Home | Editorial | Agralekh | Divya marathi article write on tutikorian strike

अहंगंडाचे बळी (अग्रलेख)

दिव्य मराठी | Update - May 26, 2018, 02:00 AM IST

तामिळनाडूतील थुथुकुडी अर्थातच तुतीकाेरीन जिल्ह्यातील वेदांता-स्टरलाइटच्या विस्तारामुळे झालेले अांदाेलन हे देशातील पर्याव

 • Divya marathi article write on tutikorian strike

  तामिळनाडूतील थुथुकुडी अर्थातच तुतीकाेरीन जिल्ह्यातील वेदांता-स्टरलाइटच्या विस्तारामुळे झालेले अांदाेलन हे देशातील पर्यावरण अांदाेलनांपैकी सर्वाधिक हिंसक ठरले. यामुळे ना समाजाचे भले हाेणार अाहे, ना उद्याेग क्षेत्राचे. यापूर्वीही पर्यावरण रक्षणासाठी चिपकाे, अप्पकाे, टिहरी धरण, नर्मदा सराेवर प्रकल्पावरून अनेक अांदाेलने झाली. परंतु ताे संघर्ष शांततापूर्ण हाेता, गांधीवादी विचारसरणीची प्रेरणा त्यामागे हाेती. नंदीग्राममधील शेतकऱ्यांच्या संघर्षाला माअाेवाद्यांनी हिंसक खतपाणी घातले, त्यात १४ जणांचा बळी गेला.

  अलीकडच्या काळात पर्यावरणाच्या मुद्द्यावरून हाेत असलेली शांततापूर्ण अांदाेलने एक तर मूक किंवा पराभूत ठरत अाहेत. त्यामुळे राष्ट्रीय हरित लवादाकडे दाद मागणे किंवा हिंसक प्रतिराेध करणे हे दाेनच पर्याय पर्यावरणवाद्यांसमाेर राहिले अाहेत. सध्या वादाच्या भाेवऱ्यात अडकलेली ‘स्टरलाइट’ ही वेदांताची उपकंपनी अाहे. वेदांता म्हणजे बिहारमधील अनिल अगरवाल यांची पाेलाद - खाण उद्याेगातील अग्रगण्य अाणि लंडन शेअर बाजारातील लिस्टेड अशी पहिली भारतीय कंपनी हाेय. या स्टरलाइटचे बस्तान रत्नागिरीत बसवण्याचे सुरुवातीला घाटत हाेते.

  त्यासाठी १९९२ मध्ये एमअायडीसीने ५०० एकर जागा दिली. मात्र स्थानिकांचा विराेध, अभ्यास गटाच्या अहवालानंतर काम थांबवले गेले अाणि ही कंपनी तामिळनाडूत स्थलांतरित झाली. दरवर्षी चार लाख टन तांब्याची निर्मिती अाणि ११.५ बिलियन डाॅलर्सची या कंपनीची उलाढाल लक्षणीय ठरावी. अार्थिकदृष्ट्या हा उद्याेग यशस्वी ठरला असला तरी सामाजिक भान राखण्याकडे व्यवस्थापनाने दुर्लक्ष केले हे तितकेच खरे. १९९६ पासून मूळ प्रकल्पाला विराेध हाेत असताना राज्य सरकार, न्यायालय अाणि पर्यावरण प्राधिकरण परस्परविराेधी भूमिका घेत गाेंधळ वाढवत राहिले.

  भरीस भर म्हणजे पर्यावरण, प्रदूषणविषयक कायदा गुंडाळून ठेवत; स्थानिकांना विश्वासात न घेता विस्तारीकरणाचा वेदांताच्या व्यवस्थापनाने घाट घातला. मात्र खनिजांच्या विघटन प्रक्रियेमुळे निर्माण हाेणारा विषारी वायू, तसेच अन्य घातक रसायनांचा भूजलासह वातावरणातील वाढता प्रादुर्भाव, गेल्या १० वर्षापासून सतत तक्रारी करूनही प्रशासकीय व्यवस्थेकडून हाेणारे दुर्लक्ष यामुळे साहजिकच सारी सरकारी यंत्रणा कंपनीधार्जिणी असल्याचा समज बळावत गेला. त्यामुळे अांदाेलनाचे हत्यार उपसण्याशिवाय लाेकांसमाेर पर्याय नव्हता. अांदाेलनाचा १०० वा दिवस साजरा करण्यासाठी माेर्चेकरी जमले, पाेलिसांचा फाैजफाटा बंदाेबस्तावर हाेता.

