आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ऐक्या’च्या दिशेने जाताना ( अग्रलेख )

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तारदिनाच्या वर्धापनदिनानिमित्त दरवर्षी वेगवेगळ्या मंचांवरून कार्यक्रम साजरे केले जातात. यंदा ते सर्व मंच विसर्जित करून ‘एक विचार एक मंच’ ही संकल्पना राबवली गेली. त्यात भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाने मात्र सहभाग घेतला नाही. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्वंतत्र मंचावरून भाषण केले. अर्थात, ऐक्यासाठी आपण आपला गट विसर्जित करायला तयार आहोत, अशी मल्लीनाथीही त्यांनी आपल्या स्वतंत्र मंचावरून केली. तरीही ऐक्याच्या दृष्टीने तयार झालेल्या सकारात्मक वातावरणात आठवलेंनी खोडा टाकला आहे, असेच सर्वसामान्य आंबेडकरी जनतेला वाटते आहे. त्यामुळेच आठवलेंना भाषण करण्यापासून रोखण्याचा प्रयत्नही झाला. पोलिसांनी तो प्रयत्न हाणून पाडला असला तरी रामदास आठवले यांच्या ऐक्याविषयीच्या भूमिकेतील प्रामाणिकपणाबद्दल जनमानसात शंका निर्माण झाली आहे. ती दूर करण्यात आठवलेंना यश अाले नाही. ती निर्माण करण्यात कोण यशस्वी झाले, हेही त्यांना चांगलेच ठावूक आहे. रिपब्लिकन पक्षांचे ऐक्य झाले की एकत्रित अध्यक्षीय मंडळ राजकीय भूमिका ठरवेल आणि त्यात भाजपची साथ सोडावी लागेल, हे आठवले यांना कळते आहे. म्हणूनच आपले मंत्रिपद जावे यासाठीच हा घाट घातला गेला आहे, अशी त्यांची भावना आहे. ती त्यांनी जाहीरपणे व्यक्त देखील केली. त्या भावनेमुळेच त्यांनी ‘एक विचार एक मंच’ संकल्पनेपासून दूर राहाण्याचा निर्णय घेतला. ही परिस्थिती बदलायला किती काळ जावा लागेल, याचे गणित ज्याला पक्के कळेल त्यालाच रिपब्लिकन पक्षांच्या ऐक्याचे भाकित करता येईल, ही वस्तुस्थिती आहे.


एकीच्या बळाचे महत्व नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. आंबेडकरी विचारांच्या पक्षांची एकी वाढली तर त्यांना राजकीय आणि पर्यायाने सामाजिक लाभ नक्कीच अधिक मिळतील, हे उघड आहे. म्हणूनच सर्वसामान्य आंबेडकरी जनतेला ऐक्य हवे आहे. याच सर्वसामान्यांतून आलेल्या नव्या पिढीने एका मंचाची कल्पना पुढे आणली. ती बऱ्यापैकी यशस्वीही झाली. नव्या पिढीचा दबावच तेवढा होता, असाही दावा केला जातो आहे. पण  एका कार्यक्रमासाठी एका मंचावर आले म्हणजे रिपब्लिकन पक्षांचे ऐक्य झाले, असे समजण्यात अर्थ नाही. आंबेडकरी विचारांच्या पक्षांची आजची स्थिती पाहाता ते तितके सोपेही नाही. इतिहासाची देखील साक्ष आहेच.  १९९६ साली अशाच तरुणांच्या दबावामुळे रिपब्लिकन पक्षांना ऐक्य करावे लागले होते. त्याही आधी वामनदादा कर्डक यांच्या उपोषणामुळे ऐक्य झाले होते; दोन्ही वेळी काय झाले, तर आपापसातील मतभेदांमुळे त्या ऐक्याची पुन्हा शकले झालीत. बॅरिस्टर खोब्रागडे, बी.सी. कांबळे, दादासाहेब गायकवाड, रा. सु. गवई अशी दिग्गज मंडळी आणि पुढे राजा ढाले, प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले, गंगाधर गाढे अशी मंडळी आपले सुभे सांभाळत होती. त्यांना एकत्र आणणे शक्य झाले असले तरी एकत्र ठेवणे अशक्य होते. आज तेवढे गट नाहीत. जनाधार असलेले रामदास आठवले आणि प्रकाश आंबेडकर आणि विदर्भात काम करणारे जोगेंद्र कवाडे यांच्याच मागे आज बहुतांश आंबेडकरी जनता विभागली गेली आहे. पण रामदास आठवले आणि प्रकाश आंबेडकर यांचे वैचारिक कल म्हणजे दोन टोके आहेत. जनकल्याणासाठी सत्ता आणि सत्तेसाठी भाजपसारखा अत्यंत उजवा पक्षही आठवलेंना चालतो. प्रकाश आंबेडकर मात्र पूर्णपणे डाव्या बाजुला झुकलेले. त्यांना डाव्यांसमोर काँग्रेसही उजवी वाटते अशी स्थिती आहे. अशा परिस्थितीत डावे आणि उजवे एक होऊन ऐक्याची टाळी वाजेल, असे स्वप्न भोळ्या भाबड्या आंबेडकरी जनतेला कोणी दाखवत असेल तर ती त्यांची फसवणूक आहे. रामदास आठवले तेच करीत आहेत. ऐक्यात प्रकाश आंबेडकर सहभागी होऊन नेतृत्व करणार असतील तर आपण त्यात त्यांचे सरदार बनायला तयार आहोत, असे ते सांगतात. ते सांगताना ऐक्याचा ‘फार्म्युला’ तयार करावा लागेल असेही ते नमूद करतात. कारण असा एकमताचा फार्म्युला तयार करणे हेच महाकठीण कर्म आहे हे त्यांना ठावूक आहे. शिवाय, नेतृत्वाबाबत जनमताचा कौल घेतला पाहिजे, अशीही मेख ते मारतात. अशा अटी प्रकाश आंबेडकर मान्य करणार नाहीत याचीही त्यांना कल्पना आहे. त्यामुळेच त्यांची ती भाषा आहे. कोरेगाव भीमा प्रकरणानंतर प्रकाश आंबेडकरांमागे आंबेडकरी जनता सध्या तरी मोठ्या प्रमाणात आहे, हे समोर आले आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांबाबत आताच थेट नकारात्मक बोलणे परवडणारे नाही, हेही आठवले यांना कळते आहे. त्यामुळेच अप्रत्यक्ष अटींच्या पाचर मारण्याचे काम त्यांनी व्यवस्थित केले आहे. सर्वसामान्य आंबेडकरी जनतेच्या हे लक्षात येईल, तो सुदिन म्हणायचा. 

बातम्या आणखी आहेत...