Home | Editorial | Agralekh | Editorial About German national football team loss against South Korea

'जर्मन मशिन्स'चा पाडाव (अग्रलेख)

दिव्य मराठी | Update - Jun 29, 2018, 06:28 AM IST

खेळाच्या मैदानात इतिहासाला किंमत नसते, हे कितीही खरे मानले तरी ताकदवान संघाचा सामना असेल तर काही अपेक्षा स्वाभाविकपणे ठे

  • Editorial About German national football team loss against South Korea

    खेळाच्या मैदानात इतिहासाला किंमत नसते, हे कितीही खरे मानले तरी ताकदवान संघाचा सामना असेल तर काही अपेक्षा स्वाभाविकपणे ठेवल्या जातात. गेल्या ८० वर्षांत जो संघ एकदाही गट फेरीत बाद झाला नाही, तो तुलनेने एका सामान्य संघाकडून मात कसा खाईल? चार वेळा फुटबॉल विश्वचषक जिंकणाऱ्या संघाला एकदाही बाद फेरीत न पोहोचलेला संघ कसा हरवेल? युरोपीय लीगमध्ये तोडीस तोड संघांविरुद्ध धडाकेबाज, दांडगट खेळ दाखवणाऱ्या खेळाडूंशी तुलनेने दुबळे आशियाई खेळाडू स्पर्धा तरी करू शकतील का? या आणि अशा इतर गृहीतकांचा चक्काचूर झाल्याचे जेमतेम काही तासांपूर्वी जगाने पाहिले. फुटबॉल जगतात क्रमांक एकवर असणाऱ्या जर्मनीला चक्क फुटबॉलच्या विश्वचषकातून गाशा गुंडाळावा लागला; तोही थेट ५७ व्या क्रमांकावर असलेल्या दक्षिण कोरियाकडून. विश्वचषक स्पर्धेत आशियाई संघाकडून माती खाण्याची वेळ जर्मनीवर पहिल्यांदाच आली. त्या अर्थाने 'युरोपीय मानवी क्षमता' पहिल्यांदाच 'आशियाई मानवी क्षमते'पुढे कमी पडली. जर्मनीमध्ये सध्या 'राष्ट्रीय दुखवटा' असल्यासारखे वातावरण आहे. दक्षिण कोरियाकडून 'दोन विरुद्ध शून्य' अशा पराभवाची कल्पना जर्मन चाहत्यांनी स्वप्नातदेखील केली नव्हती. परंतु, जे घडले त्यामुळे जर्मनीच काय, फुटबॉल विश्व स्तब्ध झाले आहे. "रशियात जर्मनी कधीच जिंकत नाही, हा इतिहास आहे,' अशी अत्यंत उथळ प्रतिक्रिया जर्मनी-दक्षिण कोरिया सामन्यानंतर समाज माध्यमांमधून व्यक्त झाली.

    दुसऱ्या महायुद्धातल्या नाझी सैन्याला रशियाच्या तगड्या प्रतिकाराचा सामना करावा लागला. रशियाच्या चिवटपणामुळे दुसऱ्या महायुद्धाचे आणि युद्धानंतरच्या जगाचे सगळे संदर्भ बदलले. हिटलरचा पराभव घडवणारा संघर्ष रशियन सैन्याने केला. ते संदर्भ सध्या रशियात सुरू असलेल्या फुटबॉल विश्वचषकातल्या जर्मनीच्या पराभवाशी जोडण्याचा प्रकार बालिश आहे. चुकीच्या चर्चांना जन्म देणाऱ्या अशा वावदूक प्रतिक्रिया टाळून फुटबॉलची गंमत लुटायला हवी. एकूण सामन्यात ७४ टक्के वेळ फुटबॉल जर्मनीच्या ताब्यात होता. अठ्ठावीस 'शॉट' त्यांनी मारले. यातल्या एकाचेही रूपांतर गोलमध्ये होऊ शकले नाही. या उलट फुटबॉलवर २६ टक्के वेळच ताबा मिळवू शकलेल्या दक्षिण कोरियाच्या जिगरबाज खेळाडूंनी दोन गोल करून दाखवले.


    थरारक, वेगवान, तीव्र संघर्ष असे शब्द जर्मनी विरुद्ध दक्षिण कोरिया या सामन्याच्या वर्णनासाठी वापरावे लागतील. मैदानात उतरलेल्या क्षणापासून कोरियाच्या खेळाडूंनी जी जिद्द, आक्रमण आणि विजिगिषू वृत्ती दाखवली त्याला तोड नव्हती. उलट जर्मनीचे खेळाडू दडपणाखाली असल्याचे स्पष्ट जाणवत होते. विश्वचषकातून बाद होण्याचा धोका त्यांच्या देहबोलीतून निथळत राहिला. खरे तर जर्मनीच्याही आधी कोरियासुद्धा या विश्वचषकातून जवळजवळ बादच झाला आहे. आता मेक्सिकोने स्वीडनला धक्का दिला तरच काही धूसर आशा दक्षिण कोरियाला असतील. असे असूनही विश्वचषकाच्या इतिहासातील धक्कादायक आणि संस्मरणीय विजयाची नोंद कोरियाने करून दाखवली. तांत्रिकदृष्ट्या अद्ययावत, अजोड गुणवत्ता, शिस्तबद्ध, काटेकोर आणि अविरत काम देणारी ही जगभर नावाजल्या जाणाऱ्या 'जर्मन मशिन्स'ची पाच वैशिष्ट्ये सांगितली जातात.

    जर्मन माणूस आणि जर्मन खेळाडूही बऱ्याच अंशी अशा 'मशीन'सारखाच. या उपरही फुटबॉल संघाची कामगिरी अशी केविलवाणी का, हा जर्मनीतला सध्याचा राष्ट्रीय पेचप्रसंग बनला आहे. जर्मन पद्धतीने त्याचा पंचनामा ते करतील. प्रत्येक स्पर्धा जुन्या नायकांना मागे टाकून नव्या नायकांना जन्म देत असते. यंदाची स्पर्धा त्याला अपवाद ठरणार नाही. रोनाल्डो, मेस्सी, नेमार, केन अशा मोजक्या 'स्टार्स'कडे जाहिरातदारांचे लक्ष आहे. परंतु, अचानकपणे दक्षिण कोरियासारखा संघ असा लखलखाट करतो की क्रीडाप्रेमींचे डोळे दिपून जातात. फुटबॉलचा दर्जा किती उंचावावा याला काही मर्यादा उरलेल्या नाहीत. छोट्या-छोट्या देशांचे संघ कमालीच्या जिद्दीने बड्या संघांविरुद्ध खेळत आहेत. प्रतिस्पर्ध्याची पार्श्वभूमी, इतिहास, श्रीमंती, त्यांना मिळणाऱ्या सुविधा, प्रशिक्षण यातल्या कशाचेही दडपण न घेता धडाकेबाज कामगिरी करत आहेत. प्रस्थापितांच्या दांडगाईला तितक्याच धिटाईने उत्तर देत आहेत. मैदानातला हा संघर्ष युद्धाची अनुभूती देणारा आहे. जिंकण्याची आग असली की कोणावरही मात करता येते, हे दक्षिण कोरियाने करून दाखवले. कोणताही सामना आधी मनाने जिंकावा लागतो; त्यानंतरच तांत्रिक सफाईदारपणा, रणनीती आणि शारीरिक कौशल्ये कामाला येतात, हा धडा जर्मनीला मिळाला. आशियातही अजून अव्वल न झालेल्या भारतासारख्या अनेक देशांसाठी दक्षिण कोरियाचा विजय प्रेरणादायी आहे.

Trending