  परंतु पाेलिसांना अधीक्षकांची सुरक्षा महत्त्वाची वाटली; त्यांनी माेर्चेकरी महिला, मुलांवर थेट गाेळ्या झाडल्या. त्यात १० जणांचा बळी गेला. त्यानंतर मद्रास उच्च न्यायालयाने स्टरलाइटला स्थगिती दिली. कदाचित हा निर्णय अगाेदर झाला असता, तर ही नामुष्की अाेढवली नसती.
  माेर्चेकरी असाेत की पाेलिस, हे दाेघेही एकाच समाजाचेच घटक असले तरी मात्र अशा घटनांतून सामाजिक संतुलन हरवत चालले असल्याचे अलीकडच्या काळात सातत्याने पाहायला मिळते अाहे. तुतीकाेरीनमधील अांदाेलनास लागलेल्या हिंसक वळणामुळे काही मुद्दे एेरणीवर अाले.

  महत्त्वाचे म्हणजे एखाद्या प्रकल्पाच्या विराेधात नागरिक जिवावर उदार का हाेतात? सुरक्षा व्यवस्थेने अांदाेलकांबाबत किती प्रमाणात हिंसक व्हावे याबाबत काही नियम असावेत का? जर असतील अाणि त्याचे पालन हाेत नसेल तर संबंधितांवर कारवाई हाेते का? अन्य ठिकाणच्या बाबतही यापेक्षा वेगळा अनुभव पाहायला मिळत नाही. त्यामुळे ही बाब समाजविराेधी शासन व्यवस्थेचे लक्षण ठरत नाही का? नागरिक हिंसक हाेतात, किंवा हाेऊ शकतात म्हणून पाेलिस किंवा सुरक्षा दलाने रक्तपिपासू व्हायचे का, हा खरा प्रश्न अाहे.

  हिंसक प्रवृत्तीच्या अाहारी जाण्यापासून जमावाला राेखणे हे पाेलिसांचे खरे काम अाहे, परंतु क्वचितप्रसंगी त्याची प्रचिती येते. अर्थातच त्यास पाेलिसांची असहायता कारणीभूत असते. काेणत्याही सुविधा, सुटीशिवाय तणावपूर्ण कामामुळे त्यांचे ढासळत चाललेले मनाेधैर्य हे सामाजिक स्वास्थ्यासाठी कसे धाेकादायक ठरते, तेच तुतीकाेरीनमध्ये पाहायला मिळाले.

  एकुणात या साऱ्या प्रकरणामागे दडलेला प्रस्थापित राजकीय, सामाजिक, प्रशासन व्यवस्थेतील अहंगंड झाकून राहिलेला नाही. कारण, सध्या सत्ताधारी-विराेधकांत, प्रशासन-नागरिकांमध्ये अबाेला वाढत चालला अाहे, त्यामुळे लक्ष वेधून घेण्यासाठी प्रत्येकाला टाेकाचे पाऊल उचलावे वाटते. तुतीकाेरीनचे स्टरलाइट प्रकरण, अाैरंगाबादेतील कचराकाेंडी असाे की अाणखी काही, अगदी क्षुल्लक कारणावरूनही लाेक इतरांचा जीव घ्यायला अाणि स्वत:चा द्यायला इरेला पेटत अाहेत अाणि हे थांबवायचे असेल तर अगाेदर राजकीय-सामाजिक संस्कृती बदलावी लागेल, हे निश्चित.

Trending