आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मिरी अपयश (अग्रलेख)

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेहबूबा मुफ्ती यांच्या पीडीपीबरोबर सत्तेवर येऊन काश्मीर समस्येवर तोडगा काढण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न फसला. तीन वर्षांतच भाजपला सत्तेतून बाहेर पडावे लागले. ही आघाडी अनैसर्गिक असल्याची रास्त टीका प्रथमपासून होत होती. तरीही एक नवा प्रयोग म्हणून त्याकडे पाहता येऊ शकत होते. मात्र, या प्रयोगात समाधानाचे दिवस कधीच अनुभवास आले नाहीत. मुळात भाजप व पीडीपीच्या आमदारांसह कार्यकर्त्यांना ही आघाडी पसंत नव्हती. सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय होताच भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षांनी उघड आनंद व्यक्त केला. इतकेच नव्हे, तर अशी आघाडी करू नका, असे आपण पहिल्या दिवसापासून हायकमांडला सांगत होतो, असेही स्पष्ट केले. पीडीपीशी आघाडी करण्यातील धोके मोदी वा त्यांच्या सल्लागारांनी वेळीच ओळखले नसावेत. यातील मुख्य धोका काश्मीर खोऱ्यातील जनता हा होता. काश्मीर खोऱ्यातील जनतेलाच हे सरकार मान्य नव्हते. यामुळे अनेक विकास कार्यक्रम हाती घेऊन, त्यावर अब्जावधी रुपये खर्च करूनही मोदींना काश्मिरी जनतेचा विश्वास मिळाला नाही. भाजपचे राज्य ही कल्पनाच काश्मिरी जनतेला सहन होण्यासारखी नव्हती. काश्मीरमधील निवडणूक निकालांचे विस्तृत विश्लेषण सीएसडीएस व लोकनीती यांनी केले होते. ते पाहिले असता काश्मिरी भारतापासून किती दुरावले आहेत याची पूर्ण कल्पना येऊ शकत होती. भाजपची बहुसंख्या असलेल्या जम्मूमधील हिंदूंनाही खोऱ्यातील काश्मिरींशी जवळीक नको होती. काश्मीर व जम्मूमधील या दुफळीचा फायदा पाकिस्तानचे लष्कर घेत होते. अशा परिस्थितीत पीडीपीबरोबर आघाडी करण्याचे साहस मोदींनी केले. साहसात फसगत होऊ शकते. तशी ती झाली व मोदींना माघार घ्यावी लागली. 


मोदींची चूक साहस करण्यामध्ये नव्हती. साहस दाखवण्याची क्षमता नेतृत्वात असावी लागते. मात्र, ते साहस नीट माहिती जमा करून व परिस्थितीचा अंदाज बांधून करावे लागते. मोदींना काश्मीरमधील परिस्थिती व मेहबूबा मुफ्ती यांचा पुरेसा अंदाज आला नाही. पीडीपी हा पक्ष पहिल्यापासून पाकिस्तानधार्जिणा आहे. ओमर अब्दुल्ला यांचे सरकार भ्रष्ट होते, पण ते पाकिस्तानधार्जिणे नव्हते. मुफ्तींचा पक्ष उघडपणे बोलत नाही. पण पाकिस्तानच्या पंखाखालील स्वतंत्र काश्मीर हा त्या पक्षाचा अजेंडा आहे. असा पक्ष सत्तेमध्ये सहभागी असताना काश्मीर खोऱ्यातील पोलिस वा अन्य प्रशासकीय यंत्रणांवर भाजपचा ताबा असणे शक्यच नव्हते. साहजिकच मोदींची वक्तव्ये भारीभक्कम असली तरी रस्त्यावर फुटीरतावादी शक्तींचे वर्चस्व होते. या वर्चस्वाला चाप लावणे मेहबूबांना शक्य नव्हते. तशी त्यांची इच्छाच नव्हती. पाकिस्तानला विश्वासात घेऊनच काश्मीर समस्या सुटू शकते हा जप मेहबूबा करत होत्या. आजही त्यांचा हा जप सुरू आहे. भाजपबरोबरची आघाडी मेहबूबांना कितपत पसंत होती याचीही शंका आहे. कारण मुफ्ती महंमद सईद यांच्या मृत्यूनंतर सरकार बनवण्यासाठी त्यांनी बराच काळ भाजपला तंगवले होते. तरीही पुढील वर्ष-दीड वर्ष भाजपने मेहबूबांबरोबर कारभार केला. पण शेवटी हा कारभार चालणे अशक्य आहे हे लक्षात आले व सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय भाजपने घेतला. 


काश्मीरमधील परिस्थिती सातत्याने खालावत असल्याने दृढनिश्चयी पंतप्रधान या मोदींच्या प्रतिमेला धक्का पोहोचत होता, म्हणून लोकसभा निवडणुकीचा विचार करून पाठिंबा काढून घेतला गेला असा एक तर्क केला जातो. तो पूर्णपणे चुकीचा आहे असे नाही. तथापि, भाजपने पाठिंबा काढून घेताच अर्ध्या तासातच मेहबूबांनी राजीनामा दिल्यामुळे या सर्व प्रकारातील गूढ वाढले आहे. भाजपला वगळून काश्मीरमध्ये सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न कुणीच केला नाही. राष्ट्रपती राजवट लागू करण्यावर भाजपसह पीडीपीचेही एकमत असावे आणि त्याला काँग्रेस व नॅशनल कॉन्फरन्स यांची छुपी साथ असावी अशा पद्धतीने तीन तासांत सर्व घटना घडल्या. काँग्रेस, पीडीपी व नॅशनल कॉन्फरन्स यांना सरकार बनवणे शक्य होते. पण तसा किरकोळ प्रयत्नही झाला नाही. मेहबूबा मुफ्ती यांची राजीनाम्याची तत्परता हा यातील कळीचा मुद्दा आहे. 


या तत्परतेमागच्या कारणावर प्रकाश पडलेला नाही. काश्मीरमध्ये आता राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळे केंद्र सरकार व लष्कराला अधिक स्वातंत्र्य मिळेल. त्याचा फायदा घेऊन काश्मीरमध्ये वरकरणी शांतता प्रस्थापित होते का हे पाहावे लागेल. काश्मीरला विकासाच्या मार्गावर आणण्याचा प्रयत्न मोदींनी केला, पण तेथील जनतेचा मनोग्रह वेगळा होता व त्याला पीडीपीची साथ होती. जनतेची मने जिंकणे व मेहबूबाची मर्जी राखणे या दोन्ही ओझ्यातून आता मोदींची सुटका झाली आहे. त्यातून देशाच्या हाती काय लागते पाहायचे. 

बातम्या आणखी आहेत...