आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्नाटक : अंक दुसरा (अग्रलेख )

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संयमाचा अभाव व सत्तेचा उन्माद यामुळे कर्नाटकात भाजपची फजिती झाली. येदियुरप्पा यांना विश्वासदर्शक ठराव मांडण्यापूर्वीच राजीनामा द्यावा लागला. त्यांना याची सवय आहे व सवयीप्रमाणे भावनांना हात घालणारे भाषण त्यांनी केले. अशा भाषणांचा परिणाम होण्याचे दिवस आता राहिलेले नाहीत. सत्ता मिळवण्यासाठी सर्व धडपड होती हे जनतेला माहीत आहे.

 

त्यामध्ये बहुसंख्य जनता, विशेषत: भाजपचे समर्थक काही गैर मानीत नाहीत. काँग्रेसबाबतही असेच म्हणता येते. सत्तास्पर्धेचा खेळ दोन्ही बाजूंनी चालला व त्याच्या पहिल्या फेरीत भाजप पराभूत झाला. यामुळे देशातील वारे फिरल्याचा भास काँग्रेससह अनेकांना होत आहे. असा भास कार्यकर्त्यांना करून देणे हे काँग्रेससाठी आवश्यक आहे. पण देशातील राजकीय विश्लेषकांनाही असा भास व्हावा याचे आश्चर्य वाटते.

 

कुमारस्वामींपुढे मुख्यमंत्रिपदाचे गाजर ठेवून कर्नाटकात काँग्रेसने लाज झाकली असली तरी भाजपचा विस्तार झाकता येणार नाही. भाजपची ताकद वाढली हे वास्तव आहे व या वाढत्या ताकदीमुळेच भाजपबरोबर आघाडी करण्यास कुमारस्वामी तयार झाले नाहीत. आक्रमक भाजपपेक्षा दुबळी काँग्रेस परवडली असा हिशेब त्यांनी केला. कर्नाटक वाचवण्याची गरज काँग्रेसला मध्य प्रदेश व राजस्थानसाठी होती. शनिवारच्या पत्रकार परिषदेत राहुल गांधींचा आविर्भाव विजयी वीराचा असला तरी भाषा जुनीच, म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सर्व खापर फोडणारी होती. ही भाषा माध्यमांमध्ये व काही गटांमध्ये लोकप्रिय असली तरी त्यापलीकडे पसरलेल्या विशाल भारताला या भाषेचा कंटाळा आला आहे हे राहुल गांधींच्या जितके लवकर लक्षात येईल तितके बरे. जनतेला नवी भाषा बोलणारा नेता हवा आहे.

 

राहुल यांना अद्याप ते जमलेले नाही. कर्नाटकात सिद्धरामय्या यांचे सरकार उत्तम काम करीत होते, असा निर्वाळा अनेक जण देत होते.  तरीही काँग्रेसच्या जागा वाढवण्यात राहुल गांधींना यश आले नाही. याउलट येदियुरप्पांसारखा तुरुंगात जाऊन आलेला उमेदवार असूनही मोदींनी भाजपच्या १५-२० जागा वाढवल्या. दोन नेतृत्वांमधील हा फरक आहे किंवा दोन नेत्यांकडे बघण्याच्या जनतेच्या दृष्टीत हा फरक आहे. हा फरक दूर करण्याचे मोठे आव्हान राहुल गांधी व त्यांच्या फौजेकडे आहे. 


कर्नाटकातील दिलजमाई फसवी आहे आणि त्या निमित्ताने होणारा प्रादेशिक पक्षांचा शो हाही मोदींच्या अनेक इव्हेंटप्रमाणे एक इव्हेंट आहे. कुमारस्वामींचा उद्याचा सोहळा देखणा होईल व त्याला झाडून सारे मोदी विरोधक हजेरी लावतील. माध्यमांमध्ये त्याची रसभरित चर्चाही होईल. असा सोहळा होणे हे काँग्रेसप्रमाणेच प्रत्येक प्रादेशिक पक्षाची मानसिक व राजकीय गरज आहे. मात्र कर्नाटकमधील गावागावांतील परिस्थिती साधीसरळ नाही.

 

कर्नाटकमधील ज्या मतदारसंघात सेक्युलर जनता दल विजयी झाला आहे, त्यातील बहुतांश ठिकाणी त्या पक्षाने काँग्रेसचा पराभव केला आहे. काँग्रेस व सेक्युलर जनता दलाच्या कार्यकर्त्यांमध्ये अनेक ठिकाणी पश्चिम बंगालप्रमाणे हाणामारी झाली आहे. देवेगौडा व भाजप यांच्यात साटेलोटे आहे या राहुल गांधींच्या प्रचारामुळे मुस्लिम मतदारांवरील पकड सुटली याचा राग कुमारस्वामींच्या मनात आहे. गौडा कुटुंबाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या हसन जिल्ह्यात भाजपचा शिरकाव झाला तो मुस्लिम मते फुटल्यामुळे, असे सेक्युलर जनता दलांच्या नेत्यांचे मत आहे. सेक्युलर जनता दल व काँग्रेस एकत्र आल्यामुळे दक्षिण कर्नाटकातील या पट्ट्यात भाजपला पाय टाकण्यास जागा मिळेल. दोन्ही पक्षांतील अस्वस्थ नेते भाजपकडे वळतील अशी धास्ती स्थानिक नेत्यांना वाटते.

 

सेक्युलर जनता दलाचा विस्तार संपूर्ण कर्नाटकात नाही. यामुळे काँग्रेस व देवेगौडा यांची दिलजमाई झाली असली तरी कार्यकर्त्यांच्या पातळीवर मने जुळणे अवघड असल्याचे स्थानिक लोक सांगतात. भाजप अतिशय आक्रमक असल्याने त्या पक्षाबरोबर आघाडी करणे धोक्याचे असले तरी काँग्रेस कमी धोक्याचा पक्ष नाही. याशिवाय मंत्रिपदांवरूनही रस्सीखेच होऊ शकते. ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम अशा मलिदा देणाऱ्या खात्यांवर काँग्रेस व जद या दोघांचा डोळा आहे. भाजपची बी टीम असे काँग्रेसकडून जनता दलाला हिणवण्यात येत होते. पण स्वत: काँग्रेस मंत्रिमंडळात बी टीम म्हणून राहणार नाही आणि कुमारस्वामी व देवेगौडा थोडीही सत्ता सोडणार नाहीत. बारा वर्षे सत्तेबाहेर राहिल्यामुळे जनता दलाला सत्तेची अधिक गरज आहे.

 

त्या जिवावरच २०१९ व पुढील विधानसभा निवडणूक लढण्याची ताकद मिळणार आहे. त्यामुळे सत्तेसाठी जनता दलाकडून अधिक रस्सीखेच चालेल. लोकसभा निवडणुकीआधी हे सरकार पडावे यासाठी भाजपचा आटापिटा होईल व सरकार टिकवण्यासाठी काँग्रेस-जदची धडपड राहील. कर्नाटकातील पुढील अंक रंगतदार असतील.

बातम्या आणखी आहेत...