्षनेतृत्वातही काँग्रेसमधल्या जुन्या बोंडअळ्या बाजूला करून नवीन नेतृत्वाला कधी संधी देणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर, ‘टीम राहुल’च्या माध्यमातून गुजरात आणि राजस्थानमध्येही काँग्रेसच्या प्रचाराची धुरा सांभाळलेले नाना पटोले यांच्याकडे जिल्हा पातळीवरील काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या आशेने पाहत आहेत. राजीव सातव यांच्याकडूनही कार्यकर्त्यांच्या बऱ्याच अपेक्षा आहेत. विद्यमान प्रदेशाध्यक्ष, विरोधी पक्षनेते ही मानाची पदे हलवू नका, हवे तर नवीन आणि तरुण चेहऱ्यास कार्याध्यक्ष करा, अशी मागणी पुढे अाली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या पातळीवर राहुल गांधींना कार्याध्यक्ष करून पक्षातील मरगळ झटकण्याचा प्रयोग झाला. महाराष्ट्रात कार्याध्यक्षपदाचा प्रयोग नवीन नाही. याआधी माणिकराव ठाकरेंना प्रदेशाध्यक्षपद देताना काँग्रेसने जयवंतराव आवळेंना कार्याध्यक्ष केले होते. त्या वेळी ते राजी-नाराजीचे राजकारण होते, पण आता आधी लढाई स्वत:च्या अस्तित्वाचीच आहे, नंतर विरोधक म्हणून सत्ताधाऱ्यांसोबतची.


- दीप्ती राऊत

बातम्या आणखी आहेत...