आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'जीएसटी'ची वर्षपूर्ती (अग्रलेख)

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'एक देश, अनेक कर' ही प्रणाली रद्दबातल करून 'एक देश, एक कर' ही अर्थसंकल्पीय प्रणाली १५ वर्षांपूर्वी मांडण्यात आली, तेव्हा अशी प्रणाली देशात लागू करण्यात प्रचंड अडचणी येतील. अनेक दशकांची गुंतागुंतीची प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष कर रचना मोडीत काढावी लागेल. संघराज्यांमध्ये करवसुलीवरून संघर्ष निर्माण होऊन देशात आर्थिक अराजक माजेल असे बोलले जात होते. ही भीती अगदीच व्यर्थ नव्हती. कारण हा काळच प्रादेशिक पक्षांच्या प्रभावाचा होता. केंद्रात आघाडीचे दुबळे सरकार आणि त्यांच्यावर प्रादेशिक पक्षांचा दबाव असल्याने सत्तेची समीकरणे सुटण्याला प्राधान्य दिले जात होते. त्यात देशातल्या अनेक राज्यांत प्रादेशिक पक्षांचे सरकार असल्याने आर्थिक संघर्ष अपरिहार्य होते. 

प्रत्येक राज्याची विकासाची परिभाषा वेगळी होती. त्याचा परिणाम देशाच्या आर्थिक विकासावर होत होता. काही राज्ये आधुनिक जीवनशैलीकडे वाटचाल करणारी होती तर काही राज्ये कुपोषण, दुष्काळ, अन्नधान्याची टंचाई, आरोग्याच्या विविध प्रश्नांनी भंजाळलेली होती. अशा परिस्थितीत करसंकलनाची प्रक्रिया व त्यांचे वाटप यामध्ये मूलगामी व क्रांतिकारी बदल करण्याची गरज होती. जीएसटी हा एक असा मार्ग होता, की त्याचे दृश्य परिणाम विकसित देशांमध्ये दिसून आले होते. एकाच वस्तूवर विविध कर लावण्यापेक्षा एक कर लावल्यास त्या कराचे संकलन करणे सोपे जाते, करबुडवेगिरीला चाप बसतो, नवे करदाते वाढतात, करजाळे विस्तारता येते, करप्रणाली पारदर्शी, सोपी होते, भ्रष्टाचाराला कमी संधी मिळते आणि महत्त्वाचे म्हणजे केंद्राच्या आर्थिक धोरणांचा राज्यांच्या विकास प्रक्रियांवर प्रभाव पडून केंद्राकडून आर्थिक मदतीचे समन्यायी वाटप होऊ शकते, याची उदाहरणे दिसत होती. अशा परिस्थितीत भारत ही एक संघटित बाजारपेठ घडवायची असेल तर जीएसटीला पर्याय नाही हे स्पष्ट झाल्यानंतर तिची अंमलबजावणी अनेक राजकीय वाद-तिढे सोडवत गेल्या वर्षी १ जुलैला सुरू झाली. त्याचे परिणाम आता हळूहळू दिसायला लागले आहेत. 

'दैनिक भास्कर समूहा'ने गेल्या वर्षभरातले जीएसटीचे संकलन, त्याचा उद्योग जगतासह सामान्यांवर झालेला परिणाम याचा वेध घेण्याचा प्रयत्न केला असता अनेक सकारात्मक बाबी दिसून आल्या आहेत. त्यानुसार आगामी वर्षात २०१८-१९ मध्ये जीएसटीमुळे कर गंगाजळीत सुमारे चार लाख कोटी रु.ची वाढ होऊन प्राप्तिकरातही २ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम मिळण्याचा अंदाज आहे. शिवाय आंतरराज्य व राज्यात ५० हजार रु.पेक्षा जास्त वस्तूंच्या वाहतुकीसाठी अनिवार्य केलेल्या ई-बिलमुळे दरमहा १० हजार कोटी रु.ची वाढ होऊ शकते. ई-बिलाच्या सक्तीमुळे कच्च्या बिलांचे प्रमाण कमी होईल, ते करजाळ्यात येतील, असे वाटते. सध्या काही वस्तूंवर जीएसटीचे दर अधिक असल्याने व्यापारी कमी किमतीत विनाबिल वस्तू विकत देतात वा कमी किंमत झालेल्या वस्तूंवर बिल देण्याचे टाळतात, या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ग्राहकांसाठी तक्रार निवारण हेल्पलाइन सुरू केली जाणार आहे. त्याचबरोबर सरकार जीएसटीचे दर आणि कराचे वेगवेगळे टप्पे कमी करत जाणार आहे. 


पेट्रोल-डिझेल, मद्य यासारख्या वस्तूंना जीएसटीत आणण्यासाठी जीएसटी परिषदेवर सहमती आणण्याचे सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. हे प्रयत्न सफल झाल्यास महागाई कमी होईल, त्याचबरोबर करसंकलनात भर पडेल. सरकारला करपरताव्याची समस्याही लक्षात आली आहे. कमी धंदा झालेल्या उद्योजकाला दर महिन्याला कर परतावा भरणे अशक्य असते. दोन कोटी रु. पेक्षा अधिक धंदा करणाऱ्या व्यापारी, उद्योजकांना विशेषत: अशा परताव्याचा जाच असतो. त्यावरही तोडगा काढण्याचा प्रयत्न होत आहे. हे बदल वर्षभरानंतर आलेल्या एकूण निष्कर्षानंतर होणार असतील तर योग्य म्हटले पाहिजेत. 


जीएसटी प्रणालीतील एक मुद्दा जो अधिक चर्चेतला आहे तो इंधनाला जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा. केंद्र व राज्य सरकारला इंधनावर मिळणारा कर अत्यावश्यक आहे. कारण त्यातून विकास योजना राबवता येतात. विशेषत: राज्यांना जीएसटीमुळे केंद्रावर अवलंबून राहावे लागत असल्याने ते इंधनावरचा आपला करहक्क सोडण्यास राजी नाहीत. हा तिढा सोडवण्याची वेळ आली आहे. केंद्र सरकार तिढा सोडवण्याच्या दिशेने पावले उचलत आहे, असे सूताेवाच अर्थमंत्र्यांनी रविवारी केले आहे. आगामी संसद अधिवेशनात जीएसटी अधिक सुटसुटीत करण्यासाठी सरकार काही विधेयकेही आणत आहे. त्यातून लहान व्यापाऱ्यांच्या तक्रारी दूर होतील अशी आशा करण्यास हरकत नाही. संघराज्य प्रणाली बळकट करणारी ही कररचना उत्तरोत्तर अधिक पारदर्शी होत गेल्यास देशात विकासाचे सुसंगत रूप पाहायला मिळेल. 

बातम्या आणखी आहेत...