आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रासंगिक; इच्छामरण: संवेदनशील दिशा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कौरव-पांडव युद्धात शरपंजरी पडलेल्या भीष्माचार्यांनी ५८ दिवस मृत्यूला थोपवून धरले होते व नंतर त्यांनी देहत्याग केला. महाभारतात इच्छामरणावर तात्त्विक चर्चा नसली तरी इच्छामरण आपल्या संस्कृतीला परिचित आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि आचार्य विनोबा भावे यांनी तर प्रायोपषणाने मरण स्वीकारले. जगामधल्या सर्वच तत्त्वज्ञानांनी ‘जन्म ते मृत्यू’ हा या चराचर सृष्टीतील जीवनाचा अटळ प्रवास आहे, प्रत्येक क्षण हा मृत्यूकडे घेऊन जात असतो, हे त्रिकालाबाधित सत्य मानून मानवी जीवनाचे तत्त्वज्ञान उभे केले आहे. माणसाने मृत्यू स्वीकारला असला तरी त्याची जगण्याची अभिलाषा कमी होत नाही. आपण जी वैज्ञानिक प्रगती केली आहे त्यामागे माणसाला चांगले जगता यावे हा खरा हेतू आहे. आपल्या राज्यघटनेनेही प्रत्येकाला ‘सन्माना’ने जगण्याचा अधिकार दिला आहे. या देशातल्या राजकीय व्यवस्थेने कसाही राज्यशकट चालवला तरी प्रत्येक व्यक्तीचा सन्मानाने जगण्याचा अधिकार त्याला हिरावून घेता येत नाही, असा अत्यंत मूलभूत व मौलिक अधिकार राज्यघटनेने दिला आहे. या सन्मानाच्या जगण्याच्या अधिकारावरून इच्छामरणावरचा वाद अधिक गुंतागुंतीचा झाला आहे. सुमारे चार दशके कोमात असलेल्या अरुणा शानभाग यांना इच्छा मरण द्यावे यासाठी दोन वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल झाली होती. त्या वेळी न्यायालयाने ही याचिका फेटाळली होती, त्यानंतर ‘पॅसिव्ह युथनेशिया’ म्हणजे रुग्णाचा आजार वैद्यकीय उपचारांच्या कक्षेच्या बाहेर गेला असेल तर त्याला मरण द्यावे, अशा युक्तिवादाची चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने काही अटींच्या आधारावर रुग्णाला इच्छामरण देण्यास परवानगी देऊन हा विषय अधिक खुलेपणाने पुढे आणला. न्यायालयाचा हा निर्णय ऐतिहासिक तर आहेच आणि त्यामुळे या विषयावर विविधांगाने चर्चा घडू शकते, ती प्रगत समाजासाठी अधिक उपयुक्त आहे. कारण न्यायालयाने, व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा अधिकार जसा घटनेने दिला आहे, असे सांगताना एखाद्याला इच्छामरण हवे असेल ते सन्मानाने वेदनारहित मिळावे, अशा त्या रुग्णाच्या इच्छेकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे मत दिले आहे. म्हणजे, न्यायालयाने केवळ दुर्धर आजाराने ग्रस्त झालेल्या, मरणासन्न व्यक्तीच्या इच्छामरण व्यक्त करण्याच्या संवेदना समजून घेतल्या आहेत व त्यावर सहमती व्यक्त केली आहे. त्यामध्ये अन्य कारणांमुळे जगण्यास कंटाळलेल्यांचा विचार केलेला नाही. मुंबईतील गिरगावात राहणारे लवटे दांपत्य आम्ही मनसोक्त जगलो असून, आम्हाला मुलेबाळे नाहीत, आमची वयेही झाले आहेत त्यामुळे आम्हाला जगण्याची अजिबात इच्छा नाही, असे सांगत गेली २० वर्षे न्यायालयीन लढा देत आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रपतींकडे एक पत्र पाठवून आमच्या इच्छामरणास परवानगी न दिल्यास आत्महत्या करण्याचाही धमकीही दिली आहे. त्यांच्या भूमिकेवर न्यायालयाने मत व्यक्त केलेले नाही व लवटे दांपत्याला या निर्णयातून दिलासाही मिळालेला नाही.  


इच्छामरणाचा मुद्दा हा तसा कायदेशीर पातळीवर गुंतागुंतीचा आहे आणि तो योग्य कायदे तयार झाल्याशिवाय सुटणार नाही. कारण संपत्तीच्या लोभापायी व अन्य व्यक्तिगत लाभासाठी अंथरुणाला खिळलेल्या एखाद्या रुग्णावर बळजबरी, धाकदपटशा, दबाव आणून इच्छामरण लादले जाऊ शकते. आपल्याकडे वृद्धांच्या समस्याही वाढत आहेत, त्यात आजारावरचा वाढता खर्च हे प्रमुख कारण आहे. हा सामाजिक प्रश्न जटिल स्वरूपाचा आहे. त्यामुळे न्यायालयाने अशा बाबी समजून आपल्या निर्णयात काही अटीही सुचवल्या आहेत. त्यानुसार जिवंत असताना एखाद्या व्यक्तीने मला दुर्धर आजार झाल्यास व तो आजार वैद्यकीय उपचारांच्या मदतीने बरा होत नसल्यास मला इच्छामरण द्यावे, असे इच्छापत्र दोन साक्षीदारांच्या उपस्थितीत न्यायदंडाधिकाऱ्याकडे सादर करावे, अशी एक महत्त्वाची अट घातली आहे. शिवाय डॉक्टरांचे मतही त्याबाबतही ग्राह्य धरण्याची अट घातली आहे. या अटीमुळे इच्छामरण प्रक्रियेत एक प्रामाणिकपणा, पारदर्शीपणा व मोकळेपणा येईल. जगातल्या काही देशांत इच्छामरणाचा हक्क तेथील नागरिकांना देण्यात आला आहे. पण खरे तर हा प्रश्न विविध मानवी संस्कृतींशी व उत्तरोत्तर प्रगत होत जाणाऱ्या आधुनिक मानवी समाजाच्या बदलत जाणाऱ्या धारणांशी अधिक निगडित आहे. माझ्या शरीरावर फक्त माझा अधिकार राहील हा मूलभूत हक्क मान्य केला तरी जे वैद्यकीय जगत रुग्णाला जगवण्याचा शेवटपर्यंत निकराने प्रयत्न करते त्याच्या नैतिक भूमिकेविरोधातही हा झगडा आहे. यातून समन्वय काढणे गरजेचे आहे. सर्वोच्च न्यायालयाने इच्छामरणावर मत देताना वैद्यकीय संशोधनाकडे, मतांकडे दुर्लक्ष केलेले नाही, त्यांनी वैद्यकीय ज्ञानाच्या मर्यादा विचारात घेत मृत्यू हा जगण्याच्या प्रक्रियेतील एक हिस्सा आहे हे मान्य केले आहे. हे महत्त्वाचे आहे.

बातम्या आणखी आहेत...