आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रासंगिक: निवडणुकीचा ‘गरम’ मोसम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र विधान परिषदेचे सहा सदस्य निवृत्त झाल्यामुळे त्यांच्या जागी नव्याने आमदार निवडून आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. भारतीय जनता पक्षाचा वारू चौफेर उधळत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होतानाच पाठोपाठ आचारसंहितेचा अंमलही सुरू झाला आहे.  नाशिकसह कोकण, परभणी, अमरावती, वर्धा अन्् लातूर या मतदारसंघांतील सदस्य अलीकडेच निवृत्त झाले. या मतदारसंघाचे वैशिष्ट्य म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था जसे नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदांचे सदस्य याचे मतदार असतात.

त्यामुळे विधान परिषदेची निवडणूक ही अत्यंत चुरशीची ठरते असा आजवरचा लौकिक आहे.

कारण, विधानसभेच्या उमेदवाराची निवड सुमारे दोन ते अडीच लाख मतदारांतून होते. या उलट विधान परिषदेच्या सदस्याची निवडणूक स्थानिक अर्थात गावपातळीवरील राजकारणाचे वलय, गावगुंडगिरीचा अनुभव  गाठीशी असलेल्या वा त्याला सामोरे गेलेल्या मोजक्याच मतदारांकडून होते. गावच्या वा शहराच्या नगरपालिका वा महानगरपालिकेत नगरसेवक अथवा नगरसेविका होताना मतदारांकरवी आलेल्या कडू-गोड अनुभवाची शिदोरी या मंडळींकडे असते. त्यामुळे विधान परिषदेची निवडणूक म्हटली की चुरस ही ठरलेलीच असते. निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याच्या किमान वर्षभर आधीच पक्षाची उमेदवारी पदरात पाडून घेण्यापासून ते निवडून येईपर्यंत इच्छुकांच्या पायाला अक्षरश: भिंगरी बांधलेली असते.

 

स्वपक्षातील तसेच विरोधी पक्षातील मतदार तसेच निवडणुकीत कळीची भूमिका पार पाडणारे नेते यांची मर्जी कशी राखायची याची ‘फिल्डिंग’ लावण्याचे कसब इच्छुकांना दाखवावे लागते. प्रत्येक निवडणुकीत निवडणूक आयोगाकरवी उमेदवारांसाठी आदर्श आचारसंहिता जारी केली जाते. त्याच पद्धतीने ती या निवडणुकीसाठीही लागू झाली असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थांतील मोजक्या सदस्यांमधून विधान परिषद सदस्याची निवड होणार असल्याने त्याची राजकीय व्यूहरचनाही तेवढ्याच तोलामोलाची असते. विधान परिषदेच्या आजवर झालेल्या निवडणुकीवर दृष्टिक्षेप टाकला तर निवडणुकोत्तर काळात आर्थिक उलाढालीचे आरोप-प्रत्यारोप, मतदारांची फोडाफोडी, वादविवाद, परस्परांविरोधात न्यायालयात जाणे, हमरीतुमरी अशी सगळी नाट्य बघावयास मिळतात.

 

नाशिकची निवडणूक ही अशा नाट्यांतील एक ज्वलंत उदाहरण आहे. राष्ट्रवादीचे बहुचर्चित नेते छगन भुजबळ यांच्या भरभक्कम पाठिंब्यामुळे सलग दोन वेळा विधान परिषदेवर निवडून गेलेले जयवंत जाधव यंदा निवृत्त झाले. या महोदयांच्या दोन्ही निवडणुका वादग्रस्त ठरल्या.  हे प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयात गेले. प्रकरण न्यायप्रविष्ट झाले म्हटल्यावर त्याचे पुढे काय होते हे सर्वश्रुतच आहे. एकदा थोड्या मताने तर दुसऱ्यांदा चिठ्ठीवर नशीबवान ठरलेल्या जयवंतरावाच्या दोन टर्म पूर्ण झाल्या तरीही न्यायालयाचा अंतिम निवाडा काही आला नाही अन्् त्यांचे प्रतिस्पर्धी अॅड. शिवाजीराव सहाणे यांना न्यायालयाकडून  दिलासा मिळू शकला की नाही हे त्यांनाच ठाऊक. उलट, शिवाजीरावांनी ज्या शिवसेनेच्या माध्यमातून जयवंतरावांना आव्हान देण्याचा कसोशीने प्रयत्न केला त्यांनाच पक्षाने बाहेर घालवले.

 

सहाणे यांनीही हार न मानता विधान परिषदेचा गड सर करायचाच, असा मनोमन चंग बांधत पुन्हा लढाईची मोर्चेबांधणी सुरू केल्याने नाशिकची निवडणूक चुरशीची होण्याची स्पष्ट चिन्हे आहेत. असे एकूण चित्र सध्या दिसत असले तरी अलीकडे पार पडलेल्या नगरपालिका, महानगरपालिका वा नगरपंचायतींच्या निवडणुकीमध्ये भाजपने ज्या रीतीने बाजी मारली त्यामुळे ठिकठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये  त्यांचे संख्याबळ चांगलेच वाढले आहे. याकडे कानाडोळा करून चालणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल मोर्चामुळेही राज्यातील वातावरण बऱ्यापैकी ढवळून निघाले आहेच.

 

काँग्रेसही नाही म्हणायला गुदमरण्यापेक्षा हातपाय मारताना दिसते आहे. तथापि, विधान परिषदेच्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आवश्यक असलेले संख्याबळ असो की पक्ष नेतृत्वाचा उत्साह, तो सध्या तरी भाजपमध्ये दिसतो आहे. त्यामुळे राज्यातील विधान परिषदेच्या सहा जागांसाठी येत्या २१ मे रोजी होणारी निवडणूक अत्यंत चुरशीची होईल यात कोणाचेच दुमत असू शकत नाही. कारण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना २०१९ च्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेतील पक्षाची ताकद वाढवायची आहे. त्यामुळे त्यांची व्यूहरचना ही सहाच्या सहा जागांवर भाजपचेच वा ते शक्य नसेल तर पुरस्कृत उमेदवार कसे निवडून येतील अशीच राहणार आहे. पक्षाच्या दृष्टीने विदर्भातील वर्धा व अमरावती या जागा हमखास प्रतिष्ठेच्या असतील त्यामुळे ही निवडणूक गरमदेखील आहेच. बघूया, घोडा-मैदान जवळच आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...